एक पाऊल... पुढे

 

 #एक_पाऊल_पुढे

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)

फार पूर्वी मुलाला कडेवर घेवून कुठे गेले की काही वयस्कर महिला मंडळी  मला पहिला प्रश्न विचारायच्या, "आता याला बहीण कधी आणणार?" 

आणि ज्या स्त्री च्या कडेवर मुलगी आहे तिला पहिला प्रश्न" आता हिला भाऊ कधी आणणार?"

त्यावर साहजिकच मी," दुसऱ्यांदा त्याला बहीणच होईल कशावरून? तूम्ही खात्री देत असाल तरच सेकंड चान्स घेते... बोला कधी घेवू." त्यावर समोरची व्यक्ती " मी कशी खात्री देणार पण भावाला बहिण हवीच "

त्यावर मीही ," भावाला बहिण.... बहिणीला भाऊ हवाच ... मान्य आहे पण दुसरा चान्स घेवूनही भावाला बहिण किंवा बहिणीला भाऊ झाला नाही तर मग तिसरा चान्स घ्यायचा का?"

त्यावर समोरची व्यक्ती सावरासावर करत म्हणणार ," तुला काय ग... दुसरा मुलगा झाला तरी भावाला भाऊ होईल .... एकाला दोघे कधीही चांगलेच " 

जिच्या कडेवर मुलगी आहे ती स्त्री हा संवाद निमूट ऐकून तरी  घेई नाहीतर "हल्ली मुली कोणत्याच बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीत" .. किंवा " मला तर दुसरीही मुलगीच हवी ... मुली आई वडिलांना जीव लावतात.  मुलाचे कितीही करा म्हातारंपणी खरा आधार मुलींचं देतात" इत्यादी वाक्य ऐकवे सगळ्यांना.

      मुलगी झाल्यावर घरातूनच तिला जे ऐकून घ्यावं लागतं त्याचा परिणाम म्हणून मग ती तिचे विचार असे परखडपणे मांडत असावी असा माझा समज.

         तुमच्या कडेवर मुलगा असो की मुलगी समाजकंटकांना तुम्हाला सल्ला हा द्यायचाच असतो .... तूम्ही तो किती मनावर घेता यावर तुमची प्रतिक्रिया ठरते.

माझ्या बालपणी घरात.. समाजात मी स्वतः मुलगा मुलगी भेद अनुभवला आहे. तेव्हा तो सगळ्याच घरात बघायला मिळायचा. त्यातून आमची आई मुलगा मुलगी भेद निसर्गाने केले तेवढेच पाळणारी व आमच्या पाठीशी कायम ठाम उभी राहणारी.   त्यामूळे आमच्या घरात प्रखर भेदभाव नव्हता. त्यामुळेच की काय मी या भेदभावाचे फारसे मनावर घेतले नाही.

 आजही अनेक नावाजलेल्या कुटुंबात मुलगा वंशाचा दिवा कितीही कर्तुत्व शून्य असो सगळे आर्थिक व्यवहार डोळे झाकून त्याच्या हवाली केले जातात आणि कर्तृत्ववान  मुलींना डावललं जातं हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. 

 स्त्रियांच्या मनातही  आपल्याला मुलगा झाला तर समाजात मान वाढतो हा गैरसमाज अनेक वर्ष पुरुष प्रधान संस्कृतीतून जन्माला आला असावा.

हल्ली मुलगा मुलगी भेद नही दो के आगे एक नही....

असं असलं तरी मुली ' च' कशा मुलांपेक्षा सरस हे वारंवार बिंबवल जातं.

याचाच परिणाम म्हणून .... 

महिलांच्या गटात बोलायला गेलं तर मुलांच्या खाण्यापिण्यापासून अभ्यासापर्यंत कोणताही विषय काढा मुलगी असणाऱ्यांची आणि मुलगा असणाऱ्यांची जणू चढाओढ लागलेली असते.

   माझ्या मैत्रिणीला दोन्ही मुलं असल्याने अशा प्रसंगी तिला खास ऐकून घ्यावं लागतं," काय ग बाई .. तुला दुसरा ही मुलगा ' च ' झाला ..... मुलगी व्हायला हवी होती.... मुलगी लक्ष्मी असते... तिच्या असण्याने घर कसं भरल्यासारखं वाटतं". 

