शो मस्ट गो ऑन

' नमस्कार ' या विषयावर लिहिलेली ही कथा
#१००शब्दांचीगोष्ट
#शो_मस्ट_गो_ऑन

RJ साक्षी कार्यक्रमाच्या  तयारीत व्यस्त  असतांनाच वाईट बातमी आली  . तिच्या  बाबांचा अपघात झाला होता रुग्णालयात त्याच्यांवर  उपचार सुरू होते.
आजचा कार्यक्रम सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा होता. वेश्यांची मुल ... समस्या.... आरोग्य ...  पालकत्व.... पुनर्वसन  यावर   अभ्यासपूर्वक  मुलाखत घ्यायची  होती.  विशेष'  पाहुणेही येवून बसलेले . अनेकांचं भविष्य यावर अवलंबून होत.  काय करावे सुचेना.... डोळ्यातलं पाणी थांबेना तेवढ्यात तिला  वडिलांचे शब्द आठवले , ' शो मस्ट गो ऑन' .... आपल्या वैयक्तिक अडचणीमुळे कोणतेही चांगले काम थांबता कामा नये . डोळे पुसत जणू काही झालंच नाही अशा आवाजात  तिने सुरुवात केली ..... "नमस्कारssss पुणे .....  कसे आहात ... मजेत ना .... "
©️ अंजली मीनानाथ धस्के

ईशा , बाबा आणि डायरी

#१००शब्दांचीगोष्ट
' माझे बाबा माझे जग '... या विषयावर लिहिलेली ही कथा आहे .
#ईशा_बाबा_आणि_डायरी
            माझ्या शाळेची सगळी तयारी तूच करायचा.   ताप आला  की , रात्रभर  पट्टया बदलत उशाशी  बसायचा.   आईची आठवण काढू नये म्हणून ती बाहेरगावी  असते, असं   खोटं सांगायचा.  तिचे जुनेच व्हिडिओ दाखवून  समजूत काढायचा     तुला मनभरून रडताही आल नाही . तुझी धडपड ... घुसमट कळायची पण  सांगू कसं??  मला   ठावूक आहे आई सोडून गेल्याच . तू मात्र जगणंच विसरला   म्हणूनच आज खोटा हट्ट केला  तुझ्यातोंडून वदवून  घ्यायला ....  तुला ओझ्यातून मुक्त करायला . .... तिचं जाणं मी स्वीकारलं पण तुला असं दुःखी बघवत नाही रे कारण   तूच माझं जग आहेस
 रडून झोपलेल्या चिमुकल्या ईशाच्या डायरीत  हे वाचून राहुलचे डोळे पाणावले.
©️ अंजली मीनानाथ धस्के

सुगंध, स्वप्न आणि ती

#सुगंध_स्वप्न_आणि_ती
#AnjaliMinanathDhaske

              एका निवांत क्षणी बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसलेल्या अस्मिताचे  लक्ष बहरलेल्या जुईच्या फुलांकडे गेले . आपोआप मिटल्या डोळ्यांनी तीने तो  सुगंध श्वासात भरून घेतला   आणि नकळत  भूतकाळात हरवून गेली .


