प्रवास

  #प्रवास

©️ अंजली मीनानाथ धस्के 

               आज 'प्रवास ' या शब्दाची आठवण होण्याचे कारण, मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. सगळ्यांचेच प्रवासाला जाण्याचे बेत आखणे सुरू आहे. माझ्या बाबतीत लहानपणापासून उन्हाळा आणि गोष्टीची पुस्तके यांचे एक अतूट नाते आहे. म्हणूनच आज मी एका आगळ्या वेगळ्या तरीही अनेकांच्या आवडीच्या प्रवास प्रकारा बद्दल लिहिते आहे.
                    मला कायम  वाचन करायला घेतलेले पुस्तक हा एक ' प्रवास' वाटतो. पुस्तक रुपी प्रत्येक प्रवासाची सुरुवात, ही एका अंधाऱ्या  बोगद्यातून होते . मला लहापणापासूनच प्रवासातील बोगद्याचे कुतूहल वाटायचे. लांबच्या प्रवासात एक तरी बोगदा लागावा असे वाटायचे. बोगद्यातून जातांना अनामिक हुरहूर वाटायची. रस्ता, जायचे ठिकाण माहितीतले असले तरी बोगद्यातून बाहेर आल्यावर पुढे काय असेल ?
 याची उत्सुकता वाटते. तसचं पुस्तक हातात घेतल्यावर आणि त्याची पहिली काही पानं वाचल्यावर त्यातली सगळी पात्रं हळूहळू लक्षात यायला लागतात . हि सगळी प्रक्रिया मला एका बोगद्या सारखी भासते. पुढे काय असेल याचा केवल अंदाज बांधणे सूरु असते. परंतू पुढे काय आहे हे अंदाजा पेक्षा वेगळे निघते तेव्हा मग सुरू होतो बोगद्या बाहेरचा खरा प्रवास . 
          पुस्तकाच्या बाबतीत बोगद्याच्या भाग लांबलचक असला की, पुढे प्रवास कितीही छान असला तरी अनेक वाचक तिथपर्यंत जात नाहित. काही जण हा बोगदा वगळून डायरेक्ट मुख्य प्रवासाला सुरुवात करतात आणि मग कथेतल्या पात्रांची नीट ओळख न करून घेतल्याने पुढे वाचकाचा बराच गोंधळ होतो. काही पुस्तक प्रवासामध्ये छोट्या छोट्या बोगद्यांची योग्य पेरणी केलेली असते. तर काही पुस्तकामध्ये एकही बोगदा नसतो. या पुस्तक प्रवासाची रचना कशी असावी हे जरी सर्वस्वी लेखकावर अवलंबून असले तरी त्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी वाचक मात्र तयारीचा लागतो. 
          अनेकदा असा अनुभव येतो की, एखादे पुस्तक आवडणे किंवा नावडणे हे सर्वस्वी वाचकाच्या मानसिकतेवरही अवलंबून असते.एका जागी बसून चित्त एकाग्र करणे कठीण जात असेल तेव्हाही मोठया कथा, कादंबऱ्या वाचल्या जात नाहीत.
       प्रवासाची आवड असेल तर केवळ संयमाने वाचन करून अनेक समृध्द कलाकृतीचा अनुभव घेता येतो. विशेष म्हणजे मला आवडलेला एखादा पुस्तक प्रवास इतरांनाही आवडेलच असे होत नाही. कारण  कधी कोणाला 'बस/गाडी लागते ' म्हणजे वाचनाचे वावडे असते, कधी कोणाला वेगाचे वेड असते म्हणजे कथानक  वेगवान पद्धतीने पुढे जाणारे लागते, कधी कोणाला बोगदा नको असतो म्हणजे पात्र परिचय किंवा कथेची प्रस्तावना नको असते, कधी कोणाला लांबचे प्रवास झेपत नाहीत म्हणजे कादंबरी प्रकार वाचण्यासाठी जड जातो, कधी कोणाला प्रवासात अनेक थांबे हवे असतात म्हणजे कथासंग्रह वाचणे आवडते , काहींना प्रवासाबाबतीत विनोदी /हलकेफुलके/रहस्यमयी/गूढ/वैज्ञानिक/ तत्त्वज्ञान /शृंगारिक अशा अशयाचा आग्रह असतो. काहींना प्रवासात सगळ्याच आशया सोबत सगळेच हवे असते म्हणजे बोगदा,वेग, उत्सुकता, थांबे, वळण इत्यादी. काहींना साधा सरळ प्रवास आवडतो तर काहींना नागमोडी .
