पणती

#पणती
©️अंजली मीनानाथ धस्के

         यंदा अनेक कंपन्यांनी बोनस द्यायचं टाळलं होतं. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असल्या तरी दिवाळी सण म्हटलं की थोडा तरी हात सैल सोडावाच लागतो. दिवाळी या सणावर यंदा मंदीचे सावट पसरलेले असले तरी बाजार मात्र नेहमीप्रमाणे गर्दीने फुलून गेला होता. कितीही तंगी असली तरी स्वतःसाठी खरेदी करतांना कोणी हातच राखून खरेदी करत नाही. हेच खरं....
                               निशालाही यंदा खर्च कमी करावा असंच वाटतं होतं. तिच्या लहान मुलाला दिवाळी असली की भारी उत्साह असायचा.त्याच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणत त्याच्यासाठी आवश्यक ती खरेदी करणेही गरजेचे होते. इच्छा नसतांनाही ती नवऱ्याच्या आग्रहाखातर त्या गर्दीचा एक भाग झाली होती. ठरलेल्या दुकानातून ठरलेल्या वस्तू घेवून बाहेर पडल्यावर बाजारात असलेल्या मंदिरातही जावून यावं म्हणून ते तिघेही मंदिरात गेले . पुरुषांची रांग लांब असल्याने नवरा आणि मुलगा मंदिरातून बाहेर यायला वेळ होता. शांततेत दर्शन घेवून निशा मंदिराच्या बाहेर पडली. ती बाहेरच्या पायरीवर बसली. तिला गर्दिचा भाग होण्यापेक्षा गर्दीचे निरीक्षण करायला खूप आवडायचे. बाहेर पडल्यावर मंदिराच्या आवारातच एक गजरेवाला गजरे विकत बसलेला होता. ती त्या गजरेवाल्याच निरीक्षण करण्यात रमली. त्याच्या फुलांचा सुगंध मनाला वेड लावत होता. कितीही काटकसरी बाई असली तरी तिला गजऱ्याचा मोह होतोच. अनेक बायका त्याच्याशी भाव करून करून थकल्या पण तो काही ऐकत नव्हता . बायकाही 'महागाईच वाढली आहे, त्याला आपण तरी काय करणार ' असं म्हणत नेहमी १० रुपयाला मिळणारा गजरा शेवटी निमूटपणे २० रुपयाला घेवून आनंदाने केसात माळत होत्या. निशालाही गजरे खूप आवडायचे . लहान असतांना तर गजरा माळल्याशिवाय तिचा दिवस जात नव्हता . हळूहळू तिचे गजरा माळण्याचे वेड कमी झाले. गजरा घेवून त्याचा सुगंध श्वासात भरून घ्यायला मात्र ती कायम उतावीळ असायची.
       तिची पावलेही गजरे वाल्याकडे वळली. ती गजरेवाल्याकडे जाणारh⁷ तोच तिला एका फुगेवाल्याने अडवले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघता त्याला खात्री होती की एकदाका निशाने गजरा घेतला तर ती काही त्याच्याकडून फुगे घेणार नाही. बायकांची सगळी गर्दी गजरे वाल्याकडे होती . त्यांच्या लेखी फुगेवाल्याला अस्तित्व नव्हते. फुगेवाला मात्र गजरेवाल्याकडे जमलेली गर्दी पाहून विचार करत होता ,' आपलंही आयुष्य या फुलांसारखं एकाच दिवसाचं पण सगळ्यांना हवं हवसं असतं तर किती बरं झालं असतं'.
         निशाची नजर जरी गजऱ्यावर खिळली होती तरी तिने फुगेवाल्याला विचारल," कैसा दिया? " त्यानेही लगेच सांगितलं ," सादावाला बीस रुपये और फॅन्सीवाला पचास रुपये". " पचास रुपये " असं ती जरा आश्चर्याने जोरातच बोलली. नकळत तिचा हात वीस रुपयाच्या फुग्यावर स्थिरावला. तिच्याकडे बघून फुगेवाल्याला वाटलं की, तिने तिचा हात वीस रुपयाच्या फुग्यावर ठेवलाय म्हणजे यातही ती भाव करणार .
       कोणता फुगा घ्यावा? तिचा निर्णय झालाच नाही . ती तशीच विचार करत थांबली. खरं तर ज्याच्यासाठी फुगा घ्यायचा होता तो तिचा लाडोबा मंदिराच्या पायरीवर बूट घालण्यात व्यस्त होता. त्याच्याच पसंतीने फुगा घ्यावा म्हणून ती उगाच फुग्यांवरुन हात फिरवीत वेळ काढत होती.
      ती वेळ काढत होती पण इकडे फुगेवाल्याच्या डोळ्यात भीती दाटून आली होती की, ' हेही गिऱ्हाईक काही न घेताच जाणार '. त्याला ती शांतता सहन होत नव्हती म्हणून ती हात ठेवेल त्या फुग्याचा रंग, आकार खूप छान आहे, असं तो सांगू लागला.
         निशाने तेवढ्यातही निरीक्षण केले. त्याचा कळकट अवतार , समोरचं बास्केटमधे पेंगुळेलं छोट लेकरू, तेही तितकच कळकट, सोबतीला मागे कॅरीअरवर त्याच्या अंथरूूणाच गाठोडं.... यावरून त्याच्या परिस्थितीचा अंदाज बांधला. फुगे विकून जे पैसे मिळतील त्यात पोट भरायचं आणि रात्र झाली की जागा मिळेल तिथे झोपायचं. असंच त्याच आयुष्य असावं. याची जाणीव तिला बेचैन करून गेली. 
           आता रात्रीचे आठ वाजले होते. निशा कडे बघत, 'या बाईनेही फुगा घेतला नाही तर?' याची चिंता, वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात छोट्या अक्षयची आणि त्याच्या बाबांची स्वारी आईला शोधत फुगेवाल्यापाशी पोहचली. निशाने अक्षयला लगेच विचारलं, " कुठला फुगा हवाय तुला ?" एरवी काही खरेदी करायचं म्हंटल की नाही म्हणणाऱ्या आईने आज स्वतःहून कोणता फुगा हवाय? असं विचारलं होतं. तिच्या या प्रश्नाने अक्षय खूपच बुचकळ्यात पडला असला तरी चालून आलेली संधी न गमावता त्यानेही लगेच फॅन्सी फुग्यातल्या स्पायडर मॅनकडे बोट दाखवून ," तो हवाय " म्हणून सांगून टाकले . तिनेही लगेच फुगा घेतला. फुगेवाल्याला शंभर रुपयाची नोट दिली आणि पन्नास रुपये परत घेण्यासाठी तिथेच थांबली . त्याने शंभरची नोट हातात तर घेतली मात्र तिला परत देण्यासाठीचे पन्नास रुपयेही त्याच्याकडे नव्हते. त्याचा खिसा रिकामा होता. त्यावरून दिवसभरात एकही फुगा विकला गेला नव्हता याची निशाला कल्पना आली.
        रात्र वाढत चालली तशी सगळ्यांना घरी जायची घाई होती. कोणी चिल्लर देत नव्हते . आता 'ही' शंभरची नोट परत केली तर 'ही' बाई फुगा न घेताच निघून जाणार . चिल्लर नाही म्हणून हाता तोंडाशी आलेली कमाईही जाणार या विचाराने नोट परत देत तो खिन्न हसला. त्याची ही अवस्था बघून निशानेच पुढाकार घेऊन आजूबाजूच्या बायकांना चिल्लर आहे का ? म्हणून चौकशी सुरु केली. खरं तर शेजारीच उभा असलेला नवरा चिल्लर आणायला जवळच्या दुकानाकडे निघाला होता तरी ती मुद्दाम ज्यांच्याकडे लहान मुले आहेत त्याच बायकांना विचारात राहिली. त्या बायकांनी नाही म्हंटल्यावरही ,' बघा असतील तर ..... मिळाले तर बरं होईल. फुगेवाल्याला द्यायचे आहेत.' असं सांगत त्यांना हातातला फुगा दाखवू लागली. तिच्या हातातला फुगा बघून त्या बाईजवळ चिल्लर नसली तरी तिचे मुलं फुग्यासाठी हट्ट सुरू करू लागे. उभ्या उभ्या तिने दोन तीन बायकांच्या मुलांना फुग्यासाठी हट्ट करायला उदुक्त केले. नवरा चिल्लर आणेपर्यंत तिघी चौघींनी आपल्या हट्ट करणाऱ्या मुलांना वीस रुपयाचा फुगा देवून गप्पही केले. तिनेही तिच्या फुग्याचे पन्नास रुपये दिले . ते पैसे खिशात टाकतांना, 'आज रात्रीच्या खाण्याची सोय झाली' याचा आनंद त्याच्या डोळ्यात होता. तो तोंडभरून हसला आणि तिला धन्यवाद देवू लागला. त्याचा आनंद तिला एक वेगळीच ऊर्जा देवून गेला. तिने गजरा न घेताच परतीची वाट धरली. आज फुलांचा सुगंध श्वासात भरून घेता आला नाही तरी एका जीवाचा त्याच्या कष्टाच्या कमाईवरचा विश्वास मात्र तिने टिकून ठेवला होता. ' कितीही महागाई वाढली तरी माणुसकी महाग होता कामा नये ' या विचाराच्या पणतीने तिच्या मनात प्रज्वलित होताच तिचा चेहराही समाधानाच्या तेजाने लख्ख उजळून निघाला.

©️अंजली मीनानाथ धस्के

( सदर कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधिन आहेत. लेखिकीच्या नावासहितच कथा शेयर केली जावी)

दिवाळी हा सण  दिव्यांचा आहे. एक छोटी पणती जसा तिच्या भोवतीचा अंधःकार दूर करते . तसेच एक चांगला विचार आपल्या  मनातील रितेपणाचा  अंधार दूर करून आपल्या विचारांना सकारात्मक दिशा देण्याचं काम करतो. अशाच एक, एक करत जेव्हा असंख्य चांगल्या विचारांच्या पणत्या
आपल्या मनात प्रज्वलित होतील तेव्हा आपले व्यक्तिमत्त्व तर दिवाळीसारख्या मांगल्याच्या झगमगाटाने उजळून निघेलच पण इतरांच्या आयुष्यातही आपल्याला आशेचा प्रकाश पसरवता येईल. सद्य परिस्थितीत संस्कारांच्या अध:पतनाचा अंधकार हा सकारात्मक विचारांच्या पणत्यांनीच नष्ट करणे शक्य आहे.
सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 
ईतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे 

( सदर कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधिन आहेत. लेखिकीच्या नावासहितच कथा शेयर केली जावी)


2 comments:

  1. मस्त..... शुभ दिपावली

    ReplyDelete
  2. महागाई वाढली तरी माणुसकी महाग होता कामा नये..... सुंदर विचार

    ReplyDelete