अस्मिता एक स्वप्नाळू मुलगी. छोटी छोटी स्वप्न बघायची . बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करायची आणि पूर्ण झालं की त्याच आनंदात पुन्हा नवी स्वप्न बघायची. तिच्या लहानपणी अंगणात जुईचा वेल होता. त्याच्या फुलांचा जेव्हा दारात सडा पडलेला असायचा तेव्हा ती फुलं वेचायला ... त्यांचा गजरा करायला तिला खूप आवडायचं.  या फुलांचा सुगंध घरभर दरवळत असायचा. अंगणातल्या झोपाळ्यावर झोके घेतांना  ती या सुगंधा सोबत मिटल्या डोळ्यांनी  अनेक स्वप्न रंगवायची .
अभ्यास वाढला तस हळू हळू फुलं वेचायला वेळ मिळेनासा झाला . तरी दरवळणारा जुईच्याफुलांचा सुगंध तिला तिच्या  स्वप्नांच्या जगात घेवून जायचा. तिच्या मनात.... सुगंध आणि स्वप्न असच काहीसं नात तयार झालं होतं.
           किशोरवयात तिला सारखं वाटायचं की आपल्यालाही इतर मैत्रिणींसारखी स्वतंत्र खोली असावी . खोलीला मस्त फिका गुलाबी रंग असावा . खिडक्या सदैव उघड्या असाव्यात. त्यातून भरपूर सूर्यप्रकाश यावा.  हवेवर  झुळझुळ उडणारे मोतिया आणि फिक्या जांभळ्या  रंगाचे पडदे  असावेत . खोलीला स्वतंत्र मोठी बाल्कनी असावी . तिथे मस्त मोठा झोपाळा....   अंगणातला जुईचा  वेल तिथपर्यंत यावा आणि त्याच्या फुलांचा सुगंध तिथे दरवळावत रहावा.
एका भींतीला पुस्तकांचे मोठे कपाट... त्याला लागून ठेवलेला टेबल  .... त्यावर गरजेच्या सगळ्या वस्तू सज्ज... आरामात बसून काम करता यावे अशी खुर्ची..... शेजारीच मऊ गादीचा छोटा पलंग ..... खोलीच्या  एका कोपऱ्यात सुंदर  आरसा .... दुसऱ्या कोपऱ्यात कॅनव्हास , ब्रश आणि रंग .... थोडक्यात
सगळ्या छंदांचा .... आठवणींचा संग्रह करता यावा अशी तिची हक्काची जागा तिला हवी होती.
      आधी परिस्थितीच नव्हती की तिने तिचं हे स्वप्न घरी सांगावं ... आणि ते पूर्ण व्हावं पण जेव्हा वडिलांनी घराचं बांधकाम करायला घेतलं तेव्हा मात्र तिच्या आशा पल्लवित झाल्या. भावाच लग्न करायचं ठरल्यामुळे त्याच्या आवडीला प्राधान्य देण्यात येत होत. त्यातूनही मार्ग काढून एक खोली आपण आपल्याला हवी तशी करूच असा विश्वास घेवून  जेव्हा ती वडिलांशी बोलायला गेली तेव्हा वडिलांनी तिला नेहमीच्याच पद्धतीने समजावले , ' तुला वेगळी खोली कशाला हवी आता .... वर्षा सहा महिन्यांत तुझंही लग्न  करायचं आहे ' .
हे  बोलणं ऐकणारी आई  म्हणाली , ' ती म्हणतेय तस  करायला काय हरकत आहे . तिची हौस पूर्ण होईल '. त्यावर ते जरा वैतागूनच म्हणाले , " असली सगळी हौस नवऱ्याच्या घरी जाऊन करा म्हणावं .... इथे येवढे लाड केले तर तिथे निभाव लागणार आहे का? " त्यावर आईला बिचारीला काही बोलता आलं नाही.  पाण्याने भरलेले अस्मिताचे डोळे पुसतांना ती म्हणाली ," आहे त्या खोल्या पैकी कोणतीही खोली घे. तुला हवी तशी लाव मग तर झालं .... बाबांना मी समजावते . तू लाग कामाला ".
 मिळेल त्यात समाधान मानून .... त्याचही चिज करणारी ती लगेच कामाला लागली .
आईही लागेल ती सगळी मदत करत  होतीच ... तेवढ्यात बाबा आले आणि म्हणाले, ' एवढी कसली धावपळ सुरु आहे माय लेकींची.... ही दिवसभर तर कॉलेजमधे असते . स्वतंत्र खोली घेवून करणार काय ? परक्याच धन आहे लेक म्हणजे .... येवढे लाड हवेत कशाला '.
अस्मिताला खूप बोलायचं होत ....पण  आई ने तिला खूणेनेच गप्प रहायला सांगितले आणि बाबांना म्हणाली , ' परक्याच धन आहे म्हणूनच लाड करून घेते .  जे भेटलं नाही त्यासाठीच आपण हट्ट करतो  पण सासरची  लोकंही तुमच्यासारखीच लाड न   करणारी मिळाली तर??? माहेरी सगळे लाड झाले तर लेक सासरी त्याचा आग्रह धरणार नाही.  तिच्या मनात समाधान... तृप्तता  असेल तेव्हाच तर संसार सुखाचा करेल.   पुढचं कोणी पाहिलं आहे .... वर्षभरात लग्न ठरलं तर तेवढ्यासाठी तीच मन नाही मोडायच मला . खोली आणि फर्निचर  आहे तेच आहे मग तुम्हाला तरी काय त्रास आहे".
त्यावर ते , ' करा तुम्हाला हवं ते ' असं बोलून निघून गेले.
खोलीचा रंग सोडला तर बाकी काही तिच्या मना सारखं नव्हतं .  त्या खोलीला ती तिची खोली म्हणत होती खरी पण त्यात वडिलांची सगळी महत्त्वाची कागदपत्रे असणारे कपाट ,आईचे कपड्यांचे कपाट तर  भावाचा कॉम्पुटर यांचे अतिक्रमण होतेच . केवळ स्वतंत्र खोली या विचारानेच ती आनंदी होती. पण  बाबा म्हणाले तस खरंच तिला त्या खोलीत घालवायला फारसा वेळच मिळत नव्हता . स्व:तच्या खोलीत लावायचे म्हणून तिने रात्रीच्या अंधारात चमकणारे  तारांगण घेतले होते.
रात्री झोपतांना मात्र नभातले चांदणे खोलीत आलेले बघून आधीच स्वप्नाळू असलेली ती अधिकच स्वप्नाळू होवून जाई .

