मोकळा श्वास (कुटुंब दिना निमित्त)


#मोकळा_श्वास
©️ अंजली मीनानाथ धस्के

    रमाकाकू गेली तीन वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. मुलगा समीर आणि सून श्वेता दोघंही नोकरीला . छोटी ईश्र्वरी आणि केतन शाळेत शिकत होते. काकूंना दिवसभराची सोबत व्हावी म्हणून सविताला कामाला ठेवलेलं
       काकूंनीही मुख्याध्यापिका म्हणून नोकरी केलेली. नोकरीवर निवृत्ती मिळून सहा महिने झाले नसतील इतक्यात त्यांच्यावर पक्षाघाताचा आघात झाला. त्याचं आयुष्य बदलून गेलं. फिरण्याची आवड , नव नवीन पदार्थ बनवून बघण्याची आवड  त्यामुळे  काकूंना परावलंबी जीवन नको वाटू लागलं.
 पुन्हा स्वतःच्या उभं रहाता यावं म्हणून जिद्दीने अनेक उपाय केले. त्यालाच यश आलं होतं. त्या भींतीचा  आधार घेत घरातल्या घरात फिरू लागल्या.
         आता त्यांना खोली बाहेर पडण्याचे वेध लागले पण इतक्यात कोव्हीड१९ मुळे लॉक डाऊन घोषित झाले. घराबाहेर पडणारी मंडळीही घरात बंदिस्त झाली.
काही दिवसातच श्वेताची चीड चीड सुरू झाली. मुलांचा गोंधळ, समीरच वर्क फ्रॉम होम, सविताची लुडबुड याने तिला तिचा निवांत वेळ मिळेनासा झाला. तिलाही वर्क फ्रॉम होम असून माहेरी जाता येत नव्हतं याच तर दुःख होतंच पण घरातल्या कामांची सवय नसल्याने त्यातच दिवस जात होता याचीही खंत होती. एरवी वेळात वेळ काढून ती रमा काकूंच्या खोलीत जावून बसायची. ऑफिस मधून आलं की सध्याकाळचा चहा दोघी सोबतच घ्यायच्या. सासू सुनेचे नाते असले तरी कधी त्यांच्यात मतभेद नव्हते. ती आवर्जून काकुंशी दिवसभर केलेल्या कामाबद्दल अनुभवाबद्दल मन मोकळं बोलायची.  तिचं हे बोलणं ऐकून काकूंना ही उत्साह वाटायचा. नवीन गोष्टींची माहिती मिळायची.
  पण आता ती सतत चीड चीड करू लागली. मुलांनी पसारा केला की त्यांच्यावर ओरडू लागली. बाहेर खेळायला जात येत नव्हतं मग ती मुलं तरी काय करतील ती रमा काकूंकडे जावून आईची तक्रार करत होती. श्वेता चहा घेवून आली तरी आता फारस बोलत नव्हती. काकूंनी चौकशी केली की ," कित्येक दिवस बाहेरच पडत नाही तर काय विशेष असणार आहे बोलण्यासारखं" म्हणून ती बोलणं टाळत असे.
       आज तर काकूंना ती खोलीत आली तेव्हा अधिकच खिन्न जाणवली. नेहमी ती मन मोकळं करते आज आपणच मोकळेपणाने बोलू असं ठरवून काकू तिला बोलल्या ," श्वेता अग आज आपली ईश्र्वरी विचारात होती की आजी तुला नाही का ग कंटाळा येत एकाच खोलीत राहण्याचा , आम्हाला तर खूप कंटाळा आला ग घरात राहण्याचा"
श्वेता सहज बोलून गेली," आगावू झाली आहे कार्टी"
काकू पुन्हा बोलल्या ," आगावू नाही ग ... फार विचारी आहे. माझ्यात आणि तिच्यात तुलना केल्यामुळे तिला असे प्रश्न पडतात. पण कसं समजावं तिला अग कोरोना आता आला . मी गेली कित्येक वर्षे खोलीतच कोंडल्या गेले आहे. खूप खूप शिकवलं ग या दुखण्याने आधी मीही चिडचिडी होते पण आता संयम बाळगायला शिकले, तडजोड करायला शिकले,
 चार भिंतीत सुखाने नांदायला शिकले
आल्या संकटाचे संधीत रूपांतर करायला शिकले
छोटे छोटे आनंदाचे क्षण वेचायला शिकले .माणूस म्हणून घडतांना एक पाऊल पुढे टाकायला शिकले. शिकले कसलं .... शिकावच लागलं. खोलीतल्या खोलीत चीडचीड केली असती तर तू माझ्याकडे बोलायला आली नसती. सतत तक्रारी केल्या असत्या तर समीरने बोलणं टाळलं असतं. दुखण्याच कौतूक करत बसले असते तर माझी रवाणगी नाईलाजाने तुम्हाला दवाखान्यात करावी लागली असती. इथे नातवंड डोळ्यासमोर खेळत असतांना दवाखान्यात जायला कोणाला आवडेल?  तुमचा अवती भोवती वावर असल्याने जो आनंद मिळतो त्याची किंमत फार मोठी आहे. एकट्याने रहाणाऱ्याला बघितलं की कुटुंबाचे महत्त्व पटते. आपण भांडलो तर समजूत काढायला कोणीतरी हवं असतं. काही विशेष बनवलं तर कौतुक करायला आपलं माणूस लागतं. घर कामात कितीही कष्ट पडले तरी आपल्या माणसाच्या मिठीत त्याचा विसर पडतो. मुलांच्या लाडिक हट्टाने.... नव नवीन फर्माईशिंनी तर जगणं सार्थकी लागल्याचा भास होतो. खोलीत जरी अडकून पडले तरी ही खोली माझ्या माणसांच्या घरट्यात आहे हे काय कमी आहे. माझ्या ह्या घरट्यात चिव चिव करणारी माझी पिल्ल मुक्त बागडतात याच समाधान खूप आहे. संकटाचे दिवसह जातातच ग..... पण या संकटात आपण सगळे सोबत आहोत हे किती महत्त्वाचं. " डोळा मारत त्या श्वेताला हसत म्हणाल्या," तसंही ..... असली मजा तो सब के साथ ही आता हैं

काय समजलीस?" 
          श्वेताला तिची चूक कळली. लेकीच्या मायेनी ती रमा काकूंच्या कुशीत शिरली. तिला तसं पाहून ईश्र्वरी, केतन आणि समीर ही सगळी काकूंना बिलगली.  काकूंनीही आईच्या मायेने त्यांना आपल्या पंखा खाली घेतलं.
चार भिंतीच्या आत घराने पुन्हा मोकळा श्वास घेतला.

©️अंजली मीनानाथ धस्के
     
टिपः सर्व वाचकांना कुटुंब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
   लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

     इतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. ब्लॉग ची लिंक anjali-rangoli.bligspot.com





No comments:

Post a Comment