आई विषयावर लिहिलेल्या तीन कथा

#१००शब्दांचीगोष्ट
आई या विषयावर लिहिलेल्या कथा.. .

#तिची_वेदना ( कथा१)
तेरा वर्षाच्या श्वेताला पहिल्यांदा जेव्हा ओटीपोटात दुखलं  तेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्या त्या वेदनेचाही सोहळा केला होता.
मुलगी आता मोठी झाली. भावी नवऱ्याचा 'वंशवेल' वाढवण्यास ती शारीरिकदृष्ट्या तयार आहे यासाठीचा तो सोहळा. श्वेतानेही त्या वेदनेला आपली 'सखीच' मानलं.
परंतु....
आज श्वेताच्या लग्नाला १० वर्षे झाली. अनेक उपाय केले  तरी तिची कुस उजवली नव्हती. वंशवेल वाढवायला नुसती माती उत्तम असून चालत नाही. बियाणही चांगल लागतं याचा विसर बहुदा सगळ्यांनाच पडला होता. दर महिन्याला येणाऱ्या तिच्या सखीवरच सगळं खापर फोडलं जात होतं. दर महिन्याला तिचा 'आई' होण्याचा प्रवास लांबणीवर पडला की, लहानपणीच्या 'त्या' सोहळ्याच्या आठवणी तिला नव्याने वेदना देत होत्या.
©️अंजली मीनानाथ धस्के

#निस्वार्थी_आई_की_स्वार्थी_व्यक्ती ( कथा २)
तीन वर्षाच्या मुलाला घेवुन बसमधे चढलेली ती आई बसायला जागा शोधत होती. "मला नको पण माझ्या मुलाला बसायला थोडी जागा द्या. लांब जायचं आहे हो" असं म्हणत तिने एका सभ्य गृहस्थाच्या मांडीवर आपल्या मुलाची सोयही केली.
 ते सभ्य गृहस्थ आणि त्यांचा शेजारचा माणूस थांबा आला म्हणून उतरले.  मुलाला सीटवर बसवून ती आईही त्याच्या शेजारी ऐसपैस विराजमान झाली. "मुलाला मांडीवर घ्या" अशी लोकांनी ओरड सुरू केली. सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तिने मुलाला आडवं झोपवून थोपटायला सुरुवात केली.
ते दृश्य पाहून एका संवेदनशील  मनात प्रश्न निर्माण झालाच ... की
या स्त्रीला ' निस्वार्थ  प्रेम करणारी आई'  म्हणावं की स्वार्थी व्यक्ती???
©️अंजली मीनानाथ धस्के

#अगं_आई_ते_अहो_आई  ( कथा ३)
सरिता काकूंनी मुलांना खूप छान संस्कार दिले. मुलंही मोठ्या पदावर नोकरीला लागली तरी आईवडिलांच्या आज्ञेत होती. काकूंची सगळ्यांशीच प्रेमळ वागणूक.
         आता त्यांना 'अहो आई' म्हणणाऱ्याही घरात आल्या.
मुलांची 'अग आई' हाक कानी पडल्यावर  प्रेमळ झरा होणाऱ्या त्या  'अहो आई' ऐकलं की  ताठ्यानी वागायच्या. प्रेमळ , समजूतदारपणा  विसरून केवळ हट्टाला पेटायच्या. सगळ्यांशी जुळवून घेणाऱ्या त्या स्वतःच्या सूनांशी जुळवून घेत नव्हत्या.
अखेरीस काकांनी समजावलं,  "अहो या शब्दापेक्षा आई या शब्दात नव्याने गुंतून बघ तेव्हाच  'अग आई' ते 'अहो आई' हा प्रवास किती  सुंदर आहे याची तुला कल्पना येईल"
आश्चर्य घडलं....
आई या शब्दातल्या मायेने त्यांच्या घरात गोकुळ नांदू लागलं.
©️अंजली मीनानाथ धस्के

सूनांनी ही अहो या शब्दात न गुंतता आई या शब्दावर माया केली तर सगळ्याच घरात गोकुळ नांदेल.



No comments:

Post a Comment