तिने अनुभवलेला ..... बाबा होण्याचा त्याचा प्रवास

#तिने_अनुभवलेला_बाबा_होण्याचा_ त्याचा_प्रवास



ईशाला कडक डोहाळे लागले तेव्हा तिला काही खाता येत नव्हते की खाल्लेलं काही पोटात टिकत नव्हतं . जीव अगदी नकोसा झाला होता. तिची ही अवस्था पाहून तापट स्वभावाचा समीरही  हळवा झाला. मुल तर दोघांचे आहे तरी शारीरिक त्रास फक्त ईशालाच सहन करावा लागणार, असं वाटून तो ईशाची खूप काळजी घेवू लागला. तिला काय हवं नको ते बघू लागला. डॉक्टर ताईने सांगितलेले सगळे तो नीट समजून घेवू लागला.
       घरची परिस्थिती फारशी त्याच्या नियंत्रणात नव्हती.
 त्याला खूप वाटे ईशाला होणारा शारीरिक त्रास कमी करावा पण त्यावरही त्याचं काहीच चालत नव्हते.  तरी आपल्या परीने तो ईशाला जपण्याची... तिला आनंदी ठेवण्याची  एकशी संधी सोडत नव्हता.  ईशा तर आपण आई होणार या आनंदाताच इतकी होती की या त्रासाचं तिला काहीच वाटत नव्हते. तीन महिन्यांनी दोघांनाही या बदलांची सवय होवू लागली . ईशाच्या आईने चोर चोळी भरली तेव्हा  "हक्काने सांग मला काय हवं ते  .... तुझे डोहाळे पुरवायला मी आहे... हेच दिवस असतात लाड करून घ्यायचे ..." असं त्या म्हणाल्या .
ते ऐकून समीर लगेच म्हणाला ,"  तुम्ही का पुरवणार डोहाळे ..... मला सांगा.. मी आहे की ... तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला ".
त्यांना जावयाचं भारी कौतुक वाटलं . जरा गंमत करावी म्हणून त्यांनीही मग समीरला भली मोठी यादी सांगितली. 
          समीर म्हंटल्याप्रमाणे  खरंच ईशा म्हणेल ते तिच्या समोर हजर करत होता.  तो सगळे लाड करतोय म्हंटल्यावर ईशालाही   तिला होणाऱ्या त्रासाचा विसर पडला.
         पूर्णपणे शाकाहारी असणाऱ्या  ईशाला अचानक उकडलेले अंडे खावेसे वाटू लागले . सासू सासऱ्यांच्या समोर घरात ' अंड '  हा शब्द बोलण्याची जिथे सोय नव्हती तिथे उकडलेले अंडे खायला मिळणार अशी आशा बाळगणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण होते.  तिची ही मागणी एेकून समीर बुचकळ्यात पडला. हार मानणाऱ्यातला तो नव्हता. डॉक्टर ताईंना विचारल्यावर त्याला कळलं की , " गर्भारपणात शरीरात ज्या व्हिटॅमिनची  कमी होते ती पूर्ण करण्यासाठी आपले शरीर ते सत्व असलेल्या पदार्थांची मागणी करत . त्यालाच आपण साध्या भाषेत डोहाळे म्हणतो आणि म्हणूनच ते पुरवले  जावे असा आग्रह ही असतो. अंड्याचा फक्त पांढरा  भाग  तोही अतिशय कमी प्रमाणात खाल्लेला चालतो ". मग  ऑफिस मधून येतांना त्याने गाडीवर मिळणारे उकडलेले अंडे केळीच्या पानात गुंडाळून घेतले. आई बाबा संध्याकाळी बाहेर फिरायला जायचे  ती वेळ साधून तो घरी आला आणि ईशाला अंडे  खायला दिले. मागचा पुढचा विचार न करता ईशाने ते अंडे गट्टम् केले. अंडे खावून मिळणाऱ्या तृप्ती पेक्षाही समीर तिचे विचित्र डोहाळे पुरवण्यासाठी धडपडतो आहे हे बघून ईशा सुखावून गेली.  घरात अंडे आणले आणि ते  ईशाने खाल्ले याचा कुठलाच पुरावा समीरने मागे ठेवला नाही.
