Showing posts with label १०० शब्दांची गोष्ट. Show all posts
Showing posts with label १०० शब्दांची गोष्ट. Show all posts

स्पर्श, कन्यादान आणि मातृत्व (100 शब्दांची गोष्ट)

 'हात ' या शब्दावर आधारित लिहिलेल्या या तीन कथा तुम्हाला आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा. 


#स्पर्श

#100शब्दांचीकथा 

मुलांनी हाताला धरून घराबाहेर काढलेल्या बहिणीला शामरावांनी स्वतःच्या घरी आणले.  तारुण्यात सासुरवास सहन करणारी ती वडिलांच्या धाकामूळे कधी हक्काने माहेरी आली नाही. या वयात मुलांचा जाचही मुकाट्याने सहन करत होती. 

आज मात्र  शामरावांनी अंगणातील एक खोली खास तिच्यासाठी तयार करून घेतली. बहिणीच्या थरथरत्या हाताला धरत त्यांनी तिला त्या खोलीत नेले," आज पासून ही खोली फक्त तुझी आहे ताई. कोणीही तुला ईथून बाहेर काढणार नाही अगदी माझ्या माघारी देखील " असे त्यांनी सांगताच बहिणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच आपला हात आपल्या भावाच्या हातावर ठेवला. आज त्या स्पर्शात अगतिकता नसून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात का होईना हक्काचे माहेर मिळाल्याचे समाधान होते. 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

*********************************************

#कन्यादान

#100शब्दांचीकथा

कन्यादानाच्या वेळी मेहंदीने रंगलेला रियाचा नाजूक हात  राहुलच्या हातात देतांना तिच्या आई बाबांना गहिवरून आले. राहुलने  रियासोबतच तिच्या आई बाबांचा हातही प्रेमाने धरला व बोलला, " या विधीने तुम्हाला तुमची मुलगी परकी होणार नाही,तिला तिचे माहेर दुरावणार नाही तर  मी व माझे कुटुंब तुमच्या परिवाराशी कायमचे जोडले जाणार आहोत. दोन्ही कुटुंबांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन व माझ्या या प्रवासात मला रियाची मोलाची साथ लाभावी म्हणुन आपण हा विधी करतोय " त्याचे असे समजुतदार बोलणे ऐकून रियाच्या आई बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर 

राहुलच्या आईबाबांनीही अलगद त्या चौघांचे हात आपल्या हाताच्या ओंजळीत घेतले.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

**********************************************

#मातृत्व 

#100शब्दांचीकथा

उपेक्षित जिणे जगतांना पूजाच्या सगळ्याच भावना जणू मेल्या होत्या. नेहमी प्रमाणेच ती यांत्रिकपणे टाळ्या वाजवत, पुरुषी हातांचे किळसवाणे स्पर्श टाळत रेल्वे स्टेशनवर फिरत होती. भूक लागली म्हणुन घेतलेल्या ताटलीतील समोसा खाण्यासाठी हात उचलला तसा तिच्या हाताला चिमुकल्या हातांचा स्पर्श जाणवला. "थोड्या वेळात परत येतो" सांगून गेलेल्या बापाची सकाळपासून वाट बघणार्‍या चिमुरडीच्या डोळ्यातील अगतिक भूकेने पूजाच्या   कठोर काळजालाही मायेचा पाझर फोडला. पोलिसात तक्रार देवूनही चिमुरडीचे आई वडील न मिळाल्याने पूजाने चिमुरडीला दत्तक घेतले. निसर्गाने स्त्रीत्व बहाल केले नसले तरी चिमुरडीचा हात कायद्याने हातात घेवून पूजाने मात्र मातृत्वाला कायमचे कवटाळले. पूजाच्या टाळ्यांनाही आता चिमुरडीच्या उज्ज्वल भविष्याचा ध्यास लागला.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)


कथे सोबत हाताची Rangoli post करते आहे 



ती ,वेळ आणि चहा

 

#जागतिक_चहा_दिवस निमित्त......

