पाऊस, कांदा भजी आणि कॉफी

#पाऊस_कांदा_भजी_आणि_कॉफी
©️ अंजली मीनानाथ धस्के
        सकाळी घरातुन बाहेर पडताना कडक ऊन होतं आणि आता घरी परततांना अचानक ढग दाटून आले. पाऊस सुरू झाला. अशा पावसात कांदा भजी खायला मिळाली तर..... अशी सुखद कल्पना त्याच्या मनात चमकुन गेली.
        बसमधे बसल्या बसल्या मात्र त्याच्या  डोक्यातही दाटून आलेल्या विचारांचा पाऊस सुरू झाला.
        लग्नाआधी ती  चांगल्या पगाराच्या नोकरीवर होती माझ्याशी  लग्न झाल्यामुळे तिने तिची ती चांगली नोकरी सोडली आणि इथे कमी पगाराची नोकरी पत्करली. तिच्याशी लग्न करून मी तिच्यावर अन्याय तर केला नाही ना? मी तिच्या उत्तम करीयर च्या आड तर आलो नाही ना?
      त्याला ही बोचणी लागली त्याला कारणही तसंच होतं. त्याच्या बरोबरीच्या मित्रांच्या बायका नोकरी करणाऱ्या . सगळे कंपनीच्या उपहारगृहात जेवायचे. नवीन लग्न झालेलं असूनही  घरून डब्बा आणणारा हा एकमेव. त्यातही तिला रोज नव नवीन पदार्थ बनवून डब्यात देण्याची हौस. त्याचा डबा बघितला की सगळे चिडवायचे ," साल्याने नशीब काढलं.... आमच्या वहिनी बिचाऱ्या.... चांगली नोकरी सोडून याचे लाड पुरवत बसल्या आहेत. "
       गंमतीचा विषय पण याला गंमतीने घेणं जड जावू लागल.
नुकतंच लग्न झालेलं. ती ही नोकरी करणारी तरी आवर्जून त्याच्या आवडीच काहीतरी बनवणारी . तिला काय आवडतं ते ही बनवून हौसेने करून खावू घालणारी. तिच्या उत्तम करीयर ला ब्रेक लागल्याची कधी खंत व्यक्त केली नाही की घर कामाचा ताण ही सांगितला नाही. ती स्वयंपाक खोलीत काही तरी बनवत असली की तिला मदत करण्याच्या बहाण्याने यालाही तिच्या भोवती घुटमळायला आवडायचं.
पण आपल्या साठी तिने करीयर मधे मागे राहणं योग्य नाही.
 काही झालं तरी आज घरी गेल्यावर तिला स्पष्ट सांगायचं," स्वयंपाकाला मावशी ठेवू.... उत्तम डबा देण्याच्या नादात तुझं करीयर मागे पडता कामा नये. "
     त्याचा स्टॉप आला. छत्री होती ... तरी तो थोडा भिजला होता.
      तिने हसून स्वागत केलं. तो फ्रेश होवून येईपर्यंत मस्त कांदा भजी तळायला घेतली. तिला असं स्वयंपाक खोलीत बघून त्याची अवस्था अधिकच वाईट झाली. इतक्यात "कशी झालीत... खावून सांग पाहू?" म्हणत तिने भज्यांची ताटली त्याच्या पुढे धरली. भज्यांच्या नुसत्या वासानेच त्याला भूक लागली होती पण  त्याला आता बोलणं गरजेचं वाटू लागलं. तिला मधेच थांबवत तो म्हणाला ," आपण स्वयंपाकाला मावशी ठेवू या का? म्हणजे तुला तुझ्या करीयरकडे नीट लक्ष देता येईल. या कामात तुझा महत्त्वाचा वेळ वाया जायला नको."
तिला त्याच्या बोलण्याच आश्चर्य वाटलं,"आज हे काय नवीन ? स्वयंपाक घरात काम करणं म्हणजे वेळ वाया जाणं असं मी मानत नाही. कोणतीही परिस्थिती उद्भवली तर स्वतःच पोट स्वतः ला भरता यावे म्हणून आईकडून हट्टाने मी सगळा स्वयंपाक शिकले. मावशी काय कधीही ठेवता येईल पण सध्या मला कंपनीच्या कार्यालयात तितकसं काम नाही. मला सध्या जास्त कामही नको आहे ".
   " जास्त काम का नको आहे? तुझी आधीची नोकरी खूप चांगली होती तुला पुन्हा तशी किंवा त्याहून चांगली नोकरी मिळवायची नाही?" त्याने न राहून विचारलं.
  खट्याळपणे त्याच्याकडे बघत   तिने मग सांगून टाकलं," तशी किंवा त्यापेक्षा चांगली नोकरी नक्कीच मिळवायची आहे पण सध्या त्यापेक्षा महत्त्वाचे तुझ्यासोबत वेळ घालवणे आहे. नोकरी काय .... ती मी मिळवेनच पण सध्या आपल्या नात्याला वेळ देणं मला जास्त गरजेचं वाटतं. कंपनीतीलं काम वाढलं की स्वयंपाकाला मावशी ही ठेवेन.  आपल्या माणसाच्या मनाचा मार्ग त्याच्या पोटातून जात असतो असं म्हणतात. मला तुझ्यासाठी हे सगळं बनवतांना जो आनंद मिळतो तो असा शब्दात सांगता येणार नाही..... पण माझं ठरलंय आधी तुझ्या हृदयात स्थान मिळवायचं . आता लवकर खावून सांग .... भजी कशी झालीत? " असं म्हणत तिने एक भजा त्याच्या तोंडात टाकला.
त्याने भजा खाल्ला आणि लगेच किचन ट्रॉली उघडून छोटे पातेले बाहेर काढले. तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं तसा तो बोलला ," भजी खूपच मस्त झालीत . या भज्यांच्या चाविसोबत तू माझ्या हृदयात प्रवेश करू पाहतेय तर मलाही तुझ्या हृदयात प्रवेश करण्यासाठी मस्त कॉफी बनवायची आहे " .त्यानेही तिला मिश्किलपणे डोळा मारला तशी ती लाजून गेली.
खिडकी बाहेर पावसाचा जोर कमी झाला होता. त्याच्या डोक्यातला विचारांचा पाऊस थांबून प्रेमाचा इंद्रधनुष्य फुलला होता.
 खिडकी बाहेर बघता बघता गरमा गरम भजी आणि वाफाळलेल्या कॉफीच्या चवीसोबत त्या दोघांचीही मनही एकमेकांत हळुवार गुंतली जावू लागली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
इतर लिखाण आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहे या ब्लॉग ची लिंक anjali-rangoli.blogspot.com


No comments:

Post a Comment