महाविद्यालयाचे_पाहिले_वर्ष


#महाविद्यालयाचे_पाहिले_वर्ष
©️अंजली मीनानाथ धस्के

मी देवगिरी कॉलेज औरंगाबाद इथे पदवीच्या पहिल्या वर्गाला होते . विज्ञान शाखा असली तरी अभ्यासक्रमात  एक भाषा विषय घेणं अनिवार्य होतं. तेव्हा मी मराठी भाषेची निवड केली.  अभ्यासक्रमा व्यतिरिक्त मराठी साहित्याची पुस्तके महाविद्यालयाच्या वाचनालयातून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना फारशी दिली जात नव्हती कारण सगळ्यांना अशी पुस्तके सहज दिली तर ज्यांना अभ्यासाला आहेत त्यांनाही मग ती उपलब्ध होत नसत. त्यामुळे मी पदवीच्या पहिल्या वर्षाला मराठी भाषेची निवड ही केवळ लायब्ररीतून मराठी साहित्याची  पुस्तकं वाचायला मिळावी एवढाच उद्देश ठेवून केली होती. वडिलांची नुकतीच या शहरात बदली झाल्याने माझ्यासाठी हे शहर नवीन .... महाविद्यालयाचे वातावरण नवीन .... अजून माझ्या वर्ग मैत्रिणीही  बनल्या नव्हत्या. त्यामुळे वाचनालयातली पुस्तकं वाचणासाठी मिळवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते.
            मराठी भाषा घेतल्याने मला घरच्या घरी अभ्यास करून परीक्षेला बसता येईल असा माझा अंदाज होता.
  पण नंतर असं कळलं की त्या विषयाच्या प्रत्येक तासाला उपस्थित राहणं आवश्यक आहे . नाईलाजाने का होईना पण मी मराठीच्या तासिकेला जावून बसले.  कोण प्राध्यापक शिकवायला येणार याचीही उत्सुकता होतीच. पहिल्याच वर्गाला शिक्षक नाही म्हणून सुट्टी मिळाली . आनंदी आनंद झाला . कारण एकतर तिथले हे माझे  पाहिलेच वर्ष असल्याने माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी कोणी नव्हत्या आणि ज्या नुकत्याच ओळखीच्या झाल्या होत्या त्यांनी इंग्रजी भाषेची निवड केली होती. तारुण्य सुलभ अवस्थेतही नवीन वातावरणात आपल्या ओळखीचं कोणीच सोबत नसतांना वर्गात बसून राहणं म्हणजे निव्वळ काळ्या पाण्याची शिक्षाच असते.
      दुसऱ्या तासिकेला आम्ही एकूण १३ जण हजर होतो. त्यात मुली फक्त तीन बाकी १० मुल होती. मी पटकन् सगळ्यात शेवटच्या बाकावर जावून बसले. प्राध्यापक वर्गात आले . त्यांनी आमच्या निरुत्साही चेहऱ्यांकडे बघितले. मी एकटीच बसलेली असल्याने की काय कोण जाणे त्यांनी मला पहिल्या बाकावर येवुन बसण्यास सांगितले. मीही नाईलाजाने जोडी जोडीने बसलेल्या  इतरांकडे बघत अगदीच अवघडल्यासारखी पहिल्या बाकावर येवुन बसले. माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून प्राध्यापकांनी ही मग सगळ्यांनाच पुढे बसण्याची विनंती केली.
तासाची सुरुवात अगदी ठरल्या प्रमाणे झाली . सर्व प्रथम एकमेकांचा परिचय करून घेण्याचे ठरले.
त्यांनी स्वतःचा परिचय करून देतांना अगदी आनंदाने आणि आत्मविश्वासाने विचारलं , " तुम्ही मला ओळखत असालच .... मी फ.मु. शिंदे " त्यावर कदाचित त्यांना आमच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव बघायचे असतील पण आम्ही अगदीच ढ .... कसलेच भाव चेहऱ्यावर न  देता फक्त ऐकण्याचे काम करत मख्ख बसून  होतो . त्यावर त्यांनीच सांगितलं की माझी कविता तुमच्या अभ्यासक्रमात होती .  मला ती कविता आठवली नाहीच पण त्यांचं नाव मात्र परिचयाचं वाटू लागलं.
बहुदा विज्ञान शाखेचे विद्यार्थी थोड्या फार फरकाने अशीच प्रतिक्रिया देत असावे ... कारण त्यांनाही आमच्या प्रतिक्रिया आणि एकंदरीत आमचे साहित्याचे  ज्ञान बघून फारसे आश्चर्य वाटले नाही.
त्यांनी आमची नाव विचारण्याची औपचारीकताही मग , " वर्गात नियमीत हजर रहाल तर मला तुमची ओळख आपोआपच होईल  आणि हजर नाही राहिलात तर त्याची फारशी गरज ही पडणार नाही " असा विनोद करून टाळली .
तास संपला .... जेव्हा मी घरी आल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला त्यावर आईने मला असं काही रागावलं की बाप रे बाप ..... गाढवाला गुळाची चव काय? .... साधी कविता आठवू नये म्हणजे काय? .... तुमचं भाग्य थोर फ. मु. शिंदे तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहेत . वैगेरे..... वगैरे
 बाकी मला फारस आठवत नाही पण इथून पुढे सगळ्या तासिकांना हजर राहणे फार गरजेचे आहे याची जाणीव झाली.
मला लहानपणीही कधीच मराठी विषयात कवींचे नाव .... त्यांचे टोपण नाव .... किंवा त्यांची कविता ... धडा... यांच्या योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न आला तर त्याचे उत्तर ठामपणे देता येत नसे. मी तो प्रश्न बुद्धीवर जोर देवून नाहीतर , अक्कड बक्कड बंबे बो .... म्हणूनच सोडवत असे. वाचनाची आवड असूनही मला काही केल्या लेखकांची आणि पुस्तकांची नाव लक्षात राहत नाही. याच दुर्गुणा मुळे मी एकच पुस्तक अनेक वेळा वाचले आहे .... नेमकी शेवट वाचल्यावर आठवत की हे पुस्तक आपण आधी वाचलेलं आहे. आता तर वाचनालयात ले लोकच त्यांच्या कडे असलेली माझ्या वाचलेल्या पुस्तकांची यादी बघून सांगतात ," मॅडम हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे दुसरं  शोधा ...."
मी खूप मार आणि बदाम खावूनही इतरांना जी माहिती अगदी सहज लक्षात राहते ती कधीच लक्षात ठेवू शकले नाही  आणि आता ही मला ते जमत नाही हे मात्र खरं.
असो....