*********** ती,वेळ आणि चहा **********
तिची ही धंद्याची वेळ. रोजच्या सारखी मुरडत ती गिर्‍हाईक शोधत होती. तेवढ्यात  पाऊस सुरू झाला अन् ती चिंब भिजली. मोडक्या छताचा आसरा घेत ती थांबली. या संधीचा फायदा घेत काही जण तिला उगाच खेटू लागले  तर काही नजरेनेच तिचे चीर हरण करू लागले. तीही या सगळ्याला निर्ढावलेली होती तरी ओल्या देहाकडे बघणाऱ्या वखवखलेल्या नजरा बघून  फुकट मजा घेवू पाहणाऱ्यांची तिला किळस आली . तेवढ्यात त्याने आपल्या बलदंड  हाताने वाफाळत्या चहाचा कप तिच्या समोर धरला. त्याच्या त्या छोट्याशा कृतीनेच काहींनी आपल्या हातची संधी गेली म्हणत काढता पाय घेतला. तर काहींनी त्याच्या धिप्पाड शरीरयष्टीकडे बघत आपला फालतू मोह आवरता घेतला.
तिची चहाची वेळ नसतांनाही तिच्या वेळेला धावून आलेल्या चहाच्या कपाभोवती तिच्या हातांची पकड घट्ट झाली. तो मात्र पाऊस थांबला तसा आल्या मार्गाने निघूनही गेला.
©️Anjali Minanath Dhaske ( Elgire)



ती... एक लढवय्या

 #ती_एक_लढवय्या

#१००शब्दांचीगोष्ट

लावण्या नावाप्रमाणेच सुंदर. चाळीशीत येवूनही ती महाविद्यालयीन तरुणीप्रमाणे कमनीय बांधा राखून होती.

एक दिवस आंघोळ करतांना काखेत गाठ जाणवली आणि  सगळच बदलून गेलं. 

              आईचं काळीज ते.... पोरांच्या कोवळ्या वायाकडे बघून खंबीर झाली. सगळे उपचार न कंटाळता पूर्ण केले.  किमोने तिचा रंग काळवंडला. डोक्यावरचे काळे भोर केस गायब झाले. कमनीय बांधा जावून हाडांचा सापळा राहिला. वय अचानक तिपटीने वाढल्यासारखा चेहरा झाला. मात्र आत्मविश्वासाला कधीच तिने साथ सोडू दिली नाही.

        आरशात बघतांना कधी डोळ्यातून पाणी काढलं नाही.  पूर्वीसारखीच आत्मविश्वासाने वावरत राहीली. ती खरी लढवय्या होती.

तिच्या खंबीर साथीने नवरा, मुलंही सावरली. 

आयुष्याची लढाई फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर जिंकता येते हे तिने सिद्ध केले.

©️ अंजली मीनानाथ धस्के

टीप: लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहीत करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.



नदीचे अनुकरण

#नदीचे_अनुकरण
©️अंजली मीनानाथ धस्के
#१००शब्दांचीगोष्ट
       कशाला ऐकुन घेते? मी बघ कशी रोख ठोक बोलते. कोणी
 पुन्हा बोलायची हिंमतच करत नाही" स्मिताने नेहाला खडसावलं.
त्यावर नेहा बोलली, नेहमी जिथल्या-तिथे उत्तर देणं योग्य नसतं. नाण्याला दोन बाजू असतात. यानिमित्ताने त्यांची बाजू कळते.  माझ्याच योग्य-अयोग्य  तराजूत त्यांना तोलत नाही. रोखठोक बोलण्यानं संवाद नष्ट होतो. त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करते. त्यांनी माझ्याच मताशी सहमत असावं असा अट्टहास धरत नाही. गरज पडल्यास माझ्या विचारात बदल घडवते. नदी रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांशी झुंजत नाही. स्वतःला  वळणं घेत अविरत वाहते. त्याचप्रमाणे मीही एकदा सांगते. पटलं तर उत्तम नाहीतर त्यांच्या विचारांशी संघर्ष करून  जगण्यातला आनंद गमावण्यात मला  रस नाही.
तिचा  दृष्टीकोन बघून स्मिता भारावली.
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करतांना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
 

आयुष्याची पाटी

#आयुष्याची_पाटी
कुठे थांबायचे ते कळले पाहिजे...... या विषयावर लिहिलेली ही कथा.
#१००शब्दांचीकथा


