बोलणे सोपे....
अहिल्याबाई होळकर महाविद्यालयात वृंदाला ' स्पर्धेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन' या विषयावर व्याख्यान द्यायचे होते. व्याख्यान ऐकायला येणारी तरुण पिढीची संख्या लक्षात घेऊन तिने अनेक मुद्दे विचारात घेतले. तिचे स्वतःचेही अनेक सकारात्मक अनुभव पाठीशी होतेच. शेवटी तो दिवस उजाडला. छान तयार होवून ती दिलेल्या वेळेत महाविद्यालयात पोहचली. तिथे तिचे स्वागत फुलांचा गुच्छ देवून करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. वृंदाचा परिचय श्रोत्यांना करून देण्यात आला. उत्तम समुपदेशक म्हणून वृंदाचे नाव सगळ्यांनाच परिचयाचे होते. तिचा शब्द न शब्द ऐकण्यासाठी श्रोते उत्सुक होते. सभागृहात एकदम शांतता पसरली होती.
तिने बोलायला सुरुवात केली,"माननीय व्यासपीठ, आदरणीय सहकारी आणि माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो ...... नमस्कार....... आजचा विषय ' स्पर्धेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ' हा आहे. आजच्या काळात स्पर्धा वाढली आहे असं आपण सतत ऐकत असतो. परंतू खरंच आजच्या काळात स्पर्धा वाढली आहे का? असा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारते तेव्हा मला नेमके उत्तर मिळतं नाही. आमच्या पिढीलाही स्पर्धेला तोंड द्यावेच लागले आहे. तेव्हाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावीच लागत असे. तेव्हाही स्पर्धेत यश मिळवण्यासाठी ' शॉर्ट कट ' उपलब्ध नव्हते. दोन गुणांनी मेरिट हुकलेली हताश मुले तेव्हाही होतीच. मेडिकल , इंजिनियरिंगच्या प्रवेशासाठी एक एक गुणांची रस्सीखेच तेव्हाही होतीच.
मग तेव्हापेक्षा आता स्पर्धा जास्त कशी ?
आजही स्पर्धा आणि तिचे मूळ रूप पूर्वीसारखेच आहे. आज मात्र आपला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हल्लीच्या पालकांचे विचार बदलले आहे. केवळ अभ्यासाला महत्त्व न देता मुलांनी इतर क्षेत्रातही आपले नाव मोठे करावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. एकाच वेळी अनेक गोष्टी आल्या पाहिजे या पालकांच्या आग्रहाने मुलांच्या आयुष्यात मात्र गोंधळ वाढतो आहे. 'इतरांना जे सहज जमत ते आपल्याला का जमत नाही' या भावनेने आजकाल मुले आणि त्यांचे पालक निराश होतात. त्यांचे बालपण खेळण्या बागडण्यात जाण्याऐवेजी अनेक गोष्टी शिकण्याच्या अट्टाहासात जाते आहे. मग सुरू होते चर्चा ..... स्पर्धेमुळे मुलांचे आयुष्य कसे करपते आहे , यावर...... पण सगळ्यात आधी
स्पर्धा म्हणजे काय ?
स्पर्धेची गरज का असते? हे समजून घेतले पाहिजे.
स्पर्धा म्हणजे," आपल्याला त्या त्या विषयाचं असलेलं ज्ञान दिलेल्या वेळेत, दिलेल्या पद्धतीने व्यक्त होण्याची एक संधी" असते.
स्पर्धा जशी इतरांशी असते तशीच ती स्वतःशीही असली पाहिजे. इतरांशी स्पर्धा केली तर हाती नैराश्य येते. परंतु हीच स्पर्धा स्वतःशी स्पर्धा केली तर आपल्यात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. स्पर्धेमुळे आपल्याला आपल्यात असलेल्या कमतरतांची तसेच बलस्थानांची जाणीव होते. यश मिळवायचे असेल तर नियोजनपूर्वक तयारी हवी अशी शिकवण मिळते. निव्वळ स्पर्धेपुरती केलेली काही दिवसांची तयारी कायमस्वरूपी यश देत नाही.' स्पर्धा असो वा नसो आपण आपल्या प्रयत्नात सातत्य राखायला हवे' हे स्पर्धेत भाग घेतल्यावरच समजते. स्पर्धेतील यश आपल्याला मेहनतीसाठी प्रेरणा देणारे असते.
केवळ ज्ञान असून भागात नाही तर ते ज्ञान योग्य ठिकाणी दिलेल्या वेळेत सुसूत्रपणे मांडता यायला हवे. याची जाणीव स्पर्धेमुळे आपल्यात निर्माण होते. स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे इतर सहभागी सदस्यांकडून खूप काही शिकायला मिळते. ज्ञानाची देवाघेवाण करण्यासाठीही स्पर्धा हे निमित्त असते. स्पर्धेनिमित्त एकाच विषयावर येणाऱ्या विविध प्रतिक्रिया आपल्या कल्पनाशक्तीचा विकास करण्यास सहाय्यक ठरतात.
स्पर्धा आपल्याला चालना देते. स्पर्धा असणे चांगलेच आहे. फक्त त्यात यशच मिळाले पाहिजे हा अट्टाहास नको. स्पर्धा फक्त यश किंवा अपयशा पुरती कधीच मर्यादित नसते . त्यापलीकडे जाऊन ती आपल्याला अनुभवाने समृध्दही करत असते. मात्र हे अनुभवाने समृध्द होणं अनुभवण्यासाठी स्पर्धा निकोप असावी लागते.
आजकाल स्पर्धा गुणांपुरती मर्यादित राहिली नाही तर तिने कळत नकळत रोजच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत प्रवेश केला आहे. व्हॉट्सअँप , फेस बुक यांच्यावर येणाऱ्या प्रतिक्रीयांची संख्या हे कारणही स्पर्धेसाठी पुरेसे आहे. आज आपला आत्मविश्वास, आनंद हा व्हॉट्सअँप , फेसबुकवर येणाऱ्या प्रतिक्रियांवर अवलंबून आहे. पूर्वी अशी माध्यमे उपलब्ध नसल्याने उठसुठ तुलनेची, स्पर्धेची भावना निर्माण होत नव्हती. आता प्रसिद्धीच्या क्रमवारीत सगळ्यांनाच पहिला नंबर हवाय. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी देखील आहे. पूर्वी रोजच्या जीवनात स्पर्धा करायची झालीच तर आजुबाजुच्या लोकांपूर्तीच मर्यादित असायची पण सोशल मीडियामुळे , घरात बसल्या बसल्या आपण जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा करू शकतो. स्पर्धेच्या कक्षा रुंदावल्या आहेत म्हणूनच आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. थोड थांबून विचार केला तर सत्य जाणवेल की , ' योग्य वेळी , योग्य बाबतीत निकोप स्पर्धा करणे हरवले आहे. स्पर्धेचा दर्जा खालावत जातो आहे'.
स्पर्धा म्हटलं की कोणी तरी पुढे जाणार कोणी तरी मागे राहणारच. पण हे मागे राहणं स्वीकारता यायला हवे. त्यातून खूप काही शिकून पुढेचे मार्गक्रमन करता यायला हवे. सगळेच उर फुटेस्तोवर धावत आहेत म्हणून आपणही त्यांचे अनुकरण करणे योग्य नाही. आपल्याला नेमके काय हवे आहे यावर सगळे लक्ष केंद्रित करून इतर बाबतीतील स्पर्धा निग्रहाने दूर ठेवायला हवी. शिकण्याच्या प्रक्रियेत स्पर्धेची भूमिका खूप महत्त्वाची आहे परंतु ही स्पर्धा जर तुमचा शिकण्याचा आनंद हिरावून घेत असेल तर अशी स्पर्धा टाळायला हवी. स्पर्धेच्या नादात जगणे मागे पडत असेल तर वेळीच चूक सुधारायला हवी. आपल्या
संपूर्ण आयुष्याचा 'स्पर्धा' हा केवळ एक भाग आहे. स्पर्धा आणि त्यातील यश म्हणजे आयुष्य नव्हे. स्पर्धेला अनावश्यक महत्त्व देवू नये.तेव्हा योग्य तिथेच स्पर्धा करा. स्पर्धेकडे संधी म्हणून बघा. त्यातील यश अपयश यावर जीवाचा आनंद अवलंबून ठेवू नका. जीवन सुंदर आहे. आनंदी रहा. आनंद पसरवा" असे बोलून टाळ्यांच्या गजरात तिने समारोप केला.
अनेक जण तिला भेटून मार्गदर्शन घेत होते. ती सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. अनेकांना गरज लागल्यास पुन्हा मार्गदर्शन करण्याचे आश्वसनही देत होती. श्रोत्यांच्या प्रतिसादावरून
कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला होता हे सहज लक्षात येत होते.
या सगळ्या धावपळीत ती थकून गेली होती. घराचे कुलूप उघडून सोफ्यावर बसतांना तिने पंख्याचे बटण दाबले. त्या गार हवेने तीला जरा बरे वाटले . डोळे मिटून ती घटकाभर तशीच बसून राहिली. तेवढ्यात तिला मोबाईलची आठवण झाली. तिने घाईत पर्स मधून मोबाईल बाहेर काढला. फेसबुकचे पान उघडले पटकन आजच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ अपलोड केले. फोन पुन्हा बाजूला ठेवून दिला आणि डोळे मिटून शांत बसून राहिली.
खरं तर तिला आता शांतातेची खूप गरज होती. परंतू
ही शांतताच तिला आतून अधिक अस्वस्थही करत होती. जाणारा प्रत्येक क्षण तिला युगा सारखा वाटू लागला होता. दरवेळी फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर प्रतिक्रिया येण्यासाठी लागणारा वेळ तिला नकोसा वाटे. थोड्याच वेळात नोटिफिकेशनच्या आवाजाने खोलीतील शांतता दणाणून गेली. आजच्या कार्यक्रमाची जी पोस्ट तिने केली होती त्यावर अनेक प्रतिक्रिया येवू लागल्या. तो आवाज ऐकून ती सुखावली. गालातल्या गालात हसली.
निदान आज तरी फेसबुकवरील लाईक ,कमेंटच्या स्पर्धेत ती जिंकणार होती.
त्याच आनंदात तिने स्वयंपाक घरात जावून मस्त कॉफी बनवली. वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेवून ती बाल्कनीतल्या झोक्यावर मंद झोके घेत एकेक प्रतिक्रया वाचण्यात गुंग झाली. आजच्या तिच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत होता. अनेक दिवसांपासून व्हरचुअल प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याचे तिचे स्वप्न अखेर साकार झाले होते.
©️ अंजली मीनानाथ धस्के
No comments:
Post a Comment