विघ्नहर्ता बाप्पा

#विघ्नहर्ता_बाप्पा
                      आज कावेरी जरा लवकरच उठली होती. खूप दिवसापासून भंगलेली बाल गणेशाची मूर्ती घरामधे तशीच पडून होती. खरं तर घरात जागा नसतांना केवळ मुलांना आवडली म्हणून केवढ्या हौसेने त्यांनी 'छोटा भीमचे' रुप असलेली गणेश मूर्ती घरी आणली होती. पण आता मात्र 'रस्त्यावर गर्दी वाढायच्या आत मूर्तीला कुठेतरी ठेवून यावे', असे तिच्या मनात होते. कामांची घाईही खूप होती. तिने कामांची यादी केली आणि मूर्ती घेवून घराबाहेर पडली. बरेच अंतर गेल्यावरही तिला मूर्ती ठेवायला मनासारखी जागा मिळेना. तेव्हा तिने गावातल्या नदीच्या घाटावर जाण्याचा निर्णय घेतला. तिथे निर्माल्य, तुटके फोटो यांचा ढीग पसरलेला होता. येवढ्या घाणीत बाप्पाला ठेवून जावे तर तिच्या मनाला पटेना. नदीत विसर्जित करावे तर तिथेही बंदोबस्त कडक होता. निर्माल्य नदीत टाकल्यास पाचशे  रुपये दंड आकारल्या जाणार होता. दुसरी एकही चांगली जागा दिसत नव्हती  म्हणून ती फार वैतागली होती तेवढ्यात तिचा मोबाईल खणखणला.  चडफडतच तिने फोन घेतला. पाहते तर आईचा फोन होता. तिने आईला काही बोलायच्या आत तिकडून आईचे रडणे ऐकु आले आणि "तू ताबडतोब घरी ये " असा निरोप तिला मिळाला. "बरं येते लगेच" म्हणून तिने फोन ठेवला. क्षणात यादीतली सगळी कामे तिने रद्द केली. आईकडे जायला गाडी वळवली तेवढ्यात तिला मूर्तीची आठवण झाली. कोणताही विचार न करता घाईतच ती मूर्ती तिने तिथेच एका झाडा जवळच्या कट्ट्यावर ठेवून दिली.
            अर्ध्या तासात ती आईकडे पोहोचली. आई अजूनही रडतच होती. रडाण्याचे कारण विचारल्यावर कळले की,तिच्या भावाने आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 
         दिवसातील अधिक काळ तर आई तब्येतीच्या तक्रारीमुळे झोपूनच असे. तिच्या रोजच्या सगळ्या विधी अंथरूणात पार पाडत होत्या. दिवाणखाना तर आईच्या पलंगाने आणि औषधाच्या बाटल्यांनी. कायमचा व्यापलेला होता. घरात दादा, वहीनी दोघेही नोकरी करणारे होते.  आईला हल्ली कमी दिसत होते.  अनेक गोष्टींचे विस्मरणही होत होते. घरात तिच्याजवळ पूर्णवेळ थांबणारे दुसरे कोणी नव्हते. पूर्वीसारखे तिला घरात एकटे ठेवून कामावर जाणेही अशक्य झाले होते. तिच्यासाठी घरात पूर्णवेळ थांबणारी प्रशिक्षित परिचारिका ठेवणे गरजेचे होते. अशी सेवा खूप महाग होती. वाहिनीचा सगळा पगार या सेवेत खर्ची लागणार होता. भावाच्या एकट्याच्या पगारात घरखर्च, बाहेरगावी शिकणाऱ्या त्याच्या दोन मुलांचे खर्च आणि आईचा दवाखान्याचा खर्च असे सगळे खर्च भागण्यासारखे नव्हते. याउलट वृध्दाश्रमात पूर्ण वेळ प्रशिक्षित  परीचारीका जुजबी रकमेत उपलब्ध होणार होती. वृद्धाश्रम घराजवळ असल्याने आईला  रोज भेटणे, घरचे जेवण देणे शक्य होणार होते. मुख्य म्हणजे ऑफिसमधे   असतांना आई सुरक्षित असल्याने निश्चिंत मनाने काम करणे शक्य होणार होते. भाऊ आणि वहीनीने नाखुशिनेच हा निर्णय घेतला होता.
