अफवा

#अफवा 
   केदार इंटरनॅशनल कंपनीमधे मोठ्या पदावर कामाला. परदेशात कोरोनाची भीती असतांनाही त्याला महत्त्वाच्या कामानिमित्त सिंगापूरला जावाच लागलं.
      आठवडाभर काम करून तो भारतात परतला. इथे आल्यावरही कामानिमित्त प्रवास सुरूच होता. काहीच दिवसांनी भारतात कोरोनाचे रुग्ण आढळले. इथेही वातावरण तंग झाले. नेमकी त्याच वेळी केदारला ताप आला. खोकला ही यायला लागला. दवाखान्यात जाऊन आल्यावर व्हायरल आहे असं डॉक्टरांनी सांगितले. आई वडील रोज कोरोनाबद्दल बातम्या ऐकत होते. केदार काही दिवसांपूर्वीच परदेशातून प्रवास करून आलाय . १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले असले तरी मनात शंका ठेवण्यापेक्षा एकदा करोनाची चाचणी करून घेतलेली बरी असं त्याचं मत होत. डॉक्टरांनीही परदेश प्रवासाचा इतिहास असल्याने चाचणी करून घेण्याचे सुचवले होतेच.
केदारचे आई वडील, भाऊ समीर त्याला भेटायला आले. सततचा प्रवास , कामाचा ताण त्यात झालेल्या व्हायरलने त्याला खूप अशक्तपणा आला होता. उपचारात कसलीच हयगय न करता समीरने त्याला कोविड १९ च्या चाचणी करता  हॉस्पिटलला नेले.
           कोविड १९ ची चाचणी नकारात्मक आली. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तरी इतर संसर्ग होवू नये, दुखणे वाढू नये म्हणून केदरला पूर्ण बरं वाटलं तरी बाहेर पडणे टाळावे असे डॉक्टरांनी सांगितले.
             कंपनीनेही घरून काम करण्याची मुभा दिलीच होती.
      कोविड१९ ची चाचणी करून सिटी हॉस्पिटल मधून बाहेर पडतांना त्यांच्या नकळत नेमके केदरच्या एका शेजाऱ्याने त्यांना बघितले.
त्यांच्या हातात दवाखान्याच्या कागद पात्रांची फाईलही शेजाऱ्याने पाहिली. पुढचा मागचा कोणताच विचार न करता त्या शेजाऱ्याने सोसायटीतील काही सदस्यांना लगेच फोन करून ," केदारला कोरोनाची लागण झालेली आहे" असे सांगून टाकले तर काही सदस्यांना  हॉस्पिटल समोर समीर केदारच्या हाताला धरून उभा असलेले फोटो व्हॉटसअप वर पाठवला.
 कोरोनामुळे केदारच्या मुलांच्या शाळेला सुट्टी मिळाली होती. सगळीकडेच वर्क फ्रॉम होम ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती म्हणून समीरनेही प्रवास टाळला. सगळ्यांनाच मस्त एकत्र वेळ घालवता येईल. केदरलाही बरे वाटेल म्हणून आई वडील केदारकडेच थांबले. केदरच्या घरचे खबरदारी म्हणून घराबाहेर ही पडत नव्हते.
सगळीकडे ही अफवा वाऱ्या सारखी पसरली. त्यांच्या घरा बाहेर न पडण्याने सोसायटीतील लोकांना अफवेबद्दल अधिकच खात्री पटू लागली. शेजारच्या कॉलनीत रहाणाऱ्या नातेवाईकांना ही अफवा कळली. त्यांनी कसलाच विचार न करता ही अफवा बाहेर गावच्या नातेवाईकांपर्यंत पोहचवली. शेजारचे त्यांना पाहून रस्ता बदलू लागले. हसून बोलणं टाळू लागले. प्रत्यक्ष भेटणं टाळत असले तरी फोनवरून विचारणा करू लागले.
 केदारलाही अनेकांनी फोन करून विचारणा केली. बिल्डिंग खालच्या दुकानात सामान आणायला गेलेल्या समीरला दुकानदाराने दुकानात यायलाच मनाई केली. या सगळ्याचा केदरच्या मुलांनाही मानसिक त्रास सुरू झाला.
