अबोली

   #अबोली
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के

                         पूजेला फुले हवीत म्हणून अश्विनी रोज शेजारच्या वाड्यात जात असे. शेजारी राहणारे आजी आजोबा तिला आपली नातच मानत होते. त्यामुळे  ते तिला हक्काने बोलावून घेत व टोपलीभर फुले देत. आजी दहा दिवसांसाठी माहेरी म्हणजे त्यांच्या भावाकडे गेल्या होत्या. आजोबा एकटेच होते घरी म्हणून मग दोन्ही घरच्या पूजेसाठी फुले वेचायचे आणि फोटोसाठी हार करायचे काम  तिलाच मिळाले होते. ती रोजच्यासारखीच फुले वेचत होती.  अबोलीची थोडी फुले घ्यावीत म्हणून तिने हात पुढे केला तेवढ्यात आजोबा मागून आले व म्हणाले , " अबोलीची फुल तेवढी तोडू नकोस, तुझी रागवेल आपल्यावर ". त्यावर ती आश्चर्याने म्हणाली, " का नको? मी रोजच तर ही फुले घेत असते. आजींना फार आवडतात". त्यावर ते म्हणाले, " तेच तर, तिला फार आवडतात अबोलीची फुले. ती रोज त्याचा छोटा गजरा बनवून माळते केसात. तिची फुले आपण पूजेला घेतली तर तिला गजरा बनवता येत नाही मग ती दिवसभर कुरकुर करत असते." असे बोलून त्यांनी आजीची नक्कल करत " एवढी फुल असतांना ...... काय गरज असते अबोलीची फुले तोडायची कुणास ठाऊक. मला मेलीला एक तर आवड आहे अबोलीचा गजरा माळायची पण हे........ मुद्दाम विसरतात आणि पूजेला घेतात सगळी फुले". त्यांनी हुबेहूब आजीची नक्कल केली होती. 
त्यावर ती दोघही खळाळून हसली. 
         आजोबांना चिडवत अश्विनीही  बोलून गेली ,"आजोबा तुम्ही फारच धाकात आहात हं... आजींच्या. त्या घरी नाहीत तरी तुम्ही फुल तोडत नाही आहात. " असे ती म्हणाली तसे आजोबा मिश्किल पणे म्हणाले " तिच्या डाय केलेल्या केसात सुंदर दिसतो गजरा  पण मी मुद्दाम घेतो चार दोन फुले पूजेला. ती लाडीक चिडते, बडबड करते, घर कसं भरल्यासारखं वाटतं. आता ती घरी नाही तर फुले तोडून आणि ती पूजेला घेवून तरी काय फायदा".
           आजी परत आल्यावर त्यांना झाडावर सुकलेली फुले दिसली तेव्हा अश्विनीने त्यांना," आजोबांनी एकही फुल तोडू दिले नाही" अशी कौतुकास्पद तक्रार केली. त्यावर आजी लटक्या रागाने म्हणाल्या, "बघ कसे मुद्दाम त्रास देतात मला. मी नव्हते घरी तर फोन करुन म्हणतात कसे, "अबोलीचे एकही फुल तोडले नाही हं.... तू चिडतेस म्हणून सगळी फुले जपून ठेवली आहेत. आलीस की खात्री करून घेशील". आजींनीही आजोबांची हुबेहूब नक्कल केली असल्याने अश्विनीला कौतुक वाटले.  आजींचे बोलणे सुरूच होते ,"खरं तर त्यांनाच मी अबोलीची फुले केसात माळलेली आवडतात. ही फुले खूपच नाजूक म्हणून मग मी त्यांचा गजरा विणते.गजरा कसला ... सुटी फुले माळता येत नाही म्हणून दोऱ्यात गुंफून छोटा गुच्छ करते इतकंच.
अबोलीच झाड ते केवढं..... त्याला फुलं येतात ती किती ......
बरं मी केसात फुल मळावी हा आग्रह ही त्यांचाच ..... तरी मुद्दाम पूजेला हीच फुले घेतात "
       त्यावर अश्विनी म्हणाली,"  आजी ... तुम्ही चिडावे म्हणून ते मुद्दाम तसे करतात ".  आजी गालातल्या गालात गोड हसल्या व बोलल्या , " मलाही माहित आहे गं, ते गंमत करतात. पूर्वी सासू , सासरे, नणंद, माझ्या माहेरची माणसे, आमची मुले..... यावरून छोटे मोठे वाद व्हायचे. मग काय  धुसफूस, रागवणं, रूसून बसणं, समजूत काढणं, यात दिवस मजेत जायचे. आता एकही कारण नाही संवाद साधायला. जुन्या आठवणी काढत बसायला आम्हाला आवडत नाही तेव्हा अशी फुटकळ कारण काढून लुटूपुटूचे भांडण करतो. दिवस कसा मजेत जातो. उगाच का आजोबा रोज सकाळी अबोलीला आवर्जून पाणी घालतात. मला लागतील तेवढी फुले बाजूला काढून जास्तीची फुले तेवढी पूजेला घेतात. तरी मी दुर्लक्ष करून त्यांच्यावर चिडते, रागावते. मग त्यांनाही बहाणा मिळतो हसण्याचा आणि हळूच केसात फुले माळून माझा  राग घालवण्याचा.  नाव  ' अबोली ' आहे या फुल झाडाचे पण आमच्या संवादाचे .... सुखाचे कारण आहे बघ ".
          
            आज  दोघींच्या या संवादाला दोन वर्षे झालीत.
            आजही अश्विनी सकाळी  फुले वेचायला शेजारच्या वाड्यात जाते. आजही आजी न चुकता आबोलीचा गजरा विणतात. लाडीक तक्रारही करतात, " मुद्दाम मला मागे ठेवून गेलात न ... माझी फजिती बघायला. पण मीही खमकी आहे. सगळं एकटीने करते. अगदी तुम्ही अबोलीच्या झाडाला जसे झारीने हळुवार पाणी घायलायचे तसेच घालते हो... मीही.  बघा फुले कशी टवटवीत आहेेत. हारही किती सुंदर झालाय.  तुमच्या तसबिरीला कसा एकदम खुलून दिसतो".
         अश्विनीचे डोळे पाणावतात. " आजी ... तुम्ही चिडावं म्हणून ते मुद्दाम तसे करतात " असं आज मात्र तिला म्हणवत नाही. धूसर नजरेने ती सुईत दोरा ओवण्याचा निरर्थक प्रयत्न करत राहते.

©️ अंजली मीनानाथ धस्के

          ( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

No comments:

Post a Comment