                    वर्षभरात खरंच तिचं लग्न ठरलं . तिथे तर घरातली सून म्हणून वाढलेल्या जबाबदाऱ्या ... नोकरी सांभाळतांना अनेक छोटी छोटी स्वप्ने मागे राहिली. लग्नानंतर पहिल्यांदा आई जेव्हा तिच्या सासरी आली तेव्हा हळूच तिच्या हातात ती माहेरी विसरून आली होती ते तारांगण दिलं . बघणाऱ्याने पूर्ण दुर्लक्ष करावं इतकी ती शुल्लक भेट पण अस्मिताला जणू तिचं स्वप्नातलं जग मिळालं होत.
सुटी बघून तिने व तिच्या नवऱ्याने चमकणाऱ्या तारका   खोलीच्या छताला लावल्या . लावून झाल्यावर तो तिला चिडवत म्हणाला,' एरवी फार समजूतदार असल्यासारखी वागतेस मग येवढ्या  बालिश स्वप्नांमधे  कशी रमतेस ग".
तीही खोटं खोटं रुसून म्हणाली, " माहेरी बाबा म्हणायचे सासरी गेल्यावर कर काय करायचं ते आणि  इथे सासूबाईं  सगळ्याच   गोष्टींवर फक्त त्यांचाच अधिकार आहे हे जाणवून देतात .बालपणीची  राहून गेलेली  काही स्वप्न आहेत ही .... तुला बालिशच वाटणार .... गंमत म्हणजे ही  स्वप्न बघतांना ती लगेच पूर्ण व्हावी असा आग्रह कधीच नसतो  कारण   स्वप्ने  बघण्यात .... ती रंगवण्यातच  आनंद आहे माझ्यासाठी ".
त्यावर तो अधिक थट्टने म्हणायचा , " चांगलं आहे ना .... तुझ्यामुळे  आपल्या बाळाचे   लाड पुरवण्याची रंगीत तालीम होते आहे माझी ".
आता रात्री तारका बघतांना तिला छान जरी वाटतं होत तरी  लग्नानंतर ज्या प्रश्नाची बोचनी प्रत्येक मुलीच्या मनाला लागते तीच बोचनी अस्मितेच्या मनाला लागली होती की,' आपलं खरं घर कोणतं?'
       सासरी रमली होती तरी माहेरची ओढ होतीच . त्याला कारणही तसंच होतं...... तिचा 'माझं घर ' हा शोध सुरूच होता .   इथे प्रत्येक वस्तूमधे सासूबाईंच वर्चस्व जाणवायच अजूनही आपली म्हणावी अशी एकही गोष्ट .... इथे  नाही . कुठे काय आणि कसं ठेवायचं ..... जेवण काय बनवायचं . इथे काय चालतं.... काय चालत नाही .... हेच ऐकावं लागतं .   काम करतांना फक्त आपलं घर मानून काम करायचं पण कोणीच अजून हे मान्य करत नाही की हे खरंच तिचं ही घर आहे.    तिच्या अस्तिवाच्या कोणत्याही खुणा  निर्माण करण्याचे स्वातंत्र्यच तिला  दिले जात नव्हते.
मग सहाजिकच माहेरच्या ओढीने ती तिकडे खेचली जायची .
तिथे तीने जमवलेल्या वस्तूंमधे तिचं अस्तित्व शोधायची .
पण तिथेही तिच्या सगळ्याच वस्तू .... आठवणी अडगळीच्या खोलीत रवाना झालेल्या .   दर वेळेस नवनवीन बदल होत गेले तसे तिचे अस्तित्व तिला तिथेही कुठेच दिसेनासे झाले . तिची चीड चीड वाढली. त्याचा राग ती घरातल्या लोकांवर काढू लागली.
सासरच्या घरात तिला तिचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता . तिच्या   स्वप्नांचे गाठोडे तिला धड उघडता येत नव्हते की टाकूनही देता येत नव्हते. मनाचा गोंधळ उडाला होता . लहापणापासूनच ,' जे करायचं ते नवऱ्याच्या घरी जाऊन करा ' असचं  ती ऐकत आली होती.
आणि आता नवऱ्याच्या घरी आल्यावर ' इथे असं चालणार नाही ' हे ऐकाव लागत होत. तिला कळत नव्हतं की तेव्हा हट्ट केला नाही ही चूक झाली  की आता हट्ट करतोय ही चूक  आहे.    दोन बोटींवर पाय ठेवण्याच्या नादात पाण्यात पडून बुडण्याची वेळ यावी अगदी तशीच अवस्था तिच्या मनाची झाली होती. त्यातून  सावरण्याआधीच  एका गोंडस मुलीची ईशाची ... ती आई झाली . भावाची मुलगीही दोन वर्षांची झाली होती. तिच्या सगळ्या स्वप्नांची जागा तिच्या मुलीने घेतली . आताही हक्क म्हणून  अधून मधून माहेरी जाणं होतंच .
              ईशा आता थोडी मोठी झाली होती .  माहेरी गेल्यावर जेव्हा ईशा  आणि भावाची मुलगी नेहा  खेळण्यावरून .... सामान ठेवण्याच्या जागेवरून भांडण करायच्या तेव्हा  ईशा आजीला विचारायची , ' आजी तू माझी ही आजी आहेस ना ? .... नेहा इतकंच हे घर माझं ही आहेच ना ?... मग इथे फक्त  ..... नेहाच खेळण्याचं कपाट... तिचच सामान घरभर का  आहे ??? माझी खेळणी .... कपाट  कुठे आहेत ???'      तीच्या या प्रश्नांवर काय सांगावं हे न सुचून आजी मग समजूत काढण्यासाठी तिच्याच कापाटाचा एक कप्पा आपल्या नातीला रिमका करून द्यायची .   ईशाही  खुश होवून सोबत आणलेली खेळणी ... कपडे त्यात मांडायची .
बाब खूप छोटी पण अस्मिताला अस्वस्थ व्हायला येवढं कारणही पुरेस होत.
अस्मिताने खूप विचार केला .... आपलं नेमक घर कोणतं ??? या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं अन्यथा मनाचा हा गोंधळ पिढी दर पिढी सुरूच राहणार.
घरी परत आल्यावर तीने ईशाला समजावले , " तू जास्त दिवस कुठे राहतेस ?? "
त्यावर ईशा निरागसपणे म्हणाली  , ' पप्पांकडे'.
तीने दुसरा प्रश्न विचारला, ' तुझी  शाळा..... मैत्रिणी कुठे आहेत ?'
ईशा चटकन् बोलून गेली , ' असं काय करतेस ग ... इथेच आहे न शाळा आणि मैत्रिणी ... '.
तीने शांतपणे सांगितलं , ' तुझी शाळा ... मैत्रिणी .. इथे .... तुझे पप्पा इथेच .... इथे तुझी सगळी खेळणी ... कपडे इथेच असतात . ते ठेवायला कपाट ही इथेच आहे.   तू जास्त दिवस राहते ते ही इथेच मग आजीच्या  घरात तुझ्या वस्तू कशा मिळतील   ?   इथल्या वस्तू ... हे घर आपलं आहे तिथल्या वस्तुंशी आपलं काही संबंध नाही ' .
ईशा चिडून म्हणाली , " असं कसं??? ......  आजी बाबा मामा मामी .... सगळे माझे आहेत . मला ते हवेच" .
त्यावर अस्मिता नकळत बोलून गेली ," वेडा बाई .... ते काय वस्तू आहेत का ???... मी तिथल्या वस्तू आपल्या नाहीत म्हणाले . ती सगळी माणसं आपलीच आहेत ग . त्यांच्यावरचा आपला हक्क ही तसाच राहणार आहे. एक गंमत सांगू .....
वस्तूंवर हक्क सांगण्यात जेवढी मजा आहे ना त्यापेक्षा जास्त मजा आपल्या माणसांसाठी काही वस्तुंवरचा हक्क सोडण्यात असते. म्हणून तिथे गेल्यावर खेळण्यांवरून ... कपाटावरून भांडण करणं योग्य नाही. आपण तिथे राहत नाही तर तिथे तुला हे सगळं कसं मिळणार  ?  तिथे आपण कपाटातली जागा मिळवायला जातो की त्यांचं प्रेम मिळवायला जातो? '
' त्यांचं प्रेम मिळवायला जातो ना ग .. मला सगळे हवे आहेत ' ईशा लाडात येऊन बोलली . अस्मिता ने पुन्हा सांगितले ,' मामा... मामी.... आजी.... आजोबा .... नेहा .... सगळी तुझीच आहे. फक्त वस्तू वरून भांडण नको ? '
ईशा ' ओके   मम्मा ... जावू मी खेळायला ' असं म्हणून खेळायला निघून गेली.
                आज ईशाला समजावून  सांगतांना अस्मिताला अचानक तिच्या प्रश्नाच उत्तर मिळालं होतं . घर म्हणजे फक्त  वस्तू नव्हे .... त्यात राहणाऱ्या माणसांनी घर बनते . आपलं अस्तित्व शोधायचं झालं तर ते माणसांच्या मनात शोधायला हवं ..... घरातल्या वस्तूंमधे नाही. वस्तूमधे  अडकून पडलो नाही तर  दोन्हीही घर आपली होतील.

