चहा.... एक जादुई पेय

#चहा_एक_जादुई_पेय
                   आज आमच्या मावशींच काम संपत आलं  तसं मी चहा करायला घेतला..... त्या नको नको म्हणत असतांना.... " घ्या हो थोडा.... त्या निमित्ताने मीही घेईल थोडा, एकटीला नको वाटतं... सोबत असेल की बरं  वाटतं  " असं  मी म्हणता त्याही तयार झाल्या चहा घ्यायला. चहा घेताना अनेक विषयावर आमचे बोलणे झाले. त्या घरी जायला निघाल्या... तशा त्या थोड्या थांबल्या आणि म्हणाल्या, " ताई चहा एकदम मस्त झाला होता. माझा सगळा शीण गेला. आता अजून दहा घरची कामं शिल्लक असती तरी केली असती बघा  चटाचटा. "  मी काहीच विशेष केल नव्हतं  म्हणून थोडं  बुजल्या सारखे झाले तरी त्यांनी केलेल्या मनमोकळ्या  कौतुकाबद्दल  त्यांना धन्यवाद दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी कृतकृत्य झाले . नुसता चहाच तर केला होता..... पण केवढं समाधान दिले त्याने असा विचार डोक्यात आला आणि  लगेच  मन भूतकाळात गेलं......
              चहा...... का कुणास ठावूक लहानपणा पासूनच दूध आणि चहा यावर माझा सारखाच लोभ  होता. आमच्या आईला मात्र आम्ही दुध पिऊन सुदृढ बालक व्हावे असे वाटायचे. दुध आवडत असल्याने ते पिण्याचा कंटाळा कधीच नव्हता. पण आम्हाला दुध देवुन हे लोक ( आई बाबा )मस्त चहा घेतात, आल्या गेलेल्याला चहाचा आग्रह करतात .... याचा हेवा वाटायचा. मी शेंडेफळ म्हणून रोज लाडी गोडी लावून त्याच्या चहातला एक घोट तरी चहा मिळवायचेच. आई मात्र.... " चहा पिल्याने तू काळी पडशील " असा धाक दाखवायची. ( जन्मजात काळा रंग घेवुन आलेली मी अजून काय काळी होणार?....... असा प्रश्न मला पडायचा.😝निदान मी तरी बिनधास्त चहा घेवु शकते असा समजही त्यामुळे पक्का झाला.) आई घरी चहा देत नाही म्हंटल्यावर मी ही नामी युक्ती शोधून काढली. आई कुठेही जातांना नेहमी मला सोबत घेवुन जायची. तिच्या मैत्रिणी तिला चहा घेण्याचा आग्रह करायच्या आणि मला उगाच विचारायच म्हणून विचारायच्या " तू घेणार का ग चहा?" बस...... याचीच मी वाट पहायचे आणि उत्तर द्यायचे 😝 " घरी घेत नाही पण तुमच्याकडे घेईल थोडा ". स्पष्ट बोलण स्वभावात लहानपणा पासुनच आहे. ताकाला जावुन भांडे लपवायचे.... असं  जमलंच नाही कधी. (" ती चहा घेत नाही " असं  माझ्या आधी आई त्यांना सांगण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती 😜) माझ्या उत्तरावर आई डोळे मोठे करून बघायची, 'घरी चल बघतेच तुला ' अशी धमकी त्यात असायची. ( यापेक्षा जास्त  ती सध्या तरी काही करू शकत नाही याची खात्री असल्यामुळे )  मी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून समोर आलेला चहा पिवुन टाकायचे.
