भुरळ..... प्रतिबिंबाची

#भुरळ_प्रतिबिंबाची
#१००शब्दांचीगोष्ट

                आरशासमोर उभं राहून तिने अनेकदा स्वतःलाच समजावलं, "तू सुंदर नाही असच हा म्हणतो. खरं सौंदर्य माझ्या अंतरमनात आहे हे याला कुठे कळतं. यात मी माझं बाह्यरूप कधी बघतच नाही. याला  मनाशी संवाद घडवून आणण्याचं साधन मानते फक्त"
याच आत्मविश्वासाच्या जोरावर तिने 'विश्वसुंदरीचा'  किताबही पटकावला.
 मुकुट धारण केलेली ती आरशासमोर उभी राहिली तेव्हाही तो तिचे सौंदर्य मान्य करेना. आता तीही जिद्दीला पेटली. नाक,त्वचा, ओठ, दात,हनुवटी सुंदर करून घेण्यासाठी  शस्त्रक्रिया केल्या. अखेर  तिने आदर्श मापदंड असलेलं सौंदर्य मिळवलचं.
आता आरसाही,"तूच विश्वसुंदरी" म्हणतो.
तीही तिचं नवं रूप दिमाखात मिरवते.
 आरश्यातल्या  खोट्या प्रतिबिंबिनेच तिला अखेर भुरळ घातली. पूर्वीसारखा तिचा मनाशी संवाद आता होत नाही.
©️ अंजली मीनानाथ धस्के

No comments:

Post a Comment