आजीची पांडुरंग भक्ती

#आजीची_पांडुरंग_भक्ती

                    पाऊस सुरू झाला की आम्ही पोरं कुरकुर् करायचो," सगळीकडे नुसता चिखल झाला आहे आता खेळायच कुठे?"  पण खाण्याची नुसती चंगळ असायची. कढी खिचडी ,चकुल्या, वरणफळ, वेगवेगळ्या भाज्यांचे सूप आणि गरमा गरम भजी खाण्याची मजाच काही और . कधी कांदा , कधी बटाटा , कधी पालक तर कधी मिरची भजी.... आहाहा
शाळेतून येतांना भिजून आले की आजी छान डोकं पुसून द्यायची तर आई कधी आल्याचा चहा तर कधी हळदीच दूध द्यायची. जरा सर्दी झाली की आजी आग्रहानं काढा द्यायची. काढा प्यायला टाळाटाळ करणारी आम्ही पोरं पण तिने  प्रेमानं आवाज दिला की आमचा नाईलाज व्हायचा. त्याला कारणही तसचं होत.  ती आम्हाला आवाज देतांना आमचं लाडाने नाव घ्यायची आणि त्याला पुढे 'माऊली' शब्द जोडायची ,"  सोन्या माऊली, माऊ माऊली घ्यावा थोडा काढा . जीवाला आराम पडतो याने, माझी माऊली आहात ना ...... म घ्या बरं पट्कन "  .. ते इतकं आवडायचं आम्हाला की तिने तस पुन्हा पुन्हा म्हणावं असा आग्रह करायचो.
तीही आनंदाने आमचे सगळे लाड पुरवायची . भल्या पहाटे उठून आजोबा भूपाळी म्हणायचे . 
आजी मात्र स्वयंपाक घरात काहीतरी खमंग बनवत असायची .
तिच्या त्या पदार्थांच्या घमघमाटानेच आम्ही  पांघरूणातून बाहेर यायचो . रोज काहीतरी नवीन करून खावू घालायची . ऋतुमान असेल त्या प्रमाणे  पदार्थ का खावेत ?? ... त्याचे शरीराला काय फायदे??? हे ती छान पटवून द्यायची  . तिचं आमच्या भोवताली असणं म्हणजे आम्हाला आनंदाची परवणी  असायचं. देवाचं नाव सतत तोंडी असावं अशी तिची धारणा म्हणून तिने काहीही झाले तरी ," पांडुरंग पांडुरंग " म्हणायची मजेशीर सवय स्वतःला लावून घेतली होती.    ..... तिला उठतांना ... बसतांना त्रास व्हायचा .. तेव्हा ती वेदनेने , " पांडुरंग  पांडुरंग " म्हणायची .  आम्ही तिच काही काम केलं तेव्हा पोरं ऐकतात आपलं या समाधानाच्या भावनेने "पांडुरंग  पांडुरंग" म्हणायची . कोणी काही दुःखद घटना सांगितली तर त्याबद्दलची हळहळ ही , "पांडुरंग  पांडुरंग" यातूनच व्यक्त व्हायची . कोणी काही आनंदाची बातमी सांगितली तर त्याचा आनंदही डोळे मिटून हात जोडून" पांडुरंग  पांडुरंग" म्हणण्यात  जाणवायचा .
 आम्ही सगळी नातवंड तिची नक्कल करायचो . तेव्हाही ती न चिडता  म्हणायची , " गंमत करता या म्हातारीची .... करा .. करा .... पांडुरंगाच असं नाव घ्यायला सांगितलं तर घ्यायचे नाहीत .... गमतीने का होईना देवाचं नाव तोंडी येतंय .... पांडुरंग पांडुरंग" म्हणतच ती हसून आमचा मुका घ्यायची .

आषाढ महिना सुरू झाला की तिच्यासोबत अनेकदा ती आम्हालाही  विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात घेवून जायची . कळत नकळत तिच्यामुळेच आमच्यामनात विठ्ठल भक्तीचे बीज पेरल्या गेले.

तिला वारीला जावस वाटायचं पण शरीर साथ देत नव्हतं म्हणून मग गावातले जे लोक वारीला जायचे त्यांच्याच पाय पडायची ... म्हणायची ...," पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा ".

   वारी ... वारकरी याबद्दल इतर बायकांशी बोलतांना ती अगदी  सोपं  करून  त्यांना समजेल अशी उदाहरणं देवून समजावून  सांगायची .  "' वारकरी ' म्हणजे  ' सासुरवाशीण  मुलगी' .... ती कशी आईच्या भेटीसाठी  माहेरच्या वाटेने चालत जाते .... तसे हे वारकरी आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी मैलोन मैल चालत जातात . माहेरच्या ओढीने करतो तो प्रवास म्हणजे ' वारी '.
 माहेरची वाट कितीही खडतर असली तरी लेकींना त्याचा त्रास होत नाही तसचं या वारकऱ्यांना कितीही ऊन...पाऊस ... वारा असला तरी त्याचा त्रास होत नाही . माहेरी गेल्यावर आईचा प्रेमळ स्पर्श झाला की कसे आनंदाचे भरते येते... मन कसे भरून पावते  तसेच विठू माउलीच्या दर्शनाने वारकऱ्यांची वारी सफल होते.
  आई कोणतीही असली तरी तिचं सगळं लक्ष आपल्या पिलाकडे असते . ही विठू माउली तर साऱ्या जगाची माऊली आहे .... तिचं सगळ्यांकडे लक्ष असतं . ती सगळ्यांची काळजी घेते. सुख असो की दुःख .... आपण आपल्या आईला विसरत नाही तसचं आपणही पांडुरंगाला विसरता कामा नये ".  तिचं हे असं मधाळ  बोलणं सगळेच तल्लीन होवून ऐकायचे .
एकादशी  ... ती खूप भक्तिभावाने करायची ....
 घरातल  वातावरण एकदम प्रसन्न असायचं ... आम्हाला तर उपवासाचे पदार्थ इतके आवडायचे की फक्त ते भरपेट खायला मिळावेत म्हणून आम्ही एकादशी करायचो . आम्हाला आजी गंमतीने म्हणायचीही , " ह्यांच्याकडे पाहिले की कळतं , एकादशी अन् दुप्पट खाशी ... असं का म्हणतात ते "

रोज रात्री झोपण्यापूर्वी आम्हाला तिने ऐकलेल्या , वाचलेल्या  सगळ्या पौराणिक कथा आवडीने सांगायची .
आम्ही झोपलो की तीही हळूच ," पांडुरंग पांडुरंग"  म्हणत झोपी जायची.
 तिच्या पांडुरंगाचे वेड आम्हालाही इतके  लागले की ती सारखं  नाव घेते म्हणजे एक दिवस पांडुरंग तीच्या भेटीला नक्की येणार अशी आमचीही खात्री झाली होती.
एकदा तर गंमतच झाली .... वडिलांना
भेटायला त्यांचे बालमित्र , पांडुरंग कामत आले होते . वडिलांनी आईला माजघरात ऐकू जाईल अशा आवाजात सांगितले , " ऐकलत का .... दोन कप चहा ठेवा .... पांडुरंग आलाय"
त्यांची ही हाक ऐकून आम्ही पोरं चमकलोच .... खेळायच सोडून तडक आजीकडे गेलो , " अग आजी इथे काय करतेस ... चल लवकर .... तुझा पांडुरंग आलाय तुझ्या भेटीला .... चल लवकर " असं म्हणतं आम्ही तिला जवळ जवळ ओढतच समोरच्या खोलीत आणले . आम्हाला असं आलेलं पाहून बाबांना आणि पांडुरंग काकांना आश्चर्य वाटले. पांडुरंग काका पट्कन उठून आजीच्या पाया पडले , आजीने तोंड भरून आशीर्वाद दिला , " औक्षवंत व्हा ". आजीने पाया पडायचे तर पांडुरंगच आजीच्या पाया पडतो आहे हे पाहून आम्ही बुचकळ्यात पडलो . आमचे  बदललेले चेहरे पाहून आजीला मात्र हसू आवरेना ..... तिने खुलासा केला , " हे पांडुरंग कामत ... बाबांचे बालमित्र ... ... माझा पांडुरंग सावळा आहे रे  ... या गोऱ्या पांडुरंगातही तो आहेच पण माझा पांडुरंग जेव्हा माझ्या भेटीला येईल तेव्हा माझ्यासाठी वैकुंठाचे दार उघडल्या जाईल पोरांनो .... " हसतच ती " पांडुरंग पांडुरंग " म्हणत तिच्या खोलीत गेलीही. बाबा आणि काकाही  आम्हाला हसायला लागले तेव्हा आम्ही तिथून पळ काढला.

आज हे सगळं आठवतंय त्याला कारणही तसंच आहे .....
आज एकादशी ..... बरोबर एक वर्ष झालं आजी जावून.
 जातांनाही तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते जणू साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले  .... तिने " पांडुरंग पांडुरंग " म्हणतच प्राण सोडला . परंतु या वेळेस तिच्या," पांडुरंग पांडुरंग " म्हणण्यात वेगळाच आनंद.... समाधान  जाणवतं होत.
अखेरच्य  काळात तर ती सारखं सांगायची ,"  मला  मरण आले तर ते एकादशीलाच यावे . वर्षातून एकदाच एकादशीला वैकुंठाचे दार उघडते . माझा प्राण पांडुरंग चरणीच विलीन व्हावा एवढीच इच्छा आहे ".
अखंड हरी नामाच्या गजरात सुरू असलेली तिची जीवनरुपी वारी  एकादशीच्या दिवशीच पूर्णत्वाला गेली . तिचा पांडुरंग खरंच तिला वैकुंठाला घेवून गेला . ती गेली..... पण मागे राहिली तिची शिकवण....... पांडुरंग कायम आपल्या सुखदुःखात आपल्या सोबत असतो .... त्याला कधीच विसरायचं नाही .

आज  तिच्या आठवणीनेच पाणावलेले माझे  डोळे ... हळूच मिटल्या गेले . गालावरून अश्रू वाहत गेले. का कोणास ठाऊक पण  तोंडातून शब्द बाहेर पडले , " पांडुरंग.... पांडुरंग".

©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः
मी काही पट्टीची लेखिका नाही . कथेला  कल्पकतेची जोड दिली आहे तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com



No comments:

Post a Comment