हरीश धडाडीचा, कर्तृत्वाच्या जोरावर संघर्षावर मात करणारा.  भविष्याची वाटचाल करतांना भूतकाळातील वाईट अनुभवांना कवटाळूनच त्याने लोकांशी वागण्याची पद्धत ठरवली. त्यानादात त्याने कधी मित्रांना, आप्तगणांना जवळ केले नाही.
 प्रत्येकाला तो त्याच  अनुभवातून तोले.
भूतकाळाने त्याचा वर्तमान  नष्ट केला. त्याच्यात 'मीपणा' वाढीस लागला.
        तारुण्यात तर काही वाटले नाही पण आता उतार वयातही तो नवीन अनुभवांचा आनंद घेण्यापेक्षा त्याच्या मीपणाच्या गोष्टीच  सगळ्यांना सांगतो. परिणामत: आज तो एकाकी पडला आहे. एकटेपणाचा भावनेने त्याला ग्रासले.
         वाईट अनुभव कितीही खरे असले तरी ते किती कवटाळायचे हे ठरवायला हवं. वाईट अनुभवानंतरही नवीन अनुभवासाठी आयुष्याची पाटी कोरी ठेवता यायला हवी.
भूतकाळात रमतांना  कुठे थांबायचं हे कळले पाहिजे.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबतीला रांगोळी ही आहेच. इतर लिखाण आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहे. anjali-rangoli. blogspot.com


अनोळखी वागणूक

#अनोळखी_वागणूक
#१००शब्दांचीकथा
©️अंजली मीनानाथ धस्के
    काही दिवसांपूर्वी रोहनचा अपघात झाला. तो मृत्यूच्या दाढेतून परतला. आईवडिलांची काळजी, भविष्याची चिंता, समाजाचे बंधन फाट्यावर मारून तो बेदरकार, बिनधास्त, मुक्त आयुष्य जगत आला होता. सुंदर चेहरा इतरांना दिसावा म्हणून हेल्मेट  टाळत होता.
आज आरशात त्याला त्याचाच चेहरा अनोळखी वाटला. ठीक ठिकाणी जखमांचे व्रण उमटले होते. जगण्यामरण्यातील एका श्र्वसाच्या अंतराने त्याला खूप काही शिकवलं होतं. आईने सक्तीने हेल्मेट घातले नसते तर आज तो स्वतःला आरशात बघूही शकला नसता.  दिसण्यापेक्षा असण्याची किंमत त्याला कळली होती. आरशातल्या अनोळखी प्रतिबिंबात जबाबदारीने वागण्याचा संकल्प त्याला जाणवला .
        कामावर जातांना त्याने स्वतःहुन हेल्मेट घातलेलं बघून त्याच्या आईला मात्र त्याची ही अनोळखी वागणूक निश्चिंत करून गेली.
©️अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.



#सकारात्मकता_हेच_औषध

#सकारात्मकता_हेच_औषध
#१००शब्दांचीकथा
©️अंजली मीनानाथ धस्के
    रुहीचा कोरोना चाचणी निकाल सकारात्मक आला. ती पुरती हादरून गेली. आता पुढचे १४ दिवस दवाखान्यात काढावे लागणार.  आपण बरे होवू याची काही खात्री नाही. आपण मेलोच तर कोणी बघायलाही येणार नाही. अशा नाना कल्पना करून ती अजून निराशेच्या आहारी जात होती. त्यात भर म्हणजे तिच्या  मुलाने  रडून एकच गोंधळ घातला. इच्छेविरुद्ध  ती दवाखान्यात दाखल झाली.
      तिचा  निस्तेज चेहरा बघून शेजारच्या खाटेवरचे  अनोळखी काका बोलले,"पोरी काळजी करू नकोस. इथे आयुष्य संपत नाही. फक्त थोड्या दिवसांची विश्रांती घेतं.  इथल्या अनुभवाने ते अधिक खंबीरपणे नवीन सूरवात करेल" या शब्दांनी तिला जगण्याची नवीन ऊर्जा मिळाली. त्यांचे शब्द तिने खरे केले. ती करोनाविरूद्ध लढाई जिंकली. 
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.


