ईश्वरी.... एक स्त्री मन


#ईश्वरी_एक_स्त्री_मन
©️ अंजली मीनानाथ धस्के 

           जागतिक महिला दिनानिमित्त सावित्री बाई फुले महाविद्यालयात डॉ. ईश्वरी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार होता.

            ईश्वरीची आई आता खूप थकली होती. तिला ईश्वरीचा खूप अभिमान होता.  ईश्वरीला आता कोणत्याही आधाराची गरज नव्हती. ती स्वतः आता अनेकांचा आधार बनली होती. 

      आज पर्यंत अनेक सत्कार समारंभ अनुभवलेल्या ईश्वरीला आज मात्र हा सत्कार घेतांना गहिवरून येत होते. ईश्वरीचा सत्कार झाला. तिने विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी स्वतःचे काही अनुभव सांगावे अशी तिला विनंती करण्यात आली. 

 क्षणात तिचे मन भूतकाळात गेले......
           घरात सगळी सुखे हात जोडून उभी होती. लग्नाला तेरा वर्षे होवूनही मुल बाळ नाही म्हणून सुभेदार कुटुंब दुःखी होते. अनेक नवस करून झाले होते. अखेर घरात पाळणा हलण्याची चाहूल लागली. संपूर्ण घर आनंदून गेले. सुभेदारांच्या घराचा वारस जन्माला आला. उशिरा का होईना परंतु मुलगा झाला म्हणून बाळाचे स्वागत अगदी धुमधडाक्यात झाले होते. 

          आजी आजोबा नातवाचे तोंड पाहून तृप्त झाले होते.  वंशाला दिवा मिळाला म्हणून बाळाचे नाव "दिपक" ठेवले. घरातले सगळेच दिपकच्या संगोपणाकडे  विशेष लक्ष देत. आई आणि बाबा दोघेही  क्रांतीज्योत सावित्री बाई फुले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. घरात मुल होत नव्हते तोपर्यंत आई आणि आजीला अनेकदा सामाजिक समारंभात कमीपणा घ्यावा लागला होता. दिपकच्या येण्याने त्याची भरपाई झाली होती. 
           आई दिपकच्या खाण्यापिण्याची, त्याच्यावर उत्तम संस्कार व्हावे यासाठी खास काळजी घेत होती. बाबा दिपकला अनेक बोध कथा वाचून दाखवत. दिपकशिवाय आजी आजोबांना तर एक क्षणही करमत नव्हते. दिपक त्याच्या आईप्रमाणे हळवा होता. शाळेत जाण्याचे वय झाले तेव्हा दिपकसाठी शहरातल्या सर्वात उत्तम शाळेची निवड करण्यात आली. दिपकचे बालपण अगदी लाडाकोडात जात होते. दृष्ट लागू नये असेच सारे घडत होते. दिपक अभ्यासातही हुशार होता.
        हळूहळू दिपक वयात येवू लागला तसे शारीरिक बदलांमुळे त्याची मानसिक घुसमट होवू लागली. इतर मुलांसारखे वागणे त्याला जड जावू लागले. त्याचे त्यालाच कळत नव्हते की, नेमके शरीर बदलते आहे की मन बदलते आहे. त्याच्या वयाच्या मुलांना मुलींबद्दल आकर्षण वाटत असे पण दिपकला मुलीसारखे राहण्याचे आकर्षण वाटू लागले होते. एकदा त्याने घरी कोणी नसतांना आईसारखा ओठांना हलका गुलाबी रंग लावला. डोळ्यात काजळ घातले. खांद्यावर आईची गुलाबी रंगाची चंदेरी ओढणी घेतली. कपाळावर चंद्रकोर टिकली लावली. कानात  मोत्याचे डूल घातले. आरशात स्वतःला असे नाजूक नटलेल्या रुपात बघून त्याला खूप आनंद झाला. रोजच्यापेक्षा त्याला त्याचे हेच रूप अधिक भावले.
                  मंदिरातून लवकर घरी आलेल्या आजीने त्याला अशा आवतरात बघितले. क्षणभर तर तिने त्या नाजूक रुपाकडे बघुन ओळखलेच नाही की, 'ती नाजुक दिसणारी मुलगी' म्हणजेच दिपक आहे. परंतू जेव्हा आजीच्या लक्षात आले तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने  काहीच न सुचून तीने दिपकला बाथरूममधे नेवून त्याच्या अंगावर थंड पाण्याच्या बादल्या ओतल्या. दिपकच्या आई वडिलांच्या कानावर झालेला प्रकार घातला. त्या दिवसापासून सगळ्यांच्या वागण्यात बदल झाला. दिपक इतर मुलांच्या संगतीमुळे तसेच टीव्हीवरील कार्यक्रमांमुळे बिघडतो आहे असे वाटून आई बाबांनी त्याचे शाळेव्यातिरिक्त बाहेर पडणे आणि टिव्ही बघणे बंद केले. 
           
      आईसारखे साधी लिपस्टिक आणि काजळ तर लावले होते. मग घरात सगळ्यांचे वागणे येवढे का बदलले ?.... अशा प्रश्न दिपकच्या बाल मनात घर करुन होता. 
            घरात सगळेच उच्च शिक्षित होते पण कोणालाही दिपकची घुसमट कळत नव्हती. काही दिवसांनी सगळं पूर्ववत होईल अशीच आशा सगळे बाळगून होते. 

        घरच्या वातावरणात काहीच बदलले नाही, सगळे पूर्वीसारखे आहे.  हे दिपकला भासावण्याचा केविलवाणा प्रयत्न घरात एकटी आईच करत होती.
             एके दिवशी घरी पाहुणे आले. सगळ्यांच्या गप्पा रंगात आल्या. तेवढ्यात कोणीतरी दिपकला विचारले," तुला मोठे झाल्यावर काय बनायचे आहे?" त्यावर दिपकने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले," मला आई बनायचे आहे". 
सगळी वातावरणात निःशब्द शांतता पसरली. त्यावर वडिल सावरासावर करत बोलले, " त्याची आई उत्तम प्राध्यापिका आहे तिच्या सारखेच त्यालाही उत्तम प्राध्यापक बनायचे आहे म्हणून तो म्हणतो आहे की आई बनायचे आहे." त्यांचे हे स्पष्टीकरण दिपकला मुळीच रुचले नाही पण घरी आलेल्या पाहुण्यांना मात्र ते पटले आणि त्यांच्या पूर्ववत गप्पा गोष्टी सुरू झाल्या. पाहुणे गेल्यावर  दिपकला बाबा खूप रागावले. आईने मात्र प्रेमाने कुशीत घेतले. आपले काय चुकते आहे हे दिपकला कळतच नव्हते . दिपकला आणि घरच्यांना कसे समजावून सांगावे हे आईला कळत नव्हते.
         आईने दिपकच्या वागण्याचा, मानसिकतेचा अभ्यास केला. त्यावर उपलब्ध असलेली सर्व शास्त्रीय माहिती वाचून काढली. त्याबाबत तज्ञ मंडळीशी चर्चा केली. त्यातून तिला जे काही कळले ते पचविणे तिच्यासाठी जेवढे कठीण होते त्यापेक्षाही घरच्यांना ते पटवून देणे महाकठीण होते. जिथे सामान्य माणसे एकमेकांना समजून घ्यायला कमी पडतात तिथे पुरुषाच्या देहातील 'स्त्री मनाला' कसे समजून घेतील? हा प्रश्न आईला सतावत होता. तरी तिने दिपकसाठी ते आव्हान स्वीकारले. घरच्यांना तज्ञ मंडळीकडून समजावून सांगितले. सत्य परिस्थिती स्वीकारून त्यातून योग्य भविष्याकडे वाटचाल करण्याचा तिचा प्रयत्न होता.
         आजी, आजोबा आणि बाबा यांना सत्य काय आहे हे समजले तेव्हा ते स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नव्हती. दिपकचे सत्य घरातल्यांनी नाकारले तर बाहेरच्यांनी  त्याचे भांडवल करायला सुरुवात केली.  त्यातूनच दिपक आणि त्याच्या आईच्या वाट्याला खूप मोठा संघर्ष आला.
          दिपकशी पूर्वी साधेपणाने वागणारी त्याची मित्र मंडळी आता त्याची टिंगल टवाळी करू लागली. समाजात वावरतांना त्याला सुरक्षित वाटत नव्हते. बालपणीसारखे मुलांमध्ये मिसळले तर त्यातील एखादा टारगट मुद्दामहून नको ते अचकट विचकट बोलत होता. नको तितकी लगट करू पहात होता. त्याच्या या अवस्थेमुळे मुलीही त्याला मित्र किंवा मैत्रीण म्हणून स्विकारायला धजत नव्हत्या.  
