जमा_खर्च (मनोगत २०१९)



    #जमा_खर्च
एका मागून एक वर्षे गेली पण जमा खर्च काही कधी मांडला नाही किंबहुना असा हिशोब करुन सरत्या वर्षाला निरोप द्यायचं धाडस कधी केलं नाही. आजही तस धारिष्ट्य करणार नाही. वर्ष आणि त्यातले क्षण अनेक चांगल्या वाईट अनुभवांनी व्यापलेले असतात. आहारात जशा सगळ्या चवी आवश्यक तसेच आयुष्यातले विविध अनुभव देणारे हे क्षण गरजेचे असतात. कसेही असले तरी ते क्षण फक्त आपले असतात. याच भावनेने मला आयुष्य जगायला आवडतं.
माझ्याकडे  करण्यासारखं सतत काही तरी चांगल असेल तर गेलेलं आणि येणार प्रत्येक वर्ष माझंच आहे असंच मी मानते.
अनेकदा आपण " काय मिळवलं" याचा आनंद  करण्यात आपण " काय दिलं " याची जाणीव कमी होत जाते. परंतु आपण सतत काही तरी चांगल दिलं तरच काहीतरी मिळवल्याचा आनंद उपभोगता येतो.
मिळवण्याच्या स्पर्धेत बरच काही देण्याचं राहून जातं.
         या वर्षी ही fb वर फेरफटका मारत असताना momsoresso मराठी ची " १००  शब्दांची गोष्ट " ही स्पर्धा दृष्टीस पडली. प्रियांका चोप्रा जोरजोरात हसते आहे असा व्हिडिओ दिला होता त्याला अनुसरून कथा लिहायची होती.
लिहावं असं काही मनात नसतांना त्या व्हिडिओ ने एक गमतीदार प्रसंग आठवला आणि त्याच प्रसंगाला शब्दात मांडल्या गेलं.
Momsoresso चा लगेच रिप्लाय आला ," कथा खूप छान आहे पण शब्द मर्यादा १०० शब्दांची आहे तेव्हा हिच कथा १०० शब्दात लिहून पुन्हा पोस्ट करा ".
        खरं तर ही १०० शब्दांची गोष्ट लिहिण्याची स्पर्धा आहे हे लिहिण्याच्या नादात मी विसरून गेले होते. लिहिलेला प्रसंग १०० शब्दात बसवणे मला अशक्य वाटतं होत. लिहणं असो की बोलणं ..... असं तोलून मापून करणं माझा पिंडच नव्हता. स्पर्धेचा विचार बाजूला ठेवून केवळ momspresso ने पुन्हा पोस्ट करा असं म्हंटल्याने , मला जमत नसतांनाही मी तो प्रसंग १०० शब्दात लिहून काढला आणि ' पिप्पी डंपरची' या नावाने  पोस्ट ही केला.
अचानक पुन्हा fb वर फेरफटका मारतांना माझी पिप्पी डंपरची ही कथा विजेती कथा म्हणून Mom'spresso मराठी च्या पेज वर माझ्या नावासहित झळकली .
आनंद गगनात मावेनासा झाला. Momspresso बद्दल काहीच माहिती नसतांना तिथून पुढे मला त्यांच्या १०० शब्दांची गोष्ट या स्पर्धेच्या पोस्ट दिसू लागल्या . गंमत म्हणून मीही लिहू लागले . १०० शब्दांच्या दोन कथा विजयी झाल्यावर मेसेंजर वर momspresso मराठी ने ," तुम्ही आमच्या ब्लॉगर ही बनू शकता" म्हणून ब्लॉगर बनण्यासाठीची सगळी माहिती पुरवली.
      आपल्या लिखाणासाठी कोणीतरी आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देते आहे म्हंटल्यावर मीही मग Mom'spresso मराठी पेज ला भेट दिली.  तिथे जानेवारी महिन्याची टॉप ब्लॉगर काँटेस्ट सुरू होती .
आशयघन रांगोळी हा माझा स्वतःचा ब्लॉग होताच . यावर मी रांगोळ्या आणि त्याला अनुसरून कथा, कविता , लेख किंवा प्रसंग लिहीत होतेच. इथे लिहिलेला बदाम हा लेख मी Mom'spresso मराठी वर " 'बदाम आई आणि मी' त्यांची ब्लॉगर म्हणून पोस्ट केला. त्यानंतर ही बरेच लेख , कथा पोस्ट केल्या .
सोबतच १०० शब्दांच्या कथा लिहिण्याचा नादच लागला.
डोक्याला लिखाण करण्यासाठी वेगवेगळे विषय मिळत होते आणि त्यानिमित्ताने लिखाण होत होतं. वाचकांना लिखाण आवडतं होतं.  बाकी कशाची अपेक्षाही नव्हती.
जानेवारी च्या टॉप ब्लॉगर काँटेस्ट मधे माझ्या ,' बदाम आई आणि मी " या ब्लॉग ची निवड झाली. आनंदाने मी ' सातवे आसमान ' वर पोहचले.  गंमत म्हणजे momspresso मराठीने यावेळी विजेत्या ब्लॉगर चे लाईव्ह इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं होतं. मला fb वर पोस्ट करणे, like,comment आणि शेअर याव्यतिरिक्त fbचे कोणतेही फीचर माहीत नव्हते.
विशाखा चाफेकर हिने सगळं समजावून सांगितलं. खूप आत्मविश्वास वाढवला . या लाईव्ह शो च्या निमित्ताने Momspresso मराठीच्या  टॉप ब्लॉगर ऋचा मयी यांच्यासोबत मैत्री झाली . काहीच माहिती नसल्याने लाईव्ह शो ला कनेक्ट व्हायला मला बराच वेळ लागला पण विशाखा ने ही वेळ खूप शिताफीने हाताळली. मी फारच नर्व्हस झाले होते पण तिने ," हिच तर लाईव्ह शो ची गंमत असते " म्हणत माझा आत्मविश्वास टिकवून ठेवला. ऋचा मयी यांच्या सोबत जेव्हा मी लाईव्ह शो मधे झळकले तेव्हा अनेकांनी मला मी कशी बोलले यापेक्षा ,'   ऋचा मयी यांच्या चांगल्या चांगल्या कथा आम्हाला WhatsApp वर वाचायला मिळतात. तुझ्यामुळे त्यांना प्रत्यक्षात बघता आलं' अशी प्रतिक्रिया दिली.
            या प्रतिक्रियेच वाईट वाटण्यापेक्षा पहिल्याच लिखाणात आपल्याला त्यांच्याशी मैत्री करता आली आणि आपण त्यांच्या सोबत लाईव्ह शो वर झळकलो याचा आनंद जास्त झाला. Momspresso मराठी ने लिखाणासाठी व्यासपीठ तर दिलंच पण अनेक चांगल्या, वल्ली मैत्रिणीही दिल्या. ब्लॉगर लेखिका म्हणून ओळख मिळवून दिली. चांगला वाचक मिळवून दिला. लिखाणासाठीचा आत्मविश्वास दिला . यासाठी Momspresso मराठी आणि विशाखा चाफेकरचे कितीही आभार मानले ते कमीच आहे .
 यावेळी ख्रिसमसच अतिशय सुरेख असं गिफ्ट momspresso मराठी कडून मिळालं ते म्हणजे
सरत्या वर्षाला निरोप देता देता ही momspresso मराठीने टॉप ब्लॉगर म्हणून माझ्या नावाचा उल्लेख केला. माझा फोटोही त्यांच्या पेज वर झळकला .
खरंच मन भरून आलं .....

