#कल्याणी
©️अंजली मीनानाथ धस्के
कल्याणी तशी आधीपासूनच सोशिक. मुली म्हणजे परक्याच धन मानण्याचा तो काळ त्यामुळे फार शिकवण्याच्या फंदात न पडता आई वडिलांनी लहान वयातच तिचं लग्न करून दिलं. संसाराची जबाबदारी अंगावर पडली आणि होत नव्हतं ते बालपणही मागे पडलं. तिची अल्प समाधानी वृत्ती असल्याने आयुष्याकडून फार मागण्याही नव्हत्या.
वर वर सगळं बरं चाललं होतं. जसं जसे दिवस जायला लागले तिला सासर कडच्यांचे खरे स्वभाव कळू लागले. सासूबाई तर त्या काळाला शोभेल अशीच म्हणजे ललिता पवार सारखीच भूमिका बजावत होत्या. नवराही संसारात फार गुंतून पडला नव्हता . त्याच्यासाठी लग्न म्हणजे निव्वळ एक व्यवहार होता. बाकी सदस्य फार कशावरही प्रतिक्रिया देत नव्हते . देवू शकत ही नव्हते. सगळा कारभार सासूबाईच्या हाती होता.
सासरे गेले. दिराच लग्न झालं. त्याने चूल वेगळी मांडली. वर्षा मागून वर्ष जात होती . कल्याणीची परिस्थिती बदलत नव्हती. आज नाही तर उद्या निदान नवऱ्याला आपल्याबद्दल प्रेम वाटेल या आशेवर ती दिवस काढत होती.
सासूबाई नुसता छळ करत होत्या. नवऱ्याला काही सांगायला जावं तर त्याचही एकच टूमणं असायचं," आधी माहेराहून पैसे आणन .... मग माझी आईच काय.... सगळ्या जगाशी तुझ्यासाठी भांडायला मी तयार आहे".
गावातच माहेर पण माहेरचे लग्न करून देवून आपल्या जबाबदारीतून मोकळे झालेले. त्यांना काही सांगण्याची सोय नव्हती. वडील होते तो पर्यंत ते अनेकदा कल्याणीच्या नवऱ्याला छोटी मोठी रक्कम देवून खुश करण्याचा प्रयत्न करत होते . आईला काही सांगितलं तरी ," मुलं झालीत की होईल सगळं नीट" असं सांगून कल्याणीची बोळवणं केली जायची. नवऱ्याला पैसे द्यावे असं तिला कधीच वाटत नव्हतं पण निदान समज द्यावी असं तिला कायम वाटायचं पण कोणालाच स्वत:ला त्रास करून घ्यायचा नव्हता त्यामुळे आधी पैसे देवून आणि नंतर दुर्लक्ष करून तिचा प्रश्न होता तसाच ठेवल्या गेला होता. वडील गेल्यावर तर तिचा माहेरचा भक्कम आधारच गेला.
निसर्गही तिच्या बाबतीत कठोर होता . काही केल्या कुस उजवत नव्हता. सासूबाई दिवस दिवस उपाशी ठेवायच्या. जीव जाईल इतकी काम सांगायच्या. ऑफिस मधून नवरा परत आला की नवऱ्याचे नको नको ते सांगून कान भरायच्या . नवराही नको ते संशय घेवून मारहाण करायचा .
तिला अनेकदा तर जीव देवून टाकावा असच वाटायचं पण आशा खूप वाईट असते . मुल झालं की सासूबाईला पाझर फुटेल या आशेवर ती जगत होती.
याच दरम्यान नवऱ्याची नोकरी गेली. आता नोकरी करायचीच नाही. स्वत:चा उद्योग सुरू करायचा असच त्याच्या मनाने घेतलं होतं. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कल्याणीने माहेराहून पैसे आणावे म्हणून त्याने तिचा मानसिक शारीरिक छळ अजुनच वाढवला.
कल्याणीने परोपरीने समजावून सांगितलं," पडेल ते काम करू , तुम्ही कमवाल तितक्या पैशात मी घर चालवून दाखवेन. कधी कशाचीच मागणी करणार नाही पण माहेराहून पैसे आणणे म्हणजे आपला स्वाभिमान गहाण टाकल्यासारखं आहे".
ती पैसे आणायला तयार होत नाही म्हणून सासूबाई आणि नवरा दोघांनी "तिला मुल होत नाही त्यात नवऱ्याची प्रगती व्हावी असं वाटतं नाही" असे कारण सांगत घराबाहेर काढलं.
दिराने जावेनेही सासूबाईंना व नवऱ्याला खूप समजावलं पण पालथ्या घड्यावर पाणी . ती जावून जाईल कुठे? माहेरी गेली . मिळेल ते काम करून आपण आपलं पोट भरावं पण पुन्हा नवऱ्याकडे जावू नये हाच विचार तिच्या मनात सुरू होता.
मुलीचा संसार मोडण्यापेक्षा तात्पुरती काही रक्कम जावयाला देवून तिची पाठवणी करावी. एकदा का उद्योग सुरळीत सुरु झाला की आपले पैसे परत मागता येतील असा विचार करून आईने मन मोठ करून जावयाला पैसे दिले.
इच्छा नसतांनाही कल्याणीला पुन्हा तिच्या सासरी पाठवण्यात आलं. पैसे मिळताच नवऱ्याने भागीदारीत नवीन कंपनी काढण्याचे काम सुरू केले. इकडे कल्याणीला दिवस गेले. तब्बल बारा वर्षांनी तिला मातृत्वाची चाहूल लागली होती. आता आपले दिवस नक्कीच बदलतील याची तिच्या मनाला खात्रीच पटली होती.
नवऱ्याचा विक्षिप्त आणि संशयी स्वभाव . सासूबाईंचा पराकोटीचा छळ सहन करतच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
गेल्या अनेक वर्षात तिला एकदाही एकट्याने कधी घराबाहेर पडता आलं नव्हतं . सतत सासूबाईंना पहारा असायचा तरी नवरा संशय घेत होता याची तिला प्रचंड चीड होती. इतकी कशी कोणाची वाईट बुध्दी असते. बीन बुडाचे आरोप करायला यांची हिंमत तरी कशी होते. असे तिला प्रश्न पडायचे पण आजपर्यंत कितीही वाटलं तरी प्रत्यक्षात मात्र ती सगळेच अन्याय करत आली होती. हे दिवस ही जातील म्हणत जगत आली होती.
बाळाच्या जन्मानंतर सुखच सुख आपल्या वाट्याला येईल अशी तिची खात्री होती पण प्रत्यक्षात मात्र तस काहीच घडल नाही.
अन्याय सहन करण्याची जशी तिला सवय झाली होती तशीच तिला छळण्याची सासूबाईंना आणि नवऱ्यालाही सवय झाली होती.
छळ कमी झालाच नाही पण आता तिच्या कुशीत तीच मुलं होत सोबतीला . त्याच्याकडे बघून तर तिला अधिक बळ मिळत होत सगळं सहन करण्याच. आयुष्य जगण्याला ध्येय मिळालं होत.
नवऱ्याने गुंतवणुक करून भागीदारीत सुरू केलेली कंपनी चांगली चालायला लागली तशी तिने आईकडून आणलेले पैसे परत करावे म्हणून नवऱ्याच्या मागे तगादा लावला. सासूबाईंनी तर ते पैसे परत करायला दिलेच नव्हते कल्याणीला घरात घेण्यासाठी दिले होते असं नवऱ्याच्या डोक्यात भरवून ठेवलं होतं. त्यामुळे पैसे परत करा म्हणताच तो कल्याणीला मारहाण करी.
नंतर नंतर तर तिनेच नवऱ्याकडे पैसे परत करावे हा तगादा बंद केला. मुलाच्या जन्मानंतर नवऱ्याने कधीच मुलाला जवळ घेतले नाही की त्याचा लाड केला नाही. नवऱ्याला प्रेम व्यक्तच करता येत नसावे अशी स्वत:ची समजूत घालून तीच मुलाला वडिलांचीही माया देत होती.
जेव्हा मुलाला शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हाही ," तुझ्या आईकडून पैसे आण आणि मग घाल त्याला किती घालायचं ते शाळेत " असं तिला ऐकावं लागलं तेव्हा मात्र ती उफाळून आली.
माहेराहून पैसे आणले तरी इतक्या वर्षांच्या संसारात कधी साडी घेतली नाही की माझा कोणताच खर्च केला नाही. हौस मौज तर खूपच दूरची गोष्ट. राब राब राबवून घेतलं तेव्हा एकवेळेच जेवण दिलं. माझ्या आईने दिलेले पैसेही परत करण्याचं नाव घेतलं नाही. माझा छळ करता तेवढा पुरे नाही का? कसली ही दुष्ट वृत्ती. आता स्वतःच्या मुलाचीही जबाबदारी नाकारता . बारा वर्षानी मुल झालं त्याच कौतुक तर झालंच नाही आता निदान त्याच्या शिक्षणाची तरी हेळसांड करू नका."
एरवी कधी उलटून न बोलणारी कल्याणी चिडून पोटतिडकीने बोलली म्हणून की काय कुरकुर करत का होईना मुलाला शाळेत घातलं. पैशावरून जे कल्याणीला ऐकावं लागतं होत तेच आता तिच्या मुलाला ऐकावं लागतं होत, " जा तुझ्या आईकडून पैसे आण".
स्वतःचा नातू पण..... सासूबाईंनाही कधी त्याच्याबद्दल पाझर फुटला नाही.
तोही याच वातावरणात मोठा होत होता. आपल्या आईला विनाकारण मार खातांना बघत होता. इवलसं पोरं पण आईसाठी वडिलांशी भांडत होता . त्यांचा मार खात होता.
नवऱ्याने भागीदारीत सुरू केलेली कंपनीही बंद पडली. प्रचंड आर्थिक नुकसान झालं. आता तर या अपयशच खापर कल्याणी आणि तिच्या मुलावरच फोडण्यात आले.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास असं वाटायला लागलं.
सासूबाई कल्याणी आणि नातवाला उठता बसता टोमणे मारू लागल्या . कल्याणी सोशिक होती पण मुलाला मिळणारी वागणूक तिच्या सहन शक्तीच्या पलीकडे होती.
नवऱ्यालाही मुलाबद्दल माया नव्हती. आता तर मुलाचा
सगळा खर्च कल्याणीच्या माहेरच्यांनी करावा असा त्याने हट्टच धरला . इतकचं नाही तर नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अजून पैसे आणून द्यावेत यासाठीही तो मुलालाच छळू लागला. कारण त्याला माहित होत नुसतं कल्याणीला त्रास देवून ती माहेरी जायला, पैसे आणायला तयार होणार नाही. मुलाला त्रास दिला की कल्याणीला सगळं त्यांच्या मनाप्रमाणे करावे लागेल.
कल्याणी माहेराहून पैसे आणायला तयार होत नव्हती . उलट ती नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करी की ," अनेकदा पैसे आणले पण काही ना काही कारणाने धंद्यात यश हाती आलं नाही. यावेळी स्वतः कष्टावर करू काही तरी ....
हवं तर मी डबे बनवण्याच काम करते . तुम्ही ही छोट मोठं काम करा ... जे मिळेल त्यात सुखाने राहू. मुलाला शिकवू . त्याला मोठा करू. देवाच्या कृपेने आपलं स्वतःच घर आहे. मुलं ही आहे . सासूबाईंना पेंशन आहे. त्यामुळे त्यांची काळजी नाही. मी कधीच काही मागितलं नाही तुमच्याकडे ... यापुढेही काहीच मागणार नाही. दोघं मिळून मेहनत घेवू . मला कोणत्याच कामाची लाज नाही. आपल्या संसारासाठी मी चार घरची धुणभांडी करायलाही मागे हटणार नाही. पण या वेळी मात्र मी माहेराहून पैसे आणणार नाही."
नेहमीप्रमाणे याही वेळी समजावण्याचा काहीच फायदा झाला नाही.
मारहाणीची परिसीमा झाली . मुलाचं शाळेत जाणं ही बंद केल्या गेलं. ती हे सगळं का सहन करत होती ?? तर... नवऱ्याला सोडून राहणाऱ्या स्त्री बद्दल समाज काय म्हणेल ? कसाही असला तरी मुलाला बापाचं छत्र हवंच. सासुरवास सगळ्यांनाच असतो त्यात नवल ते काय ? या रुढीवादी मताचा समाज असतांना तिने नवऱ्याला विरोध करणे म्हणजे समाज विरोधी वर्तन ठरलं असतं. महेरच्यांनाही वाटायचं की ," इतक्या वर्षांनंतर नवऱ्यापासून वेगळं होणं म्हणजे समाजात हसं होईल. सासू एक ना एक दिवस थकेलच ना .... तेव्हा सासुरवास बंद होईल. एकदा का मुलगा मोठा झाला की नवऱ्याचाही फार त्रास सहन करावा लागणार नाही"
खोट्या आशेवर ती दिवस ढकलत होती.
एक दिवस कल्याणीला मार खातांना बघून मुलगाच म्हणाला ," काय होईल ते होवू दे .... आता आपण इथे रहायचं नाही. असला बाप असण्यापेक्षा मी माझा एकट्याने रहायला तयार आहे. मिळेल ते काम करू पण इथे रहायचे नाही ".
सगळं जग एकीकडे आणि मुलाचे धीराचे शब्द एकीकडे. तसही त्याच शिक्षण पुन्हा सुरू करणं फार गरजेचं होतं. या सगळ्यात त्याचं वर्ष वाया गेलं होतं. २१ वर्षात सासूबाईंना आणि नवऱ्याला कधी पाझर फुटला नव्हता . भविष्यातही पाझर फुटण्याची शक्यता नव्हती . कल्याणीच्या जगण्याचा उद्देशच तिचा मुलगा होता . त्याने सांगितल्यावर तिनेही मन खंबीर केलं . हा अन्याय सहन करण्यापेक्षा आता त्याच्यासाठी या घराबाहेर पडणच योग्य ठरणार होत.
ती मुलाला घेवून घराबाहेर पडली. तिच्या मनात माहेरी जायचं नाही हे पक्क होत. तिची पावलं दिरजावेच्या घराकडे वळली. खरं तर त्यांच्यावरही तिला भार बनायचं नव्हतं. मिळेल ते काम करण्याची तिची तयारी होती. ती मुलाला घेवून स्वतंत्रच रहाणार होती पण तोपर्यंत तिला त्यांचा आधार हवा होता.
तिची ती अवस्था बघून दिराने खूप प्रयत्न केले आईला आणि भावाला समजावून सांगण्याचे पण त्यांना खात्री होती की कल्याणी स्वतःहुन परत येईल.
कल्याणीच शिक्षण जास्त नव्हतं त्यात पदरी पोर घेवून ती जाणार कुठे?
पण या वेळी मुलाची साथ तिला मिळाली होती म्हणून तीही जिद्दीला पेटली होती. काही झालं तरी परत जायचं नाही हे तिने पक्क ठरवलं होतं.
लवकरच तिने स्वयंपाकाची कामं धरली. छोटी खोली भाड्याने घेवून त्यात संसार मांडला. मुलगाही तिला मदत करत होता. तिने त्याला सरकारी शाळेत घातलं. त्याच वय तस लहानच तो करून करून किती मदत करणार. एकट्या कल्याणीवर आर्थिक भार पडला. घरभाड शाळेचा खर्च , घरखर्च तिच्या एकटीच्या कमाईत भागात नव्हता. मुलाला घेवुन वेगळं रहाते म्हणून समाजाचाही तिच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला होता.
वहिनीच आणि भावजयीच अजिबातच पटत नव्हतं. आई भवाजवळ न राहता एकटी राहू लागली तेव्हा
कल्याणीच्या भावाने सुचवलं की " आईचं वय झालंय, ती एकटीच रहाते. तू तिच्याजवळ रहायला गेलीस तर दोघींना एकमेकींचां आधार होईल. चार घरची कामं करतेस त्यापेक्षा आईजवळ रहा तिची सोय होईल. तिथे राहून जे करता येईल ते काम कर. नवरा घ्यायला येईल ... नाही येईल ते पुढचं पुढे बघू"
तिलाही ते पटलं . आईची सेवा करता येईल . घराच भाड वाचेल असा विचार करून ती आईकडे रहायला आली.
तिथे राहून तिने डबे देण्याचं काम स्वीकारलं. आईची परिस्थिती चांगली होती पण आता कल्याणीला कोणाचेच उपकार नको होते. आईही पक्की व्यवहारी होती. कल्याणी आपल्या घरात फुकटात रहाते म्हणून तीही स्वत:ची सगळी कामं कल्याणीलाच सांगत होती. कल्याणीचा मुलगा तर ' जावयाचं पोर अन् हमारमखोर ' असं वाटून आईच्या डोळ्यात खुपायचा. आपल्या आईने मुलाला टाकून बोललं की कल्याणीची घुसमट व्हायची. मुलगा मोठा झाला तस त्याला रोज रोज आजीचे ते बोलणे ऐकून घेणे जड जावू लागले. आईसोबत वेगळं रहावं येवढं त्याच वय नव्हतं की कमाई नव्हती. मुलाच्या आवडीचा पदार्थ बनवून तो त्याच्यासाठी घुवून जायचं ठरवलं तरी तिला तिच्या आईच्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागायची. मुल स्वतःच, पैसे स्वतः चे, पदार्थ बनवण्यासाठी कष्ट तिचे स्वतःचे तरी तिला स्वतः च्याच मुलाला मोकळेपणाने भेटण्याचे स्वातंत्र्य नव्हते. कमाई फारशी नव्हती . काही झालं तरी सासरी जायचं नाही हे कल्याणीने ठरवलं होतं तसं च तिच्या मुलाचाही पक्का निश्चय झाला होता.
पण त्याला इथे आजी सोबत राहणं ही कठीण जात होत. आर्थिक कोंडी इतकी होती की शेवटी त्याने एकट्यानेच घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या मित्राच्या घरी राहू लागला. शिक्षण घेत घेत तो मिळेल ते काम ही करू लागला. सुरवातीला कल्याणीला भेटायला तो आजीच्या घरी येत होता पण तो दिसता क्षणी आजीचा तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा . कल्याणीला ते अजिबात खपायच नाही पण इथेही तिची "आपलेच दात अन आपलेच ओठ" अशीच गत झाली होती. शेवटी उपाय म्हणून तीच मुलाला भेटायला त्याच्या घरी जावू लागली. मुलाच्या आवडीचा पदार्थ बनवून तो त्याच्यासाठी घुवून जायचं ठरवलं तरी तिला तिच्या आईच्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागायची. मुल स्वतःच, पैसे स्वतः चे, पदार्थ बनवण्यासाठी कष्ट तिचे स्वतःचे तरी तिला स्वतः च्याच मुलाला मोकळेपणाने भेटण्याचे स्वातंत्र्य नव्हते.
मुलासोबत समाधानाने राहण्याचं सुख तिच्या वाट्याला कधी येणार होत काय माहित. मुलाला बाहेरगावी नोकरी मिळाली . मुलाकडे जाण्याची इच्छा असून त्याचा पगार जास्त नसल्याने ती आईकडेच राहिली. वय झालं तशी आई अंथूरणाला खिळली. आता तर भावालाही वाटू लागलं की तिने आईजवळच रहावं. दिवसभर आईची देखभाल करण्यासाठी बाई ठेवणे परवडणारे नव्हते. मुख्य म्हणजे आईने सूनांशी पटवून घेतलं नाही कधी म्हणून मुलं गावात असून सुद्धा ती एकटी वेगळी रहात होती. ती आई काम करणाऱ्या बाईशी काय पटवून घेणार?
कल्याणी इतके दिवस सहन करत आली म्हणून सगळ्यांची सोय झाली होती. कल्याणीला मुलाकडे आठवडाभर जाण्याचीही सोय नव्हती. आईसाठी तिला सकाळी सगळं करून जावं लागायचं आणि रात्री उशीर झाला तरी परत यावा लागायचं.
कल्याणीच स्वतःच वय ६२ झालं होतं . तरी तिला तिच्या मनाचे निर्णय घेता येत नव्हते.
आधी समाजाच्या धाकाने नवऱ्याचा, सासूचा त्रास सहन केला. नंतर परिस्थिती चांगली नव्हती म्हणून आईचा त्रास सहन केला.
आता मुलाला वाटू लागलं की कल्याणीने आपल्याकडे येवुन रहावं. इकडे भावू भावजय यांना काळजी लागली . कल्याणी मुलाकडे गेली तर आईला आपल्या घरी आणावं लागेल. तिचा छळ सहन करावा लागेल. आई झोपून होती तरी तोंड अखंड सुरू असायचं. तिचे शब्द कानात विष ओतायचे. तिच्या सानिध्यात फक्त कल्याणीच टिकली होती.
असच एकदा आठ दिवस तरी मुलाकडे राहून यायचंच म्हणून कल्याणीने हट्ट धरला . भावावर सगळं सोपवून ती मुलाकडे रहायला गेली.
उणे पुरे चार दिवस झाले नसतील तर आईला आय सी यू मधे अडमिट करावं लागलं. कल्याणीला गेल्या पाऊली परत यावं लागलं. आईसोबत तीच दवाखान्यात राहिली. या वयातही कल्याणी दुसऱ्यांचा विचार करून स्वतः ची गैरसोय करत होती. त्यातही आता भावाकडून "गरज होती तेव्हा राहिलीस न आईकडे आता आईला गरज आहे तर तुला मुलाकडे जायचं आहे " अस ऐकवलं जावू लागल.
खरंच तेव्हा तिला गरज होती आधाराची म्हणून ती आईकडे राहिली होती. पण खरंच आईने, भावाने निस्वार्थ भावनेने मदत केली होती ?? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे कधीच नव्हते. सगळ्यांनी तिच्या मजबुरीचा फायदाच घेतला होता. ती आईकडे रहात होती पण तीच घरातला सगळा खर्च भागवत होती. आईने कधीच तिला घरखर्च करायला पैसे दिले नव्हते. ती रहाते म्हणून घरकामाला बाई लावली नव्हती . सगळ्याचा हिशोबच मांडला तर कल्याणीचच् नुकसान जास्त झालं होतं. कमावत असलेले पैसेही गाठीला बांधून ठेवणं झालं नाही की मुलाला स्वतः जवळ ठेवून घेता आलं नाही.
तिच्या वाट्याला काय आलं तर .... ज्यांच्यासाठी झटलो , राबलो त्या सगळ्यांनी तिला स्वार्थी ठरवलं.
दवाखान्यातील आईच्या खोली बाहेरच्या बाकावर बसून संध्या सगळ्याचा विचार करत होती. तेव्हा तिला प्रकर्षाने जाणवल की योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं असतं . स्वतःच्या अस्तित्वासाठी अन्यायाला वाचा फोडण महत्त्वाचं असतं. इतरांच्या मानाचा विचार न करता जेव्हाच्या तेव्हा " नाही " म्हणायला ही यायला हवं.
आयुष्याने खूप शिकवलं . पण २१ वर्षाच्या संसारात नवऱ्याने सामावून घेतलं नाही की ६२ वर्षाच्या आयुष्यात माहेरच्यांनी समजून घेतल नाही. तरी इथे का आहोत आपण ? या प्रश्नाचं उत्तर ..... तिच्यात कोणी गुंतल नव्हतं पण वेड्या आशेने तिला मात्र सगळ्यात गुंतवून ठेवले होते. आपल्या कष्टाचं चीज होईल . दगडातला देवही पावतो ही तर सगळी आपली माणसं .... त्यांच्यात ही बदल होईल एक ना एक दिवस . आशा .... आशा आणि फक्त आशा ....
तेवढ्यात तिचा फोन वाजला .
त्यावरच तिला बातमी कळाली की ," तिचे सौभाग्य अनंतात विलीन झाले आहे " .