मला ही बोलतात तुला संधी होती तू विचार करायला हवा होता. त्यावर हल्ली  मी सांगते ," जाऊद्या नशिबात जे असेल तेच होत. " ( वयोमानानूसार मी नमत घ्यायला शिकले बहुदा)

या उलट माझी मैत्रीण जिद्दीला पेटून तिचे मत मांडत असते .

असेच एकदा ती खूप वैतागली होती.... मी तिला शांत करण्यासाठी माझ्या घरी घेवून आले . तिला समजावण्यासाठी सहज बोलून गेले ," जाऊ दे न... त्यांच्या बोलण्याने आपला संसार चालतो का??? मग त्यांचे बोलणे का मनावर घेतेस . कशाला अशांच्या तोंडी तोंडी लागते"

त्यावर तिने तिची घुसमट व्यक्त केली.....

मुलगी झाली असती तर कुटुंब पूर्ण झालं असतं .... मुलगी लक्ष्मी असते. . तिच्या असण्याने घराला घरपण येतं .... सगळं मान्य पण .... माझ्या हातात मुलगा दिसतो आहे तरी मुलगीच व्हायला हवी होती असे बोलणारे लोक माझ्या मुलाच्या बाल मनाचा विचार करत नाही . त्याच्या मनात कळत नकळत न्यूनगंडाची भावना रुजवू पाहणाऱ्यांच्या भावनांचा मी का विचार करावा ? मुलगा मुलगी होण आपल्या हातात नाही हे सगळ्यांना माहीत असूनही असे मुर्खासारखे बोलुन आपल्या लहानग्यांना विनाकारण हिनवतात. एक आई म्हणून समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मी या बोलण्याला विरोध करणार कारण आपण गप्प बसलो तर समानता येणार नाहीच उलट आधी पुरूष प्रधान संस्कृती होती आणि आता स्त्री प्रधान संस्कृती येईल .... आधी स्त्रिया पीडित होत्या आता पुरूष पीडित राहतील ..... अशाने समानता कधीच येणार नाही .... संघर्ष मात्र कायम राहिलं .... मी हे खपवून घेणार नाही" 

   काय चूक बोलली ती ? .... मुलगी असो की मुलगा .... त्या मागे लोकं ' च' लावतात आणि तिथेच आपल्या सारख्या सामान्यांच्या बुध्दीचा ताबा सुटतो.

हा ' च ' अनेक संवादात मला बोचतो पण इलाज नाही म्हणत मी सोडून दिलं होत.  ज्यांना दोन्ही मुलं किंवा दोन्ही मुली आहेत अशांनी " तुला काय बाई एकच.... त्यातही मुलगा आहे म्हणून तुला आमची वेदना कळणार नाही" असे लेबलही मला लावले.

     काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीतल्या एकीला मुलगी झाली म्हणून मी भेटायला गेले.... गेल्यावर मी बाळाचे कोडकौतुक करत होते. ते लोभस रूप बघण्यात मी दंग होते. तेवढयात बाळाची आई बोलली ," दुसरीही मुलगी ' च ' हवी होती आम्हाला"

 मी त्या बोलण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले . माझ्या सोबत असलेल्या काकू सहज बोलून गेल्या  ,"  .... घरात बाळ असल की सगळ्यांना समजत पण किती शांत आहे हे बाळ" त्यावर बाळाची आई लगेच बोलली ," मुली गुणाच्याच असतात. मुली जन्मतः आईचे हीत बघतात. ही पण अजिबात रडत नाही की कसला त्रास देत नाही" वास्तविक हे बोलतांना अत्यानंदाने तिचे लक्ष  तिच्या बाळावर असायला हवे होते पण तिची नजर आजूबाजूला वावरणाऱ्या सासुवर खिळली होती. तिथून पुढे ती आम्हाला अनेक प्रकारे मुली ' च ' कशा गुणी असतात हे सांगत होती. 