आईची साथ.....एक संरक्षक कवच



   #१००शब्दांचीकथा
मी सक्षम आहे या विषयावर लिहिलेली ही कथा
#आईची_साथ_एक_संरक्षक_कवच
      नवऱ्याच्या माघारी सुमन मावशींनी चार घरची कामं करून,  स्वतः उपाशी राहून शिक्षणाची सोय करत मुलाला मोठ केलं होतं.
     मोठ्या पगाराची नोकरी, शहरी छोकरी मिळवून तो परदेशात स्थायिक झाला होता. पैसा असून नशीबाने साथ सोडली.
तिथल्या हवामानाचा वाईट परिणाम त्याच्या शरीरावर होवून दोन्ही किडन्या निकामी झाल्या. 
     खेड्यातल्या सुमन मावशींना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी स्वतःची एक किडनी त्याला देण्याचा निर्णय घेतला. उतारवयातही त्याच मुलाच्या आधार बनल्या. नशीब  साथ सोडत पण आई नाही. मृत्यूशी झुंज देवून परतलेल्या, पश्चातापाने रडणाऱ्या मुलाचे डोळे पुसत त्या जणू स्पर्शातून त्याला सांगत होत्या," अजून मी सक्षम आहे तुझ्यावरची संकटं परतून लावायला. रस्ता चुकलेल्या मुलाला योग्य मार्गावर आणायला."
©️ अंजली मीनानाथ धस्के

आई असते सक्षम


#१००शब्दांचीकथा
"मी सक्षम आहे" या विषयावर लिहिलेली कथा
#आईच_असते_सक्षम
 गरीब,अशक्त, घाबरट,आठ दिवसांची उपाशी गरोदर नफिजा कोरोना पोझिटीव्ह झाली. गावातल्या दवाखान्यांनी तिची प्रसूती नाकारली. दुसरा दवाखाना २५किलोमीटर दूर शेजारच्या गावात. वाहतूक सेवा बंद. रात्रीची वेळ. पोटातल्या बाळासाठी तिने हींमत एकवटली. पायीच चालायला सुरुवात केली.  नवरा गपगुमान तिच्या मागे चालू लागला.
        तिथे पोहचल्यावर स्वतःमधे कसलेच त्राण बाकी नसतांनाही तिने  गुटगुटीत बाळाला जन्म दिला. बाळाला तिच्यापासून दूर ठेवण्यात आले. तरीती खचली नाही की रडली नाही. अशक्य ते शक्य केल्याने डॉक्टरांना तीचं नवल वाटत होतं. तिची दुसरी चाचणी नकारात्मक आली. अखेर तिने बाळाला मिठी मारली. डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रु  जणू  सांगत होते,"मी आई आहे....  सक्षम आहे.... सगळी आव्हानं पेलायला.... माझ्या बाळाचे उत्तम संगोपन करायला."
©️ अंजली मीनानाथ धस्के



मुक्त सृजनशीलता महत्त्वाची

#१००शब्दांचीकथा
 momspresso Marathi वर विजयी कथेत स्थान प्राप्त झालेली कथा.
विषय : जादूची कांडी फिरवणारी परी भेटली तर...
#मुक्त_सृजनशीलता_महत्त्वाची

  जादूची कांडी फिरवणारी परी भेटली तर.... वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली.
रावी: तर... मी या जगातून स्पर्धाच नष्ट करून टाकेल. स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढतो,कमतरता कळतात,प्रेरणाही मिळते. खूप शिकायला मिळतं. हे सगळं खरं असलं तरी खूप मेहनत घेवुनही स्पर्धेत जेव्हा अपयश वाट्याला येतं तेव्हा मोठ्यांनाही ते  सहज स्वीकारता येत नाही. तिथे लहानांकडून काय अपेक्षा करणार?
*स्पर्धा आपल्या मुक्त सृजनशीलतेवर वेळेचे,विषयाचे बंधन लादते* स्पर्धा कळतनकळत तुलना करायला शिकवते. ही तुलनाच जीवघेणी ठरते. हरणाऱ्याचे सांत्वन केले जाते. लक्षात मात्र विजयी होणाराच राहतो. हरण्या-जिंकण्या पलीकडचं आयुष्य प्रत्यक्षात जगायचं असेल तर स्पर्धा नष्ट करायलाच हवी. 
 रावीचे उत्तर ऐकून आयोजकांनी टाळ्यांच्या गजरात *स्पर्धा*असा उल्लेख काढून*व्यक्त व्हा*असे आवाहन केले.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः कथा आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावी.






आजीच झाली परी

#१००शब्दांचीकथा
विषय : जादूची कांडी फिरवणारी परी भेटली तर...
#आजीच_झाली_परी

    चिमुकल्या नातीने परी कथा सांगणाऱ्या आजीलाच प्रश्न केला...
आजी तुला जादूची कांडी फिरवणारी परी मिळाली तर.... तू काय करशील ग?

 पैश्यामागे धावणाऱ्यांना नात्याच महत्त्व कळू दे. नात्यांमध्ये मोकळा संवाद वाढू दे. घरातल्या लक्ष्मीहाती अन्नपूर्णा वसू दे
घराचं गोकुळ होवू दे. हेच मागितलं असतं ग पण तो कोरोना राक्षस आलंय ना त्यानेच माझ्या या इच्छा पूर्ण केल्या.
 आता जर परी भेटली तर मात्र"कोरोना राक्षसाने लवकर जावं आणि माझ्या या छोट्या परीला अंगणात खेळता यावं हेच मागेन"
तूला परी भेटली तर तू काय करशील ?

 मी... तिचा पापा घेईल... असा 😘
 ती तुझ्यासारखीच न मागता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल ना म्हणून....
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः कथा आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावी


त्याच्या प्रेरणेने तिची झेप



#१००शब्दांचीकथा
#विषय
#आकाशी_झेप_घे_रे_पाखरा

#कथा१
#त्याच्या_प्रेरणेने_तिची_झेप

     मृणाल खूप चुलबुली मुलगी.
२३व्या वर्षी लग्न होवून संसाराची जबाबदारी अंगावर पडली.
पहिलं अपत्य 'विशेष मुल' म्हणून जन्माला आलं.
       आई होण्याचा आनंद अनुभवण्यापेक्षा मुलाची अवस्था बघून ती पुरती कोलमडली. अनेकांनी मुलाला संपवण्याचे सुचवले पण तिने त्याला जगवण्याचे आव्हान स्विकारले.
स्वतःच अस्तित्व विसरून ती फक्त त्याची आई बनली. त्याला व्यक्त होता येत नव्हतं पण आईची तळमळ जाणवत होती. १३ वर्षाचा असतांना त्याचा  संघर्ष संपला. प्राण पाखरू होऊन  समाधानाने आकाशात विलीन झाले.
'विशेष मुलांच्या' संगोपनासाठी पालकांना समुपदेशन करण्याचे ध्येय देवून  जणू त्याने आपल्या आईचा पिंजराच तोडला होता.
आज ती त्याच्या नावानेच एक संस्था चालवते. त्याच्यासारख्या   अनेक मुलांना जगण्याचा हक्क मिळवून दिला.
©️ अंजली मीनानाथ धस्के




पिलानेच आईच्या पिंजऱ्याचे उघडले दार



   #१००शब्दांचीकथा
#विषय
#आकाशी_झेप_घे_रे_पाखरा
#कथा२
#पिलानेच_आईच्या_पिंजाऱ्याचे_उघडले_दार

आई मी निबंध स्पर्धेत भाग घेवू?

घे की त्यात विचारायचं काय.

अग पण माझ्याकडे तेवढा वेळ  नाही. विषय ही थोडा किचकट वाटतो. मला बक्षिस मिळणार नाही.

अरे ..... बक्षिस मिळावं  म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचा नसतो. त्या निमित्ताने आपली नवीन विषयाची तयारी होते. इतरांचे दृष्टिकोन जाणून घ्यायला मिळतात.  जिंकणाऱ्याला बक्षिस मिळत पण इतरांनाही स्पर्धा अनुभव संपन्न करून जाते. वेळ जेवढा आहे तेवढाही पुरेसा आहे तू योग्य नियोजन करण्याची गरज आहे फक्त.

मग हे नियोजन  रांगोळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी  तूही करायला हवे. तू मात्र स्वतःला घराच्या जबाबदारीत गुरफटून घेतले आहेस.

