ती, तो आणि प्रेमळ संवाद (प्रसंग २)

    #ती_तो_आणि_प्रेमळ_संवाद
प्रसंग २
   ©️ अंजली मीनानाथ धस्के
 कोरोना नावाच्या विषाणूने जग बंद पाडलं होतं पण तीच काम काही बंद पडलं नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच फुकट गेल्या. पावसाळी सहलीला   जाण्याचे योगही नष्ट झाले. चीनी लोकांच्या वृत्तीचा आणि सामानाचा निषेध करून झाला तरी हा मेला विषाणू मरायच नाव घेत नाही याचा राग मनात खदखदत होता. आपणच बनवायचं, आपणच खायचं आणि नंतर आपणच भांडी घासायची याचा आलेला कंटाळाही लपवू म्हंटल तरी तिला लपवणे कठीण जात होत. त्याचा ताण शरीरावर आणि मनावरही येत होताच.
 अधिक महिन्यात माहेरी जाता येणार नाही याची चिंताही मनाला सतावत होती. दिवसाच्या रूटीनमधे या  ऑनलाईन शाळेने जी काही उलथा पालथं केली होती तिचा जोरदार विरोध करण्याचा विचार असूनही तो कधीच कृतीत आणता येत नाही याची सलही मनात बोचत होतीच.
     सकाळी सकाळी डबा  बनवण्याची घाई असलेल्या तिच्या डोक्यात विचारांचा नुसता गोंधळ सुरू होता.
          इतक्यात ऑफिसला जाण्याची तयारी करत असलेला नवरोबा अधून मधून स्वयंपाक घरात चक्कर टाकून जात होता. पहिल्या खेपेला त्याच्या हातात नाश्त्याची प्लेट दिली. दुसऱ्या खेपेला मस्त गरमा गरम चहा दिला. तरी तिसऱ्या खेपेला ती डबा नीट भरते आहे की नाही याची खात्री करून घेत तो उगाच तिथे घुटमळला.
     आपण तिच्यावर लक्ष ठेवतो आहे हे तिच्या लक्षात येवू नये म्हणून उगाच खिडकी बाहेर झाडाच्या फांदीवर  अंग फुगवून निवांत बसलेल्या चिमण्याकडे बघत तो बोलला ," बघ ग ...  लॉकडाऊनमुळे हा चिमणा जाड झालाय ना ?"
     तिने  चिमण्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला. एक जळजळीत कटाक्ष शर्टच्या इन मधे लपण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या ढेरीकडे टाकला  आणि बोलली ," चिमणा जाड झालाय खरा "
तस त्याने एका श्वासात पोट आत  तर पाय काढता घेतला.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबतीला रांगोळी ही आहेच.

No comments:

Post a Comment