रस पान

#रसपान
#भक्तीरस
#भौतिकरस
©️अंजली मीनानाथ धस्के
           आज का कोणास ठाऊक ..... सकाळी सकाळी जरा वेळ घाटावर जावून  नदीकडे निवांत बघत बसावस वाटलं . मस्त थंडी .... नदीच्या पाण्यावर धुकं पसरलेलं .... पानकावळे पाण्यात सुर मारून आपली भोजन व्यवस्था करण्यात मग्न ... त्यामुळे  पाण्याचा होणारा एक विशिष्ट  आवाज..... चिमण्यांची सुरेल चिवचिव....   मन कसं शांत ..... शांत ....... शांत झालं. शेजारीच एक आजोबा योगा करायला बसले. त्यांनी मोबाईलवर  "अथर्वशीर्ष " लावलं....  " ओमssss भद्रं कर्णेभि:ssss ...." कानावर पडताच मन ताल पकडू लागलं ... डोळे मिटले गेले.... " त्वमेव केवलं कर्तासिsss... त्वमेव केवलं धर्तासिsss.... " पर्यंत मन पोहचले . रोमारोमात भक्ती रस पाझरू लागला ... आत्मा आणि परमात्मा एक होणार असं वाटू लागलंच होतं  तेवढ्यात...... दुसऱ्या बाजूला दोन कॉलेज कुमारी येवुन बसल्या ..... आणि त्यांच्या मोबाईलवर ...." मतलबी ..... बन जा जरा मतलबी .... दूनियाकी सूनता क्यो..... खुद की भी सून ले कभी "  हे गाणं वाजलं.
विश्वामित्र जिथे टिकाव धरू शकले नाही तिथे माझ्या सारखी सामान्य व्यक्ती काय टिकाव धरणार.
क्षणात मतलबी मन " परमात्म्याची भेट" पुन्हा केव्हातरी घेवू म्हणत भक्ती रसातून बाहेर आलं आणि लगेच भौतिकरस प्राशन करू लागलं. कुठलेही दुःख नसलेल्या माझ्या मनाने  सकाळच्या उगवत्या  सूर्याला नमस्कार करून   ," सूरज डुबा हैं यारों sss.... दो घुट नशेके मारो sssss
गम तुम भूला दो सारे संसार के " म्हणत जल्लोषात थिरकायला सुरुवात केली.
काय करणार 😉.... आमच्या पिढीचे वय ज्या टप्प्यावर आहे तिथे मनाला भक्ती रसाची कितीही ओढ असली तरी अजून ते भौतिकरसातच चटकन रमते.
माझ्या मनाचे जे झाले ते झाले ..... गुलाबी थंडीत ... सकाळी सकाळी तुमचे मन शांत .. प्रसन्न व्हावे म्हणून ही  " गुलाबी पहाट" असलेली  रांगोळी खास तुमच्यासाठी.....
इतर लिखाण " आशयघन रांगोळी"  या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com
( ही रांगोळी आधी चित्र काढून न घेता .. डायरेक्ट रंग वापरून रंगवली आहे.  )
©️अंजली मीनानाथ धस्के




एक न मिळालेला अल्बम ( विनोदी)