आकाशी भरारी घेण्यासाठी तिच्या पिंजऱ्याचे दार तिच्याच पिलाने आज हळूच उघडले.
©️अंजली मीनानाथ धस्के


जगण्याची मिळालेली एक संधी

 
   
      #१००शब्दांचीकथा 

#जगण्याची_मिळालेली_एक_संधी

       मित्रांसोबत बाईक रेसिंगचा प्लॅन ठरवलेला. घरी कल्पना न देता फक्त  'आई येतो गं' म्हणत घराबाहेर पडला.
           ती हाक ऐकून बाहेर येणाऱ्या आईचे लक्ष समोर पाडलेल्या हेल्मेटकडे गेलं. त्वरेने तिने ते त्याच्या हातात दिलं.
            वेगात गाडी चालवतांना मोठा अपघात झाला. मित्रांनी दवाखान्यात दाखल केले.
           दहा दिवस कोमात गेलेला तो शुद्धीत आला. केवळ हेल्मेट होत म्हणून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
   महिनाभर रोज त्याच्या काळजीने काळवंडलेल्या आईवडिलांना बघून त्याने आज एक निश्चय केला.
              २९ फेब्रुवारी या वर्षातला एक जास्तीचा दिवस. मलाही देवाने जगण्याची एक जास्तीची संधी दिली. इथून पुढे मी स्वतः वेगावर नियंत्रण ठेवणारच पण इतरांनाही सुरक्षिततेची काळजी घ्यायला प्रेरित करणार.
©️ अंजली मीनानाथ धस्के
कथा आवडल्यास नावा सहित शेयर करावी.

आई विषयावर लिहिलेल्या तीन कथा

#१००शब्दांचीगोष्ट
आई या विषयावर लिहिलेल्या कथा.. .

#तिची_वेदना ( कथा१)
तेरा वर्षाच्या श्वेताला पहिल्यांदा जेव्हा ओटीपोटात दुखलं  तेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्या त्या वेदनेचाही सोहळा केला होता.
मुलगी आता मोठी झाली. भावी नवऱ्याचा 'वंशवेल' वाढवण्यास ती शारीरिकदृष्ट्या तयार आहे यासाठीचा तो सोहळा. श्वेतानेही त्या वेदनेला आपली 'सखीच' मानलं.
परंतु....
आज श्वेताच्या लग्नाला १० वर्षे झाली. अनेक उपाय केले  तरी तिची कुस उजवली नव्हती. वंशवेल वाढवायला नुसती माती उत्तम असून चालत नाही. बियाणही चांगल लागतं याचा विसर बहुदा सगळ्यांनाच पडला होता. दर महिन्याला येणाऱ्या तिच्या सखीवरच सगळं खापर फोडलं जात होतं. दर महिन्याला तिचा 'आई' होण्याचा प्रवास लांबणीवर पडला की, लहानपणीच्या 'त्या' सोहळ्याच्या आठवणी तिला नव्याने वेदना देत होत्या.
©️अंजली मीनानाथ धस्के

#निस्वार्थी_आई_की_स्वार्थी_व्यक्ती ( कथा २)
तीन वर्षाच्या मुलाला घेवुन बसमधे चढलेली ती आई बसायला जागा शोधत होती. "मला नको पण माझ्या मुलाला बसायला थोडी जागा द्या. लांब जायचं आहे हो" असं म्हणत तिने एका सभ्य गृहस्थाच्या मांडीवर आपल्या मुलाची सोयही केली.
 ते सभ्य गृहस्थ आणि त्यांचा शेजारचा माणूस थांबा आला म्हणून उतरले.  मुलाला सीटवर बसवून ती आईही त्याच्या शेजारी ऐसपैस विराजमान झाली. "मुलाला मांडीवर घ्या" अशी लोकांनी ओरड सुरू केली. सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तिने मुलाला आडवं झोपवून थोपटायला सुरुवात केली.
ते दृश्य पाहून एका संवेदनशील  मनात प्रश्न निर्माण झालाच ... की
या स्त्रीला ' निस्वार्थ  प्रेम करणारी आई'  म्हणावं की स्वार्थी व्यक्ती???
©️अंजली मीनानाथ धस्के

#अगं_आई_ते_अहो_आई  ( कथा ३)
सरिता काकूंनी मुलांना खूप छान संस्कार दिले. मुलंही मोठ्या पदावर नोकरीला लागली तरी आईवडिलांच्या आज्ञेत होती. काकूंची सगळ्यांशीच प्रेमळ वागणूक.
         आता त्यांना 'अहो आई' म्हणणाऱ्याही घरात आल्या.
मुलांची 'अग आई' हाक कानी पडल्यावर  प्रेमळ झरा होणाऱ्या त्या  'अहो आई' ऐकलं की  ताठ्यानी वागायच्या. प्रेमळ , समजूतदारपणा  विसरून केवळ हट्टाला पेटायच्या. सगळ्यांशी जुळवून घेणाऱ्या त्या स्वतःच्या सूनांशी जुळवून घेत नव्हत्या.
अखेरीस काकांनी समजावलं,  "अहो या शब्दापेक्षा आई या शब्दात नव्याने गुंतून बघ तेव्हाच  'अग आई' ते 'अहो आई' हा प्रवास किती  सुंदर आहे याची तुला कल्पना येईल"
आश्चर्य घडलं....
आई या शब्दातल्या मायेने त्यांच्या घरात गोकुळ नांदू लागलं.
©️अंजली मीनानाथ धस्के

सूनांनी ही अहो या शब्दात न गुंतता आई या शब्दावर माया केली तर सगळ्याच घरात गोकुळ नांदेल.



आत्मसन्मानाने जगण्याची संधी


#आत्मसन्मानाने_जगण्याची_संधी
#१००शब्दांचीगोष्ट
          मी जन्मतः आंधळी,  शरीराने अधू असल्याने सगळ्यांनाच नकोशी होते.  रेडिओवर एखादं गाणं ऐकलं की ते हुबेहूब म्हणण्याच्या माझ्यातल्या कौशल्याने गरीब आईवडिलांना कमाईच  साधन मिळालं आणि माझी रवानगी रेल्वस्थानकावर झाली.  येणाऱ्या-जाणाऱ्यांना गाणं म्हणून दाखवल्यामुळे माझी इतर भावंड शाळेत जात होती. घरी जरा चांगलं अन्न शिजत होतं.
       आंधळी, झिपरी, लुळी, पांगली, भिकारी अशा अनेक नावांनी मी ओळखली जावू लागले. मी मात्र गाणं ऐकण्यात आणि ते गाण्यातच स्वतःचा आनंद शोधला.
       गाणं गातांनाचा माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि इतके वर्ष दुर्लक्षित असलेली मी अचानक प्रकाश झोतात आले.
          कलेची कदर करणाऱ्यांनी 'पार्श्वगायिका' ही नवी ओळख मिळवून दिली. ही ओळख नव्हेच माझ्यासाठी आत्मसन्मानाने जगण्याची संधीच आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के

नवी ओळख

  #नवी_ओळख   
#१००शब्दांचीगोष्ट
         माझ्यामूळे घराला वंशाचा दिवा मिळाला परंतु माझे स्त्रीमन  पुरुषी शरीराची साथ देईना.  लोक मला ' हिजडा' म्हणून हिनवू लागले. घरच्यांनी माझ्या  'लक्ष्मण' या नावाला लावलेलं आडनावही काढून घेतलं. जळत्या निखाऱ्याप्रमाणे बोचनाऱ्या नजरा, विषारी शब्दांचे बाण पचवतच छोटीमोठी नोकरी करत L.L.M.चे शिक्षण पूर्ण केले.  काही लोकं अंगचटीला यायचे. हिजड्यांनाही 'नाही' म्हणण्याचा अधिकार आहे याची जाणीव त्यांना करून दिली . माझ्यासारख्यांनाही सामान्यआयुष्य जगता यावे यासाठी संघर्ष केला.
       वेश्याव्यवसाय करणाऱ्यांच्या ५० मुलांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. तृतीय पंथीयांना सन्मानाने करता येतील अशा नोकऱ्या मिळवून दिल्या.
 त्यांनी मला त्यांच्या जीवनातील अंध:कार दूर करणारी  एक 'पणती'  मानलं. त्यांनीच मला 'अॅडोव्हकेट लक्ष्मीताई' ही नवी ओळख दिली.
©️अंजली मीनानाथ धस्के


      

भुरळ..... प्रतिबिंबाची

#भुरळ_प्रतिबिंबाची
#१००शब्दांचीगोष्ट

                आरशासमोर उभं राहून तिने अनेकदा स्वतःलाच समजावलं, "तू सुंदर नाही असच हा म्हणतो. खरं सौंदर्य माझ्या अंतरमनात आहे हे याला कुठे कळतं. यात मी माझं बाह्यरूप कधी बघतच नाही. याला  मनाशी संवाद घडवून आणण्याचं साधन मानते फक्त"
याच आत्मविश्वासाच्या जोरावर तिने 'विश्वसुंदरीचा'  किताबही पटकावला.
 मुकुट धारण केलेली ती आरशासमोर उभी राहिली तेव्हाही तो तिचे सौंदर्य मान्य करेना. आता तीही जिद्दीला पेटली. नाक,त्वचा, ओठ, दात,हनुवटी सुंदर करून घेण्यासाठी  शस्त्रक्रिया केल्या. अखेर  तिने आदर्श मापदंड असलेलं सौंदर्य मिळवलचं.
आता आरसाही,"तूच विश्वसुंदरी" म्हणतो.
तीही तिचं नवं रूप दिमाखात मिरवते.
 आरश्यातल्या  खोट्या प्रतिबिंबिनेच तिला अखेर भुरळ घातली. पूर्वीसारखा तिचा मनाशी संवाद आता होत नाही.
©️ अंजली मीनानाथ धस्के

खरी लाईफ लाईन

#खरी_लाईफ_लाईन
#१००_शब्दांची_गोष्ट
९वीच्या विद्यार्थ्यांना,"तूच माझी लाईफ लाईन" या विषयावर  निबंध लिहून वाचायला सांगितला.
         आयुष्यात  प्रमुख भूमिका निभावणाऱ्या व्यक्तींवर, नात्यांवर  सगळ्यांनी भरभरून बोलायला  सुरुवात केली.
           शहरीकरणाला अगदीच नवीन त्यामुळे मंदबुध्दी म्हणून हिणवले जात असलेला  संतोष जेव्हा त्याचा निबंध वाचायला उठला तेव्हा वर्गात एकच हशा पिकला.
          "दिल्लीची सद्यपरिस्थिती  बघता निसर्गाचा समतोल राखला नाही तर पुढची पिढी सुदृढ, निरोगी जन्माला येणं कठीण.
निसर्ग जीवन स्रोत आहे.   शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि कसदार जमीन हिच भावी पिढीची लाईफलाईन आहे.
निसर्ग नेहमीच खूप देतो आता आपली वेळ आहे.
जल, वायू आणि जमीन राखूया प्रदूषण मुक्त,
 निसर्गच  खरी लाईफलाईन लक्षात असू द्या फक्त"
         थोड्यावेळ पूर्वी हसण्यात बुडालेला वर्ग  टाळ्यांच्या कडकडाटात गरजून निघाला.
©️ अंजली मीनानाथ धस्के

असाही बालदिन

#असाही_बालदिन
#१००शब्दांचीगोष्ट
सोहम आणि स्पृहाने  रागातच साक्षीच्या केबीनमधे प्रवेश केला. ती तिथे नव्हती.   स्पृहाच लक्ष टेबलवर ठेवलेल्या भेटवस्तूंकडे गेलं. त्यावरचा मजकूर अर्धवट होता. आपल्यासाठी  मजकूर लिहितांना तिला तात्काळ शस्त्रक्रिया विभागाकडे  जावं लागलं होतं याची जाणीव होवून दोघांचाही राग शांत झाला.  शेजारच्या खोलीत असलेले आजोबा औषध घ्यायला नकार देत आरडाओरडा करत होते. दोघांनी तिथे जाऊन साक्षी सांगते तसचं त्या आजोबांना समजावून सांगितलं. त्यांनी बालकांपुढे बालहट्ट मागे घेत  इंजेक्शनही  घेतलं.
तेवढ्यात आजोबांची समजूत काढण्यासाठी साक्षी तिथे पोहचली. समोरचे दृश्य पाहून,"बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा" म्हणत तिघांनाही चॉकलेट्स दिली. आजोबा त्यावर दिलखुलास हसले. मुले तिला प्रेमाने बिलगली आणि सगळ्यांनाच प्रगल्भतेची जाणीव करून देणारा बालदिन साजरा झाला.
©️ अंजली मीनानाथ धस्के
anjali-rangoli.blogspot.com
या लिंक वर इतर लिखाण आणि रांगोळ्या उपलब्ध आहेत.
Momspresso Marathi वर विजेती कथा म्हणून निवड झालेली ही १०० शब्दांची गोष्ट.