फिटनेस फंडा

फिटनेस_फंडा   
            बागेतल्या झाडांमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या ओपन जिम मधील उत्साही माणसांना बघून, 'आजकाल फिटनेससाठी काय काय केलं जातं ' यावर चर्चा सुरू होती. सगळी तरुण झाडे सळसळ करत आपले मुद्दे मांडत होते. ज्येष्ठ वृक्ष मात्र शांत उभा होता. तेवढ्यात  सकाळी बागेत फिरायला येणाऱ्यांना आकर्षित करून स्वतःच्या क्लबचे  मेंबर बनवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी 'डान्सिंग फॉर फिटनेस' ची फ्री कार्यशाळा आज आयोजित केली आहे असे जाहीर केले. त्यांनी स्पीकर वर आधुनिक गाणी लावली. सगळ्या झाडांची सळसळ थांबली. कान मात्र टवकारल्या गेले. समोर काही मुले उभी राहून हात पाय कसे हलवायचे याबद्दल सूचना देवू लागली. फार काही प्रतिसाद मिळत नाही हे बघून लोकांचे लक्ष वेधून घेत त्यांच्यातील एका गुटगुटीत पोराने माईकचा ताबा घेतला. त्यावर  ," आपल्या आयुष्यात खूप टेन्शन असतात. त्या सगळ्यांना घटकाभर तरी विसरता आलं पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी थोडा तरी वेळ काढता आला पाहिजे. कसलीही लाज बाळगू नका. नाचता येत नसेल तर आम्ही शिकवू. हसत खेळत , झिंगाट ऐकत फिटनेस मिळवा आणि आयुष्याची गाडी बुंगाट पळवा". असे बोलला. तसे पुन्हा एकदा नव्या जोमाने गाणी लागली.
           " झिंग झिंग झिंगाट" ,
"तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक" अशी गाणी जोरात वाजू लागली.  सकाळी असली गाणी कानावर पडल्याने,  व्हायचं तेच झालं. पार्टी आणि व्यायाम यायला फरक न कळल्याने गाणी ऐकताच रात्रीचा हँग ओव्हर न उतरलेले काही जण त्यांच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत बेधुंद होऊन नाचत सुटले. मघाचा माईक हातात घेतलेला गुटगुटीत पोरगाही सूचना देत देत नाचायला लागला.
दुर बाकावर बसलेल म्हातारं मित्राला म्हणलं ," माझा नातूबी रोज रात्री  पार्टी का काय म्हणत असच गाणं लावून नाचतंय. डोकं उठवतंय . आता सकाळच्या पारी फिटनेसच्या नावावर डोकं उठवण्याचे यांना पैसे  द्यायचे? घोर कलयुग आलाय .... हरी ओम .. .. हरी ओम "
तेव्हढ्यात 'आवाज वाढव डिजे तुला आईची शपथ हाय' हे गाणं लागले. त्या गाण्याच्या तालावर उत्साहित तरुण झाडांनीही ताल धरला. ती सगळी अधिकच सळसळू लागली.
मघाशी माईक हातात घेऊन आयुष्याला बुंगाट पळवा म्हणणारा गुटगुटीत पोरगा आता नाचून थकल्याने कोपऱ्यात जावून धापा टाकायला लागला.
     तरी काही चाणाक्ष झाडांनी त्याला हेरलच. त्यांच्यात ," हा स्वतः अजून इतका गुटगुटीत आहे. जरा नाचला नाही तर धापा टाकतो आहे. हा काय लोकांची आयुष्य बुंगाट पळवणार?" अशी जोरदार चर्चाही रंगू लागली. 
          हा सगळा प्रकार गुपचूप बघणारं जून झाड मात्र, "संगीत संस्कृतीत प्रत्येक प्रहरासाठी एक विशिष्ट राग आहे. त्याचाच नेमका आजच्या पिढीला विसर पडला आहे" म्हणत खिन्न हसलं.' काळासोबत बदलायलाच हवं. बदलता येत नसेल तर निदान गप्प राहणे शिकायला हवे.' असे स्वत:लाच समजावत " तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे " या स्वतःच्याच जुन्या फिटनेस फंड्यावर डोळे मिटून घेत गार वाऱ्यासोबत ताल धरून डूलायला लागलं.

©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाण आवडल्यास प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका.
(या लेखाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या मालकीचे आहेत.)

No comments:

Post a Comment