ती आणि तिचा मानसिक ताण

#ती_आणि_तिचा_मानसिक_ताण
©️ अंजली मीनानाथ धस्के
       सगळेच गेले अनेक दिवस घरात .... सक्तीने घरात थांबव लागतंय म्हणून कंटाळलेले.
     दिवसभराच्या कामात तिला तिचा नेहमी मिळणारा निवांतपणाही मिळेनासा झालेला.
        काळजीने आप्तस्वकियांची चौकशी करण्यासाठी फोन हातात घ्यावा तर त्यावर ढीगभर संदेश आलेले.
काही खरे , काही खोटे , काही पुरुषांच्या घर कामावर विनोद करणारे तर काही स्त्रियांच्या वाढलेल्या घर कामाबद्दल दुःख व्यक्त करणारे . काही मानसिक संतुलन राखण्यासाठीचे उपाय सांगणारे तर काही शारीरिक आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त माहिती देणारे. काही मन गुंतवून रहावं म्हणून गंमतीदार आव्हान देणारे तर काही अनेक प्रकारच्या स्पर्धा जाहीर करणारे.
       तिने फोन बाजूला ठेवला . डोळे बंद केले. विचार मनात घोंगावू लागले.
     
वाढलेल्या कामाचा ताण शरीरावर जाणवतो आहे. घरबसल्या मिळणाऱ्या खऱ्या खोट्या माहितीने मनावरचा ताण ही वाढतो आहे.
नेमके काय करावे म्हणजे मनावरचां ताण कमी होईल?
ही रोज रोज येणारी गंमतीदार आव्हाने स्वीकारण्यात दिवस कमी पडतोय. मुलांनाही वेळ द्यायचा आहे. त्यांनाही नवीन काही शिकवता आलं तर शिकवायच आहे.
        घरातल्या कामात नवरा मदत करतोय पण त्याच्यावरही तर वर्क फ्रॉम होम चा ताण वाढतोय.
        भविष्यात येणाऱ्या आर्थिक मंदीचा... त्या अनुषंगाने येणाऱ्या बेरोजगारीचा विचार ही त्याला सतावत असेलच.
     आपण आपला आज मजेत जावा म्हणून शक्कल लढवतोय तर तो भविष्य सुरक्षित रहावे म्हणून घरून जमेल तेवढी काम करतोय ...  झटतोय.
त्याला विरंगुळा लागत नसेल का? तो त्याचे मन रमावण्यासाठी कोणती गंमतीदार आव्हाने स्वीकारत असेल? त्याच्या मनावरचा ताण तो कशा प्रकारे कमी करत असेल?
        खरं तर सामाजिक अंतर ठेवून वागायला शिकवणारी ही परिस्थिती प्रत्यक्षात मात्र कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणणारी आहे. पण एकत्र वेळ घालवण्या ऐवजी जो तो नेहमी प्रमाणे किंबहुना नेहमीपेक्षा जास्तच वेळ मोबाईल हातात घेऊन त्यात स्वतः चां आनंद शोधतोय.
     खरं तर केवळ   स्वतःच्या मानसिक ताणाचा  विचार न करता कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचा एकत्रित प्रयत्न करायला हवा.
बाकीचे कामं आपण नेहमीच करतो. पण इच्छा असूनही एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नव्हता. आता तो वेळ मिळतोय तर चांगल्या आठवणी तयार करायला हव्या. मुलांसाठी तर हा काळ फार महत्वाचा आहे. या काळातील भीतीची , एकटेपणाची जाणीव त्यांना आयुष्यभर लक्षात राहील पण याच जाणीवेला आपण आनंदात ,  उत्तम संस्कारात , सृजनशीलतेच्या शोधात बुडवल तर ..... तर मात्र  हा काळ " सुवर्ण आठवणींचा  काळ " म्हणून कायम त्यांच्या  स्मरणात राहील.
  भविष्यात  बिकट परिस्थिती आली तरी घरच्यांच्या साहाय्याने आपण तिच्यावर मात करू शकतो असा विश्वास आपल्या मुलांमधे निर्माण करण्याची हीच संधी चालून आली आहे..
     आलेल्या परिस्थिती बद्दल आपण तक्रार केली तर मुलंही तोच तक्रारींचा पाढा वाचायला लागतात.
     सगळ्यांच्या तुलनेत  स्त्री मानसिक दृष्ट्या सबळ आहे . जर आपण ठरवलं तर ही परिस्थितीच एक वेगळं आव्हान म्हणून स्वीकारू शकतो. आपल्यासोबत  घरातल्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राखू शकतो.
         असे अनेक विचार डोक्यात सुरू असताना तिला एक कल्पना सुचली.
       एरवी जे करण्याचं धाडस होत नाही किंवा जे करण्याची फारशी गरज पडत नाही ते आता करायचं.
     " दिवसातले काही तास कुटुंबातल्या सगळ्यांनी फोन बंद ठेवायचं" .... या वेळात विविध खेळ खेळायचे, गप्पा मारायच्या, आपले आवडते छंद जोपासायचे .
एरवी ही आपण हे सगळं करत असतो पण फोन सुरू असल्याने त्यावर काम करत करत बाकी कामं करतो.
    फोन बंद असल्याने आपलं पूर्ण लक्ष आपण करत असलेल्या कामावर केंद्रित होईल. हा वेळ फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा असेल. या निमित्ताने आपल्याला एकमेकांना नव्याने जाणून घेता येईल.
 काही दिवस सोशल डीस्टासिंग पळायचं आहे ... त्या निमित्ताने सोशल मीडिया पासूनही जरा दूर राहू. चुकीची माहिती वाचणं नको की त्यावर तर्क वितर्क करणं नको. योग्य माहिती आधीच मिळालेली आहे. त्या आधारे आपण भल आणि आपलं कुटुंब भल.
 ठरलं तर मग .....
तिने फोन हातात घेऊन बंद केला.
कार्टून बघत बसलेल्या मुलांना आवाज दिला . वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नवऱ्याला थोडा वेळ ब्रेक घ्यायला सांगितला. फोन वर आपल्या मित्र मंडळीशी त्याच त्याच गप्पा मारून कंटाळलेल्या  सासू सासऱ्यांनाही बोलावून घेतलं. सगळ्यांना फोन थोडा वेळ बंद करायला सांगितले.
         कोणता खेळ खेळायचा किंवा काय काम करायचं असेल ते सगळ्यांनी मिळून ठरवायचं अस तिने जाहीर केले.
            आजी आजोबांनी सुचवलेले खेळ  ऐकुन मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
   खेळ खेळतांना मुलांचां आनंद ओसंडून वाहत होता तर मोठ्यांनाही त्यांचे बालपण नव्याने गवसले होते. आजी आजोबा ही मुलांचे आधुनिक खेळ प्रकार आवडीने शिकून घेत होते. सगळ्यांना नवं ज्ञान मिळत होत . त्या सोबत एकमेकांना अधिक समजूनही घेता आलं. फोन वारंवार हातात न घेणाऱ्या पालकांच्या संगतीने घालवलेला हा वेळ मुलांसाठी  संस्मरणीय झाला . सोबतच घरातल्या मोठ्यांनाही मुलांसारखा उत्साह अनुभवायला मिळाला.
तिलाही  तिचा पर्यायाने कुटुंबाचा मानसिक ताण कमी करण्यासाठीचा खात्रीशीर उपाय मिळाला .
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः
 हा लेख आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावा .
आपल्या सगळ्यांच्याच मनात विचार चक्र सुरू आहेत. काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तर काहींची उत्तर  आपण आपली शोधायची असतात. प्रश्न एकच असला तरी प्रत्येकाचं उत्तर मात्र वेग वेगळं असू शकत. या लेखातल्या ' तिच्या ' सारखेच अनेक उपाय तुम्ही ही शोधून काढले असतील . ते उपाय
 नक्की शेयर करा.

No comments:

Post a Comment