देवी शॉर्ट फिल्म समीक्षा

#देवी
#शॉर्टफिल्म



      देवी या शॉर्ट फिल्मचा फर्स्ट लूक जेव्हा पहिला तेव्हा त्या फिल्मच्या पोस्टरमधे अनेक नामवंत नायिका पहिल्या आणि या शॉर्ट फिल्म बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
          सुरवातीला पाच मिनिटे नक्की काय सुरू आहे याचा अंदाज घेण्यात जातात.
         नंतर हळू हळू या शॉर्ट फिल्मचा विषय लक्षात येतो आणि फिल्म पूर्ण बघून झाल्यावर  आपलं डोक सुन्न होत. मनात राग , चीड,  हतबलता, अगतिकता या सगळ्या भावना प्रचंड गोंधळ घालू लागतात. अनेक प्रश्न जे आजही अनुत्तरित आहेत त्याची मनाला नव्याने बोचणी लागते हेच या शॉर्ट फिल्म च यश असावं.
           एक छोटीशी खोली. त्यात  विविध वयोगट, विविध भाषा,  विविध क्षेत्रातील आणि शारीरिक व्यंग असलेल्या स्त्रिया एकत्र बसलेल्या आसतात.
 टी. व्ही. वर सुरू असलेली  बातमी ऐकुन त्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता त्या आपल्याच विश्वात रमलेल्या असतात.
 टीव्ही वर येणारी बातमी थांबते सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची एक लकेर येते आणि तेवढ्यात दारावरची बेल पहिल्यांदा वाजते.  बाहेर असलेल्या स्त्रीला खोलीत घ्यावे की नाही यावर चर्चा सुरू होते.
खोलीतली जागा कमी असल्याने काहींनी बाहेर जावे आणि नव्या स्त्रियांना आत घ्यावे असाही एक पर्याय पुढे येतो.
      आतल्या स्त्रियांना बाहेर जायचे नसते त्यामुळे कोणी बाहेर जावे यासाठी ज्या स्त्रियांवर घरातल्याच व्यक्तीने बळजबरी केली त्यांनी बाहेर जावं असं ठरत .
दुसऱ्यांदा बेल वाजते .
   कोणीच बाहेर जाणार नाही. हे समजल्यावर जिच्या बाबतीत बळजबरी करणारा २५ वर्ष वयाच्या आतला होता तिने थांबावे . बाकीच्यांनी बाहेर जावे असा दुसरा पर्याय समोर येतो .
      कोणा वर एकाने तर कोणावर अनेकांनी बळजबरी केलेली असते त्यांच्या वयाची बेरीज केली तर जिने सगळ्यांना ही सुरक्षित खोली दिली तिच्यावरच बाहेर जाण्याची वेळ येते .
        तिसऱ्यांदा बेल वाजते.
आता बळजबरी केल्यानंतर  प्रत्येकीला कसं संपावण्यात आल त्यावरून बाहेर कोणी जावं हे ठरवावं असं सुचवलं जातं .
      इथेच आपल्या विचारांना धक्का बसतो. आता पर्यंत ज्यांना आपण सामान्य पीडित महिला समजतोय त्या वास्तविक जिवंतच नाहीत. ती खोली म्हणजे  स्वर्ग किंवा नरक नसून त्या पिडीत स्त्रियांना सुरक्षित वाटावी अशी एक छोटेखानी जागा आहे.  मुख्य म्हणजे जिने या सगळ्या पिडीत स्त्रियांना एकत्र आणलं तिला आपण त्यांचं रक्षण करणारी  *देवी* म्हणावं तर *तीही पिडीतच* आहे. हे मनाला चटका  देवून जातं.

       प्रत्येक जण स्वत:च्या मृत्यूची कहाणी एका शब्दात सांगत. प्रत्येकीची कारण आपल्या परिचयाचं .... नवीन असं काहीच नाही तरी आत खोल कुठेतरी  विचार करायला लावणारं .
          दाराबाहेर असणाऱ्या स्त्रीला आत घेण्याचं सर्वानुमते ठरत . दार उघडून रक्षण करणारी देवी जिला आत घेते तिला बघितल्यावर आतल्या प्रत्येक स्त्रिच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख ,  वेदना आणि समाज व्यवस्थेतील विकृतीबद्दल पडलेले अनेक प्रश्न, आक्रोश सगळं काही डोळ्यात स्पष्ट दिसतं.
 काही तरी चुकलय याची शंका आपल्या मनालाही स्पर्श करून जाते.
आत आलेली सज्ञान स्त्री नसून  आपल्या फ्रॉकशी खेळणारी पाच सहा वर्षाची चिमुकली हे आपल्याला दिसल्यावर वेदनेची एक कळ मेंदूत पोहचते.
 जेव्हा ती चिमुरडी खोलीतल्या सगळ्यात प्रौढ स्त्रीच्या आजी या नात्याने गळ्यात पडते तेव्हा पुन्हा एकदा नवीन बातमी घेवून  टी. व्हि. सुरू होतो.
     यावेळी मात्र त्या सगळ्या पिडीत स्त्रियांच्या चेहऱ्यावरची वेदना आपल्या काळजाचाही ठाव घेते.
     स्त्रीच वय , जात किंवा शारीरिक क्षमता काहीही असो वासनांध  पुरुषाला तिच्यात फक्त एक मादी दिसते . हा गंभीर प्रश्न नेहमीचाच पण तितक्याच दमदार आणि वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. एक जळजळीत सत्य .... जे बघायला , ऐकायला कठीण पण त्यावर काम होण्याची नितांत गरज आहे.
     प्रत्येकीच्या वाट्याला कमी संवाद आले असले तरी काजोल , मुक्ता बर्वे भाव खावून जातात. इतरांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या संवादांना योग्य न्याय दिला आहे. लेखन उत्तम आहेच पण सादरीकरणही तेवढेच दमदार आहे.
कलाकारांच्या नावापेक्षा कथेचा आशयच  कथेचा प्राण आहे याची जाणीव प्रकर्षाने होते.
      मनोरंजनासाठी आपण अनेक सिनेमे बघतो पण कमी शब्दात आणि वेळेत प्रभावीपणे  वेगळी, ओघवती मांडणी असलेली  ही शॉर्ट फिल्म एकदातरी आवर्जून बघावी अशीच आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( लिखाण आवडल्यास नावा सहित शेयर करावे)

No comments:

Post a Comment