जेली_चॉकलेट्स

#जेली_चॉकलेट्स

 

                सुषमाची धाकटी मुलगी स्नेहाचा साखरपुडा होता.  सुषमा कंबर कसून काम करत होती . सगळे विधी नीट पार पडले .  आलेले व्याही  निरोप घेऊन जायला निघाले. तेव्हा धाकट्या जावयाने वाकून नमस्कार केला, " मम्मी .... येतो  " म्हणाला.   इतरांना त्यात आश्चर्य वाटाव असं काहीच नव्हतं पण सुषमा मात्र थोडी बावरलीच. मोठे जावई नवीन पद्धतीला धरून आदराने  " आई "  म्हणायचे . त्याची सवय होती पण नवीन जावयाने स्नेहाप्रमाणेच आपल्याला ' मम्मी ' म्हणावं याचं तिला थोड आश्चर्य वाटलं  होतच.

         तिचा बावरलेला चेहरा बघून ध्रुव बोलूनच गेला ," स्नेहा  तुम्हाला  मम्मी पप्पा असंच म्हणते.  ते ऐकुन  मी ही मम्मी आणि पप्पा म्हंटले तर ..... चालेल ना तुम्हा दोघांना ... ? "

          त्याच्या या वाक्यावर सासरे म्हणाले , " मला पप्पा म्हंटलेलं नुसतं चालणार नाही तर धावणार आहे ". हे ऐकुन सगळेच दिलखुलास  हसले .

             स्नेहाचे लग्न थाटामाटात पार पडले. सगळ्यांनी जावयाच्या मोकळ्या स्वभावाचे कौतुक केले. पहिल्या दिवाळ सणाला स्नेहा आणि ध्रुव दोघेही आले होते . गप्पा गोष्टी झाल्यावर  सुषमा मागच्या अंगणात शेवग्याच्या शेंगा तोडायला म्हणून गेली. तर स्नेहा ही तिच्या मागे गेली .  खालच्या शेंगा  संपल्या होत्या .   वरच्या शेंगां काही केल्या  दोघींना तोडता येत नव्हत्या . त्यांनी अजयला आवाज दिला . तो स्टूल आणण्यासाठी म्हणून आत आला. तेवढ्यात समोरच्या अंगणात फिरत असलेला ध्रुव आवाज ऐकुन तिथे आला. त्याने लगेच स्नेहाच्या हातातली काठी घेवून शेंगा तोडायची तयारी केली आणि  विचारू लागला , " कोणती शेंग हवी ती सांगा ... देतो काढून".
        सुषमाला तर काय बोलावे कळेच ना. अजयलाही त्याच्या मेहुण्याने असं काम करणं पटेना. अजय त्याच्या हातातली काठी घेत  " नको नको ... तुम्ही कशाला त्रास घेता .... दोघेही मस्त  बाहेर फिरून या . मी तोडतो या शेंगा " अशी विनवणी करू लागला.

   त्यावर ध्रुव थोडी हट्टी भूमिका घेत  म्हणाला ," तूच सगळी मजा करतोय . मला कधी तरी अशा अंगणातल्या शेंगा तोडण्यातली गंमत अनुभवू दे की. ते काही नाही .. मीच शेंगा तोडणार ".
                बऱ्याच शेंगा तोडल्यावर स्नेहाला जाणवलं की, त्याने गरजेपेक्षा जास्तच शेंगा तोडल्या आहेत . त्यावरून दोघं वाद घालू लागले. तशी सुषमा मधे पडतं  बोलली " आवडतं आहे  त्यांना तर तोडू दे ग... कॉलोनीतल्या सगळ्यांना चार दोन दिल्या की आता संपून जातील सगळ्या शेंगा". त्यावर तोही मिश्किलपणे म्हणाला ," जावयाने  तोडलेल्या शेंगा आहेत  या.. भाजी चविष्ट होणारच  म्हणून  सांगा .... "
          स्नेहाही लटक्या रागात म्हणाली , " हो ना ... जावई आले म्हणून त्या आनंदात आम्ही शेंगा वाटप करतोय असं हि सांगू शकतेस". तिच्या या कल्पनेवर  सगळेच मनमोकळे हसले .
         जावयाने यावं ..... जावयाचा मान घ्यावा .. हुकुम सोडावे . आपण त्यांच्या आवडीच करावं . हेच सुषमा ऐकुन , अनुभवून होती .
           ध्रुवचं असं मोकळ वागणं बघुन सुषमाला मोठ्या मुलीचा पहिला दिवाळ सण आठवला .
          किती विनवण्या केल्या तेव्हा कुठे व्याही पोरीला आणि जावयाला पाठवायला तयार झाले . घरची शिकवण म्हणून की काय  आल्यावरही जावयाने मानपान याच गोष्टींना महत्त्व दिले. त्यांच्यासाठी ड्रेसचं घेतलेले कापडही  पसंत नाही म्हणून परत केलं. दुकानात जाऊन स्वतःच्या पसंतीने महागातला सूट घेतला. परततांना लेकी सोबत शिदोरी म्हणून भरपूर फराळ दिला . व्याही आहेर ही दिला होता .  येवढं सगळं करून नंतर व्याह्यांनी खरमरीत पत्र पाठवून दिवाळ सणामधे राहिलेल्या चुका सांगितल्याच  .
         मोठ्या लेकीला  माहेरी येण्याची परवानगी सहजा सहजी कधीच मिळत नाही .   काही कारणानिमित्त ती माहेरी  आलीच तर  तिला कधीच  एकटीला पाठवत नाहीत . जावई सोबतच असतात कायम . मोकळं बोलता येत नाही की लेकीचे लाड पुरवता येत नाहीत. सगळा वेळ जावयाची फर्माइश पूर्ण करण्यात जातो. जावई ही जावयाचा दरारा ठेवूनच वागतो . वरून तोंड भरुन " आई " म्हणतो . या आईच्या वेदना त्याला कधी दिसत नाहीत की समजत नाहीत . त्याच्याच तोऱ्यात असतो मग काय उपयोग त्या ' आई ' म्हणण्याचा .
           तिचे विचार सुरू होतेच. तेवढ्यात तिच्या कानावर लहान जावयाचे शब्द पडले ," अग स्नेहा ... एक कल्पना सुचली आहे . मीही जावू का मम्मींसोबत  या शेंगा वाटायला . तेवढीच मजा . लहानपणी कायम मीच जायचो आईसोबत असं घरचं माळव द्यायला ".
          स्नेहा पट्कन बोलून गेली ,"नको ... नको .... तू जाशीलही पण मम्मी अवघडेल तुझ्यासोबत , तिला सवय नाही जावयाच्या मोकळ्या स्वभावाची ".
         सुषमाने विचार केला ,' खोटं काय आहे यात '. आपल्याला  जावयाच्या दराऱ्याचीच सवय  आहे .

        मुळात जावयाचं कौतुक करावं , त्यांच्या आवडी निवडी जपाव्या याची किती हौस होती आपल्याला.  ह्या हौसे पोटी आपण मोठ्या जावयासाठी किती करतो पण  कौतुकाचे दोन शब्द कधी वाट्याला आले नाहीत.

दिवाळ सण आनंदाने साजरा झाला. स्नेहा आणि ध्रुव आले तसे गेलेही .  ध्रुवची जावई म्हणून कसलीच अपेक्षा नव्हती.
ध्रुव कधीही आला की घरातलाच एक होवून जाई. स्वतःच्या हाताने पाणी घेई . घरातली मंडळी जे काम करत असेल त्यात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करी. बाहेर गावी गेला तर तिथून प्रत्येकासाठी त्यांच्या आवडीचे काही ना काही घेवून येई.
            हळूहळू  ध्रुवचं मम्मी म्हणणं सुष्माच्या अंगवळणी पडू लागलं होतं तरी मनात मात्र  जावईयाचच नात होतं. त्यामुळे ध्रुवशी बोलतांना ती  अंतर  राखूनच  बोले.
            मोठ्या जावयाला अजूनही सासऱ्यानेच फोन करावा, चौकशी करावी , वेळ प्रसंगी शुभेच्या द्याव्यात ही अपेक्षा . सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने रुसवे फुगवे अजूनही सुरूच . इतकी वर्षे झाली होती मोठीच्या लग्नाला पण मोठा जावई.... जावईच बनून राहिला होता.
     आता   सुषमा आणि ध्रुवच्या "  सासू जावई " या नात्यालाही  बरीच वर्षे झाली होती .   सुषमाच्या बोलण्यातला अवघडलेपणा थोडा कमी झाला. पण तिच्या मनात " जावई " या शब्दाचा दरारा होता तसाच राहिला.
      यंदाही दिवाळी आली म्हणून  सुषमाने  फराळाचे पदार्थ करायला घेतांना मोठ्या जावयाला आवडतात म्हणून खास अनारसे केले तर  ध्रुवसाठीही  मुद्दाम बेसन लाडू  केले .
        इकडे  स्नेहाही लक्ष्मी पूजन झाल्यावर माहेरी जायचे आहे म्हणून फराळाची पाकीटं भरत होती.
         ध्रुव ऑफिसच्या कामानिमित्त लोणावळ्याला गेला होता. येतांना  त्याने जेली चॉकलेट्सचे मोठे पाकीट खास  मम्मीला देण्यासाठी आणले होते . सामान भरतांना त्याने स्नेहाला त्यांची आठवण करून दिली. तेव्हा स्नेहाने न राहवून विचारलेच," तिला चॉकलेट्स आवडत नाहीत रे .... ही जेली चॉकलेट्स नक्की मम्मीलाच द्यायची आहेत का ?? ".
            त्यावर ध्रुव ठामपणे म्हणाला ," हो मम्मींसाठीच आहेत ती .  मला आठवतं मागच्या वेळेस त्या आल्या होत्या तेव्हा आपल्या शार्दुलने दिलेली जेली चॉकलेट्स त्यांनी आवडीने खाल्ली होती ".
            स्नेहाला  वाटले , कसं शक्य आहे हे ? मम्मी चॉकलेट्स खातच नाही  पण ती गप्प बसली . सोबत घ्यायचे सगळे समान नीट पिशवीत भरून ठेवले.
           ठरल्या दिवशी स्नेहा , ध्रुव आणि छोटा शार्दुल स्नेहाच्या माहेरी  आले . फराळाच्या पदार्थांची चव चाखतांना ध्रुवने ," मम्मी बेसन लाडू .... एक नंबर झालेत " असं म्हणून तिच्या कष्टाचे चीज केले.  तरी सुषमाची कळी काही खुलली नाही.
    "आवडले ना मग अजून घ्या एक " असं म्हणतांना स्नेहाला सुषमाचा स्वर दुःखी जाणवला . स्नेहाने चौकशी केल्यावर समजले की  " दिवाळीनंतर  सुट्टी मिळणार नाही म्हणून याही वर्षी मोठ्या जावयाने लेकीला माहेरी पाठवण्याचे टाळले तर होतेच पण दिवाळीचे पदार्थ , भेटवस्तू तुम्हीच येवुन देवून जा असंही सूचवल " याचं दुःख  सुषमाच्या मनात घर करून होत.

             मायलेकिंच्या गप्पा सुरू होत्या तेवढ्यात ध्रुव तिथे आला आणि जेली चॉकलेट्सच पाकीट सुषमाच्या हातात ठेवलं ," मम्मी हे खास तुमच्यासाठी " असं सांगून तो बाहेर निघूनही गेला .
                 तेव्हा न राहवून स्नेहाने विचारलेच," मम्मी तुला जेली चॉकलेटस्  खरंच आवडतात का ग ? त्यावर सुषमाकडून ,"हो ग .. जेली चॉकलेटमधे वेगवेगळ्या फळांच्या चवी असतात म्हणून मला चॉकलेट्स प्रकारामधे तेवढेच फक्त आवडतात. तुम्हीच आणलेत न हे .... मग आवडतात का?म्हणून मलाच काय विचारते आहेस? " असं उत्तर मिळाल्यावर तर स्नेहा उडालीच . स्नेहाने शेवटी कबुल करून टाकलचं  ," मला कसं माहित नाही ग? तुला जेली चॉकलेट आवतात ते.  हे चॉकलेट्स ध्रुवने  लोणावळ्यावरुन येतांना खास तुझ्यासाठी आणलेत आहेत . मी नकोच म्हणत होते पण त्याला खात्री होती की तुला जेली चॉकलेट्स आवडतातच म्हणून आणले सोबत".
 हे ऐकुन सुषमाचे मन भरून आले. मुलींनाच आईची माया असते. त्यांनाच आईचं मन कळतं. हे ऐकुन , अनुभवून माहीत असणाऱ्या तिला जावईही आपल्या आवडी निवडी आठवणीने जपतो हे पाहून ती समाधानाने भरून पावली.  ध्रुवाच्या  या  छोट्याश्या कृतीने तिच्या मनातली जावई या शब्दाची भीती जावून ती जागा लेकाप्रती असणाऱ्या प्रेमाने घेतली .

     या रंगीबेरंगी, वेगवेगळ्या चवीच्या जेली चॉकलेट्सने जणू तिच्या मनात दिवाळीच्या दिव्यांप्रमाणेच  त्या दोघांमधील नव्या नात्याच्या अनोख्या रंगाचा, अवीट गोडीचा लखलखाट पसरवला. तिच्या डोळ्यातल्या दुःखाची जागा आता आनंदाश्रुने घेतली. 

©️ अंजली मीनानाथ धस्के       
(सोबत मी काढलेली रांगोळी ही आहे )

No comments:

Post a Comment