रनर-अप (भाग १)

 #रनरअप
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे )
  #भाग१

 

गार्गी आणि रोहन दोघंही उच्च शिक्षित. गार्गीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडकल रिसर्च मधे   न्यूरो लॉजिकल सायंटिस्ट ची फेलोशिप मिळवली होती.  तर रोहन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ  आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधे संशोधक म्हणून कार्यरत होता. .

    दोघांच्या बालपणाच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि १० वर्षांच्या सोबतीनंतर  प्रेमाची परिणीती लग्नात झाली.

          दोघंही लहानपणापासूनच  महत्त्वाकांक्षी होते. तितकंच एकमेकांवर प्रचंड प्रेम करणारे

 होते. दोघांच्या सुखी संसाराला सुरवात झाली होती. दोघं एकमेकांना वेळ देत , एकमेकांच्या आवडी निवडी जपत , लाडिक रुसवे फुगवे करत आनंदात दिवस घालवत होते.

 त्याच वेळी दोघंही  स्वत:च्या  दोन निरनिराळ्या महत्त्वाकांक्षी संशोधनावर काम करत होते. दोघांसाठीही हे संशोधन खूप महत्त्वाचे होते. त्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत होते.



गार्गी मानवी  शरीरातील मज्जा संस्थेच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करत होती. मानवी शरीरातील चेतापेशी, ज्ञानतंतूमंडळ हे इतर अवयव कसे नियंत्रण करतात हे समजून घेत होती .  एखादा मानवी अवयव निकामी झाला तर मृत चेतापेशींच्या जागी नवीन सजीव पेशींचे प्रत्यारोपण करून नवीन ज्ञानतंतूमंडळ ची निर्मिती शक्य होईल आणि मग  निकामी अवयव ही  मज्जा संस्थेद्वारे जोडला जावून त्या अवयवांची हालचाल पूर्ववत सुरू करणे शक्य होईल अशी तिची खात्री असल्याने त्यासाठीचे निरनिराळे प्रयोग ती प्रयोगशाळेत  करत होती.

   रोहनने  कृत्रिम मानवी मेंदू विकसित करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. या विषयावर बरेच संशोधन आधीही झाले होते पण प्रत्येक  यंत्र मानवाच्या बुध्दी बाबतीत काही ना काही मर्यादा होत्या. रोहनचे संशोधन हे  यंत्र मानव या संकल्पनेला फार पुढे घेवून जाणारे होते .



       यांत्रिक मानवी मेंदू बनवण्यासाठी त्याच्या संशोधनाला गार्गी करत असलेला अभ्यास सहाय्यक ठरत होता. तिच्या माहितीच्या आधारे त्याच्या संशोधनाला योग्य दिशा मिळत होती. एका मानवी मेंदूद्वारे दुसऱ्या मानवी मेंदूला  नियंत्रित करता येईल अशी चीप त्याने बनवली होती.

तरी त्याच्या संशोधनात त्याला हवं तसं यश मिळालं नव्हतं.

      बघता बघता त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली.

  बेंगलोरला  संशोधन परिषद घेण्यात आली तेव्हा रोहन ने त्याचे हे संशोधन तिथे मांडले .

 त्याने यांत्रिक मेंदू बनवण्यावर काम करावं अशीच सगळ्यांची इच्छा होती. पण ते काम तितकसं सोपं नव्हतं. त्या संशोधना दरम्यान त्याला  मानवी मेंदू नियंत्रित करण्यासाठी ची चीप बनवण्याचा शोध हाती लागला होता. पण या संशोधनाबद्दल  अनेकांना शंका वाटत होती. या संशोधनाचा गैर वापर होण्याची शक्यता जास्त असल्याने त्याने हे संशोधन पुढे न नेता फक्त यांत्रिक मानवी मेंदू बनवण्यासाठीचे  संशोधन करावे असे बंधन त्याच्यावर लादण्यात आले. त्याच नाराजीत परतत असतांना  त्याचा मोठा अपघात झाला. 

      महिन्याभराच्या अथक परिश्रमातून डॉक्टरांना त्याचा जीव वाचवण्यात यश मिळालं होत. जीव वाचला असला तरी त्याचे त्याच्या शरीरावर कसलेच नियंत्रण राहिले नव्हते. मेंदू ठणठणीत असूनही मज्जा संस्था निकामी झाल्याने मेंदुचे कुठलेच आदेश त्याच्या कोणत्याच शारीरिक अवयवाला पोहचवता येत नव्हते. डोळ्यांनी सगळं बघता येत होत. कानाना सगळं ऐकू येत होत पण प्रतिक्रियेसाठी अवयवांची हालचाल करता येते नव्हती.

     त्याची ती अवस्था पाहून गार्गी मनातून पुरती खचली. गार्गी उसन अवसान आणून त्याच सगळं नीट करत असली तरी रोहन मात्र कायम तिच्याकडे बघत अश्रू गाळत असायचा.   त्याला खूप खूप बोलायचं होत पण काहीच व्यक्त होता येत नव्हतं म्हणून सगळ्या भावना अश्रू बनून वाहू लागायच्या. ती त्याचे अश्रू पुसायची. तिलाही त्याच्या मनात काय सुरू आहे याची कल्पना होती पण त्यावर तिच्याकडे सध्या तरी काहीच उपाय नव्हता.

      डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीती  यापेक्षा जास्त सुधारणा  होणार नाही हे स्पष्ट केले होते.

     तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम तिला गप्प बसू देत नव्हतं. तिला त्याची ही अवस्था बघवल्या जात नव्हती. तिने तिच्या संशोधनाचा वेग वाढवला.  त्याच्या शरीरातील चेतापेशी बदलून नवीन चेता पेशी टाकल्यावर त्याचा काही फायदा होईल का या अनुषंगाने तिने अनेक प्रयोग करायला सुरवात केली. प्राण्यांवर प्रयोग करण्यात खूप वेळ जावू लागला . इकडे रोहनची अवस्था अतिशय खराब होवु लागली. तो निराशेच्या आहारी गेला. ती जिद्दीने त्याला आशावादी ठेवायचा प्रयत्न करत होती. त्याच्या शरीरातील चेता पेशी जागृत होण्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते ते सगळं ती करून बघत होती. दीड वर्षांनी तिच्या बाह्य प्रयत्नांना छोटंसं यश आल. रोहन डोळ्यांची हालचाल करू लागला.
क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
कथेसोबत कथेला साजेशी रांगोळी ही तुमच्या भेटीला आली आहे.
#AnjaliMinanathDhaske

इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com उपलब्ध आहे.

टिपः
लिखाण आवडल्यास शेअर करताना नावासहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_91.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_19.html?m=1

भाग ४:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_48.html?m=1

भाग ५: शेवटचा भाग

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_16.html?m=1






         

No comments:

Post a Comment