#एकनमिळालेलाअल्बम
#PULA#यत्रतत्रसर्वत्र
(PULA हा पुणे लेडीज चा खूप मोठा ग्रुप आहे.)
©️अंजली मीनानाथ धस्के
 तर झालं असं ....
मला एक फोन आला. ( त्यात काय एवढं विशेष . सध्या ह हळदीकुंकवाचा सिझन आहे ... आलं असेल एखादं बोलावण असं अजिबात समजू नका. ) पुल ग्रुपच्या व्हेरिफाइड सेलर असलेल्या एका ज्वेलरी कंपनीकडून हा फोन आला होता . त्यांना त्यांच्या मराठमोळ्या  दागिन्यांच्या जाहिरातीसाठी सामान्य स्त्रीचाच चेहरा हवा होता आणि त्यासाठी माझ्याहून परफेक्ट कोणी असूच शकत नाही अशी त्यांची बहुदा खात्री पटली होती. म्हणून त्यांनी  मला फोन केला होता. मी जरा आढेवेढे घेतले पण माझ्या वेशभूषे पासून ते मेकअप आर्टिस्ट पर्यंत सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. माझ्या जाण्या- येण्याची सोय ही केली. तेव्हा माझा नाइलाज झाला. मी दिलेल्या वेळी दिलेल्या  ठिकाणी पोहचले. माझे शरीर त्यांच्या स्वाधिन केले .( सगळ्या बायकाच .... कंपनीची मालकीण ... वेशभूषा करणारी .... मेकअप आर्टिस्ट ...आणि फोटोग्राफर... तेव्हा गैर अर्थ घेवू नये😜) त्यांनी बघता बघता माझा कायापालट केला . आरश्यात जेव्हा स्वत:ला बघितले तेव्हा , " ही😱 मी नव्हेच ... ही तर अप्सरा😜 नभीची" असेच वाटले मला . मनसोक्त पोझ दिल्या .... इतक्या की कॅमेऱ्याची  मेमोरी फुल्ल झाली . मन कसे तृप्त झाले होते. मला फोटोची फायनल कॉपी   दोन दिवसात व्हॉट्स ऍप वर पाठवायच त्यांनी कबुल केलं. मी त्यांचे आभार मानले आणि पुन्हा भेटण्याचं आश्वासन देवुन  प्रेमाने त्यांचा  निरोप घेतला.  घरी आल्यावर दोन दिवसात फोटो मिळणार या विचारात मी शेखचिल्ली सारखी स्वप्न रंगवू लागले. कशात लक्ष लागेना . फोटो कसे  आले असतील ? मी चांगली दिसत असेल का? फोटो चांगले आले तर पुलं वर लगेच रिव्ह्यू देवुन टाकूया का? . फोटो बघून सगळ्या भरभरून कौतुक करतील का ? कौतुक केले तर आपण काय रिप्लाय करायचा?. आनंदाच्या  नुसत्या उकळ्या फुटू लागल्या. इतका आनंद झाला की...  आनंदाने उड्या मारत " आज मै उपर ... आसमा नीचे " हे गाणं मी मोठ्याने गुणगुणायला लागले .
तेवढ्यात नवरोबने गदा गदा हलवून झोपेतून जागे केले. तो मला फिट आली आहे  असंसमजून घाबरून विचारत होता , " काय हे? काय  होतय ? हात पाय वाकडे का करतेय? काय सांगायचं आहे? स्पष्ट सांग काहीच कळलं नाही काय बडबडत होती ".
त्यावर मी चिडून बोलले , " पाच मिनिट अजून थांबला असता तर फोटोचा अल्बम मिळणार होता . लगेच रिव्ह्यू देवुन छान कमेंट ही  मिळाल्या असत्या. "
त्याला काहीच कळले नाही . तो माझ्याकडे 🙄🙄🤔🤔😱😱😱😱 भूत बघितल्या सारखा बघत होता.
हे सगळ सांगायचं कारण की , पुलं ग्रुप वर एवढ्या  उत्कंठावर्धक काही गोष्टी घडत असतात की त्याचा परिणाम संवेदनशील मनावर झाल्यावाचून राहत नाही. तेव्हा झोपण्यापूर्वी  पुल ग्रुप पासून किमान अर्धा तास तरी दूर रहावे.  अन्यथा  जवळचे लोकच  तुमच्या बद्दल.. तुमच्या उत्तम आरोग्य बद्दल 😜 गैरसमज  करून घेतील.
 तसेच मेहनतीने केलेल्या फोटो शूटचा अल्बम कधीच मिळणार नाही या गोष्टीचं  झालेलं प्रचंड दुःखही तुम्हाला😓🤪 पचवावे लागेल.
©️अंजली मीनानाथ धस्के
फोटो अल्बम मिळाला असता तर तुम्हालाही खात्री पटली असती की मी फोटोमधे या रांगोळीतल्या नटीपेक्षा ही सुंदर दिसत होते😉😆. असो.... तूर्तास रांगोळी वरच समाधान मानावे.
इतर लिखाण माझ्या " आशयघन रांगोळी" या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com

झोपेतल्या गोष्टी


#झोपेतल्यागोष्टी
#गमतीजमती

      बाळराजेंना झोपतांना गोष्ट सांगावीच लागते तेव्हा पप्पा फार फार कल्पक होतो . रोज काय नविन सांगायचे? या प्रश्नाचं उत्तर म्हणून गोष्टीत तो मनाला वाटेल तसे फ्युजन करतो . कानावर पडलेली गोष्ट ऐकत मी बापडी झोपेच्या विश्वात अर्धवट रममाण झालेली असते . कानी संवाद पडतो तो असा.....
बाळराजे : पप्पा पुढे काय होत?
पप्पा: ( आलेला पेंग बाजूला ठेवून गड लढवण सुरू आहे...  )  ....   स्वतःला वाचवण्यासाठी तो घोडा जीवाच्या आकांताने धावत सुटतो आणि .....     अचानक.................. अ...  चा...   न...  क...( झोप लागली बहुतेक  ..... असा विचार मी झोपेत करतेय )
बाळराजे : अचानक काय??
पप्पा :  अचानक काय ?? हम्म्म
कुठे होतो रे मी ?
बाळराजे : घोडा धावत सुटतो....
पप्पा : हा ..... तर तो धावत असतो धावत असतो आणि अचानक बिळात शिरतो .
(मी झोपेत  आणि बाळराजे जागेपणी एकादमात )
आम्ही:  काय???? बिळात🤔 शिरतो .... पप्पा आज घोड्याची गोष्ट आहे ना .?
पप्पा: हो का? घोडा होता का तो ?
शेवटी मी जागी  झालेच  ... बाळराजे वैतागले ...  पप्पाला झोपेतून  पूर्ण जागे करून सांगितलं.......
आम्ही: हो ....घोडा आहे आज गोष्टीत ..... बिळात कसा  जाईल तो??🙄🙄🙄🤔🤔🤔
पप्पा : अरे ..........तो घोडा नावाचा उंदीर आहे रे ... गेला बिळात आता  .... झोपा बरं तुम्हीही  ...
मी आणि बाळराजे : घोडा नावाचा उंदीर🙄😱😜😬😝🤪😆😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣
 (आमच्या हसण्याने निदान शेजारची चार घर तरी जागी झाली असतील )
दुसऱ्या दिवशी  बाळराजेंनी पप्पाला त्याचाच विनोद ऐकवला  .... पप्पा आज ," उंदीर नावाच्या घोड्याची गोष्ट सांगा ना ".
त्यानंतर  .... मुंगी नावाच्या हत्तीनीची ..... ससा नावाच्या वाघाची ..... जिराफ नावाच्या बकरीची.... अश्या अनेक कथांचा जन्म  झाला .
आज चला हवा येवू द्या मधे जेव्हा , " अरे मी  मास्याचे नाव ससा ठेवले आहे ". हा विनोद बाळराजेंनी ऐकला तेव्हा अगदी खुशीत म्हणाला  .... " पप्पा पप्पा.... हे... सेम ...टू... सेम...  तुमच्यासारखे विनोद करतात " 🤣🤣🤣
मी .... पप्पाला  मधेच झोप लागली  तर आज काय विनोद  होणार काय माहित या चिंतेत
पप्पा मात्र बाळराजे खुश आहेत आपल्या विनोद बुध्दीवर  म्हणून स्वत:च्या कल्पकतेला पणाला लावण्याचा तयारीत.
©️अंंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे

मन की बात

#मनकीबात
एखाद्या ' घटनेवर ' चिडाव.....
एखाद्या ' मुद्यावर ' भांडाव....
एखाद्या ' अवगुणावर ' टीका करावी.....
एखाद्या ' प्रसंगी ' आवाज ही वाढवावा....
एखाद्या ' विचारावर ' मतभेद ही असावा....
तरी माणसाने माणसाचा तिरस्कार करू नये कारण प्रत्येक माणूस हा कधी ना कधी ... एखाद्या घटनेमुळे... एखाद्या प्रसंगी... एखाद्या अवगुणामुळे... एखाद्या  मुद्यावर चुकलेला असतोच. दुसऱ्यांच्या ' मतांचा ' आदर केल्यास ' भेद' आपोआप नष्ट होतील.
©️अंजली मीनानाथ धस्के

वाण

#वाण
#१००शब्दांचीगोष्ट
           पगार झालेला नाही .  हातात फक्त १०० रुपये . त्यात वर्षाचा पहिला सण .... कसा मेळ बसवायचा याच विचारात राधा बसची वाट बघत उभी होती. तेवढ्यात  कानावर शब्द पडले , " मी जरा वेळ मंदिरा समोर बसतो , बघू औषधाचे पैसे जमले तर आज जावू दवाखान्यात". तिने मागे वळून पाहिले तर पायाच्या  जखमेला झाकण्यासाठी  भलेमोठे कापड गुंडाळलेली भिकारीण वेदनेने विव्हळत बसली होती .   तिला दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची नीतांत गरज होती . तिचा नवरा भिक मागून पैसे जमा करण्याची तयारी करत होता. तेवढ्यात बस आली. राधेचा हात आपसूक पर्समधे गेला.  १०० ची नोट त्या भिकरणीला दिली . तिने मनापासून आशिर्वाद दिला. बसमधे चढल्यावर राधा स्वतःशीच प्रसन्न  हसली . संक्रांतीचा सण वाण देवुन दणक्यात साजरा झाला होता.

Momspresso Marathi वर "वाण" या शब्दाला अनुसरून १०० शब्दांची गोष्ट लिहायची होती . 
या स्पर्धेत विजेती कथा म्हणून प्रकाशित झालेली माझी ही कथा " वाण" 


मकरसंक्रांत (२०१९)


" तिळ गुळ घ्या गोड गोड बोला" 
       मकसंक्रांत म्हंटल की...  तिळगुळ, हळदीकुंकू, वाण यांची आठवण होते. तसेच पतंग उडवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे सगळेच जण रांगोळीत पतंग रेखाटण्याचा प्रयत्न करतात. मला ही पतंग काढायला खूप आवडतं. परंतु या वेळेस मनात थोडा वेगळा  विचार  आला ...उन्हाळ्याची चाहूल घेवुन येणारा हा सण त्यामुळे पक्ष्यांसाठी बाल्कनीत पाण्याचे छोटे भांडे भरून ठेवायला हवे  याची आठवण झाली... पतंग उडवून झाल्यावर झाडावर राहिलेल्या मांज्यात अनेक छोटे पक्षी अडकतात त्यांना इजा होते हे टाळायला हवे.... चिमण्यांची संख्या कमी झाली आहे ती टिकवण्यासाठी थोडे प्रयत्न करायला हवेत....
आजही ज्यांच्या चिवचिवाटाने दिवसाची प्रसन्न सुरुवात होते त्या चिमण्यांसाठी हि रांगोळी ....
देता दाना , मिळता पाणी
भूक भागते चिमण्या जीवांची
गाती  चिव चिव गाणी
सजुदे मैफिल याच सुरांची
किलबिल पडू दे कानो कानी....
©️ अंजली मीनानाथ धस्के





वेक अप

#वेकअप
#१००शब्दांचीगोष्ट
महिन्याभरापूर्वी छोट्याशा आजाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या टेस्ट केल्या गेल्या. दुर्दैवाने  डॉक्टरांची शंका खरी ठरली.  कुटुंबावर आभाळच कोसळलं होतं. थर्ड स्टेजवर ' कॅन्सर '  ऐकून नवरा हादरून गेला... ती पार कोलमडली. भेटायला येणारे सांत्वन करत .... दिलासा देत ....  पण तिचं कश्यातच लक्ष नव्हतं.  'आपल्या माघारी लेकरांच काय होणार ' या काळजीने तिला झोप आली नाही.  आयुष्यात अनेक संकटे आली पण तिने धीर सोडला नव्हता. शुन्यातून विश्व निर्माण केलं होतं . चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला..  आरशात पाहिलं ...... समोर ती.. मागे मुलं बिनघोर झोपलेली . तेवढ्यात गजर झाला ... क्षणात निर्धार करत स्वतःशीच पुटपुटली, " रडणं पुरे .... घर सावरायला हवं ... योग्य ट्रीटमेंट घेवून बरं व्हायला हवं... खूप कामं पडली आहेत " वेक अप सोनाली वेक अप " .
©️ अंजली मीनानाथ धस्के
(Momspresso Marathi ने थिम अलार्म क्लॉक चे चित्र आणि वेक अप शब्द दिला होता कथा लिहिण्यासाठी.)