काय? कसं ? कधी ? असा एकही प्रश्न तिने विचारला नाही. मुलाला ताबडतोब बोलावून घेतले. सगळे विधी नीट पार पाडले. त्यामुळे ९२ वर्षाच्या सासूबाईंना आशा लागली की कल्याणी आता त्यांच्या जवळ राहून त्यांचं सगळं नीट करेल.
१४ दिवसांनी भाऊ घ्यायला आला. आईसोबत दवाखान्यात रहातांना त्याचीही फजिती होत होती.
तिची बॅग ही भरून तयार होती. भावाने बॅग उचलून गाडीमध्ये ठेवण्यासाठी हातपुढे केला.
त्याचा हात तसाच हवेत ठेवून तीने ती बॅग मुलाच्या हातात दिली. तिचा निर्णय झाला होता. एका वेदनेचा अंत देवाने केला . दुसऱ्या वेदनेचा अंत होण्याची वाट बघण्यात तिला आता गुंतून पडायचं नव्हतं. आपल्यावर मुलाचा प्रथम हक्क असून गरजेपोटी त्याला कायम आपल्यापासून दूर ठेवलं . इतरांचा विचार करण्यात आयुष्य निघून गेलं. आता तिला थोडं स्वार्थी बनून बघायचं होत. तिने आयुष्यात अन्याय सहन करण्याची चूक केली होती. खूप उशीर झाला होता पण उशिरा का होईना तिला तिची चूक सुधारायची होती.
तिच्यातल्या सोशिकतेचा उशिरा का होईना पण तिने अखेर अंत केला .काही झालं तरी ती तिच्या मुलासोबतच राहणार होती. आता ती फक्त आणि फक्त त्याची ' आई' म्हणून जगणार होती.
ती मुलासोबत त्याच्या नोकरीच्यागावी निघाली. खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली होती. ज्यात समाज काय म्हणेल? या पेक्षा ती तिच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा यांना प्राधान्य देणार होती. अनेक अडचणीमुळे मुक्त उपभोगायच राहून गेलेलं " आईपण " ती आता भरभरून अनुभवणार होती.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
आशावादी वृत्तीचा ... सहनशीलतेचा .... चेहरा नसतो .... असते ती फक्त अनुभूती म्हणून चेहरा नसतांनाही एका सुंदर स्त्रीची अनुभूती करून देणारी ही रांगोळी..... कल्याणी
कथेतल्या कल्याणीला अन्याय विरूद्ध उभ राहण्याच धाडस खूप उशिरा सुचल पण वयाचा, समाजाचा विचार न करता तिने प्रयत्न पूर्वक ते धाडस केलं हे खूप महत्त्वाचे आहे. पूर्वी समाजाची अनेक बंधन जाचक होती . म्हणून तिने अन्याय सहन करण्याचा मार्ग निवडला होता. तिच्या काळात प्रत्येक घरात थोड्या फार फरकाने तिचीच कहाणी होती म्हणूनही तिने अन्यायाला विरोध केला नव्हता.
कारण ती जात्याच सहनशील आणि प्रचंड आशावादी होती . एक ना एक दिवस परिस्थिती बदलेले अशी तिला आशा वाटत होती. आयुष्याच्या दुसऱ्या पर्वात मात्र तिने स्वतः ला अधिक खंबीर करत निर्णय घेतला.
तिची ही कथा म्हणजे सहन सक्तीची सीमा बघणारी आहे पण या कथेतून नवीन पिढीला ती संदेश देवू पाहते की ," अन्याय सहन करणं हे कायम चूक असतं ...... तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प बसू नये . वेळीच योग्य निर्णय घ्यावे. समाज तुमच्या समस्या सोडवायला येत नाही. तेव्हा तुमच्यासाठी काय योग्य हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे. इतरांचा विचार करावा पण इतका नक्कीच करू नये की ते तुम्हाला गृहीत धरू लागतील. तुमच्या आयुष्याचे निर्णय घेतांना तुम्ही मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर असणंही खूप गरजेचे असते. तुम्हाला गृहीत धरणाऱ्याना तुम्ही वेळीच "नाही " म्हणायला शिकलं पाहिजे.
No comments:
Post a Comment