    काही दिवस आधी हिच्या मोठ्या मुलीला एकीने सहज विचारलं होत ," तुला भाऊ हवां की बहिण ? " त्यावर मुलीने  "बहिण" हे उत्तर दिले होते तेव्हा ह्याच (बाळाच्या) आईने तिला समजावले होते की "बहिण हवी असे नाही म्हणायचं... तूला राखी  बांधायला भाऊ हवाय न? मग भाऊ हवाय असच सांगायचं . तू जे मागशील तेच देव बाप्पा देणार "

मुलगी झाली आणि आपल्या मुलीच्या न झालेल्या भावाचे समर्थन करू पाहणारी आई अचानक मुली ' च ' कशा पाल्य म्हणून उत्तम असतात याचे धडे आम्हालाच गिरवू लागली.

वास्तविक आम्ही काही तिला दुसरी मुलगी झाली म्हणून हिणवले नव्हते किंवा तसे करण्याचा आमचा काही मानस ही नव्हता पण तिला आलेल्या कटू अनुभवाने तिने सरसगट सगळ्यांनाच तिच्या विरोधी पक्षातले गृहीत धरण्यास सुरवात केली होती हे पाहून वाईट वाटलं.

लेकी बोले सुने लागे.... असं काहीसं सुरू असावं या अंदाजाने आम्ही निपुटपणे काढता पाय घेतला.

      माझ्या एका मैत्रिणीची  दोन्ही मुलं ग्रॅज्युएशन झालेली आहेत तरी तिला  समाजात मिसळत असताना " तुला दोन्ही मुलगेच का ?" असे अजून ऐकून घ्यावे लागते. ती ही आशा वागण्यावर इतकी चिडते पण काही फरक पडत नाही. विचारणारे विचारतातच  

एकदा मुलगा मुलगी भेदभाव यावर चर्चा सुरू असताना

बरेच मुद्दे बोलल्या गेले .... 

हल्ली मुलगी झाली तर तिच्या पावलाचे ठसे उमटवून लक्ष्मी घरात आली असा जंगी सोहळा करतात .... पूर्वी मुलगी झाली तर त्या स्त्रीला खुप छळ सहन करावा लागत होता मग आता सोहळा केला जातो ...  समाज सुधारत जातोय.

दुसरा मुलगाच / मुलगीच असे म्हणून हिणवले जाते ते आधी थांबावायला हवे. याने मुलांच्या/ मुलींच्या मनात न्यनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. 

मुलांनी स्वयंपाक केला तर इतकं काय डोक्यावर घ्यायचं ... गेली कित्येक वर्षे मुली हेच करत होत्या. तेव्हा नाही केलं कोणी कौतुक मग आताच का??? 

आम्हाला मुलगा/ मुलगी झाली तो काय आमचा दोष आहे?

हल्ली बायका मुलींचे फाजील लाड पुरवतात. मुलींना घरातली कामे शिकवत नाही की काही वळण लावत नाही. अवघड आहे भविष्य....

इतरांना विरोधी पक्षातले गृहीत धरूनच प्रत्येक स्त्री स्वतः चा मुद्दा मांडत होती. 

इत्यादी इत्यादी.....

 माझी एक मैत्रीण तर इतकं मार्मिक बोलली की डोळ्यात पाणी आले.... 

      " ज्यांना मुल होत  नसतं त्यांना जावून विचारा त्यांचे दुःख काय आहे.... ज्यांना सहज मुलं होतात त्यांनाच असे भेदभाव सुचतात... "

मला का कुणास ठाऊक वाटून गेले.

मान्य आहे की पूर्वी आणि काही अंशी आताही मुलगी झाली की समाज टोमणे मारून स्त्रीला घायाळ करत असतो. या कृतीला आपण बळी न पडता आपल्या पाल्याची निकोप मानसिकता बनवायची असेल तर आधी आपल्याला आपली मानसिकता निकोप करायला हवी. लिंगभेद अधोरेखित होईल अशा कोणत्याही कृतीचे समर्थन करणे टाळायला हवे.

मुलगी/ मुलगा झाला म्हणून सोहळे करणारे आपण ..... मातृत्वाचा सोहळा करायला कधी शिकणार?

