प्रॉमिस डे

 #प्रॉमिस_डे
#नित्याचाच
#तरीही_खास
 
©️ अंजली मीनानाथ धस्के
    आज जरा घाईचा दिवस होता. संपवू म्हंटल तरी कामे संपतच नव्हती. फोनवर सतत वाजणाऱ्या नोटीफीकेशन साऊंड ने तर तिचं डोकं उठलं होतं. घाईने तिने फोन हातात घेतला तर त्यावर व्हॅलेंटाइन आठवड्यानिमित्त अनेक मित्र मैत्रिणींचे आपल्या जीवनसाथी  सोबतचे विविध आनंदी क्षण असलेले फोटो, व्हिडिओ संदेश होते. ते मेसेज वाचून तिला उगाचच वाटायला लागलं की सगळं जग प्रेम व्यक्त करत असतांना आपण मात्र घरगुती कामात अडकून पडलो आहोत. तिला प्रकर्षाने जाणीव झाली की ,' हल्ली आपण मुद्दाम असं प्रेम व्यक्त करतच नाही. व्हॅलेंटाईन डे  साजरा करणं काही आपली संस्कृती नाही हे कितीही माहीत असलं तरी कोणत्याही एका दिवसाची वाट न पाहता प्रेम व्यक्तही तर करणं जमत नाही.  आपण संसाराच्या जबाबदाऱ्या वाटून घेतांना सगळ्यांचे कौतुक करतो पण एकमेकांना मुद्दाम कधी वेळ देत नाही. ते काही नाही आपणही आपल्या प्रेमाला चारचौघांसारखं व्यक्त करायला हवं.' 
असा विचार डोक्यात सुरू असतांनाच  तिने चपात्या करायला घेतल्या. जेमतेम दोन चपात्या लाटल्या आणि  तिने नवर्‍यासाठी,' लव यू' असा मेसेजही टाइप केला. मेसेज पाठविण्याआधी तिचे लक्ष तव्यावरच्या चपातीचे गेले. अन्‌ गॅस सिलेंडर संपले आहे हे लक्षात येताच झटकण फोन बाजूला ठेवला. आता तिची अजूनच चीडचीड झाली.
         'ऑनलाईन बुकींगसाठी नवऱ्याचा फोन नंबर दिलेला होता. आता तो ऑफिस मिटिंगमधे बिझी असणार. आता संध्याकाळपर्यंत बुकिंग करण्यासाठी थांबव लागणार . दुसरं सिलेंडरही  मैत्रिणीच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून तिला दिलेलं आहे.' असे स्वगत सुरू असतांना
"या गॅस सिलिंडरलाही आजच संपायच होतं' म्हणत ती चरफडत होती. 
              तेवढ्यात तिचा फोन वाजला. नवर्‍यावर असलेले प्रेम व्यक्‍त करण्याचे विचार केव्हाच मागे पडले होते. त्यामूळे नवऱ्याने केलेला फोन बघून त्याचा जास्त वेळ न घेता तिने पट्कन गॅस सिलिंडर संपल्याच सांगून टाकलं.
" बुकिंग करायला विसरू नको " असं बजावलं आणि फोन ठेवून दिला.
        कामापुरता स्वयंपाक झाला होताच. राहिलेली कणिक तिने फ्रीज मधे ठेवली. ओटा आवरून इतर कामं करायला घेतली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
          दार उघडलं तर समोर त्याच्या मित्राचा ऑफिस बॉय सिलेंडर घेवून उभा. " दादांचा फोन आला म्हणून ताबडतोब आमच्या कॅन्टीनचा सिलेंडर घेवून आलो. नवीन सिलेंडर येईपर्यंत वापरायला होईल " असं म्हणून तो सिलेंडर ठेवून निघूनही गेला.
      त्याला  खास एका दिवशी प्रेम व्यक्त करता येत नाही पण माझ्या "सुख दुःखात " साथ देण्याच वचन मात्र तो आजही न चुकता पाळतो  या जाणिवेने ती खूप सुखावली.
      नेमकी ती अडचणीत असतांना नेहेमी त्याचा स्वतःहून फोन कसा येतो? न सांगताही त्याला तिच्या छोट्या मोठ्या अडचणी कशा कळतात? स्वतः कामात बिझी असूनही त्याला तिच्या अडचणीला प्राधान्य देणे कसे जमते? रोज न चुकता ऑफिसमधे पोहोचल्यावर 'पोहोचलो ' तर लंच टाईममधे ' तू जेवलीस का?' असा मेसेज पाठविणे कसे जमते? तिचा मूड खराब असतो तेव्हाच फ्रीजमधे डेअरी मिल्क कसे असते? तिची तब्येत ठिक नसते तेव्हा त्याला सुट्टी घेवून तिच्या आवडीचा मेनू बनविण्याची लहर कशी येते? तिच्या माहेरच्या माणसांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना शुभेच्छा  संदेश पाठविणे कसे जमते? आज अचानक या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तिला नकळत उमगली आणि तिच्या चेहर्‍यावर त्याच्या प्रेमाची लाली चढली. आयुष्य आनंदी असण्यासाठी प्रेम व्यक्त करता येण्यापेक्षा प्रेम निभावता येणे आवश्यक असते. याची जाणीव होवून तिने पुन्हा फोन हातात घेतला. त्यावर नवर्‍यासाठी मघाशी टाईप केलेला 'लव यु' चा मेसेज अजूनही प्रतिक्षेत होता. खरं तर आता  'लव यु बोलना तो बनता है' असे वाटून तिचे तिलाच हसायला आले. तरीही तिने 'लव यु' चा मेसेज डिलीट करून ,'थँक्यू, आज थोडे लवकर यायला जमेल का?' असा मेसेज पाठवून दिला. थोड्या वेळात त्याचाही,'बघतो जमते का' असा मेसेज आला .
        तो मेसेज वाचून ती एकट्यातही लाजली आणि कोणत्याही कारणाशिवाय नवऱ्याच्या आवडीचे लाडू बनवायला घेतले. तो लवकर घरी येईल का नाही? लाडू गोड होतील की नाही? माहीत नाही पण त्याच्या संगतीने आयुष्य गोड होतंय या भावनेने ती आनंदून गेली.
 त्या दोघांचा आजचा प्रॉमिस डे मात्र कोणत्याही खोट्या, दिखाऊ प्रॉमीस देण्या घेण्या पासून अलिप्त राहिला. 
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिप: कथा आवडल्यास लाइक कमेंट तर कराच पण शेयर करतांना नावासहित करा ही विनंती.
इतर लिखाण आणि रांगोळ्या " आशयघन रांगोळी " anjali-rangoli.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहे.




No comments:

Post a Comment