          स्त्री मन किती विचित्र असतं नाही ???  चमचा माझा .... पोळपाट लाटणं माझं .... डबे माझे ... कपाट माझं .... घर माझं .... म्हणण्यात आपण समाधान मानतो. पुरुषांच बरं असतं आई माझी .... बायको माझी म्हंटल की बाकी सगळा पसारा आपोआप आवरला जातो . नवऱ्याच्या  वस्तूही आपण आपल्या मानतो . त्याचं सामान इथे तिथे पडलेलं असेल तर तेही आपण कुरकरत का होईना उचलून ठेवतो . त्याचं विस्कटलेल कपाट बघून आपला जीव लगेच दुःखी होतो . एक एक कपडा आपला मानून नीट घडी घालून ठेवतो.
तो मात्र आपल्या घडी केलेल्या कपड्यावरही  आरामात लोळू शकतो . गरज वाटलीच तर आपल्या नीट लावलेल्या  कपाटात ते कसेही कोंबु शकतो.
आपण छोट्या छोट्या वस्तूंमध्ये  जीव गुंतवतो. त्यांना जपण्यातच सगळा वेळ जातो . या गडबडीत   नात्यांना  द्यायचा वेळ कमी पडतो आणि शेवटी चिडण्या शिवाय आपल्या हाती काही रहात नाही.
आपणही इतकी वर्षे नेमक्या त्याच दुष्टचक्रात अडकलो .... सासरी माहेरी दोन्हीकडे आपलं अस्तित्व वस्तूतून शोधत राहिलो .... . सिद्ध करत राहिलो. जेव्हा जेव्हा ते साध्य झालं नाही तेव्हा तेव्हा उगाच दुःखी होत राहिलो.
माझं माझं म्हणण्यात आयुष्य गेल्याला   .......  वस्तूंमध्ये अस्तित्व जपणाऱ्या सासुबाईंकडून 'आपलं' म्हणण्याची.... आपल्याला स्विकारण्याची  अपेक्षा करत राहिलो.
माहेरी माझं माझं म्हणण्यासारखी एकही वस्तू शिल्लक राहिली नाही तेव्हा उगाच चडफडत राहिलो  पण ते ' माहेरच आपलं ' आहे हे विसरून गेलो . तसचं सासरी .... नकळत जीवघेण्या चढाओढीचे स्पर्धक होत राहिलो पण हे 'सासरही आपलच' हे कुठे लक्षात आलं.

लहानणापासून 'नवऱ्याच्या घरी जाऊन काय हवे ते करा ' हे ऐकत आलो तेही एका अर्थी बरच झालं . त्यामुळे स्वप्नांना   खरे करण्यासाठी कितीही  वाट पाहावी लागली तरी ती पाहण्याची आपली तयारी झाली. स्वप्नांना विसरून न जाता  त्यांचा पिच्छा पुरवावा लागतो . याची जाणीव झाली . माहेर जरी जन्मभूमी असल तरी आपली खरी कर्मभूमी सासर हेच आहे याची समज आधीपासूनच मिळाली.  सासर  आपलं खरं घर असल तरी दोन्ही घरातली माणसं आपलीच आहे. आपल्या हक्काची आहे . घरावर नुसते आपले नाव असून भागणार नाही तर घरातल्या माणसांच्या मनात आपले स्थान निर्माण करायला  हवे.  माझं.... काय... हे   शोधण्यापेक्षा सगळच आपलं मानायला हवं तेव्हा मनाचा गोंधळ होणार नाही. हक्क गाजवण्याआधी त्यासोबत  येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारायला हव्यात. घरातल्या वस्तू आपल्या नाहीत याचं दुःख करण्यापेक्षा माणसं आपली आहेत याचा आनंद घ्यायला हवा. आपली स्वप्ने अशी गाठोड्यात  न बांधता त्यांचे पंख करता यायला हवे. स्वप्न पूर्तीचा आनंद नक्कीच खूप मोठा असतो पण अपूर्णतेची जाणीवच सतत प्रयत्नशील राहण्यासाठी प्रेरणा देणारी ठरते.  तिचा शोध थांबला होता . स्वप्नांचे गाठोडे न राहता  पंख झाले होते.

                या घटनेला आता बरीच वर्षे झाली होती......  आज   विस्मृतीत गेलल   तिचं एक अतिशय जिव्हाळ्याच स्वप्न पूर्ण झालं होतं ... आता तिचं स्वप्न स्वतंत्र खोली पुरतं मर्यादित नव्हतं तर  संपूर्ण घर तिला हवं तसं तिने सजवल होत  . आज  तिने वेचलेल्या ओंजळभरच   जुईच्या फुलांचा सुगंध तिला आनंदाच्या ..... सुखाच्या .... समाधानाच्या झोक्यावर झुलवत होता.
©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाणाच्या सोबतीला रांगोळी ही येते तुमच्या भेटीला.
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

गोंधळ , फजिती आणि हशा


गोंधळ , फजिती आणि हशा

सासरी जाण्यासाठी नवी नवरी निघाली . लांबचा प्रवास असल्यामुळे  सासरे निघण्याची घाई करू लागले .  तिने घाईने लहान बहिनीला ,' कुलूप लावून  गाडीत पेटी ठेव' असं सांगितल आणि सगळ्यांचा निरोप घेण्यासाठी  निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सासरी पोहचल्यावर तिची पेटी कुठेच दिसेना. आंघोळीचा खोळंबा झाला. पेटी गावातल्याच एका पहुण्याकडे गेली होती. उघडून बघितल्यावर त्यांना कळाले की ही नवरीची पेटी आहे. त्यांनी  पेटी परत आणून दिली तर घरून फोन आला की मावशीच्या पेटीला हीचे कुलूप लावले  असल्यामुळे तिचीही अडचण झाली आहे. बहिणीने  सगळा गोंधळ  घातला होता  .
सासरी मात्र  " अदलाबदली पेटीची .... करवलीनेच केली फजिती नवरीची" असं म्हणून एकच हशा  उसळला.
©️ अंजली मीनानाथ धस्के


Momspresso Marathi वर या वेळेस ' गोंधळ' हा शब्द दिला होता कथा लेखासाठी

असंगाशी संग .... प्राणाशी गाठ

   #असंगाशी_संग_प्राणाशी_गाठ

            आज काल का कोणास ठाऊक मी बी. एड. करत असतांना चे दिवस आठवतात. तेव्हा अभ्यासक्रमात खूप कार्यक्रम समाविष्ट करण्यात आले होते. त्या पैकी एक म्हणजे ' छात्र सेवा कल' . या उपक्रमा अंतर्गत आम्हा शिक्षक विद्यार्थ्यांनी आठ दिवस संपूर्ण शाळा आणि शाळेचा कारभार जसा चालतो अगदी तसाच तो  चालवायचा असतो. मुख्याध्यापक ....वर्ग शिक्षक ..... विषय शिक्षक व.... चपराशी सगळ्या भूमिका आम्हीच करायच्या असतात. शाळा सुरू होते त्या प्रार्थापासून ते शाळा सुटे पर्यंत सगळी जबाबदारी आमची असायची.  शाळा सुटतांना शाळेतील विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण या विषयाच्या अंतर्गत एक कथा सांगायची....  प्रार्थना घ्यायची आणि मगच सगळे विद्यार्थी घरी जायचे . असा शाळेचा नियम होता.
शक्य तोवर हे काम आमच्या सोबत असणारे आमचे सहकारी ज्यांनी बी एड. ला मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेची निवड केली आहे ते करत.
 एक दिवस   ज्या वर्गाची मी आठ दिवसांसाठीची  वर्ग शिक्षिका होते  . तसेच मी ज्या वर्गावर पाठ घ्यायचे ते विद्यार्थी गोंधळ घालून माझे नाव मोठं मोठ्याने घेवू लागले . मुख्याध्यपकांनी त्यांना विचारल्यावर मुलांनी सांगितलं की आम्हाला ज्या गणित आणि विज्ञान विषय शिकवायला येतात त्या ताईनेच आज कथा सांगावी.
  आमच्या वेळा पत्रकात पुर्ण आठ दिवसांचे नियोजन आधीच झाले होते . त्यानुसार सगळे तयारी करत होते.    मूल्यशिक्षण .... बोध कथा ...... ..... या कसल्याच बाबींची   मी तयारी केली नव्हती की  विचारही  केला नव्हता.   असं अचानक सगळ्या शाळेसमोर बोधकथा सांगायची म्हंटल्यावर माझे हात पाय थरथरायला लागले.  वर्गात ५० मुलांना शिकवण वेगळं आणि सगळ्या  शाळेसमोर.... शिक्षक.... विद्यार्थ्यांसमोर ... असं कुठलीच तयारी न करता बोलण वेगळं.
माझे सहकारी जे ठरल्या प्रमाणे तयारी करून आले होते त्यांचा खोळंबा झाला होता याचाही माझ्या मनावर ताण आला. मी " उद्या नक्की सांगते " असं म्हणून टाळू पहात होते तितके ते काम मीच करावे असा आग्रह होत होता.
मला एकही कथा आठवेना ..... माझ्या हातात माईक .... हात थरथरत आहेत . माझ्या मनावर ताण आला की माझा आवाज कापरा होतो.    कापऱ्या आवाजात माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले ," आज जी कथा मी सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे , ' असंगाशी संग .... प्राणाशी गाठ'. मी सुरुवात केली आहे म्हंटल्यावर वातावरण अधिकच शांत झाले . अगदी इतके शांत की माझ्या धडधडत्या हृदयाचे ठोके माईक मधून सगळ्यांनाच ऐकू जातील की काय अशी भीती मला वाटली.
माझा आवाज भीतीने अधिकच कपरा झाला.
                 तरी मी कथा सांगायला सुरूवात  केली, " एक आटपाट नगर होतं. त्या नगराचा एक राजा होता . त्या राजाची एक सुंदर राणी होती . राजा त्या राणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा. एके दिवशी राणीला नदीवर आंघोळ करण्याची इच्छा झाली. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठीची सगळी तयारी सुरू झाली. नदीवर सैनिक पाठवण्यात आले . सगळी व्यवस्था अगदी चोख करण्यात आली. राणी तिच्या सखींसोबत  पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत असतांना ,सैनिक मात्र   थोडे अंतर ठेवून  राणी आणि राणीच्या सामानाचे संरक्षण करण्यासाठी पहारा देत उभे राहिले.