        ईशाच्या आईने  दिलेल्या यादी प्रमाणे प्रत्येक महिन्यात समीर तिच्यासाठी काही तरी खास बेत करत होता. एकदा नौका विहार करण्यासाठी तिला कामावरून परस्पर जवळच्या तळ्यावर बोलावले . तोही तिथे आधीच हजर होता .  मोटर बोट न घेता राज हंसाचा आकार असलेली छोटी नाव त्याने आधीच ठरवून ठेवली होती. तो स्वतः ती  हळूहळू वल्हवत होता.  मनसोक्त नौका विहार करून झाल्यावर तिच्या आवडीच्या भेळवर त्यांनी ताव मारला.
      घरच्या कटकटी तर रोजच्याच असतात पण ही वेळ ईशाला त्या सगळ्यांचा विसर पाडायला लावायची . या क्षणांवर फक्त .. ईशा ... समीर आणि त्यांचं गर्भातल बाळं यांचाच अधिकार होता.
           ईशाला अजूनही उलट्यांचा प्रचंड त्रास होत होता. त्यावर उपाय म्हणून सकाळी उठण्याआधी काही तरी गोड खावं असं डॉक्टर ताईंनी सुचवलं . ती झोपेत जरा जरी हलली की समीर लगेच काही तरी खाण्यासाठी घेवून येई. स्वयंपाक घरातील त्याच्या या वेळी अवेळी होणाऱ्या खुडबुडीने इतरांची झोप मोड होवू नये म्हणून खोलीतच त्याने एका डब्यात खाण्याचे सारे जिन्नस भरून ठेवले होते. तिच्या काळजीने ईशाचे  सासरे देखील या डब्यात चिक्की , राजगिरा लाडू अशा पदार्थांची भर टाकत होते.
आधी कशालाही नाही म्हणणारी ती , आता मात्र सगळे पौष्टिक पदार्थ आवर्जून खात होती. डॉक्टर ताईंनी सांगितलेली आहार पद्धती ती आणि समीर काटेकोर पणे पाळत असल्यामुळे
ईशाच वजन आधी कमी होत  पण गर्भधारणेनंतर ते झपाट्याने वाढायला लागलं.  बाळाची वाढ ही तीन आठवडे पुढे होती . पण बाळाचं आणि तीच वाढतं वजन डॉक्टरांना वेगळीच काळजी लावून गेलं. बाळाला जन्मतः डायबेटिस असण्याची शक्यता तर होती पण गर्भ धारणेत निर्माण होणारा डायबेटिस ईशाला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे
ईशाला सातत्याने रक्तदाब तपासायला आणि रक्तातील साखरेची चाचणी करायला सांगितल्या गेले.  समीर जरा धास्तावला होता पण ईशाला पक्क वाटायचं की , असं काही नसणार . हे सगळं  आपण आहार पद्धती काटेकोरपणे पाळण्याचे चांगले परिणाम आहेत. त्यामुळेच वजन झपाट्याने वाढत आहे.
 ईशाला बेड रेस्ट सांगितल्यावर समीरला मनाविरुद्ध तिला माहेरी पाठवावे लागले कारण घरच्यांना न दुखवता ईशाची काळजी  घेण्याचा दुसरा कुठलाच पर्याय त्याच्याजवळ नव्हता.   ईशालाही येवढ्या लवकर माहेरी जायचे नव्हते. तिचे कॉलेजचे बरेच काम बाकी होते. तिला दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय तिला सुट्टी घेता येणं शक्य नव्हते. महत्वाचे म्हणजे तिला  वाटे गर्भातील बाळाला  अखेरपर्यंत  समीरचा सहवास मिळावा पण घरातील इतर सदस्यांचा तिच्या गरोदरपणा बद्दल असलेला उत्साह .... असहकार बघता तिने ही शेवटी माघार घेतली.
         माहेरी तर तिच्या आईला तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. समीर ही  महिन्यातले निदान दोन रविवार तिच्या सोबत घालवता यावे यासाठी इतक्या लांबचा प्रवास तिच्यासाठी करत होता. तो आला की ईशाच्या आईला त्यांच्याच यादीची आठवण करून देत असे .
          ईशाचे डोहाळे म्हणून एकदा वनभोजन करून झाले .  एकदा चांदण्या रात्रीची  सहल करायची म्हणून तो आला पण आता ती खूप अवघडली  होती. या अवस्थेत तिने घरा बाहेर  पडावे तेही रात्रीचे  याला तिच्या आईचा विरोध होता . यावर उपाय म्हणून समीरने घराच्या छतावराच सहल करूया असं सुचवलं . तशी सगळी तयारी ही केली . जेवणं झाल्यावर झोपायला म्हणून सगळी खाली गेली . ईशाला झोप येत नव्हती. तिला  तिथेच थांबायचे होते म्हणून ती मऊ अंथरूण टाकून तिथेच भिंतीला टेकून बसली.   दोघांनाही एकमेकांशी खूप बोलायचं होत .  ईशाने  समीरच्या खांद्यावर डोकं ठेवलं . त्याच्या हातात स्वतःचा हात टाकून ती  पौर्णिमेचा चंद्र .... हवेतला गारवा ... मनात दाटून आलेल्या तृप्तीच्या  भावना ... अनुभवत होती.  तिच्या मनात विचार सुरू होते , ती आई होण्यासाठीचे अनेक शारीरिक बदल अनुभवत आहे तर समीरही उत्तम बाबा होण्यासाठीचे सगळे मानसिक  बदल स्वतः मधे घडवू पाहतो आहे . आई होणं कायं असतं हे ती ऐकून होती ... वाचून होती . पण समीरचा बाबा होण्याचा प्रवास तिला नवा होता . आईच्या शारीरिक त्रासाचं   कौतुक केलं जातं पण तिचं हे आईपण सुखकारक करणाऱ्या बाबा विषयी कुठेच कसं काही बोललं जातं नाही . असं वाटून तिने समीरकडे पाहिलं तर तो  सगळ्या दगदगिने  तिथेच झोपी  गेला होता. त्याची उत्तम बाबा होण्यासाठीची सुरू असलेली धडपड आठवत   ती पुन्हा पौर्णिमेचा चंद्र बघत बसली.  सगळं कसं शांत ... निःशब्द.... आल्हाददायक.... मनाला सुखावणारं वातावरण  होत.
         तिला झेपेल असा छोटासा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम ही झाला . शेवटच्या महिन्यातली सोनोग्राफी करून घ्यावी म्हणून दवाखान्यात गेली तर  पोटातले पाणी कमी झाल्याचे कळले . जास्तीत जास्त तीन दिवस थांबू शकता मग काय तो निर्णय घ्यावाच लागेल असं डॉक्टरांनी सांगितले.
       घरी जावून ठरवून असं म्हणून ती घरी आली पण परत येतांनाच पोटात दुखायला लागले.   रिक्षाचे हादरे तिला सहन झाले नाहीत. घरी आल्यावरही बरं वाटेना. तिचा रडवेला चेहरा पाहून आई वडील दोघेही काळजीत पडली. तीन दिवसांनी तरी निर्णय घ्यायचाच आहे मग आजच का नको असे त्यांना वाटले. समीरला विचारले तर  तो एकदम घाबरून गेला . आपण बाबा होण्याचा क्षण असा अचानक आला तेही  तो तिथे नसतांना असं वाटून तो दुःखी झाला. त्याच्या नातेवाईकांमधे कोणाचेच सिझेरियन झाले नव्हते . ईशाच्या बाबतीत मात्र हा निर्णय घ्यावाच लागणार होता. त्याला तिची खूप काळजी वाटली .  डॉक्टरांना जे योग्य वाटेल तेच करावे असं ठरल. त्यांनी रात्रीपर्यंत अजुन थोडे थांबवे असं सुचवले .
   इकडे ईशा पुरती बेजार झाली होती. आई तिला देवाचा अंगारा लावून स्वतःचे समाधान  करून घेत होती . तर वडील तिच्या खोलीत सारख्या आत बाहेर चकरा मारत होते. रात्री नऊ वाजता तिला दवाखान्यात दाखल करायचं ठरल. समीर तिकडून यायला निघाला तो सकाळी सात वाजेपर्यंत पोहचणार होता. काय गंमत झाली काय माहित ईशाला दवाखान्यात दाखल केल्यावर लगेच पोटात दुखायचे थांबले.
         
          दुसऱ्या दिवशी सकाळी  ऑपरेशन करायचे ठरले . आता  मात्र बाळाला हातात घेण्यासाठी  सकाळची वाट बघावी लागणार  होती. सकाळी समीर आल्यावरच ऑपरेशन करावे असे ईशाने सुचवले.
      ईशाच्या आईला काळजीने झोप लागली नाही . ईशा मात्र पोट दुखायचे थांबले म्हणून खुश होती.  बाळचे लवकरच लाड करायला मिळणार या विचारांनी ती  ऑपरेशनसाठी जास्तच  उत्सुक होती.
     सकाळ झाली . सगळी तयारी ही झाली . सगळे डॉक्टर वेळेवर हजर होते. सकाळीच ऑपरेशन करायचे ठरले तरी समीर अजुन पोहचलाच नव्हता. अर्धा तास सगळे थांबले  पण त्या पेक्षा जास्त थांबणे भुलतज्ञ यांना शक्य नव्हते. त्यांच्या पुढच्या ऑपरेशन ची वेळ निश्चित होती.  ऑपरेशन एक दिवस पुढे ढकलावे लागणार होते.
डोळाभरून समीरला बघावं असं ईशाच्या खूप मनात होत. पण अजून एक दिवस थांबून पोटातले पाणी कमी होवून बाळाच्या जीवाला धोका निर्माण व्हावा असंही तिला मुळीच नको होत.
      ती ऑपरेशन थिएटर मधे गेली .  तिला भुल दिली . गार गार लहर पायाच्या अंगठ्यापर्यंत गेली.  अगदी हसत खेळत सगळे डॉक्टर   आत आले. वातावरणात कसलाच तणाव नव्हता . तिनेही मग डोळे मिटले . समीर बाहेर आला असेल का ? असा विचार मनात आला. हळू हळू  सगळ्या जाणिवा शिथिल झाल्या .  पण कान मात्र उघडे होते  बाळाचा आवाज ऐकण्यासाठी .
     डॉक्टर  "बाळाची जन्म वेळ नोंद करून ठेवा "  असं परीचारिकेला सांगत होते. त्यापाठोपाठ बाळाचा रडण्याचा आवाज तिला स्पष्ट ऐकू आला . ती रडायला लागली ... तिला बाळ कसं आहे हे विचारायचं होतं पण तिचा आवाज निघत नव्हता. तिची ती धडपड बघून डॉक्टर ताईने ," मुलगा झाला तुला "असं तिच्या कानात हळूच सांगितलं. बाळ कसं आहे हे तिने अस्पष्ट असं विचारल्यावर  , " खूप छान ... गोंडस आहे तुझं बाळ " असं त्यांनी सांगितलं . मला दाखवा बाळ म्हंटल्यावर त्या तिच्याजवळ बाळाला घेवून आल्या . खूप प्रयत्न करूनही आलेल्या ग्लानी मुळे तिला तिचे बाळ नीट दिसले नाही . अग झोप तू ... नंतर दिसेलच बाळ कसे  आहे ते .... आत्ता शांत हो बरं.. नाहीतर डोकं दुखायला लागेल. रडू नकोस . का रडते आहेस. तुला काही त्रास होतो आहे का ? असं त्यांनी विचारल्यावर तिने , " मी रडत नाही ..... मला खूप आनंद झाला आहे " असं त्यांना सांगितलं. "  आनंदाचे अश्रू आहेत होय..... . वेडी ग वेडी    "असं म्हणून त्यांनी लाडाने तिचे डोळे पुसले . "आता हा आनंद बाहेर थांबले आहेत त्यांनाही देवून येते" असं सांगून. त्या बाळाला स्वच्छ करून दुसऱ्या खोलीत घेवुन गेल्या.   तिला तिच्या खोलीत आणलं  .  आधी ठरल्याप्रमाणे जन्मानंतर बाळाच्या सगळ्या टेस्ट करण्यासाठी त्याला खास लहान मुलांच्या दवाखान्यात न्याव लागणार होत आणि त्यासाठी परिचारिका त्याला नेवू लागली तेव्हा ईशाची आई त्यांना विरोध करू लागली पण ती परिचारिका काही ऐकेना. त्या आवाजाने ईशाला जाग आली , ती सगळा जोर एकवटून म्हणाली, " आमच्या डॉक्टर ताईंना बोलवा आधी ..बाळ कुठेही जाणार नाही ". ती गुंगीत ही बाळासाठी  आक्रमक  झाली. तेवढ्यात डॉक्टर ताई तिथे आल्या ..... त्यांनी तिला शांत केलं. "बाळ कुठेही जाणार नाही . त्याच्या सगळ्या चाचण्या आपल्या हॉस्पिटल मधेच करण्याचं ठरलं आहे . न्याव लागलंच तर मी स्वतः घेवून जाईल आणि घेवून येईल .  या परिचारिकेला  बाळाला घेवून जाण्याचे काम सोपवले आहे तिला आज काय ठरले ते माहीत नाही त्यामुळे  ती नेहमीप्रमाणे येवून बाळाला घेवून जात होती .
तू आराम कर ..... मी स्वतः सगळं बघते " अशी खात्री करून दिली.  तेव्हा ती निश्चिंत मनाने औषधाने येणाऱ्या गुंगीच्या स्वाधीन झाली .  समीर दवाखान्यात पोहचला होताच. तोच पुढची सगळी धावपळ करू लागला. बाळाच्या सगळ्या चाचण्या घेतल्या गेल्या .  '  बाळ   एकदम सदृढ आणि निरोगी  आहे', हे ऐकून समीरचा जीव भांड्यात पडला.
लगेच तो ईशाकडे परतला. ती अजून ग्लानीतच होती.
 तिचा हात हातात  घेवून,' आपण वेळेआधी दवाखान्यात पोहचायला हवे होते ' असं वाटून कितीतरी वेळ समीर  असाच  भरल्या डोळ्यांनी तिला  बघत बसला होता . तिला जाग आली तेंव्हा मनात इतक्या भावना दाटून आल्या की तिला काय बोलावे सुचलेच नाही . ती ही त्याला  डोळे भरून फक्त बघत होती. शेजारीच आई  बाळाला चमच्याने दूध देत होती. बाळाला खूप भूक लागली होती तेही मस्त चुटूचुटू दूध पीत होते. बाळाचा मामा त्याच्याशी आनंदाने बोबडे बोल बोलत होता.
  त्यांचा जल्लोष कानी पडताच ती समीरला म्हणाली , " बाळाला बघितलं??" . त्याने मानेनेच होकार दिला. ईशाने लगेच "तू घेतलंस बाळाला ?? " असा पुढचा प्रश्न विचारला . त्याने , " नाही ग .... माझी  हिंमतच झाली नाही . किती लहान आहे तो .... " असं सांगितलं . हे ईशाच्या आईने व भावाने ऐकलं . त्यांनी समीरला घाबरायच काही कारण नाही असं सांगून  खूप प्रोत्साहित केले. बाळाचे पोट भरल्यावर त्याला त्याच्या बाबाकडे देण्याची तयारी सुरू झाली.   एक हात  मानेखाली  ... एक हात बाळाच्या अंगाखाली घालून बाळाला कसं अलगद उचलायच ह्याच प्रात्यक्षिक करून दाखवल्या गेले . समीर मांडी घालून बसला ... बाळाचं हक्काचं सिंहासन तयार झालं ... बाळाला आजीने हळूच समीरच्या मांडीवर दिलं.  बाळाला योग्य पद्धतीने घेण्याची त्याची धडपड सगळेच कौतुकाने पाहत होते.  बाळ  बाबांना टकमक बघू लागल. त्याला असं बघून समीर इतका आनंदी झाला की लगेच त्याच्याशी बोबडे बोल बोलू लागला.  त्याचा आनंदी चेहरा बघून  आणि त्याचे बोबडे बोल ऐकून ईशा तृप्त झाली. डोळ्यात पुन्हा आनंदाश्रु दाटले.
आज  खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याचा  आई म्हणून प्रवास सुरू झाला होता पण त्याच क्षणी समीरही तिच्या बरोबरीने बाबा म्हणून प्रवास करायला सज्ज झाला आहे हे पाहून ती निश्चिंत झाली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः मी काही पट्टीची लेखिका नाही . तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com




2 comments: