नवी दिशा


     #नवी_दिशा 
©️ अंजली मीनानाथ धस्के
         आज ईशाला भेटायला तिची बाल मैत्रीण श्रुती घरी येणार होती. तिने भराभर घर आवरायला घेतलं. एक एक वस्तू जागेवर ठेवतांना मनोमन 'ती नवऱ्याच्या सवयींचा उद्धार करत होती. एरवी सगळं घर सासूबाई आवरून ठेवतात. पण आज मला सुट्टी म्हणून त्याही नातेवाईकांकडे निघून गेल्या. श्रुती येणार म्हणून करतेय आज . रोज रोज मी नाही करणार. त्यांचा मुलगा काडी इकडची तिकडे करत नाही. सगळ्या अपेक्षा माझ्या एकटीकडून....'
  थोड्याच वेळात तिची चीड चीड सुरू झाली आणि तितक्यात दारावरची बेल वाजली. तिने बळेच हसून श्रुतीच स्वागत केलं.  ईशाच् काहीतरी बिनसलं होत हे श्रुतीला लगेच जाणवलं.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . ईशाने सगळा बेत श्रुतीच्या आवडीचा केला होता. सगळं आवरल्यावर दोघी बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या . श्रुतीने न राहवून ईशाला विचारलच," तुझं काय बिनसलं आहे ? "
तिने असं विचारताच ईशा मोकळे पणाने सांगू लागली,
" इतकी वर्षे झालीत लग्नाला पण सौरभ एक वस्तू जागेवर ठेवत नाही. मला पसारा केलेला आवडत नाही हे माहीत असूनही त्याच्यात किंचित बदल होत नाही. ओला टॉवेल पलंगावर टाकू नको म्हणून हजारदा सांगितलं तरी रोज ओला टॉवेल पलंगावरच टाकून  मोकळा होतो.
बाहेरून आल्यावर तर कधीच चपला उचलून जागच्या जागी ठेवत नाही. 
      कितिदाही जेवणाच टेबल आवरून ठेवा . हा बाहेरून आला रे आला की सगळं सामान त्यावर ठेवून देतो.
 कपाट आवरून ठेवलं की हा काहीतरी शोधा शोध करून सगळ्या कपड्यांची घडी मोडतो आणि वेळा नाही म्हणत घाई घाईत त्यांचे बोळे करून कपाटात कोंबून देतो. अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्याने मला त्रास होतो पण त्याला त्याचं काहीच वाटत नाही. कितीदा समजावून सांगितलं, चीड चीड केली तरी त्याचं ठरलेलं उत्तर असतं ..... 'या छोट्या छोट्या गोष्टी मला  लक्षात रहात नाही".
घरात असं वागणं तर बाहेरच्या व्यवहारातही अनेक गोंधळ घालून ठेवतो. एक काम धड करत नाही. अग साधी भाजी आणायला सांगितली तर धड आणत नाही. चुकून आणली तर तीही मला न आवडणारीच आणतो.
सासू सासरऱ्यांनी सौरभला नुसतं लाडावून ठेवलाय . काहीच वळण लावले नाही की जबाबदारीने वागण्याची सवय लावली नाही. हा  कोणतीच गोष्ट जबाबदारीने करत नाही. इतरांचे जबाबदारी घेणारे नवरे बघितले की हेवा वाटतो त्यांचा. संसार माझ्या एकटीचा थोडीच आहे. मीही देते सगळी जबाबदारी सासू सासऱ्यांवर ढकलून. तसंही त्यांना सगळी सूत्र त्यांच्याच हाती हवी आहेत. मुलाचे लाड केलेत. आता सूनेचेही करा म्हणते. सगळ्या अपेक्षा माझ्याकडूनच का?"
"
           ती श्रुतीला तिच्या तक्रारी सांगत होती  तेवढ्यात चिन्मय शाळेतून आला. आल्या आल्या त्याने दारातच बुट आणि सॉक्स काढून फेकले. त्याच्या खोलीत जाता जाता दप्तर जेवणाच्या टेबलवर ठेवून दिलं. खोलीत गेल्यावर तर पलंगावर शाळेचा गणवेश काढून टाकला . हात पाय धुवून असल्यावर ओला टॉवेल ही तिथेच टाकून दिला आणि ईशाला मोठ्याने आवाज दिला," आई भूक लागली. लवकर काहीतरी खायला दे"   ईशाने तत्परतेने   ," थकल का ग माझं पिल्लू" म्हणत घाईने त्याच्या आवडीचा चिवडा भरलेली प्लेट आणि  त्याच्याच  आवडत्या चॉकलेट दुधाचा पेला त्याच्या हातात दिला.   त्यानेही पटापट सगळं संपवलं आणि तिथेच सगळा पसारा टाकून तो खेळायला पसार झाला.
      त्याने केलेला पसरा आवरून ठेवत ईशाने कॉफी ही करायला घेतली.
        ईशा सगळं जागेवर ठेवतांना श्रुती तिच्याकडे आश्चर्याने बघत होती.
ईशाने कॉफीचा कप तिच्या हातात देत विचारलं," येवढं आश्चर्याने काय बघते आहे "
श्रुती पटकन् बोलून गेली ," तुलाच बघते आहे, थोड्यावेळापूर्वी नवऱ्याच्या तक्रारी सांगत होतीस. त्याच्या वाईट सवयींसाठी सासूला दोष देत होती. आता स्वतः च्या मुलाच्या त्याच वाईट सवयींकडे किती सहज दुर्लक्ष केलंस "
तिच्या या बोलण्याने ईशा खजील झाली. श्रुती तिला समजावत बोलली ," तुझ्याशी सौरभच