                सगळे कान देवून ,ऐकत आहे म्हंटल्यावर आवाजातला कंप जरा कमी झाला. मीही कथा सांगण्यात रमले.
              या नदी शेजारीच सुंदर वनराई होती . या वनराईत एक खूप मोठे वडाचे झाड होते. या झाडावर एक कावळा .... एक बगळा आणि इतर अनेक पक्ष्यांची घरटी होती. झाडाच्या सावलीतच मोठे बिळ होते . त्यात एक  विषारी नाग ही रहात होता. कावळ्याने सांगावे आणि इतरांनी करावे असे सगळे आनंदात नांदत होते.  कावळ्याला कायम बागळ्याचा राग येई . त्याचा रंग पांढरा शुभ्र ..... वागणूक सगळ्यांशी प्रेमाची .... कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही . मुख्य म्हणजे बगळा  कावळ्याचे सांगणे फार मनावर घेत नसे . जे त्याला योग्य वाटे तेच तो करत असे . कावळ्याचे ही सगळ्यांशी संबंध होतेच पण त्या सगळ्यांनी आपलंच ऐकावं .... या झाडावर फक्त आपली हुकूमत चालवी अशी लालसा त्याच्या मनात निर्माण झाली. सगळे पक्षी कामासाठी बाहेर पडले की कावळा राहिलेल्या पक्षांसोबत इतर पक्षांची निंदा करत असे . बगळ्याने ही हे सगळ करावं असं त्याचं मत होतं. पण बगळा काही त्याला दाद देईना. कावळ्यात एक दुर्गुण होता . तो म्हणजे कावळा हलक्या कानाचा होता. ''खरं काय खोटं काय ' याचा विचार न करता इतर सांगतील त्यावर विश्वास ठेवणारा होता. कोणी त्याची खोटी स्तुती केली की तो स्तुती करणाऱ्याचे वाटेल ते काम करून देत असे. सगळ्यांनी आपल्या बद्दल चांगलेच बोलावे असा त्याचा आग्रह होता.     साप ..... कावळा आणि बगळा दोघांशी बोलत असे.  आता कावळ्याने या  विषारी  सापाची मदत घेण्याचे ठरवले . सापाला खुश करण्याची एकही संधी तो सोडत नसे.  कावळा आपली सगळी कामे बिनबोभाट करतो आहे म्हंटल्यावर सापही कावळ्याच्या फायदा घेवू लागला.   आता कावळ्याने आपली जास्तीत जास्त कामे करावी म्हणून सापही त्याला मुद्दाम बागळ्याच्या विरोधात अनेक गोष्टी सांगू लागला.  शब्दांचे विष कावळ्याच्या कानात ओतू लागला. या सगळ्याचा परिणाम म्हणून ,  साप आपल्या बाजूने आहे म्हंटल्यावर कावळ्याला अधीकच चेव चढला. इतर पक्ष्यांनाही कावळ्याचा  त्रास होताच . कावळ्याच्या विरोधात बोलायला कोणी तयार होत नसे . कोणालाही कावळ्याचा  काही त्रास झाला तर,' ज्याचं तो बघून घेईल ' असे म्हणून सगळे गप्प बसून रहात. पण त्यांना हे कळत नव्हते की जो त्रास आज दुसऱ्याला आहे तोच त्रास कधी ना कधी आपल्याला होणार आहे. आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून  त्यातले काही पक्षी कावळ्याला जावून मिळाले.  कावळ्यानेही आपल्या सारख्याच वाईट विचारांचे पक्षी जमवायला सुरुवात केली. हे सगळे मिळून    कावळ्याच्या मदतीने इतरांना त्रास देवू लागले. बगळ्याने  खूप समजावलं की सगळे प्रेमाने राहू. झाडावरचे वातावरण पूर्वी सारखेच करू .पण त्यांना आता या वाईट कामांचीच चटक लागली .  बगळ्याच्या विरोधात काहीही सांगितल की कावळा आपली कामं आनंदाने करतो म्हंटल्यावर काही पक्षीही  सापा सारखेच कावळ्याचे कान भरू लागले . बगळा काही केल्या कावळ्याच्या ऐकण्यात येईना आणि कावळ्याच्या विरोधातही काहीच करेना तेव्हा कावळ्याला बगळ्याशी प्रेमानेच बोलावे लागे . त्या दोघांना प्रेमाने बोलतांना बघून सापाला विनाकारणच असे वाटू लागले की हे दोघे मित्र झाले तर आपली कामं कोण करणार. त्याला राहून राहून वाटू लागलं की या दोघात भांडण व्हायलाच हवे. त्याने कावळ्याचे कान भरायचे काम अधिक जोमाने सुरू केले. तो सांगू लागला की," तुमच्या समोर गोड बोलतो पण माघारी तुमच्या विषयी नेहमी खूप वाईट बोलत असतो . इतका वाईट बोलतो की तुम्हाला त्याच्याशी बोलायचं तर बोला मी इथून पुढे तुम्हा दोघांशीही बोलणार नाही".  कावळा डोक्याने आधीच अर्धवट त्यात सापाची साथ सुटली तर इतर पक्ष्यांनाही आपला धाक राहणार नाही असं वाटून कावळ्याने बगळ्याचा काटा काढायचाच असे  ठरवले .
           एके दिवशी राजाचे सैनिक नदीच्या काठावर राणीच्या आंघोळीची तयारी करतानां सापाने पाहिले . त्यांच्या जवळच्या दगडावर  बगळा निवांत बसलेलाही  त्याने पाहिला. त्यालाही नदितल्या पाण्यात आंघोळ करायची होती.

पण त्याला  बघताच   सैनिक  धावत आले आणि त्याला हाकलून लावले . त्याच्या  मनात बगळ्या विषयीचा  राग अधिकच  उफाळून आला. सापाने कावळ्याला  सांगितलं की बगळ्याचा काटा काढण्याची एक नामी युक्ती त्याला सुचली आहे. जेव्हा साप सैनिकांचे लक्ष वेधून घेईल ती संधी साधून कावळ्याने आंघोळीला आलेल्या राणीचा हिऱ्यांचा हार पळवायचा . हार घेण्याआधी सैनिकांचे लक्ष स्वतः कडे वेधून घ्यायचे  आणि उडायला सुरुवात करायची . म्हणजे ते कावळ्याचा  माग काढायला सुरुवात करतील . ही संधी साधून साप पटकन् त्याच्या बिळात लपून जाईल . कावळ्याने तो हार  बगळ्याच्या घरट्यात नेवून ठेवायचा. सैनिक आले की त्यांचे लक्ष घरट्याकडे वेधून घ्यायचे आणि पळून जायचं.  सैनिक  रागाच्या भरात बगळ्याचे घरटे उध्वस्त करतील. घरटे उध्वस्त झाले की आपोआपच बगळाही परत इथे येणार नाही".
कसलाही विचार न करता कावळा लगेच तयार झाला.
ठरल्या प्रमाणे सगळ झालं . हार बगळ्याच्या घरात ठेवला . नेमकं बगळ्याने ते पाहिलं . वेळ फार कमी होता . बगळ्याकडे दोनच पर्याय उपलब्ध होते . एक.....   घरट्याचा विचार सोडून जीव वाचवून पळून जाणं . दुसरा..... आलेल्या परिस्थितीला तोंड देवून  या दोघांना  कायमचा धडा शिकवणे.
पहिला पर्याय खूप सोपा होता. पण बगळ्याला माहित होत की जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी कावळा आणि सापसारखे लोक भेटतीलच किती दिवस त्यांना टाळत ... भीत आपण जगणार . आता आपल्या अस्तित्वासाठी का असेना आपल्याला लढावे लागणार. त्याने चटकन् तो हार आपल्या चोचीत घेतला आणि सापाच्याच  बिळात टाकला . तेवढ्यात सैनिक तिथे आले. बगळा लगेच उडून गेला. सैनिकांनी कावळ्याला हार उचलतांना पाहिलं होत त्यामुळे त्यांनीही बागळ्याला काही केलं नाही.  हार घरट्यात नाही हे पाहून तर आता कावळ्याचे धाबे दणाणले . तो मोठं मोठ्याने काव काव करू लागला . त्याची काव काव ऐकून त्याच्या मदतीला इतर पक्षी ही आले . अचानक ऐवढे पक्षी बघून सैनिकांनी धनुष्य बाण चालवायला सुरुवात केली.  या गोंधळात पक्षी दुसरीकडे उडून गेले पण काही घरटी तुटली . कावळा जखमी झाला त्याला उडता येईना.
इकडे कावळ्याच्या आवाजाने गोंधळून  जावून साप ही बिळाच्या बाहेर पडला . एका सैनिकाचे  लगेच त्याच्या बिळावर लक्ष गेले. तिथेच राणीचा हार पडलेला दिसला . त्याने ओरडून सगळ्यांना सावध केलं आणि काठी घालून सापाला मारून टाकले  .  हार घेवून  सैनिक निघून गेले.
 वातावरण शांत झाल्यावर सगळे पक्षी परतले.
बगळाही  आपल्या घरट्यात परत आला . कावळा जखमी होवून विव्हळत होता . विष ओकणारा साप मरण पावला होता. ज्यांनी ज्यांनी कावळ्याला साथ दिली होती सूदैवाने त्यांची घरटीच  फक्त तुटलेली होती पण  प्राण मात्र थोडक्यात बचावले होते. आता सगळ्याच पक्षांना कळून चुकले की वाईट माणसांची संगत केली की आपलेही  वाईटच होते. तेव्हा सगळ्यांनी एकी केली व कावळ्याला त्या झाडावरून हाकलून लावले.

गोष्ट सांगून झाल्यावर नेहमी प्रमाणे त्यातून काय शिकलो यावर चर्चा करायची असते म्हणून मग मी नेहमीचाच प्रश्न विचारला, "आता या गोष्टीतून तुम्ही काय बोध घेतला?"
आठवीतल्या एका हुशार मुलीने फार सुंदर उत्तर दिले.
 ," ही कथा नावा प्रमाणेच बोध देते ..... " असंगाशी संग ...... प्राणाशी गाठ "....वाईट माणसांची संगत ही तात्पुरती सुखकारक असली  तरी या संगतीचे  वाईट परिणाम हे दूरगामी असतात. अनेकदा त्यांच्या संगतीने येणारी संकट ही जीवावर बेतणारी असतात ".

मुख्याध्याकांना कथा फार आवडली होती त्यांनी लगेच माझ्या हातून माईक घेत मुलांशी संवाद साधला, " तुम्ही ज्या पद्धतीने शांत बसून ऐकत होता त्यावरून स्पष्ट आहे की तुम्हाला ही कथा आवडली..... तेव्हा तुम्हाला या कथेतील कोणा प्रमाणे वागायला आवडेल ? "
सगळ्यांनी एका सुरात सांगितले ," बगळ्याप्रमाणे".
लगेच पुढचा प्रश्न ," बगळ्याप्रमाणे का? "
मुलांनी हात वर केले .... एकेकाला उत्तर देण्याची संधी दिली . थोड्या फार फरकाने सगळ्यांची उत्तर अशीच होती.....
कारण बगळा हुशार .... चतुर आहे म्हणून
कारण बगळा सद् मार्गी आहे म्हणून

