ते ११ रुपये

#ते_११_रुपये
           
             २०१५ साली सोसायटीच्या गणेश मंडळासाठी मी रांगोळी काढायचं ठरवलं होतं. आमच्या सोसायटीचा गणपती सात दिवस असतो म्हणून मग मला अष्टविनायकांपैकी एक गणपती रोज काढायची कल्पना सुचली . शेवटच्या दिवशी दोन गणपती काढले तर रांगोळीतून अष्टविनायक दर्शन सहज  पूर्ण करता येणार होत.
          मोरेश्वर गणपती काढण्यापासून सुरवात केली. पहिल्याच दिवशी मोरेश्वर गणेशाचे रांगोळीतील रूप बघून सगळ्यांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. माझा रांगोळी काढण्याचा हुरूप वाढला . दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रांगोळी काढण्यासाठी म्हणून मांडवात गेले तेव्हा माझ्या कालच्या रांगोळीवर ११ रुपये ठेवलेले दिसले . चुकून पडले असतील असं वाटून मी ते पैसे तिथल्याच दान पेटीत टाकले आणि कामाला लागले . रांगोळी काढून झाल्यावर घरच्या कामांची घाई असल्याने  मी त्या पैशांबद्दल कसलीही चौकशी न करता घरी आले .
तिसऱ्या दिवशीही  रांगोळीवर ११ रुपये ठेवलेले दिसले . काहीच कळेना . चुकून पडतील तर बरोबर अकराच रुपये कसे पडतील? ते चुकून पडल्या सारखे दिसत नव्हते . कोणी तरी मुद्दाम ठेवत असल्यासारखे वाटत होते. मी गोंधळात पडले . हा काय प्रकार आहे?  मांडवात चार पाच आजोबा भजन म्हणण्यासाठी जमलेले होते त्यांनी माझा गोंधळलेला चेहरा बघून विचारलेच , काय झालं आहे ?
मीही त्यांना ११ रुपयांबद्दल सांगितले," काल तर हे पैसे मी उचलून दान पेटीत टाकले मग हे पैसे इथे पुन्हा कोण? आणि का ठेवतं?"
 त्यावर त्यांनी खुलासा केला . A wing मधले एक आजोबा गणपतीच्या दर्शनाला येतात तेव्हा तुझ्या रांगोळीवर मुद्दामहून ११ रुपये ठेवतात . पहिल्या दिवशी आम्ही त्यांना टोकलं की," ते पैसे तिथे नका ठेवू . दान पेटीत टाका".
त्यावर त्यांनी सांगितलं की ,"   हे पैसे खास या रांगोळी काढणाऱ्या मुलीसाठीच आहेत  .  आता नाजूक तब्येतीमुळे अष्टविनायक दर्शन घ्यायला जाणं झेपत नाही . हिच्या रांगोळीमुळे इथेच देवाचं दर्शन घडतय .  रोज पुढच्या गणपतीचं दर्शन घेण्याची ओढ म्हणून चालवत नसतांना मी इथं येतो . रांगोळी सुरेखच काढते. जितकी ओढ पुढच्या गणपतीच्या   दर्शनाची असते मनात तितकीच ओढ हिची रांगोळी बघण्याचीही निर्माण होते. साक्षात गणपतीचीच कृपा आहे  तिच्यावर  तेव्हाच तर इतक्या सुंदर रांगोळ्या काढते.   मला तर तिच्या रांगोळीतच माझा देव भेटला. तिच्या कलेचं कौतुक म्हणून आहेत हे पैसे. दान पेटीत काय पैसे टाकायचे ते टाकतोच नंतर आधी तिचे आभार मानू द्या. या पैशाला कोणीच हात लावायचा नाही . हे तिलाच मिळायला हवेत". म्हणून आम्ही कोणी हात लावत नाही त्या पैशांना.
"पोरी तुझेच आहेत ते पैसे . मान ठेव त्याचा . दान पेटीत टाकू नकोस ". असं म्हणून त्या आजोबांनी मी काल दान पेटीत टाकलेले ११ रुपयेही काढून माझ्या हातात ठेवले.
मला तर काहीच कळायला तयार नाही . कौतुकाचा हा प्रकार मला नवीनच होता. पण मनात कुठेतरी खूप भारी वाटलं होत हे खरं. घरी येवुन मोठ्या आनंदाने नवऱ्याला झालेला प्रकार सांगितला तेव्हा त्याचं म्हणणं होतं," असतो एखाद्याचा भरभरून कौतुक करण्याचा स्वभाव,   म्हणून त्यांनी तुझ्या कलेचं कौतुक केलं असावं  ... लगेच काही हरबऱ्याच्या झाडावर चढू नको".  कारण काय असेल ते असो पण त्यांचं केलेलं हे कौतुक मला एक वेगळीच प्रेरणा देवून गेलं होत हे मात्र खरं .
आम्हा दोघांची भेट  रोज रांगोळीच्या माध्यमातून होत होती म्हणूनच कदाचित सात दिवसात त्यांनी मला भेटायचा प्रयत्न केला नाही की मीही त्यांचा शोध घेतला नाही .
ओळखीचे लोक मला भेटल्यावर माझ्या रांगोळीच खूप कौतुक करतात पण एका अनोळखी व्यक्तीने केलेलं हे कौतुक माझ्या कायम स्मरणात राहीलं. त्याला कारणही तसंच आहे . माझ्या रांगोळ्यांमधे विशेष काही नव्हतं..... विशेष होतं ते त्यांच्यात. असं मोकळ्या मनाने कौतुक करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी खूप मोठं मन लागतं . जे त्यांच्याकडे होतं.
आजही गणेश उत्सवात रांगोळी काढतांना मला त्यांची आठवण येते . त्यांना मनोमन मी निरोप ही देते , "आजोबा.... नंतर रांगोळी स्पर्धेत अनेक पारितोषिक मिळाली पण तुमच्या कौतुकाची सर कशालाच आली नाही हो ...
तुम्ही केलेल्या कौतुकाने मिळालेली प्रेरणा मला कधीच शब्दात मांडता येणार नाही .
आजकाल अनेक  लोक इतरांचे  कौतुक करण्यासाठी टाळाटाळ करतांना दिसतात. वेळच नाही , सुचलं नाही , आवडलं तरी पट्कन कौतुक करण्याचा आमचा स्वभावच नाही अशी सबब सांगतांना दिसतात तेव्हा मात्र तुमची प्रकर्षाने आठवण होते.
मी स्वतःच्या आनंदासाठी काढलेल्या रांगोळ्यांच तुम्ही कौतुक केलं. त्यामुळे आजही मी चांगल्या वाईट प्रतिक्रियांचा विचार न करता  स्वत:च्या आनंदासाठीच रांगोळी काढते . बघणाऱ्यांना त्या रांगोळ्या आवडतात. ही खरंच तुम्ही म्हणालात तसं बाप्पाचीच कृपा असावी.....
तुमचे  आभार मानावे तितके थोडेच आहेत कारण  ते ११ रुपये मला  कौतुकांच्या आठवणीबाबत कायमचे खूप श्रीमंत करून गेले आहेत .

रांगोळी काढतांना जो आनंद मला होतो त्याचं आनंदाचा अनुभव बघणाऱ्यालाही येवुन त्याची पोच पावती म्हणून मला कौतुकाचे ११ रुपये दिल्या गेले. त्या ११ रुपयाच्या रूपात मी दिलेलाआनंद माझ्याजवळ परत आला तेही द्विगुणित होवून.
आनंद मिळवायचा असेल तर तो स्वतः अनुभवत इतरांनाही देता यायला हवा ही शिकवण मला मिळाली ती त्या आजोबांमुळेच. 
आता आनंदाची सुरुवात मी माझ्यापासुनच करते. इतरांनी माझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणावे अशी अपेक्षा न करता मी स्वतः ते निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करते.  मला आनंद वाटेल ते सगळ मी  कुठंलीही अपेक्षा न ठेवता  स्वतःसाठी आणि इतरांसाठीही करते . त्यामुळे आता भेटला तर  आनंदच  भेटतो नव्या नव्या रूपाने .... 
तेव्हा तुम्ही ही स्वतःचा आनंद स्वतः मधेच शोधा. माझ्यासारखाच  तुम्हालाही तो नक्की सापडेल . कारण बाप्पाच तो ....  बाप्पाची कृपा सगळ्यांवरच असते 



©️ अंजली मीनानाथ धस्के
तेव्हा काढलेल्या रांगोळ्या व्हिडिओ च्या स्वरूपात पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे. आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेयर करायला विसरु नका.





No comments:

Post a Comment