निव्वळ मातृत्वाचा सोहळा करणही समानतेच्या दृष्टीने चुकीचेच आहे.

स्त्रीच्या पोटी बाळ जन्माला जरी येत असलं तरी त्या बाळाच्या आस्तित्वासाठी पुरुष ही गरजेचा नाही का? स्त्री माती आहे तर पुरूष बीज आहे .... माती श्रेष्ठ की बीज या वादात .... रोप चांगले हवे असेल तर दोन्हीं गोष्टी महत्त्वाच्या आहेत असेच उत्तर कोणताही माळी देईल.

मग जे केवळ एकमेकांमुळेच पूर्णत्वाला जावू शकतात अशा स्त्री पुरुषांच्या जन्मावरून लिंग भेदाला सुरवात का करायची?

दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ही स्पर्धा का लावायची?

..... सोहळा करायचाच असेल तर तो पालकत्वाचा व्हायला हवा. कारण जन्मलेल्या बाळाचे कोणतेही लिंग असू द्या .... पालकत्वाची आव्हाने त्याने कमी होत नाहीत.  " 

या चर्चेत ज्या स्त्रियांना मुलगा मुलगी दोन्हीं असतात (जगाच्या दृष्टीने परिपूर्ण कुटुंब असलेली)  तिच काय ते सुखी असते. 

एकदा शिक्षकाने चौथीतल्या वर्गात  "Save girl child" या विषयावर निबंध लिहायला सांगितला. वर्गातल्या ९९ टक्के मुला मुलींना या विषयावर काय लिहावं हेच कळत नव्हतं. जी गोष्ट त्यांना माहीत नाही किंवा त्यांनी ती अनुभवली नाही  ती गोष्ट शिक्षकाने गरज म्हणून  इतिहासाचे दाखले देऊन समजावून सांगितली . कळत नकळत रुजवू नये ते विचार मुलांच्या बाल मनावर बिंबवल्या गेले. वर्गात असलेली समानतेची भावना मोडकळीस येवून लिंगभेदाची भावना अधोरेखित केल्या गेली.

मुलीच्या जन्माचा सोहळा नक्की करा पण त्या सोहळ्याचे कारण  तिचे  मुलगी असणे येवढेच मर्यादित ठेवू नका. अशाने तुमच्याही कळत नकळत तुम्ही तिला जाणीव करून देत राहाल की समाजात  तिचे अस्तित्व दुय्यम मानले जाते.  ज्या जाणिवेची तिला मुळीच गरज नाही. तिचे विश्व तुम्ही आहात.  समाजाला दाखवायला केलेल्या सोहळ्याने समाजाच्या विचारणारेत फारसा फरक पडणार नाही परंतु आपल्या पाल्याच्या आपण घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाने  समाज बदल नक्कीच घडून येईल . भावी पिढी ही समाजाचा पाया आहे.  तेव्हा पालकांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असायला हवे. 

   सद्य परिस्थितीत पालकांचे विचार पूर्वी इतके बुरसटलेले नक्कीच नाहीत. अनेक पालक ज्यांना एकुलती एक मुलगी आहे असे आपल्या मुलीबद्दल बोलतांना कुठेही ' च ' हा शब्द न वापरता बोलतांना मी बघितले आहेत. त्यांच्या निकोप विचारांनी मला खूप प्रभावित केले आहे. आपल्या पाल्याच्या प्रति आदर असावा किंवा नसावा या दोन्ही भावना केवळ त्याच्या लिंगावर आधारीत कशा असू शकतात? असा साधा प्रश्न कधी कुणाला पडत नसेल का? भविष्यात मुलगा किंवा मुलगी आपल्या पालकांशी  कसे वागतील हे त्यांच्या लिंगावर ठरत नाही तर ते पालकांनी दिलेल्या संस्करावर तसेच पाल्याने पालकांच्या वागणुकीचे केलेल्या निरीक्षणावर अवलंबून असते. संस्कार चुकीचे असले की मुलगा असो की मुलगी आईवडिलांना कोणी प्रेमाने सांभाळत नाही याची जाणीव मला समाजातले काही उदाहरणे बघूनच झाली आहे.