अनेकदा इतरांनी डोक्यावर घेतलेला पुस्तक प्रवास आपली घोर निराशाही करू शकतो.
          वाचक म्हणून मला अशा काही मर्यादा मी ठेवत नाही. मिळेल ते वाचण्याची सवय लागली आहे. थोडक्यात काय तर प्रवासाची आवड आहे. त्यामूळे अनेकदा  प्रवास आवडत नसला तरी संयमाने वाचन करत प्रवास पूर्ण करण्याकडे कल असतो. बऱ्याचदा अर्धा प्रवास रटाळ वाटत असतांनाच शेवट मात्र काहीतरी चांगले देवून जातो. इथे एक सांगावेसे वाटते की प्रवासाची आवड असेल परंतु वेळ नसेल किंवा मोठा प्रवास झेपत नसेल तेव्हा छोटया छोटया प्रवासा पासून सुरूवात करायला काहीच हरकत नसते. वाचत रहाल तर पुढे मोठे मोठे प्रवासही सहज पूर्ण करु शकाल...... 
       अनेकदा प्रवासाची सुरूवात उत्साह वर्धक होते परंतू शेवटाकडे जाता जाता घोर निराशा पदरी पडते. अनेकदा बोगदा संपतच नाही आहे असे वाटत असतांनाच बोगाद्या बाहेर एक रोलर कोस्टर वाट बघत असतो.  कधी बोगद्यातील अंधार पुस्तकातील पात्रांना समजून घेण्यास उपयुक्त ठरतो तर कधी लाईटचा उजेड, अंधार यांचा बोगद्यातील खेळ आपल्याला पात्रांच्या गर्दीत ' स्व' त्वाची जाणिव करुन देतो. कधी साधा सरळ प्रवास अचानक नागमोडी वळणे घेत पुढे जात राहतो. कधी संथ वाटणारा प्रवास क्षणात वेग पकडतो. कधी वेगवान प्रवासाला अचानक ब्रेकही लागतात. कधी हलक्या फुलक्या, विनोदी अंगाने सूरु झालेला प्रवास आयुष्याचे गहन तत्त्वज्ञान देवून जातो. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ' प्रवास ' करावाच असेही बरेच प्रवासाठीचे दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे.
               पुस्तक प्रवासाची गंमत अशी आहे की, हा प्रवास तुम्ही कधीही, कुठेही सूरु करू शकता. इतरांना तुम्ही एका जागी स्थिर भासत असला तरी तुमचा प्रवास अविरत सुरू असतो. तुमच्या वेगाचा, आनंद, उत्सुकता, समाधान, भावनांचे चढ उतार याचा अनुभव हा तुमच्या शेजारी बसलेल्या येत नाही. या सगळ्यां अनुभवावर तुमची व्यक्तिगत मालकी असते. तसेच कोणत्याही पुस्तकाचे यश अथवा अपयश हे बहुतांशी पुस्तक प्रवासाचे संक्षिप्त वर्णन कोणत्या शब्दात केले गेले आहे यावर देखील बऱ्याच अंशी अवलंबून असते. 
        लेखन करताना मला वाटते की प्रत्येकाने त्याला जसे हवे तसे  पुस्तक प्रवास लिहीत जावे. सगळ्यांचेच समाधान करणारे प्रवास निर्माण करण्याच्या आग्रहाने अनेकदा प्रवासातील नावीन्य हरवून जाते. तुम्ही निर्माण केलेल्या पुस्तक प्रवासाला वाचक कमी मिळाले म्हणजे तुम्ही निर्मितीत कमी पडला असे नसून त्या प्रवासाची आवड असणारे कमी आहेत, इतकाच त्याचा अर्थ होतो. सगळ्यांनाच सगळे प्रवास आवडू शकत नाही. एकच पुस्तक प्रवास असला तरी प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगळा असतो कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन, आवड वेगळी असते. शेवटी कोणी काय वाचावे आणि कोणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
       एखादा पुस्तक प्रवास गंडला म्हणून लेखकाने निर्मिती थांबवायची नसते तसेच वाचकांनीही वाचणे सोडता कामा नये.
मला तर पुस्तक प्रवास कसाही असला तरी तो अनेक अनुभवाने समृध्द करणारा भासतो. 
©️ अंजली मीनानाथ धस्के 
टिपः लिखाणा सोबत रांगोळीही आहेच. 







2 comments: