जागतिक चिमणी दिवस २०२०


   
#जागतिक_चिमणी_दिवस
#२०मार्च२०२०
#चिवचिव
  चिमण्या ... त्यांची चिव चिव.... मला भारी आवडते. सकाळी त्यांची किलबिल कानी पडली की प्रसन्न वाटतं. त्यांच्या हालचाली बघत बसणे हा तर माझा आवडता छंद. सध्या घरी कोणी येत नाही की आपण कोणाकडे जात नाही. नियम म्हणजे नियम ... कडक पाळायचा.
   हे छोटे मित्र मंडळी मात्र नियमित  येतात. चिमणे जीव येवुन चिव चिव करतात . जणू सांगून जातात," संकट कोणत्याही स्वरूपाचं असू दे तुझा दृढ संकल्प महत्त्वाचा. तशी तू  स्वखुशीने घरी असतेच पण आता काही दिवस सक्तीने घरात राहून बघ. घरातल्या कणा कणाशी तुझं नातं जसं जोडल्या गेलंय तसेच इतर सदस्यांचे नातेही घराशी नव्याने जोडायला मदत कर. मुलासोबत मुल होवून खेळ. मुलाला सोबत घेऊन कामं कर . काम हळू होईल पण दिवस मजेत जाईल . मुलाला अनेक घर कामं शिकव. त्याला सध्या मैदानी खेळ खेळता येत नाही  म्हणून काय झालं बैठे खेळ खेळण्याची मजा काही औरच असते हे पटवून दे. सगळे दिवस सारखे नसतात. अहोंना वर्क फ्रॉम होम आहे तेव्हा फॅमिली टाईम एन्जॉय कर. काही नवीन पदार्थ बनवायला त्या दोघांची मदत घे.
वेळ उरणार नाहीच पण उरला तर मस्त पाय पसरून टीव्हीवरचे कार्यक्रम बघ. वाटलं तर वाम कुक्षी घे.
   तू खंबीर तर घर हसरं हे पक्क लक्षात ठेव तेव्हा चूटर पूटर  खाऊ खात ....  गप्पा गोष्टी.... थोडीशी मस्ती .... यात ' ही' वेळही  मस्त निघून जाईल. आम्ही तर आहोतच कायम सोबतीला ..... "
मातीच्या भांड्यातलं थंड पाणी पिवून  तहान भागवत खिडकीच्या दांड्यावर विसवलेले ते जीव दिलासा देवून जातात. जगण्याची .... लढण्याची नवी उमेद देवून जातात.
        आज त्यांचा खास .... जागतिक चिमणी दिवस.
त्यांची संख्या कमी होत आहे. त्यांना जपलं पाहिजे. निसर्गाचा समतोल राखलाच पाहिजे . वेळ आली आहे डोळे उघडून परिस्थितीच  निरीक्षण करण्याची. निसर्ग अनमोल.... त्यातील प्रत्येक जीव बहुमोल. वेळीच निसर्गाची हानी थांबायला हवी. आता पर्यंत त्याने भरपूर दिलंय... देत आहे. आता आपली वेळ आहे परतफेड करण्याची.
           जमेल तेवढी झाडं लावण्याची. नद्यांना स्वच्छ करण्याची. या चिमण्या जीवाला जपण्याची .
            उन्हाळा सुरू झाला की परसदारी चिमण्यांसाठी पाणी ठेवून बघा मिळणारा आनंद .. येणारा अनुभव ... मनाला प्रसन्न करून जाईल.
रोज त्यांना पाहून पाहून त्यांची रांगोळी काढण्याचा मोह मला झाला होता तेव्हा काढलेली ही रांगोळी . जुनी असली तरी मला अत्यंत प्रिय आहे. गुबगुबीत चिमणराव आणि स्लिम ट्रिम चिमणाबाई....
      आजच्या दिवशी या चिमण्या जीवांचे आभार तर मानलेच पाहिजे .....
ते आहेत म्हणून माझी सकाळ किलबिलते
त्यांच्या चिवचिवाटाने घर प्रसन्न हसते.
©️ अंजली मीनानाथ धस्के
(पोस्ट शेयर करताना नावासहित करावी. )


No comments:

Post a Comment