 लग्न वयाच्या २८ वर्षी झालं. तोपर्यंत चांगल्या वाईट सवयीने तो घडलेला होता. २८ वर्षांच्या सवयी बदलणे तितकसं सोपं नाही. प्रयत्नपूर्वक नवीन सवयी आत्मसाद केल्याशिवाय ते सहजासहजी शक्य नाही. त्या सवयीसाठी सासूला दोष देवून मोकळी झाली हे ही कबूल पण चिन्मय तर तुझा मुलगा आहे. तूझ्या पोटी जन्म घेतला आहे. त्याच्यातही त्याच सगळ्या सवयी आहेत ज्या तुला सौरभमधे असलेल्या  आवडत नाही. चिन्मयच्या या सवयीसाठी कोण जबाबदार??? सौरभला बघून तो शिकला असंही तू म्हणू शकते पण मग तुला बघुन तो काहीच शिकला नाही का ? विचार कर बायको या नात्याने तू सौरभला बदलू इच्छिते... त्याच्यावर चीड चीड करतेस पण आई म्हणून चिन्मयच्या सवयींवर पांघरूण घालतेस. तुझं सौरभवर प्रेम होत म्हणून त्याच्याशी लग्न केलस ना .... की त्याला चांगल्या सवयी लावायच्या होत्या म्हणून त्याच्याशी लग्न केल? सौरभनेही काही चांगले बदल स्वतःमधे करायला हवेत  किंबहुना ते केलेही असतील फक्त तुला ते जाणवत नसतील. किंवा त्याने केलेल्या चुका शोधण्याच्या नादात त्यांच्याकडे तुझं लक्ष जात नसेल. सतत तक्रार नोंदवून त्याला सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तो जसा आहे तसाच स्वीकारत बदल सुचवलेस तर त्याच्यातही बदल होईल. छोट्या छोट्या बदलाचे कौतुक करत राहिलीस तर तुला हवे असलेले मोठे बदल ही घडून यायला वेळ लागणार नाही.
 सासूला दोष देणं सोपं आहे ग ... परंतु आई म्हणून तू चिन्मयला घडवण्यात  कमी पडलीस तर उद्या तुझाही उद्धार होणार आहे हे विसरू नको. चीड चीड करून सौरभ आणि सासूला दोष देण्यापेक्षा आई म्हणून स्वतःला उत्तम घडव.... सगळं सोपं होईल. सासू सासऱ्यांनी सौरभला जबाबदारीची जाणीव करून दिली नाही हे खरंच आहे पण तूही चिन्मय च्या बाबतीत तेच करते आहेस. तुला सौरभ मधे बदल हवे आहेत पण त्या नादात तुझं चिन्मय कडे दुर्लक्ष होतंय. तुला त्याच्यासोबत अधिक वेळ घालवायला हवा. तो जितका वेळ बाबांना बघतो त्याच्यापेक्षा जास्त वेळा त्याला तुझी घरासाठीची तळमळ दिसायला हवी. मुलांना चांगल आणि वाईट दोन्ही कळत .  एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा तुम्ही दोघांनी मिळून चिन्मयशी संवाद साधा. त्याच्याशी बाप म्हणून बोलावं लागलं की सौरभमधे आपोआप जबाबदारीची जाणीव वाढीस लागेल. सौरभ ला जबाबदारी घेता येत नाही पण तुला ती घेता येते तरी तू सौरभकडे बोट दाखवून पळवाट शोधते आहे. खरं सांग तुम्हा दोघांमध्ये जास्त चूक कोणाची ?
मला माहीत असलेली ईशा जबाबदारी घेणारी होती ... टाळणारी नाही.
 तुझ्यात क्षमता आहेत म्हणून तुझ्याकडून अपेक्षा आहेत.  तुमच्या नात्यात ते चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतही असतील पण सासू सासऱ्यांना तुझ्या क्षमतांची त्यांना जाणीव आहे हेही नसे थोडके.  इतर अनेक घरांमध्ये सून बिनकामाची म्हणून तिच्या कडून काहीच अपेक्षा नसतात . त्या घरांमध्ये सगळ्या अपेक्षा मुलांकडून असतात. त्यांच्याशी तुलना करायला आवडेल? जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य असतो. कोणाचाही हेवा करू नकोस. तुझ्या कडे जे चांगले आहे ते बघ ... त्यावर लक्ष केंद्रित कर
 ."
      तिच्या बोलण्याने ईशाला तिची चूक कळली.सौरभमधे चांगले बदल घडवून आणण जेवढं गरजेचं आहे त्याही पेक्षा आई म्हणून चिन्मयला भविष्यासाठी चांगल्या सवयी लावणं आवश्यक आहे. जुन्याच नात्यांना नव्या दृष्टिकोनातून बघायला हवं.
 याची तिला जाणीव झाली. श्रुतीला तिने प्रेमभराने निरोप दिला. जाता जाता श्रुतीनेही तिच्यासाठी आणलेले खास फ्रेंडशिप बॅंड सारखे दिसणारे ब्रेसलेट तिच्या हातात घातले. श्रुती तर तिच्या घरी निघून गेली. पण जाता जाता आपल्या
 जिवलग मैत्रीणीच्या विचारांना नवी दिशा देवून गेली..
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com वर उपलब्ध आहे.
या कथेला साजेशी दोन मैत्रिणींची फुलांची रांगोळी.




No comments:

Post a Comment