      त्याच्या आयुष्यात त्याने ज्याच्याजवळ मन मोकळे करावे असे त्याच्या वयाचे कोणीच नव्हते. तो एकाकी पडला होता. आधी आजी आजोबा, बाबा दिपकला सगळीकडे आनंदाने घेवून फिरायचे पण आता मात्र त्याला महाविद्यालयाच्या प्रवेशासाठीही बाबा सोबत करायला तयार नव्हते. दिपक मात्र मन मारून बाबांना आवडेल असे वागण्याचा प्रयत्न करत होता. जे प्रत्यक्षात नाही ते दाखविण्यात त्याचा जीव मेटाकुटीला येत होता. आईला त्याची घुसमट समजत होती.  त्याच्या 'स्त्री मनाला' तो शरीराने एक पुरुष आहे हे समजत असूनही तसे वागणे फार जड जात होते. 
       समाज जणू फक्त स्त्री आणि पुरूष अशा दोनच विभागात विभागलेला होता. समाजाच्या दृष्टीने दिपक सारख्यांना फारसे अस्तित्वच नव्हते. जिथे अस्तित्व नाकारले जाते तिथे आदर, प्रेम व अधिकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. 
  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर  दिपकला सुरक्षित वाटावे, त्याच्या शिक्षणात अडचणी येवू नये म्हणून आईने त्याला स्वतःच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला.
        येवढे होऊनही दिपक अभ्यासात हुशार होता. यामूळे वर्गातील काही मुले त्याचा दुस्वास करायची. आता प्राध्यापक म्हणून काम करतांना त्याच्या आईच्याही अडचणी वाढल्या होत्या.   
         दिपक सारख्यांना सामान्य मुलांच्या बरोबरीने शिक्षण देण्यात येवू नये. त्याने त्याच्या ' किंन्नर' समाजात जावून रहावे. त्यांच्या सारख्यांसाठी जे अलिखित नियम लिहून दिले आहेत त्यांचे पालन करावे. असेच समाजातील अनेकांना वाटत होते.
       दिपकने आता किन्नर समाजाच्या रितीभाती शिकून घ्याव्या. आईजवळ न राहता किन्नर समाजात रहावे. यासाठी किंन्नर समाजाकडून दिपकच्या घरच्यांवरही प्रचंड दबाव येत होता. या सगळ्याला कंटाळून आजीआजोबा गावाकडच्या घरी राहायला गेले. समाजात दिपकमुळे होणारी मानहानी वडिलांनाही अजिबात सहन होत नव्हती. वडिलांनीही सेवानिवृत्ती घेवून गावाकडे राहणे पसंत केले. दिपकमुळे त्याच्या आई वडिलांचे संबंधही प्रचंड ताणल्या गेले.
            दिपकने उच्च शिक्षण घ्यावे यासाठी त्याची आई मात्र कायम  प्रयत्नरत होती. आई दिपकने कायम आपल्याजवळ रहावे यासाठी कायद्याची मदत घेवून शक्य ते सगळे प्रयत्न करत होती. इतरांप्रमाणे किन्नर समाजालाही शिक्षण, नोकरीसाठी संधी मिळावी यासाठीही तिचे प्रयत्न सुरू होते. 
      दिपक पदवी शिक्षण घेत असतांना  एक दिवस वर्गातल्या काही टारगट मुलांनी त्याला एकट्यात गाठून त्याच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याला शोधत त्याची आई तिथे वेळेत पोहचली आणि पुढचा अती प्रसंग टाळल्या गेला. या प्रसंगाने तर दिपक फारच घाबरून गेला होता. आईला मात्र वेगळ्याच जाणिवेने भेडसावले होते. दिपकचे मन स्त्रीचे असून शरीर पुरुषाचे आहे. तो मन मारून पुरुष वेश परिधान करत करतो. सद्यपरिस्थितीत  तो मुलाच्या वेशात असला तरी विक्षिप्त वासनेच्या नजरा त्याला त्रास देतातच.  दुहेरी घुसमट सहन करण्यापेक्षा आता दिपकला त्यांची नैसर्गिक ओळख मिळाली आहे त्याचा आपण सन्मान करायला हवा. तो जसा आहे तसाच त्याला स्विकारण्याची गरज आहे. त्याला इतर मुलांप्रमाणेच सामान्य वागणूक मिळावी असे वाटत असेल तर आधी त्याला इतरांप्रमाणेच आत्मविश्वास पुर्ण जीवन मिळवायला हवे. तरच समाजातील इतर घटक त्याचे 'असे विशेष' असणे सहज स्विकारतील. त्याला सन्मान देतील. या निषकर्षापर्यंत अखेर ती पोहचली होती. तिच्यासाठीही हा प्रवास खडतर होता. 
       या एका कठीण प्रसंगाने आईच्या विचारांना दिशा मिळाली आणि तिच्या या  विचारांनी तिने दिपकलाही प्रेरित केले. आईने सगळ्यात आधी कायद्याने  दिपकचे नाव बदलून ' ईश्वरी ' असे करून घेतले. ईश्वरी या नावाने दिपकच्या मनात अनेक वर्षे कोंडमारा सहन करणाऱ्या 'स्त्री मनाला' नवी ओळख  मिळाली होती. आईने विश्वासाने उचललेल्या या धाडसी पाऊलाचे..... आईच्या कष्टाचे चीज करण्याचा ध्यास ईश्वरीनेही घेतला. लिंग, जात , धर्म यापलीकडे जावून निव्वळ बुद्धीच्या सामर्थ्यावर   वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीने ईश्वरी पेटून उठली. 
       पुन्हा एकदा ईश्वरीला अनेकांच्या बोचऱ्या नजरांना नव्याने सामोरे जावे लागले. पण या वेळी ती खचली नाही. तिने स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेतले. वयात येताना आपल्या मनाची जशी घुसमट झाली तशी घुसमट इतर कोणत्याही मनाची होवू नये या भावनेने तिने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मानसशास्त्र या विषयाची निवड केली. अडचणी येत होत्या पण आता माय लेकिनी मागे फिरून न पाहण्याचा निर्णय घेतला.
ईश्वरीने  मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. येवढे करून कोणतीही चांगली शिक्षणं संस्था तिला नोकरी देण्यास उत्सुक नव्हती. नोकरी मिळत नाही म्हणून खचून न जाता तिने संशोधनासाठी परदेशातील विद्यापीठात प्रवेश व शिष्यवृत्ती मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. मानसिक स्तरावर विशेष असणार्‍या मुलांची आणि त्यांच्या पालकांची मानसिकता अभ्यासण्यासाठी तीला 'इंडियाना विद्यापीठात'  शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळाला. हे संशोधन पुर्ण करून भारतात परतल्यावर तिने ' आईची माया ' ही सेवाभावी संस्था स्थापन केली. किन्नर समाजातील शिकलेल्या लोकांची मदत घेत मानसिकरित्या विशेष मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तिने एक शाळा सुरू केली. शाळेत विशेष मुलांना त्यांच्या  आवडीप्रमाणे शिक्षण दिल्या जाते. त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष मुलांच्या पालकांनाही विशेष मार्गदर्शन दिले जाते. या संस्थेला मिळणाऱ्या उत्पन्नातून काही भाग हा किन्नर समाजातील ज्यांनाही पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येतो. यामुळेच  तिच्या कार्याने प्रभावित होऊन किन्नर समाजाचाही तिला पाठींबा मिळू लागला. शिकलेल्या किन्नर व्यक्तीला  त्याच्या योग्यतेप्रमाणे नोकरी करता यावी यासाठी तीने प्रशासना विरोधातही लढा दिला. 
        विशेष मुलांच्या पालकांना योग्य समुपदेशन मिळाल्याने आपले मुलंही भविष्यात आत्मनिर्भर बनू शकते हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. समाजाने नाकारलेल्याची भावना घेवून जगण्यापेक्षा समाजातील गरजू लोकांना मदत करण्याची दिशा तिने किन्नर समाजातील अनेकांना दिली.  प्रशासनालाही तिच्या कार्याची दखल घेणे भाग पडले.  इतर सेवाभावी संस्थानी तिचा सत्कार केला. किन्नर समाजातील अनेक बुद्धिजीवी मुला मुलींना तिने उत्तम शिक्षण मिळविण्यासाठी प्रेरीत केले. ईश्वरीला नैसर्गिकरित्या आई होणे कठीण होते. या जीवन प्रवासादरम्यान 