              कावेरीकडे आईला न्यावे तर तिचे घर फारच छोटे होते. परिस्थिती तर अगदी बेताची होती. तरी ती रोज सकाळी मुलांना शाळेत सोडल्यावर आईकडे येवून बसायची.  मागच्या महिन्यात ती दुपारी मुलांना शाळेतून आणण्यासाठी बाहेर पडली होती. तेव्हढ्या तासाभरात  आईला पाणी पितांना ठसका लागला.  पाणी फुप्फुसात गेले आणि ती बेशुद्ध पडली होती. त्यानंतर पंधरा दिवस दवाखाना केला तेव्हा ती पूर्ववत बोलू लागली होती. आईजवळ प्रशिक्षित परिचारिका असणे आवश्यक असल्याने तिला दादा वहीनीला काही समजावता येणार नव्हते. 
        तिच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यांची उत्तर शोधण्याआधी तिला आईला समजावणे, धीर देणे गरजेचे होते. काय बोलावे तिला काहीच सुचत नव्हते. ती पुर्णपणे बधीर झाली होती. तरी तीने धीर केला व आईला म्हणाली , " डोळे पूस बघू आधी, निर्णय घेतला म्हणून लगेच नाही काही नेणार तुला, निघेल काही तरी मार्ग, तू काळजी करू नकोस. मी बोलते दादा वहीनीशी,  देव आहेच की आपल्या पाठीशी. डोळे पूस बघू आणि काही तरी खावून घे बरं आता."
         तीने मनातल्या मनात " देवा तुलाच रे काळजी. काही तरी मार्ग काढ यातून. सोडव बाबा या संकटातून" असा धावा केला . तशी तीला मूर्तीची आठवण झाली आणि सल काळजात खोलवर  रुतली. डोळ्यात अश्रू दाटले. तिच्या मनावर प्रचंड ताण आला. तिचं आता कशातच चित्त नव्हतं. ती घाईतच उठली आणि घराबाहेर पडली. आता तिला तिचे बालगणेश परत हवे होते. तीने जिथे मुर्ती ठेवली होती तिथे ती परत आली.
         पण आता तिथे मूर्ती कुठेच नव्हती. होती ती फक्त अपराधी पणाची भावना आणि डोळ्यात दाटलेले पाणी.  
         ती डोळे मिटून, डोकं धरून तिथेच बसून होती. एकीकडे मनात बाप्पाची विनवणी सुरूच होती.
तेवढ्यात तिच्या कानी " गणपती बाप्पा मोरया" चा गजर पडला.
तिने आवाजाच्या दिशेने बघितले तर काही स्वयं सेवक नदीच्या आसपासचा  परिसर स्वच्छ करत होते.  तुटलेले फोटो, भंगलेल्या मुर्त्या गोळा करून टेंपोत भरत होते.  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या,निर्माल्य नदीत टाकल्यामुळे, नदी किनाऱ्यावर ठेवल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. परिसर अस्वच्छ राहतो.  हे टाळण्यासाठी स्वयंसेवक   त्या मुर्त्या, फोटो व निर्माल्य घेवून जात होते. 
त्यांच्या गाडीवर मोठा बॅनर होता.  त्यावर छोटीशी कविता ठळक अक्षरात लिहिलेले होती.

भंगलेली मूर्ती सांगू पाहे काही
नवी कोरी असता देव्हाऱ्यात मांडली.
हात जोडूनी दोन्ही, पुढती माझ्या मानही झुकली.
केवळ माझ्या दर्शनाने अनेक संकटेही सुटली.
पण........
रंग जरा उडता किंवा
कोपरा एखादा तुटता
नकोशी का होते? अडगळ का वाटली?
सोडले जरी कडेला अथवा झाडा खाली
कोणे एकेकाळी देवत्व होते माझ्यातही

त्याच गाडीजवळ एक आजोबा माईक हातात घेवून सांगत होते, " निर्माल्य नदीतच विसर्जित व्हावे असा आग्रह धरणारे आपण विसरून जातो की, असे नियम,रुढी बनविल्या गेल्या तेव्हा लोकसंख्या फार नव्हती. त्या काळी स्वतःचे पाणी शुद्ध करण्याची नैसर्गिक क्षमता नद्यांमधे अस्तित्वात होती. आपल्या संस्कृतीत नद्यांना अत्यंत पवित्र मानले जाते. तिच्यात मारलेल्या एका डुबकीने आपली सगळी पापे धुवून जातात असे मानल्या जाते. पूर्वी नदीचे पाणी पिण्यायोग्य होते. आता या पाण्यावर जलशुद्धीकरण केल्याशिवाय आपण हे पाणी पिणे अशक्य आहे. आपली देवावर खरी श्रद्धा असेल तर तीच श्रद्धा देवाने निर्माण केलेल्या या निसर्गावरही असायला हवी. जसे भंगलेल्या मूर्तीचे देवत्व नष्ट होते तसेच दूषित नदीचे पावित्र्य नष्ट होत नसेल का? मानला तर  दगडातही देव असतो. असे ठामपणे सांगणारे आपण भंगलेल्या मूर्तीचे मात्र देवपण नकारतो. देव जर निर्लेप, निर्गुण निराकार आहे तर शोभेच्या मूर्तिपूजेचा अट्टाहास योग्य आहे का?
तेव्हा नद्यांना दूषित करणारे स्त्रोत नगण्य होते. आता आपण आपल्या नद्यांचे नाल्यात रूपांतर केले आहे. जुन्या पद्धतीचे पालन करतांना पूजेसाठी जुन्याच पध्दतीच्या पर्यावरण पूरक मूर्ती, फोटो  वापरण्याचा आग्रह असायला हवा. 
'एक गाव एक देऊळ', 'एक गाव एक गणपती ' या संकल्पना मानणाऱ्या समाजाचे 'एक वसाहत एक देऊळ', 'एक घर एक गणपती ' या संकल्पना मानणाऱ्या समाजात रूपांतर झाले आहे. तेव्हा निसर्गाप्रतीही आपल्या जबाबदार्‍या वाढवायला हव्यात.
 'प्रदूषण रहित नदी ' या आमच्या आवाहनात प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर जरी प्रतिसाद दिला तरी नदीचे पावित्र्य पुन्हा मिळविण्यात आपल्याला यश येईल. तुम्ही नदीत टाकण्यासाठी जे काही निर्माल्य, भंगलेल्या मूर्ती आणता, ते आम्हाला द्या. आम्ही त्याचा योग्य तो मान राखून त्यावर प्रक्रिया करु"
         त्यांचे बोलणे ऐकत असतांनाच  कावेरीची नजर तिच्या बाप्पालाच शोधत होती. गाडीच्या आत डोकावून पाहते तर तिथे तिची छोटा भीमचे रूप असलेली मूर्ती ठेवलेली होती.  तिने ती मूर्ती वापस मागितली पण ती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असल्यामुळे आज जरी घरी नेली तरी उद्या अधिक भंगल्यावर तिला पुन्हा विसर्जनासाठी इथेच आणल्या जाणार असे वाटून  स्वयंसेवक ती मूर्ती तिला द्यायला तयार नव्हते. प्लास्टर ऑफ पॅरिसची मोठी मूर्ती घेण्याची चूक तर तिने केली होती. तिला तिची चुक उमगलीही होती. तरी तिची साध्याची होणारी भावनिक गुंतागुंत ऐकून एकाने त्यांच्याजवळ असलेली शाडू मातीपासुन व फुलांच्या बिया आत टाकून बनवलेली अत्यंत छोटी व सुबक गणेश मूर्ती तिला दिली. आता भविष्यात कधी पुन्हा तिच्या बाप्पाची मूर्ती भंगलीच तर घरातल्या कुंडीत तिचे विसर्जन करता येणार होते . विसर्जन केलेल्या बाप्पाची छान फुल झाडे ही बनणार होती. 
  त्यामुळे बाप्पाचं रूप जरी बदललं तरी आपला बाप्पा आपल्याला मिळाला याचा तिला आनंद झाला होता . इथून पुढे मात्र ती 'भंगलेल्या मुर्त्या गोळा करण्यासाठी  त्यांच्यातली एक स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे' , असे तीने त्या आनंदाच्या भरात ठरवून टाकले .
              तीने या नव्या बाप्पाला घरी आणलं देवघरात ठेवून पूजा केली.
*विघ्नहर्ता बाप्पाच तो.  खरे तर त्याला भक्तांकडुन काही नको असते. त्याच्यासाठी फस्त भक्तीची भावना महत्वाची असते .*  बाप्पासमोर बसून तिने केलेल्या कृतीची माफी मागितली. मूर्ती पूजेचा अट्टाहास सोडून नदीचे पावित्र्य राखण्याचा ध्यास घेण्याचे वचन दिले. तेव्हढ्यात योगायोगानेच  दादाचा फोन आला. 'आईच्या नावाने कोर्टात सुरू असलेल्या केसचा निकाल आईच्या बाजूने लागल्याने वडिलोपार्जित संपत्तीत असलेला आईचा वाटा तिला मिळणार आहे. आता वर्षभरासाठी आईजवळ पूर्णवेळ परिचारिका ठेवणे शक्य होणार आहे. बाप्पाचीच कृपा. त्यानेच सोडवलं मला संकटातून '. हे सांगताना त्यालाही आनंदाश्रु अनावर झाले हे तिला स्पष्ट जाणवले. आज निसर्गाप्रती जागरूकता आणि बाप्पाबद्दल  श्रद्धेच्या भावनेने तीला नवा दृष्टिकोन मिळाला होता. तिचे मन त्या कृतज्ञतेत समाधानाने व्यापून गेले.
©️ अंजली मीनानाथ धस्के

जुन्या कथेलाच नव्याने एक सकारात्मक शेवट दिला आहे


No comments:

Post a Comment