      दिवसेंदिवस चहावर असलेले  प्रेम वाढतच गेले.  ( दुधावर ही लोभ होताच ) तसतसे आईचे चहापासून  दूर ठेवण्याचे प्रयत्न ही वाढत गेले. एके दिवशी आमच्यात भांडण  सुरू झाले. " तुम्ही मस्त चहा घेता, मला का नाही देत? मीही आता मोठी झाले आहे. तू काळी पडत नाही चहा घेवुन मग मीच का काळी होणार?   झाले तर होवू दे काळी पण मला थोडा चहा हवाच." असे मी रागाने बडबडत होते. मला तिचे म्हणणे पटत नसले तरी तीही माघार घ्यायला तयार नव्हती. शेवटी माझे वडील आले भांडण सोडवायला. " दे तिला थोडा चहा, काही होत नाही तेवढ्याने, दुध घ्यायला तर ती नाही म्हणत नाही न? मग काय अडचण आहे?  "  असं त्यांनी सांगितल. आईला त्यांचे बोलणे रूचले की नाही.....माहीत नाही. पण मी आनंदून गेले. पप्पांना  आणि मला आईने चहा दिला. चहा पितांना युद्ध जिंकल्याचा भास होत होता तर एक  प्रश्न डोक्यात होताच. शेवटी न राहवुन  पप्पांना मी विचारलेच, " आई नाही म्हणत असतांना..... तुम्ही कसे काय तयार झालात?"   त्यावर ते...... " चहाही  घेता आला पाहिजे?"  मी निरागस पणे, "म्हणजे काय हो पप्पा ?". त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्यामुळे चहावर असलेले प्रेम तर वाढलेच पण ' चहा ' या पेया विषयीचा आदर ही वाढला. त्यांनी स्पष्टीकरण दिले...... " चहा हे संवाद साधण्याचे उत्तम साधन आहे. दोन परिचित व्यक्ती चहा पितांना मन मोकळं बोलतात तर दोन  अपरिचित व्यक्ती आपला परिचय वाढावा म्हणून चहा पितात. तुम्हाला देण्याइतकं दुध सगळ्यांकडे असेलच असं सांगता येत नाही, तेव्हा तुम्ही " मी फक्त दुधचं घेते " असं संगितल तर  त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते आणि मग  मनमोकळा संवाद घडत नाही. तळागाळातल्या लोकांशी संवाद साधायचा असेल, त्यांना आपलसं करून घ्यायचं असेल, त्यांच्यात मिसळून जायच असेल तर चहा घेता आलाच पाहिजे. चहाला नकार दिला तर कदाचित तुमच कौतुक होईलही पण गप्पांची मैफील रंगायला हवी असेल तर चहा घेता यायला हवा. "
                  वडीलांनी सांगितलं ते मनात खोलवर रूजलं. निरीक्षण करण्याची वाईट सवयही लहानपणा पासुनच आहे. त्यामुळे पप्पांच्या बोलण्यातला खरेपणा पडताळून बघण्याची एकही संधी मी सोडली नाही. आई घरी काम करणाऱ्यांना कामात जरा वेळ आराम मिळावा, काम करण्यात उत्साह वाटावा म्हणून सक्तीने चहाची छोटी सुट्टी द्यायची. चहा सोबत घरात असेल ते खायला द्यायची. मग या छोट्या सुट्टीतही सुख दु:खाच्या गोष्टी बोलल्या जायच्या. त्यांच्या अनेक समस्या..... या सुट्टीतच आईकडून सोडवल्या जायच्या. घरी येणारा प्रत्येक जण चहा घेवुनच जायचा. अनेकांची मन तिने चहा देवुन जिंकली होती.
                  एकदा मी आईवर रागावून घरा बाहेर पडले.  खरं  तर तिने मला घरा बाहेर राहण्याची शिक्षा केली होती. ( शिक्षा का केली? असे निरागस प्रश्न विचारायचे नाहीत  . वाईट अनुभव विसरलेले बरे असतात.)  बराच वेळ बाहेर थांबून आई घरात घेईल याची वाट मी बघितली. ती काही आली नाही. मग मलाही  कंटाळा आला होता आणि शेजारीच बांधकाम सुरू होते म्हणून मग मी माझा मोर्चा तिकडे वळवला. तिथे काम करत असलेले रखवालदार आजोबा मला ओळखत होते. त्यांच्या सावलीत टाकलेल्या बाजेवर मी निवांत बसले. तेव्हा त्यांनी विचारलं, " आज एकटीने ईकड कस येन केलं?"  त्यावर मी.... " आईन घरा बाहेर काढलय. आता मी कधीच जाणार नाही घरी. इथंच राहणार तुमच्या सोबत. तुम्ही सांगाल ते काम करत जाईन. तुम्ही नाही न हाकलुन देणार?" त्यावर ते.... " म्या कशापायी  हाकलू ? ... काम कशाला वो सांगू तूम्हास्नी....कधी नव्हे ते पाहुण आले घरला.... आधी त्यांचा पाहुणचार कराया पाहिजे. गरीबा घरचा चहा घेणार का जरासा?"  चहा..... ऐकुन माझी कळी खुलली.त्यांनी चुलीवर चहा ठेवला  आणि मला समजावत म्हणाले , " एवढा राग बरा न्हाय, आई हाय.... रागवली तर काय होत .... मायाबी करते की तेवढीच. आता चहा प्या आन शांत व्हा. झाल गेल गंगेला मिळाल , अस म्हणायच आन सार विसरायच बगा  " मी चहा पीत होते तेवढ्यात आई आली शोधत. "घरी चल.... तुला चहा आवडतो न म्हणून केलाय, सोबतच घेवुया."  माझ्यापुढे चहाच होता ते बघून आजोबांना आई म्हणाली, " तुम्ही कशाला केला, घरी यायच... मी सगळ्यासाठीच केला असता." त्यावर ते.... " तुम्ही रोजच देताय की चहा. आमच्या घरी कोण येत चहा घ्यायला, आज पाहुणे आल्याचा आनंद झाला, या पोरीपायी. मी घरी नेतो म्हटल  तर ही काय थांबत नव्हती. उगा कुठे गेली असती... मंग चहात रमवल मन तिचं, चहा घेवुन झाल्यावर आनतच होतो बगा  तुमच्याकडे "  आम्ही सगळे घरी गेलो आणि परत चहा घेतला. चहाने एक भांडण बेमालुम मिटवले होते .
                                     तिने  चहानी जोडलेली   नाती..... वर्षानुवर्ष टिकणारी, रक्ताच्या नात्यापेक्षाही मजबूत अशा नात्यांमधे बदलतांना मी पहिली. चहा न देणारी आई.... आता पावसात भिजून आल्यावर ' आल्याचा ' खास चहा देवु लागली. आजही ती आम्हा तिघा भावंडांपैकी कोणाकडेही  असली तरी, तिथेही ती या चहाची जादू करतेच . ती नसतांना " बरेच दिवस झाले, तुमच्या आई आल्या नाहीत " अशी तिची प्रेमळ चौकशी होते. ती आल्यावर " आल्या तशा रहा महिनाभर..... लेकीस्नी आन आमास्नी बी बरं वाटतय .... जायाची घाई नगा करू " अशी हक्काची दटावणीही होते .
            माझे वडील घरी आलेल्यांना  चहाचा आग्रह करतांना असंच म्हणायचे, " घ्या थोडा... तुमच्या निमित्ताने मलाही घेता येईल. "  त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकून मी ही तसाच आग्रह करायला शिकले. आईची चहाची जादू आता मलाही जमते आहे, ही जाणीव मनाला फार सुखावून गेली. त्यांच्या आठवणींमुळे  माझ्याही नकळत.....चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित आले. चहाने मलाही खूप छान मैत्रिणी दिल्या आहेत. खूप छान आठवणी दिल्या आहेत. आयुष्यातील अनेक नाती, क्षण या चहाने सुरेख गुंफली आहेत.चहाच्या निमित्तानेच  आठवणींच्या गाठोड्यातून आज पुन्हा एक सुखद क्षण वेचला गेला......कागदावर लिहिला गेला....... स्वतःशीच छान संवाद साधला गेला...
चहा.... खरंच संवाद साधण्याचे एक उत्तम साधन आहे.

©️ अंजली मीनानाथ धस्के
पुणे, चिंचवड ३३

5 comments:

  1. अंजली , खूप छान लिहिलंस .

    ReplyDelete
  2. Khup sunder. Mazi aai pan ashich Chahane premal nati jodate

    ReplyDelete