'आईपण ही भावना शरीराशी निगडीत नसून मनाशी निगडीत आहे ' याची तिला अनुभूती येत गेली. मनाने ती अनेकांची आई होतीच परंतू कायद्यानेही तिने चार मुलामुलींना दत्तक घेतले. अखेर तिच्या आईसारखीच आई होण्याचे तिचे स्वप्न  पूर्ण झाले होते. 
           डोक्यात अनेक आठवणी जाग्या होत असतांना तिने योग्य शब्दांची जुळवाजुळव करत भाषणाला सुरूवात केली. तिच्या बुध्दीच्या विकासासाठी तिच्यावर बालपणी झालेले संस्कार किती महत्त्वाचे होते हे तिने मोजक्या परंतू प्रभावी शब्दात सांगितले. तिला मिळालेले मान चिन्ह शेजारीच बसलेल्या तीच्या आईच्या हातात दिले. तिच्या यशामध्ये तीच्या आईचा सिंहाचा वाटा आहे, हे सांगायला ती विसरली नाही. भाषण संपले तसे टाळ्यांचा कडकडाट झाला. 
       संघर्ष करतांना अनेकदा माय लेकीचे डोळे पाणावले होते. आज मात्र  माय लेकीच्या डोळ्यात  दाटलेले अश्रू आनंदाचे होते. 
       आज इतक्या वर्षांच्या  संघर्षानंतर ईश्वरीच्या कार्याने इतर विद्यार्थ्यांनीही प्रेरणा घ्यावी या भावनेने ज्या महाविद्यालयातून  इश्वरीची आई सेवा निवृत्त झाली होती, शिक्षण घेत असतांना हिडीस मानसिकतेला बळी पडलेल्या मुलांनी ईश्वरीवर अती प्रसंग ओढावला होता, त्याच क्रांतीज्योत सावित्री बाई फुले महाविद्यालयात ईश्वरीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते. या महाविद्यालयात विषेश मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. त्या अभ्यासक्रमासाठी अध्यापक म्हणून निवड करतांना कोणताही भेद न बाळगता केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर किन्नर समाजातील काही शिक्षकांची निवडही  करण्यात आली होती. 
      या कार्यक्रमाचे सोशल मीडियावर  होणारे प्रसारण गावी असलेले तिचे वडील बघत असतांना अपराधी भावनेने अगतिक झाले होते. जागतिक महिला दिनानिमित्त ईश्वरीचा झालेला हा सत्कार म्हणजे आपल्या लेकराच्या पाठीशी  खंबीरपणे उभे राहणाऱ्या आईच्या संघर्षाला आलेले घवघवीत यश तर होताच परंतू ईश्वरीच्या पुरूषी शरीराचे स्थान अखेर नगण्य करत तीच्या स्त्री मनाचा समाजाने स्वीकार केला आहे याची पावतीही होता. तीच्या सारख्या स्त्री मनाच्या मुलांना  समाज रचनेत मानाचे स्थान मिळण्याची ही तर खरी सुरवात होती. 

 ©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावासहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

सदर कथा कल्पनिकआहे. स्त्री किंवा पुरुष अशा वर्गात न मोडता येणाऱ्या तृतीय पंथा बद्दल कोणताही भेद न बाळगता त्यांना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न देता त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांनी आत्मविश्वासाने वाटचाल करावी यासाठी प्रयत्नशील रहावे. कुटुंबाने व समाजानेही  त्याचा स्वीकार करत  सन्मानाने जगण्याचा त्यांचा अधिकार अबाधित ठेवावा.  हेच या कथेतून आपणाला सुचवू इच्छिते. काही चुकल्यास माफी असावी.


2 comments: