इच्छा शक्ती

#इच्छा_शक्ती
               सदाशिवचा सेंद्रिय खत तयार करण्याचा व्यवसाय होता.  व्यवसायासाठीची जागा भाडे तत्वावर होती. तो पैं पै करून स्वतःच्या मालकीची जागा घेण्यासाठी भांडवल जमा करत होता. या व्यवसायाला जोड म्हणून खास देशी झाडांची अद्ययावत नर्सरी उभारण्याच त्याच स्वप्न होतं. या नर्सरीत झाडांची लायब्ररी असणार होती. अनेक छोट्या कार्यालयांना स्वतःची स्वतंत्र नर्सरी नसते. अशा कंपन्यांना, कार्यालयांना भाडे तत्वावर बहरलेल्या कुंड्या देण्याचा त्याचा मानस होता. सगळ्या कुंड्यांची देखभाल त्याच्याकडेच राहणार होती. कंपनीला दर आठवड्याला जुन्या कुंड्या ऐवजी नवीन प्रकारची झाडं असलेल्या नव्या कुंड्या ठेवता येणार होत्या.  त्यामुळे स्वतः झाडांची देखभाल न करताही कंपन्यांना त्यांच्या कार्यालयाचे रूप  टवटवीत राखता येणार होते. कार्यालयात पीस लिपीची खरी झाडे ठेवून हवा अधिक  शुद्ध राखणे सहज शक्य होते. त्याला खात्री वाटत होती की एक ना एक दिवस या सजीव रोपांच्या लायब्ररीची किंमत जगाला कळेल. सगळ्या बॅंकामधून, कार्यालयातून प्लॅस्टिकची झाडं हद्दपार होतील.
            कोरोना नावाचा विषाणू आला आणि सगळेच व्यवहार ठप्प झाले. या लॉक डाऊन मुळे सदाशिव आणि त्याच्या वडिलांनी ज्या कंपनीत काही वर्षांपूर्वी माळी काम केलं होतं तिचं  दिवाळं निघालं. कंपनीच्या मालकाने कंपनी विकायला काढली. सदाशिवला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने ही कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती अनुकूल नव्हती पण त्याने धाडस करण्याचे ठरविले.
         सद्य परिस्थितीत त्याने स्वतः जवळचे भांडवल जागा घेण्यात गुंतवणे धोक्याचे होते पण त्याच्या मनाने कौल दिला होता. सगळ्या कागद पत्रांची, पैशाची  जुळवा जुळव सुरू झाली. तसा सदाशिवला त्याचा भूतकाळ आठवू लागला.
           सदाशिव एक मेहनती माळ्याचा मुलगा होता. शिक्षणात बुध्दी चालली नाही म्हणून शिक्षण अर्धवट राहीले. घरची परिस्थिती बेताची असल्याने लहान वयातच वडिलांसोबत कामावर जायला लागला होता. वडील छोट्या कंपनीत माळी काम करायचे. सकाळी डबा घेऊन कामावर आलं की, संध्याकाळपर्यंत कंपनीतल्या झाडांची देखभाल करायचे. नवीन कलमं बनवायची, जुनी सुकलेली झाडं काढून नवीन झाडं लावायची, झाडाची छाटणी करायची, त्यांना खत पाणी द्यायचे, वाफे बनवायचे, कार्यालयाच्या आतल्या कुंड्या बाहेर काढून बाहेरच्या बहरलेल्या कुंड्या आत ठेवायचे, अशी एक ना अनेक कामं दिवसभर सुरू असायची.
           शाळेच्या अभ्यासात रमला नाही तो सदाशिव या कामात मात्र खूप रमयचा. वडील अशिक्षित होते पण झाड बघितलं की त्यांना नाव सांगता यायचं. मरायला आलेली अनेक झाड त्यांनी आपल्या कष्टाने पुन्हा डेरेदार केली होती. त्यांच्या तालिमीत सदाशिव तयार होत होता. वडीलांसारखी त्यालाही झाडांशी बोलायची सवय होती. झाडा भोवतीच्या जमिनीला उकरी देतांना तो झाडाच्या मुळांना जपायचा. त्यांच्याशी हळुवार गप्पा मारत काम करायचा. झाडाच्या वेड्या वाकड्या फांद्या तोडतांना तर त्याला फार वाईट वाटायचं पण झाडाच्या योग्य वाढीसाठी ते आवश्यक आहे हे तो स्वतःला तर समजवायचाच पण त्या झाडांनाही समजावून सांगायचा.
         एकदा घरी येता येता त्याला उकिरड्यावर टोमॅॅटोची रोपं आलेली दिसली. बाप ओरडत होता तरी त्याने ती अलगद कचऱ्यातून मोकळी केली. अन् घरी आल्या आल्या अंगणातली थोडी जागा भुसभुशीत करून तिथं लावली. त्या झाडांची खूप काळजी घेतली. त्याला टमाटे आले ते पाहून तर त्याचा बापही हरखून गेला अन् बोलला ," सद्या किती छान आहेत रं ही .... कोणी म्हणलं का उकिरड्यावरची उचलून आणलेली आहेत ही रोपं " सदाशिव सहज बोलून गेला ," झाडाला फक्त उगवण माहीत असतं बापू .... शेतात असलं काय अन् उकिरड्यावर असलं काय   " त्याचे ते शब्द  ऐकुन ,' अभ्यासात तेवढी बुध्दी चालली नाही पोराची पण  पोरग समजूतदार आहे ' असं बापाला वाटून गेलं.
          कंपनीच्या मागच्या बाजूला दोन खोल्यांचे पडके बांधकाम होते त्यातच ते सगळे रहायचे. अनेकांना रस्त्यावर अनाथ प्राणी दिसले की ते उचलून आणतात आणि त्यांचा सांभाळ करतात. सदाशिवला मात्र झाडं जवळची वाटायची. कायम बाहेर कुठे गेला आणि रस्त्याच्या कडेला एखाद मरगळेल रोप दिसलं की अलगद उपटून घरी आणायचा. ज्या झाडांना उपटून आणता येत नाही त्यांच्याभोवती तिथंच आळ करायचा. त्या झाडाला काठीचा आधार बांधून ठेवायचा. जवळची पाण्याची बाटली तिच्या आळ्यात रिकामी करायचा आणि मगच पुढे जायचा. त्याच घर मोडकं होत पण आंगण मात्र कायम देशी फुलझाडांनी, फुलांनी बहरलेलं असायचे.
         कंपनीतल्या  मोठ्या साहेबांना बाग कायम फुलांनी सजलेली लागायची. त्यासाठी ते कमी वेळात भरपूर फुलं देणारी परदेशी झाडं लावायला सांगायचे. सदाशिवला वाटायचं ,' विदेशी झाडांचे किती नखरे असतात. ऋतु जरा बदलला की लगेच खराब होतात. कंपनीतल्या मोठ्या साहेबांना तर जरा झाडं खराब झाली की बदलायची असतात. सारखी नवनवीन प्रकारची झाडं बाजारातून विकत आणायची आणि त्यांचा एक बहर संपला की उपटून टाकायची. साहेबांच्या डोळ्यांना बरं वाटावं म्हणून आणि ते पगार देतात म्हणूनही  झाडांची कत्तलच करतो आपण. त्यापेक्षा देशी फुल झाडं फळ झाडं लावली तर ..... ती इथं कायमची रुजतील,  फुलतीलव फळही देतील. त्यांची थंड छाया उन्हाने तापलेल्या, थकलेल्या प्रत्येक जीवाला आनंद देईल. कलम केलेला गुलाब दिसतो सुंदर पण त्याला कसलाच सुवास नसतो अन् आपल्या अंगणातील देशी  मोगरा सारा आसमंत दरवळून टाकतो. लाल जास्वंद .... त्याचं तर पान फुल सगळंच उपयुक्त. फाटकावरच्या कमानीवर चमिलीचा नाहीतर जुईचा वेल तर कसला भारी दिसेल. पण नाही..... आपल्याच मातीत, आपलीच झाडं लावली जात नाही.  त्या परदेशी झाडाचं कौतुक केलं जातं.' एके दिवशी अशा विचारांच्या तंद्रीतच तो होता इतक्यात नेमकी मोठ्या साहेबांनीच त्याला हाक मारली.  साहेब कार पार्क करायचे तिथल्या कोपऱ्यात  फारशीच्या फटीतून वडाचे झाड उगवलेले त्यांना दिसले होते. ते झाड ताबडतोब तिथून काढले जावे म्हणून सदाशिवला त्यांनी बोलावून घेतलं आणि काही सूचना दिल्या.
               सदाशिवने अलगद तिथली फारशी मोकळी केली. हळुवारपणे त्या झाडाची मुळ मातीतून बाहेर काढली. वडाच झाडं लावायच तर त्याला जागाही तेवढी मोकळी हवी अस वाटून त्याने ते रोप घरी नेवून माती भरलेल्या पोत्यात लावलं. मोठी झाड गार सावली देतात पण पान गळती सुरू झाली की त्यांचा खूप कचरा होतो म्हणून कंपनीच्या मुख्य आवारात एकही मोठं झाडं साहेबांनी लावू दिलं नव्हतं. या आधीही कडुलिंबाचं छोटं रोप सदाशिवला मुख्य आवारात उगवलेले दिसलं तेव्हा त्याने ते रोपही अलगद काढून घेतले होते. झाड जरा मोठी झालं की कंपनीच्या बाहेर दूर लावून येवू म्हणून तात्पुरती सोय म्हणुन अनेक मोठी झाडे तांदळाच्या रिकाम्या पोत्यात माती भरून त्यात लावलेली होती. यामुळे त्याच्या छोट्या अंगणात आंबा, फणस, शेवगा या मोठ्या झाडांची तर परसदारी अनेक फुलं, फळ भाज्या  यांची गर्दी झालेली होती.त्याचा प्रत्येक झाडांवर प्रचंड जीव होता.
             कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या खोल्या रहायला दिल्याने त्यांना हातात पगार फार मिळत नव्हता पण झाडांच्या सुखापुढे त्याला आणि त्याच्या बाला पगाराची चिंता नव्हती. रहायला खोल्या होत्या. परसदारी सगळ्या भाज्या लावलेल्या होत्या. वर्षाचं धान्य भरल की त्या सगळ्यांच आहे त्या पगारात  आरामात भागात असे.
     कंपनीला दहा वर्षे पूर्ण झाली म्हणून कंपनीत 'जागतिक पर्यावरण दिनी' वृक्षारोपणाचा कार्यक्रम करावा असं मोठ्या साहेबांच्या मनाने घेतले होते. आर्थिक दृष्ट्या कोलमडू पाहणारी कंपनी पुन्हा रुळावर आणण्यासाठी या उपक्रमाच्या प्रसिद्धीचा फायदा करून घेण्यासाठी त्यांनी शहरातल्या काही बड्या लोकांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला होता. फार काही करायचं नव्हते, 'नामवंत व्यक्तीच्या हातून चार दोन झाडे लावायची, काही बातमी दारांना बोलवायचं. दुसऱ्या दिवशी पेपरमधे कार्यक्रमाची विस्तृत बातमी देत काही फोटो प्रकाशित केले की, विस्मृतीत गेलेली कंपनी पुन्हा प्रकाश झोतात येणार होती. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली. कार्यक्रम दोन दिवसांवर येऊन ठेपला. या सगळ्यात शहराचे महापौर आणि वृक्ष प्रेमी असलेल्या दादासाहेबांनाही निमंत्रण गेले होते. त्यांनी कार्यक्रमाला येण्याचं आश्वासन दिले पण त्यांची काही अटही होत्या. 'वृक्षारोपण हे सगळ्या देशी झाडांचे असले पाहिजे आणि या झाडांमध्ये एक वडाचे झाड असलेच पाहिजे.' यासाठी ते आग्रही होते. ऐन वेळी या अटी कळल्याने साहेबांचा जरा हिरमोड झाला होता.
                कंपनीतील बागेच्या कामाची व्यवस्था बघणाऱ्या अधिकाऱ्याला साहेबांनी बोलावून घेतले. देशी झाडांची यादी त्याच्याकडे सुपूर्त करून ती सगळी झाडं कंपनीच्या नर्सरित उपलब्ध आहेत का? याची पाहणी करायला सांगितली. कंपनीच्या नर्सरित सगळी विदेशी झाडांची रोपं आहेत हे समजल्यावर, बाहेरच्या नर्सरितून ताबडतोब काही देशी झाडांची रोपे आणली जावीत ' अशी सूचना साहेबांनी केली. यादीतली काही झाडे मिळालीत परंतु वडाचे झाड कोणाकडेच मिळाले नाही. 'उद्या कार्यक्रम आहे आणि अजून वडाचे झाड उपलब्ध झाले नाही'  म्हणून साहेब चिंतेत होते. इकडे वडीलांना बरे नसल्याने सदाशिवनेच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षारोपणासाठी खड्डे खणून तयार करायला घेतले होते. नेहमीप्रमाणे त्याच्या मनात विचार सुरू झाले होते," आपल्याकडे पोत्यात लावलेली कडुलिंब, वड, आंबा, पिंपळ आणि आपटा ही झाडं लवकरच गावाबाहेर जावून लावायला हवीत. पावसाळ्यात मातीत रुजली की, पुढे त्यांना फारसा धोका राहणार नाही. जगण्याची ओढ घेवून भिंतीच्या काना कोपऱ्यात सिमेंट मधे उगवलेली ही झाडं ..... यांना त्यांच्या हक्काची मोकळी जागा मिळायला हवी.' या विचारातच त्याने त्याचे काम संपवले आणि बागेतल्या नळावर हात धुवायला निघाला होता. जाता जाता पार्किंगमधे फोन वर बोलणाऱ्या साहेबाचे बोलणे त्याच्या कानावर पडले," वडाचे  झाडं मिळत नाही म्हणजे ?उद्या कार्यक्रम आहे. मला ते  झाडं हवंच आहे. दाम दुप्पट द्या पण असतील तिथून देशी झाडांची रोप आणा "
          हे बोलणे ऐकून सदाशिव तिथेच घुटमळला. साहेबांचे फोन वरचे बोलणे झाले. त्यांचे लक्ष तिथेच घुटमळणार्‍या सदाशिव कडे गेले. त्यांनी त्याला विचारले ," माझ्याकडे काही काम आहे का?" सदाशिव घाबरत घाबरत बोलला," साहेब आता तुम्ही फो वर देशी झाडांबद्दल काहीतरी बोललात म्हणून थांबलो होतो " त्यावर साहेब बोलले ," उद्यासाठीच्या कार्यक्रमाला देशी झाडांची काही रोपे हवी आहेत.  वडाचे रोप तर कुठेच मिळत नाही आहे? "त्यावर सदाशिव लगेच म्हणाला ," माझ्याकडे आहेत काही रोपं,  तुम्हाला हवी असतील तर ......"
त्याचं हे बोलणं अर्ध्यावर तोडत साहेब आश्चर्याने ओरडलेच," काय? तुझ्याकडे रोपं आहेत? आपल्या नर्सरीत देशी झाडांची  रोपे नाहीत, असे मला सांगितल्या गेले होते. तू खरे बोलतोय ना "
सदाशिव लगेच म्हणाला ," साहेब आपल्या नर्सरीत नाहीत ही रोपं, माझ्या घराच्या अंगणातली आहेत. 
थोडा वेळ द्या .... मी आता घरून घेवून येतो."
तो घराकडे पळत गेला आणि ढकल गाडीत टाकून काही रोपं घेवूनही आला. त्या रोपांमध्ये वडाचे रोपही होते. ते पाहून तर साहेब आनंदाने हरखून गेले. 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशीच त्यांची स्थिती झाली होती.
          जेव्हा त्यांना सदाशिवने सांगितले,' ही सगळी रोपे त्याला कंपनीच्या आवारातच उगवलेली सापडली होती. यांना मोकळ्या जागी लावता यावे म्हणून त्याने अशी पोत्यातल्या मातीत लावून जतन केली होती.' तेव्हा तर त्यांना सदाशिवचे खूपच कौतुक वाटले.
      दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण कार्यक्रमाला ठरल्यावेळी सुरवात झाली. सदाशिवच्या मनातली इच्छा आज पूर्ण होणार होती. त्याने जमवलेल्या रोपांना त्यांची हक्काची जागा मिळणार होती. सदाशिवचे वडील सगळ्यांना रोप लावायला मदत करत होते. साहेबांनी शेजारीच उभ्या असलेल्या सदाशिवला आवाज दिला आणि महापौरांना सांगितले, " आम्ही एकही रोप बाहेरून विकत आणले नाही. ही सगळी रोपं आमच्या कंपनीचा छोटा माळी सदाशिव याने   स्वतः जमवली आहेत. म्हणूनच  ह्या छोट्या वृक्ष प्रेमीच्या मदतीने तुम्ही हे वडाचे झाड इथे लावावे. अशी मी तुम्हाला विनंती करतो." ते ऐकून सदाशिव पुरता गांगरून गेला. साहेबांनी पुढे होवून त्याच्या हाताला धरून त्याला आणले. साहेबांच्या जवळ सदाशिवला उभ बघून सदशिवच्या वडीलांना त्याचा अभिमान वाटला. वडाचे झाड त्याच्या मदतीने महापौरांच्या हस्ते कंपनीतील मुख्य आवारात लावले गेले.
        'काही दिवसांपूर्वी साहेबांनी ह्याच वडाच्या झाडाचे अस्तित्व नाकारले होते आणि आज तेच झाड मोठ्या आनंदाने महापौरांच्या हस्ते मुख्य आवारात लावले गेले' याचे सदाशिवला खूप नवल वाटले होते. त्या वडाच्या इवल्याशा रोपाने सदाशिवला शिकवण दिली होती,"उगवण्याची प्रचंड इच्छाशक्ती असली तर दिवस बदलायला वेळ लागत नाही." याच शिकवणीचा उपयोग त्याने त्याच्या पुढील वाटचालीत केला होता. आज त्याने सेंद्रिय खत निर्माता म्हणून स्वतची: ओळख निर्माण केली होती.
                 सदाशिव भूतकाळात रमला होता इतक्यात त्याचा फोन वाजला. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाली होती. कंपनीच्या खरेदी व्यवहारासाठी त्याला बोलावण्यात आले होते.
           काय सुंदर योगायोग जुळून आला होता. आजही 'जागतिक पर्यावरण दिन' होता. काही वर्षांपूर्वी याच दिवशी वडाच्या इवल्याश्या रोपाला त्याची हक्काची जागा मिळाली होती आणि आज सदाशिवच्या छोट्या स्वप्नालाही साकार करण्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा मिळणार होती.
     त्याने घरी फोन करून आई ,बाबा आणि बायकोला बोलावून घेतले. तो त्याच्या 'बालमित्राला' बघण्यासाठी खूप उत्सुक होता. सगळे कंपनीच्या आवारात पोहचले. त्याचा बाल मित्र मस्त डेरेदार वाढला होता. त्याचे ते भव्य रूप पाहून सदाशिव आनंदाने भारावला. सदाशिवचा छोटा मुलगा पळत गेला आणि पारंब्याना लटकला. झाडाने आनंदाने सळसळ केली. जणू ते  आशिर्वाद देत सदाशिवला सांगू पहात होते," आभिनंदन मित्रा .... उगवण्याची  इच्छाशक्ती असेल तर दिवस बदलायला वेळ  लागत नाही.  आज तुझ्या व्यवसायाचे इवलेसे रोप याच कंपनीत 'वटवृक्ष' म्हणुन रुजणार आहे ".

 ©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

 सोबतीला रांगोळी ही आहेच.
इतर लिखाण आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे.
रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇👇👇👇
https://youtu.be/nbgOLkemgIs

No comments:

Post a Comment