नंतरच्या तसिकेला त्यांनी राधा आणि कृष्ण यांच्या बद्दल खूप गहिरा अर्थ सांगणारी कविता शिकवायला सुरुवात केली. त्यांनी चार ओळी वाचल्या आणि आम्हाला त्याचा अर्थ विचारला . त्यावर एक मुलगा म्हणाला ही मराठी भाषेतली कविता आहे एवढेच कळले बाकी काही कळलं नाही. त्याच उत्तर ऐकुन सरांनी डोक्यालाच हात लावला.. मला उठवले आणि मला जे काही समजल ते माझ्या शब्दात मांडायला सांगितलं. मला ती फारच थोडी कळली होती पण आता गप्प बसून चालणार नाही याची जाणीव होवून मी अगदी प्रामाणिकपणे जे समजलं ... जेवढं समजलं तेवढं सांगितलं. काय झालं कुणास ठावूक .... पण या घटने नंतर मास्तर पूर्ण वेळ फक्त मला एकटीलाच कविता शिकवत होते.

तिथून पुढे वर्गात कोणताही प्रश्न हा फक्त मलाच विचारला जात होता . आता वर्गातल्या इतर दोघी ही माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या तरीही त्या मराठीच्या तासाला माझ्या जवळ बसण्याच टाळू लागल्या. मलाही मराठी विषयाचा अभ्यास करणं आवडत नव्हत..... आवंतर वाचनासाठी मात्र जीव कासावीस होत होता.
मी अनेक जागा बदलल्या तरी काही फरक पडला नाही.
महाविद्यालयाच्या  परिसरात फिरतांना .... वाचनालयात असतांना चुकून कधी सरांची भेट झाली तर ते अभ्यासाची  आवर्जून चौकशी करायचे. त्यांच्या वागण्यात मोकळे पणा होता. ते वयाने आणि अनुभवाने मोठे होते तरी त्याचं दडपण त्यांनी कधीच विद्यार्थ्यांना दिलं नाही.
थोड्याच अवधीत बाकी १२ जण ही त्यांच्या तासिकेला मोकळेपणी चर्चा करू लागले. सर नेहमी सांगायचे ,"  लेखकाला काय सांगायचं आहे हे महत्वाच असतंच पण वाचकाला त्यातून काय बोध होतो हे ही महत्वाचे आहे . दोघांची विचारधारा जुळली तर गाडी योग्य रस्त्यावर आहे असं समजायचं आणि नाही तर ती योग्य रस्त्यावर आणण्याचं काम आमच्या सारख्या शिक्षकांना करावं लागत. त्याचाच आम्ही पगार घेतो . तेव्हा तुम्ही बोला ... व्यक्त व्हा.... म्हणजे माझे कष्ट वाचतील . " अगदी हसत खेळत विनोद करून ते शिकवायचे त्यामुळे अर्थातच एक कविता अनेक दिवस शिकवल्या गेली.
आमच्या महाविद्यालयाचा वार्षिक अंक निघत असे. त्यात विज्ञान शाखा विभागातूनआम्हीही आमचे काही लिखाण केले असेल ते देवून सहभागी व्हावे  अशी सरांची इच्छा होती. कोणी तयार होईना तेव्हा मला सांगण्यात आले की ," तुला तर काही तरी लिहून द्यावेच लागेल .... विज्ञान शाखेचे कोणीच सहभाग घेणार नाही . मग मी शिकवण्याचा काय फायदा..... तू काही तरी लिखाण करत असावी असा माझा अंदाज होता ... तू काहीच लिखाण करत नाहीस का? "
 त्यावर  मी ," थोड थोड करते ...पण माझ्या पुरतेच ते मर्यादित असावे असे मला वाटते . कारण  त्यात फार काही विशेष नाही ... जेव्हा जे मनात आलं ते लिहून ठेवते पण त्या कविता तुम्ही वाचाव्या किंवा मासिकात प्रकाशित व्हाव्या अशा मुळीच नाहीत " . त्यावर ते ठाम पणे म्हणाले
" ते माझं मला ठरवून दे ... उद्या येतांना  तुझ्या कविता आण .... त्यातल्या ज्या मला बऱ्या वाटतील त्याचं देतो मासिकासाठी ... मग तर झालं ".
मी खूप सांगून पाहिलं पण ते ऐकायला तयार नव्हते तेव्हा माझा नाईलाज झाला.
मला माझ्या त्या कविता प्रकाशित व्हाव्या असे मुळीच वाटत नव्हते. कारण मी लिहिते हेच मला मुळी कोणाला सांगायचे नव्हते. माझ्या कोणत्याच खास मैत्रिणींनाही मी लिहिते हे माहीत नव्हतं. फक्त १२ वीतली  मैत्रीण प्रीती  ही आता पर्यंतची एकमेव माझी वाचक होती . तीच आणि माझं ते गुपित होतं. रिकामा वेळ मिळाला आणि फक्त ती आणि मीच असलो की मी कविता वाचन करायचे . ती फारच मन लावून ऐकायची . खूपच खुश व्हायची. तीच माझ्यावर खूप प्रेम होत (आताही आहे ) म्हणून मी काहीही लिहिलं तरी तिला ते ऐकुन खूप भारी वाटायचं. त्यामुळेच कदाचित तिच्याजवळ  मी जे काही लिहिते ते वाचायला मला हिंमत मिळायची.
पण आता हे असं मासिकात लिहून येणं म्हणजे  जरा अती धाडसच काम होत. एकतर विज्ञान शाखेचे मी विद्यार्थिनी त्यात मला कोणी कवयित्री म्हणून ओळखावे असे मला मुळीच वाटत नव्हते . मुख्य म्हणजे घरी समजले तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल याचीच मला काळजी लागून राहिली होती. वडिलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कशातही फारसा रस नव्हता या उलट आईला मराठी विषया बद्दल असीम आदर ... प्रेम... तेव्हा माझ्या  सुमार कविता वाचून तिने डोक्याला हात लावला तर ....याची भीतीही होती . त्याला कारण ही तसेच होते . मी तिसरीत असतांना...... बाई वर्गात शिकवत होत्या . बाहेर मस्त पाऊस पडत होता . मी  खिडकीच्या बाहेर रिमझिम पाऊस बघण्यात गुंग झाले . मनात भराभर विचार आले . मी माझ्या  कवितांच्या वहीत ते पटापट लिहू लागले
    मला लिखाणाचा सुर गवसला होता इतक्यात  माझ्या पुढची वही बाईंनी काढून घेतली . मुख्याध्यापिका बाईंकडे मला नेण्यात आले. माझी वही जप्त झाली . माझ्या पालकांना बोलावून घेतल्या गेलं. त्यानंतर खर तर मला  शाळेत काय किंवा घरी काय कोणी ओरडले नाही पण माझ्या कविता हा घरी थट्टेचा विषय  झाला होता. अर्थात त्या कविता होत्याही तशाच मजेशीर . आपल्या सुप्त गुणांचा असा बोभाटा व्हावा हे मनाला रूचल नाही . लिखाण सुरूच राहील पण आता ते सहजा सहजी कोणाच्या हाती लागणार नाही इतपत काळजी घेतल्या गेली...... असो.
मी माझी जपून आणि लपवून ठेवलेली डायरी सरांना दाखवली. त्यांनी वर्गातच काही कविता वाचल्या आणि त्यातल्या तीन कविता माझ्याकडून वेगळ्या कागदावर माझ्या नावा सहित लिहून घेतल्या .
माझ्यासाठी तो विषय तिथेच संपला ..... मी मासिक घेवून कधी बघितलं नाही की माझी कविता त्यात आहे का? ... किंवा कोणती आहे ?
          दोन वर्षांनी जेव्हा एका नवीन मैत्रिणीने विचारल की तू आपल्या महाविद्यालयाच्या मासिकात कविता लिहिली होती का? मी तुझ्या कविता वाचल्या आहेत. तुझं नाव होत कवितेच्य  खाली.....  त्यावरून मी मात्र अंदाज बांधला की आपण सरांना दिलेल्या कविता मासिकात छापून आल्या आहेत.
 खरं तर हे ऐकुन मला आनंद होईल अशी तिची अपेक्षा होती पण माझ्या लिखाणाचं गुपित हिने इथे सगळ्यांसमोर असं उघडं करू नये याचीच मला चिंता सतावत होती. तेव्हा विज्ञान शाखा आणि कला शाखा यात फारसे सख्य नव्हते . विज्ञान शाखेतील शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे कल असलेला फारसे रुचत नव्हते. " इतकीच आवड आहे साहित्याची तर विज्ञान शाखेत प्रवेश कशाला घेतला? .... उगाच विज्ञान शाखेची एक जागा वाया घालवली"..... हेही ऐकुन घ्यावं लागलं असतं.
 तो विषय तिने अधिक वाढवू नये म्हणून मी त्याबद्दल कसलीही चौकशी न करता विषय बदलला.