खरंच आपण फक्त आपल्या पुरता मर्यादित विचार करतो . नाण्याची एक बाजू बघूनच आपले हिशोब मांडतो पण लक्षात घ्या नाण्याला दोन बाजू असतात. 

बाळ जन्माला येताना आईला होणाऱ्या वेदनांची तीव्रता आपण बाळाच्या लिंगावर ठरवू शकतो का?? जन्मला आलेले बाळ मुलगा असो की मुलगी त्याच्या संगोपनात येणारी आव्हाने सारख्याच तीव्रतेची असतात तेव्हा सगळ्या पालकांनी आपापसात कुरगोडी करण्यापेक्षा समानतेच्या विचारावर ठाम राहणं गरजेचे आहे.

पूर्वापार चालत आलेली बेटा श्रेष्ठ की बेटी? अशी रस्सी खेच थांबवून.... तीन पायाच्या शर्यतीत जो ताळमेळ लागतो तो बेटा आणि बेटी मध्ये  विकसित केला तर समाजाचे चित्र नक्कीच बदलेल. 

 समाजात परिवर्तन आणायचं असेल तर सुरवात आपल्यापासून करायला हवी. 

मेरी बेटी मेरा अभिमान ..... मुलीचा अभिमान असावा असेच संस्कार तिला दिले जातात याचे खुप कौतुक आहे. परंतु अभीमान  बाळगण्यासाठी "बेटी "हा शब्द अधोरेखीत करत आपणच आपल्या मुलींना जाणीव करून देतो की कोने एके काळी ती पीडित होती.  मुलगा असो की मुलगी पालक म्हणून " मेरे बच्चे मेरा अभिमान .... असे म्हणून बघा याने हळू हळू लिंगभेदाची तीव्रता कमी होत समानतेचा अंकुर बालमनात नक्कीच रुजेल .

मुलगी लक्ष्मी आहे तर मुलगा नारायण आहे .... 

जोडी बनल्यावर ती लक्ष्मी नारायणाचीच शोभून दिसते. तेव्हा जे आहे त्याचा अभिमान तर बाळगाच पण जे नाही त्याचा न्यूनगंड बाळगू नका आणि तो इतरांनाही देवू नका.

          घरकाम, शालेय शिक्षण शिकवत असताना मुलागा मुलगी हे भेद नष्ट करुन काळाची गरज लक्षात घेता दोघानाही त्याचे योग्य प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

    समाजातील कोणत्याही  एका घटकाला केवल लिंग भेदाचा आधार घेत  महत्त्व न देता.... समानतेच्या दृष्टीने कृती करायला हवी.

समाज हा माणसाला घोड्यावर बसू देत नाही... घोड्यासोबत पायी चालू देत नाही की घोड्याला डोक्यावर हि घेवू देत नाही ... तेव्हा आपण कसं वागायचं हा सर्वस्वी आपला निर्णय असावा.

आपली छोटीशी कृती ही भविष्यातल्या अनेक मोठ्या बदलांची नांदी असते हे लक्षात असू द्या. कोणतीही कृती केवळ अनुकरणाने न करता त्याचा सखोल विचार करूनच स्वीकारायला हवी. लिंगभेद नष्ट करुन समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकायला हवे.

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)

टिपः लेख आवडला तर नावासहित शेयर करायला हरकत नाही. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

 खरं तर मी ज्या विषयावर लिहिले आहे.... तो विषय अती संवेदनशील असून सगळ्यांच्या डोक्यात असतो.

मला वाटलं की कळत नकळत आपण त्यावर व्यक्त होण्याचे टाळतो किंवा चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतो म्हणूनच मी माझ्या परीने केलेले विचारमंथन  इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. समाजात मिसळत असताना अनेक अनुभव आले ... त्यातून मी जे शिकले ते इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे अनुभव वेगळे असतील त्यावर आधारित तुमची मते किंवा प्रतिक्रिया वेगळ्या असतील त्यांचाही आदर आहे.मला काय म्हणायचे आहे हे कोणताही पूर्व ग्रह न ठेवता वाचले तर नक्की पटेल....  

सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 
ईतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे 




1 comment: