जसे दिसते तसे नसते

   
#जसे_दिसते_तसे_ नसते



       गेले दोन दिवस थंडीने गारठून गेलेल्या सुलभाच्या मनात एकच विचार येत होता..... आपल्याला घर .. उबदार पांघरूण असून एवढी थंडी वाजते तर उघड्यावर झोपणाऱ्या त्या आजी आजोबांचे काय होत असेल???? .
       
गेले दोन वर्ष ती त्यांचे निरीक्षण करत होती.
रोज मुलाला शाळेत सोडतांना जाण्यायेण्याच्या रस्त्यावरच एक गणपती मंदिर लागायचे . तिथेच गणपती मंदिराजवळ असलेल्या दुकानांच्या समोरच्या मोकळ्या जागेत हे आजी आजोबा  रात्रीचे झोपत. सकाळच्या वेळी रस्त्यावर रहदारी कमी त्यामुळे आपसूक जाता येता त्या आजी आजोबांना ती बघायची. रोजच्या बघण्याने तिला त्यांचा दिनक्रम ही हळूहळू कळू लागला होता.
 सकाळी सगळा पसारा आवरून सार्वजनिक प्रसाधनात स्वच्छ होवून ते दिवसभर कुठेतरी गायब होत. दिसायला अतिशय गरीब तरी गणपती मंदिरासमोर भीक मागतांना तिने त्यांना कधीच पाहिले नव्हते..... हे विशेष.
 त्यामुळे त्यांच्याकडे  बघून वाटायचे ते कुठेतरी कामाला जात असावे. त्यांच्यात असलेले प्रेम बघून कौतुक वाटायचे. त्यांच्याशी बोलून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा  होती पण कधी  हिंमत झाली नाही ....
             पंधरा दिवसांपूर्वी सकाळी ते तिला नेहमीच्या जागेवर दिसले नाही म्हणून  त्यांचा शोध घेतच ती पुढे जात होती.
 तेवढ्यात थोड पुढे गेल्यावर अगदीच उघड्या जागेवर ते दोघे अंथरुणावर बसलेली दिसली. आज दुपारी वेळ काढून त्यांच्याशी बोलायचं असं तिने ठरवलं . दुपारी ती वेळ काढून त्यांच्याजवळ बोलायला गेली तर आजीच्या पायाला प्लास्टर दिसले . चौकशी केली तेव्हा कळलं की , रोज संध्याकाळी मंदिरासमोर घोडागाडी , फुगेवाले, फेरीवाले असे सगळे असतात . छोटी यात्राच भरते जणू . त्यातील घोडा अचानक आजींच्या  अंगावर धावून आला . त्यांचा पाय शेजारच्या खड्यात गेला आणि त्या खाली पडल्या ... पायाचे हाड मोडले.  पायाला प्लास्टर लागलं . आता त्या पूर्वी सारखे हिंडू फिरू शकत नाही. कधी कोणी  खायला आणून देत . कधी कोणी पैसे देतं. त्यातून जवळच्याच दुकानातून खायचं विकत आणता येतं. अशी जुजबी माहिती मिळाली . खायची सोय होत आहे म्हंटल्यावर त्यांना  औषधासाठी थोडे पैसे देवून सुलभा घरी परतले.
         पंधरा दिवस होवूनही ते तिथेच आहेत . कुठे आसरा का शोधत नाही? केवढी थंडी... त्यात त्यांचे वय बघता त्यांचा निभाव कसा लागणार??? योग्य उपचार का घेत नाही??? असे अनेक प्रश्न तिच्या मनात  उपस्थित झाले.
त्यांना काही मदत करता आली किंवा कायम स्वरुपी निवारा देता आला तर तो देण्यासाठी प्रयत्न करावे असे तिच्या मनाने घेतले.
म्हणूनच  आज काही केल्या तिला झोप लागेना ..... काय करावं ?? या प्रश्नाचं उत्तर शोधत असतांना एकदम लक्षात आलं , निवारा वृध्दाश्रम चालवत असलेल्या श्रुती ताईंचा नंबर तिच्याकडे होता  . त्यांच्याशी बोलून बघाव का?.  रात्री वेळेचा विचार न करता तिने त्यांना  फोन केला .
आश्चर्य म्हणजे
 त्यांना या आजी आजोबांची माहिती होती पण ते वृद्धाश्रमात यायला तयार नाहीत असं ताईंनी तिला सांगितलं .
 " तुम्ही प्रयत्न करा कदाचित तुम्हाला यश मिळेल" असं सांगून त्यांनी या कामाची कायदेशीर तरी सोपी पद्धत  तिला समजावून सांगितली," पोलिस स्टेशनला रिपोर्ट करा . पोलिस त्यांना सरकारी दवाखान्यात नेतील . पोलिस NOC देतील तेव्हाच त्यांना दवाखान्यातून वृद्धाश्रमात आणणे शक्य होईल .  ते स्वतःहून यायला तयार नसतांना  केवळ तुमच्या सांगण्यावरून मी त्यांना आश्रमात आणू शकत नाही ".
ती सांगत असलेले आजी आजोबा आणि  त्यांनी आधीही प्रयत्न करून वृद्धाश्रमात न आलेले आजी आजोबा एकच आहेत का??? या प्रश्नाचं उत्तर समजण्यासाठी त्यांचे फोटो काढून पाठवायला श्रुतीताईंनी तिला सांगितले .
        सकाळी सगळ्यात आधी तिने त्यांचे फोटो काढून ताईंना पाठवले. फोटो बघून त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले की हे तेच हट्टी लोक आहेत . हे आजी आजोबा म्हणजे, 'आई आणि मुलगा' असं त्यांचं नातं आहे. यांच्यासाठी कायदेशीर पद्धतच वापरावी लागेल.
  तिला अजूनही एक प्रश्न छळत होताच की,' येवढे हाल होत असतांनाही हे आजी आजोबा वृद्धाश्रमात जायला नाही का म्हणतात ???'
तिला उत्तर हवेचं होते, तिने त्यांच्याशी पुन्हा सविस्तर बोलण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याजवळ ती गेली तेव्हा त्या आजोबांनी तिला ओळखलं . आजही ही मदत करायला आली असं वाटून त्यांनी हसून तिचं स्वागत केलं.
तिने आजोबांना विचारलंच, ' एवढी थंडी , आजीच्या पायाला प्लास्टर, त्यांचं सगळ एकाच जागी ... खायचे हाल असं असतांना तुम्ही वृद्धाश्रमात का जात नाही ? तिथे तुम्हाला डोक्यावर छत,  योग्य आहार , औषध मिळतील ".
     त्यावर ते लगेच म्हणाले ," आम्हाला असच उघड्यावर राहायचं आहे. छान सुरू आहे आमचं . आम्हाला बंधन नको कुणाचे.
          माझ्या आईला ( त्या आजीला) १२०००/- पेंशन आहे. . आम्ही रोज १५०/- रिक्षाला देतो . इथून दूर दुसरीकडे जावून भीक मागतो . खूप लोक दयेने आम्हाला कपडे , जेवण , पैसे देतात . मी आईच सगळं करतो . मला काही त्रास नाही तिचा. आईलाही असंच आवडतं उघड्यावर . थंडी बिंडी काय वाजत नाही .... हे बघा किती रजाया आहेत आमच्याकडे . अजून पोत्यातही भरपूर नवीन रजाया, चादरी  भरून ठेवल्या आहेत.
 मजेत आहोत आम्ही ... वृद्धाश्रमात अजिबात जाणार नाही .
ते लोक गोड गोड बोलून आमचे सगळं सामान घेऊन टाकतील. आईचे पैसे घेवून टाकतील. आई बरी झाली तरी आम्हाला बाहेर पडू देणार नाही . आता लोक पैसे देतात तिथे गेल्यावर हे सगळं बंद होईल .... मग काय करायचं आम्ही .
तुम्हाला द्यायचे तर द्या पैसे .... नाहीतर जा इथून .... आम्ही इथेच राहणार . कुठेच जाणार नाही".

त्यांनी दिलेल्या माहितीने ती पुरती गांगरली . अनेक प्रश्न मनात नव्याने निर्माण झाले . आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही त्यांनी असे उघड्यावरचे आयुष्य का निवडले ??? वृद्धाश्रमात जायचे नसेल तर एक खोली भाड्याने का घेत नाही?? गरज नसतांनाही ते भिक का मागतात ??? वृद्धाश्रमाबद्दल यांना एवढी चीड का ???? त्यांनी दिलेली ही सगळी माहिती १०० टक्के खरी कशावरून ?? सत्य काही वेगळं असेल का???

यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तिने त्यांना मागितलं नाही . त्यांना मदत करायला गेलेल्या तिला कळून चुकले की त्यांना तिच्या मदतीची मुळीच गरज नव्हती. ती घरी परतली.
तिचा पडलेला चेहरा बघून नवऱ्याने काळजीने विचारणा केली.
तिनेही सगळा प्रकार सांगितला.
झाल्या प्रकाराने ती नक्कीच विचलित झाली आहे हे ओळखून त्यानेही प्रेमाने तिचा हात हातात घेऊन तिचे सांत्वन  केले ," जास्त विचार करू नको   .. त्यांची सोय होते आहे सगळी. त्यांनी दिलेली माहिती खरी असो की खोटी.... ते मजेत आहेत... हेच सत्य आहे.
या सगळ्यातून तू काय शिकलीस  हे खूप महत्त्वाचे . कधी कधी आपल्याला जग  जसे दिसते.... तसे  मुळीच नसते आणि हो....हा अनुभव आला म्हणून सगळेच असे असतात असंही नाही ..... पुन्हा एखादा गरजू दिसला तर चौकशी केल्याशिवाय कुठलाही  निर्णय घेवू नकोस. हजारदा असा अनुभव आला तरी चालेल पण  यामुळे एकही गरजू सुटता कामा नये. हे कायम ध्यानात ठेवायचं. तू तुझं काम केलं ....  दुसऱ्याची इतकी काळजी असते तुला हे  पाहून  मला अभिमान वाटतो तुझा "
त्याचे हे धीराचे बोल ऐकुन तिनेही  शाश्रू नयनांनी त्याच्या  खांद्यावर डोकं ठेवलं . आजी आजोबा मजेत आहे .... हा विचार करून तीही निश्चिंत झाली .

©️ अंजली मीनानाथ धस्के


          

No comments:

Post a Comment