त्यानंतर एवढं मात्र झालं की कधी तरी वेळ प्रसंगी मी माझ्या कविता काही खास मैत्रिणींना वाचून दाखवू लागले . पण हे प्रमाण फारच कमी होत . इतकं कमी की आजही अनेक मैत्रिणी ,' तू लिहितेस हे माहिती नव्हतं .... याचा नव्यानेच शोध लागला'  असं म्हणतात.   हे ऐकुन मला आजही आनंद व्यक्त करावा की आपलं लिखाणाचं गुपित आता गुपित राहील नाही याचं दुःख करावं काही कळत नाही.
  तेव्हा महाविद्यालयात मित्र मैत्रिणीं कडून त्यांची आवड निवड जाणून घेण्यासाठीची प्रश्न पुस्तिका भरून घेण्याची पद्धत आली होती. आईला साहित्याची प्रचंड आवड होती. तिला  फ. मू. शिंदे सरांची स्वाक्षरी भेट करावी म्हणून मी
एक नवी कोरी पुस्तिका घेवून ती सरांना माहिती लिहण्यासाठी दिली.
त्यात आवडता रंग ..... इथे त्यांनी ..." पांडुरंग " असे लिहिले . तुमच्या मित्र/ मैत्रिणी साठी काही लिहा .... तिथे त्यांनी ..., " आयुष्याचे सगळे रंग तिने अनुभवावे .... मोकळ्या मनाने व्यक्त व्हाव... पुढच्या वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा" असं माझ्यासाठी लिहिले.
त्यांनी तेव्हा प्रेमाने दिलेला सल्ला..... मोकळ्या मनाने व्यक्त हो..... आज त्याचा अर्थ कळतो आहे. खरं तर त्यांच्या सनिध्याचा फायदा करून घेत लिखाणाची उंची गाठण्याचा संधी मिळाली होती पण मनातल्या संकोचाने ती गमावली.
महाविद्यालयाचे पाहिले वर्ष तसे माझ्या लेखी फारच दुर्लक्षित राहिले. आज मात्र भूतकाळातील आठवणींचे गाठोडे उघडले तेव्हा जाणवलं..... शिक्षक म्हणून सरांचे जे सानिध्य मला लाभले त्याचा माझ्या   लिहिण्यावर कळत नकळत परिणाम झाला . त्यांनी मी बरं लिहू शकते हा आत्मविश्वास निर्माण केला होता.
त्याच्या जोरावरच आज मी इथपर्यंतचा प्रवास केला आहे.
©️अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.



No comments:

Post a Comment