 हे कमी म्हणून की काय काही नातेवाईकांनी केदारच्या आई वडिलांनाच फोन केला," तुमचा मुलगा कोरोनामुळे गेल्याच कळलं " अशी सुरवात केली. आई वडील बिपी चे रुग्ण . हे असं कानावर आल्यावर त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडले. प्रत्येकाला सांगून पटवून त्यांना प्रचंड मानसिक थकवा आला.
कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही असे डॉक्टरांनी लिहून दिलेले पत्र दाखवूनही फायदा होत नव्हता. अफवा वाऱ्यासारखी पसरली होतीच.
घरात सगळ्यांनी आनंदाने रहावे म्हणून एकत्र आलेल्या केदारच्या घरच्यांना केदारबद्दलच्या अफवांनी पुरते हैराण करून सोडले. केदार आधीच थकलेला होता त्यात या वाईट अनुभवाने तो अधिकच खचला.
         शेवटी घरच्यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. शोध घेतल्यावर या अफवांना करणीभूत असलेले ते शेजारी ज्यांनी केदारला हॉस्पिटलच्या बाहेर पडतांना बघून सगळ्यांना फोन केला होता त्यांचं नाव समोर आल.
        पोलिसात तक्रार नोंदवल्या गेली तर त्या माणसाची नोकरी गेली असती . सगळ्यांनीच मग हे आपापसात मिटवून घेण्याचा सल्ला दिला. आपल्याला झाला तेवढा मानसिक त्रास पुरे झाला. त्या माणसाची नोकरी घालवून त्याला आयुष्यातून उठवायची केदार आणि त्याच्या घरच्यांची मुळीच इच्छा नव्हती.
अखेर त्या शेजाऱ्याने केदरची आणि त्याच्या घरच्यांची तोंडी व लेखी माफी मागितली.
सोसायटीच्या व्हॉटसअप ग्रुपवर लेखी माफीचा फोटो पाठवला
पोलिसांकडूनही त्यांना," पुन्हा असे घडणार नाही याची काळजी घ्या" अशी सक्त ताकीद मिळाली.
  सुजाण नागरिक या नात्याने खबरदारी घ्यावी म्हणून कोविड१९ ची चाचणी केदारने करून घेतली पण सुशिक्षिततेचा बुरखा पांघरून वावरणाऱ्या समाज कंटकाच्या अफवेला बळी पडला होता.
         इतर सदस्यांनीही आपली चूक कबूल केली. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. काही दिवसांच्या मनस्तापानंतर आता कुठे तो आणि त्याच्या घरचे स्थिरावले आहेत. अखेर एका वाईट अनुभवाची दिलासा देणारी सांगता झाली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( ही कथा काल्पनिक असून प्रत्यक्षात साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा शेयर करताना नावा सहित करावी )
टिपः
कधीही कानावर किंवा व्हॉट्सअपवर येणाऱ्या कोणत्याही माहितीची खात्री करून घेतल्या शिवाय ती माहिती इतरांना फॉरवर्ड करू नये. तुम्ही केलेला एक फॉरवर्ड मेसेज एखाद्याच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेऊ शकतो. जगावर कोरोना रुपी महा संकट असतांना सगळ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका चोख बजावायला हवी. उगाच फोन आहे , वेळ आहे म्हणून कसलाही विचार न करता कोणतीही माहिती कोणालाही फॉरवर्ड करू नये. या कठीण परिस्थितीत सोशल मीडियाचा वापर करायचा असेल तर तो इतरांना धीर देण्यासाठी करावा. संकटाचा सामना एकजुटीने करण्याची प्रेरणा देण्यासाठी करावा . अनेक बिघडलेली कामे या सोशल मीडियामुळे सुरळीत होवु शकतात. या माध्यमाचा योग्य आणि सकारात्मक वापर करावा.

No comments:

Post a Comment