मी इतर ऑनलाईन स्पर्धेतही भाग घेतला. विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये लिखाण करायचे नव्हते तर अभिनय करायचा होता. अभिनयाचा किडा वळवळला आणि इथेही यश मिळालं.
अनेक प्रयोग केले आणि ते आप्त स्वकियांच्या पचनिही पडले.
या वर्षात मला भरभरून प्रतिसाद तर मिळालाच पण परिस्थिती कशीही असली तरी आपल्याकडे असलेले चांगले तेच देता यायला हवे हेही मी शिकले. सोशियल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने करता येतो. आपले विचार प्रभावीपणे जनमानसात पोहचवता येतात याची जाणीव झाली.
शिकण्याचा हा प्रवास आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत असाच सुरू रहावा हिच इच्छा....

 आयुष्याचा या प्रवासात वेगवेगळ्या टप्यांवर ज्यांनी लाख मोलाची साथ दिली त्या सगळ्या आप्त स्वकियांचे, मैत्रिणींचे, वाचकांचे आणि शुभ चींतकांचे मनापासून खूप खूप आभार .....
तुमच्या स्नेहामुळेच हा प्रवास सुंदर आठवणींनी सजतोय तेव्हा असाच स्नेह कायम असू द्या....
नवीन वर्षासाठी मी कधीच कुठलाच संकल्प करत नाही किंबहुना संकल्प करण्यासाठी कधीच नवीन वर्षाची वाटही बघत नाही.
 त्यामुळेच वर्षा अखेरीस जमा खर्चाचा हिशोब ही मांडत नाही. दर वर्षाला निरोप देतांना मात्र ," पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त"  असं म्हणूनच निरोप देते. नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्ष सरत जात तसं ते भरभरून ' देतही ' जातं पण या भरभरून 'घेण्याच्या ' नादात माझ्याकडे असलेलं खूप काही ' द्यायचं ' राहून जातं ......
जे द्यायचं राहून गेलेलं असतं ते येत्या वर्षात देण्याचा प्रयत्न असतो ....
ही अपूर्णतेची  जाणीवच पूर्णेतेचा प्रवास सप्तरंगी बनवते ......

शेवटी एवढंच म्हणेन....

अपनों  के प्यार में
हम गमो की फिकर करते नहीं
मंज़िलो की तलाश में
हम कभी सफर करते नहीं
जिंदगी बसती है हर सीख में
हम हार जीत में उलझते नहीं
उड़ने का जस्बा ख्वाबों में
हम इनामो से तरक्की तोलते नहीं
जीना सीखा है पल पल में
हम सालों का हिसाब रखते नहीं

© अंजली मीनानाथ धस्के
https://www.momspresso.com/parenting/article/2019-mdhiil-nviin-ttonp-blongrs

No comments:

Post a Comment