निसर्गाय_नमः

#निसर्गाय_नमः
   बऱ्याच दिवसांनी निवांत खिडकीत बसून वाफळलेला चहा घेतांना ...... दूरवरच्या डोंगर रांगावर नजर आपोआप खिळली.
नदीची खळखळ कधी नव्हे ती कानी पडत होती. आसमंतात फक्त पक्षांच्या किलबिलाटाचा आवाज भरून राहिला होता.
            एरवी सतत धावणारं जग आज अचानक थांबल्यासारखं वाटतं होतं.
           
             रस्त्यावरही इतरांशी कळत नकळत स्पर्धा करणारे. निसर्ग निर्मित आवाजाकडे दुर्लक्ष करून धावणारे.  मानव निर्मित आवजांचे प्रदूषण करणारे .....
आज सगळे निःशब्द होते. बोलत होता तो फक्त निसर्ग.
आज घरात राहून कोंडल्याची भावना सगळ्यांच्या मनात निर्माण होते आहे. बाहेर निसर्ग मात्र मोकळा श्वास घेत होता.
  निसर्ग भरभरून देतो . आपलं समाधान होत नाही. आज रस्त्यावर प्राणी बिनधास्त फिरू शकत आहे .  तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या माणसाचा मात्र पराभव होत आहे. डोंगरांना , नद्यांना ..... वृक्षांना..... कोणत्याच व्हायरसची भीती नाही.
           महात्मा गांधी म्हंटले होते , खेड्याकडे चला......  त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या गेलं.  शहरीकरणाने आपल्याला वेड लावलं. पैसा , घर .. गाडी घेण्याच्या नादात गावं मागे पडली. आज मात्र गावी जाण्यासाठी लोकं धडपडतांना दिसत आहे.
       घरात कोंडून घेणाऱ्याला वाटतं ," गावाकडे माझंही एखादं घर असतं, एखादं शेत असतं तर मीही गावी गेलो असतो. शेतातल्या घरात राबून मजेत दिवस काढला असता.
          दारात भाजी, कोठारात धान्य, गोठ्यात गायी असल्यावर  ..... कशाला केली असती चिंता. "
           एक लक्षात घ्यायला हवं आज  कुठेही गेलो तरी आपण सुरक्षित नाही. उलट जिथे आहे तिथेच थांबून विचार करायला हवा. तंत्रज्ञान विकसित करतांना 'निसर्गाची हानी होणार नाही' हा विचार अग्रस्थानी हवा. निसर्ग सर्व श्रेष्ठ आहे ..... त्याच्याशी खेळ महागात पडू शकतो. याची प्रचिती आली आहे.
   सध्या स्वतः शी संवाद साधण्यासाठी निवांत वेळ मिळतोय . माणूस म्हणून कुठे तरी आपल्या हातून नकळत काही चुका झाल्या आहेत. बुद्धीमत्तेच्या जोरावर निसर्गाला हरवायला निघालेला मनुष्य .... आता निसर्गापुढे स्वतः हतबल झालाय.
            आपण निसर्गाला जपण्यात.... त्याचा आदर करण्यात कमी पडलो आहे हे मान्य करायला हवं. आताही दुर्लक्ष केले तर निसर्ग रस्त्यावर येईल. मानव प्राणी मात्र कायमचा मातीत मिसळून जाईल.....
©️ अंजली मीनानाथ धस्के
( पोस्ट  शेअर करताना नावा सहित करावी. )

No comments:

Post a Comment