त्यावर ते म्हणाले , ....." ही कथा मलाही खूप आवडली... कारण यात  सद् मार्गी बगळा तर आहेच पण ही कथा आपल्या समाज व्यवस्थेचं प्रतीक ही आहे   .  बगळा होण वाटतं तेवढं सोपं नाही. ..... जेव्हा तुम्ही समाजात राहता तेव्हा  अनेक  प्रसंग असे येतात की लोकं छोट्या स्वार्थासाठीही तुमचा गैर फायदा घेऊ शकतात.  आपण हलक्या कानाचं असता कामा नये. दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः च्या अनुभवावर निर्णय घेतला जाणे गरजेचे असते. तुमच्या आजूबाजूला अनेक  माणसं सापासारखी  असतात. जे स्वार्थापोटी शब्दाचं विष आपल्या कानात ओकत असतात. अशा सापांना वेळीच ठेचलं पाहिजे अन्यथा आपल्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग ओढवू शकतात. ही कथा आपल्या समाज व्यवस्थेचं उदाहरण आहे .... झाडावर चांगले वाईट दोन्ही प्रकारचे पक्षी आहेत पण वाईट कामं करणाऱ्यांची एकी लवकर झाली ..... चांगल्या विचारांच्या पक्ष्यांना संघटित व्हायला वेळ लागला. जर चांगल्या विचारांचे पक्षी वेळीच संघटित झाले असते तर कावळ्याला समज देणे .... गरज पडल्यास हाकलून देणे त्यांना अवघड नव्हते . त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढवला नसता पण जोवर स्वतः ला त्रास होत नाही तोपर्यंत , " आपल्याला काय करायचं दुसऱ्याचं  ....  त्यांचं ते बघून घेतील . अशीच भूमिका सगळ्यांची असते. आज जे दुसऱ्या सोबत घडले ते उद्या आपल्या सोबत हि घडू शकते याचा विसर आपल्याला पडलेला असतो.
संकट कितीही मोठे असले तरी आपण आपल्या सद् सद् विवेक बुध्दीच्या जोरावर तिचा सामना नक्कीच करू शकतो.
 जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी थोड्या फार फरकाने अशीच चांगली वाईट माणसे आपल्या आजूबाजूला असतात. तेव्हा पाठ दाखवून पळून जाणे सोपे असते . खरी हिंमत खंबीरपणे लढण्यात असते.
बघ्याची भूमिका घेणं सोपं असतं पण गरज असते ती योग्य वेळी  आपली मते स्पष्टपणे  मांडण्याची  आणि त्यावर ठाम राहण्याची . तेव्हाच समाजातील वाईट वृतींना आळा बसून सौख्याचे वातावरण प्रस्थापित होईल."
आम्ही सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला.
आज इतकी वर्ष झाली या प्रसंगाला पण ही बोध कथा आणि त्यावर मुख्याध्यापकांनी केलेले स्पष्टीकरण .... दोन्ही अगदी लक्षात राहिले .आजही जेव्हा एखाद्या वाईट व्यक्तीच्या सानिध्यात आल्याने एखाद्या वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागते .  तेव्हा मी ही कथा आणि मुख्याध्यापकांचे त्यावरचे स्पष्टीकरण आठवते . तेव्हा जे तितकसं समजलं नव्हतं ते आता मात्र नीट कळलं आहे.
आजही  ........ तेव्हा शिकलेले  मूल्यशिक्षण कामी पडते.
 आयुष्यात मी जे काही चांगले  काम केले  किंवा  करते आहे त्याचे सगळे श्रेय हे , " मला लाभलेल्या उत्तम व्यक्तींच्या सहवासालाच जाते ..... त्यांच्यातल्या चांगलेपणाने  मला नेहमीच वाईटा विरूद्ध खंबीरपणे उभे राहण्याची हिंमत दिली .
हा प्रसंग आठवण्याच दुसरं मजेशीर कारण म्हणजे , माझ्या या कथा कथनाने शाळेचे मुख्याध्यापक इतके प्रभावित झाले होते की त्यांनी आमच्या घरी येवुन माझ्या वडिलांकडे त्यांच्या मित्राच्या मुलासाठी मला मागणी घातली होती .  मुलाने आणि त्याच्या वडिलांनी माझ्याच नकळत मला याच छात्र सेवा काल मधे शाळेत वावरतांना बघितले होते .
मला पुढचे शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती त्यानंतरच मी लग्नाचा विचार करणार होते त्यामुळे माझ्या वडिलांना  त्यांना नाईलाजाने नकार कळवावा लागला होता.
मनात कुठलाही आकास न ठेवता . नकार मिळूनही माझ्या वडिलांना त्यांनी माझ्याच वेगळेपणा बद्दल सांगितले. माझ्या निमित्ताने का होईना त्यांची एकमेकांशी ओळख झाली .. याचं समाधान व्यक्त केलं.  तसचं  लग्नाच्या गाठी स्वर्गात  बांधल्या जातात ..... असं स्वतः ला आणि माझ्या वडिलांना समजावलं होत.
  खरं तर आई बाबांचे सगळ्यात खोडकर अपत्य म्हणजे मी .... तरी झाल्या प्रकरणाने त्यांना माझा अभिमान वाटला हे मात्र नक्की .
असो......
 इथून पुढच्या वाटचालीतही  अशीच चांगली माणसं भेटत जातील आणि अनेक सकारात्मक विचारांनी ... अनुभवांनी मला समृध्द करतील  याची मला खात्री आहे.
समाजाचे प्रतीक असलेले या कथेतील वडाचे झाड रांगोळीत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( टिपः यात कुठलीही आत्मप्रौढी नसून .. ज्या प्रसंगांनी आत्मविश्वास वाढवला ... आपल्यातल्या चांगल्या गुणांची  ओळख करून दिली .... ... त्याबद्दल केवळ कृतज्ञ तेचे भाव आहेत .)


बोधकथा

#बोधकथा



बी एड करत असतांना सगळ्यात आवडीचा कालावधी म्हणजे जेव्हा आमचे पाठ एखाद्या शाळेवर लागायचे .  खूप धम्माल असायची . आम्ही मुलांना शांत करून आमचा पाठ कसा पूर्ण करतो याला खूप महत्त्व असायचे . मला पाठा दरम्यान खूप शैक्षणिक साधने वापरायला आवडायची . आम्ही पाठ घेत असतांना आमचे सहकारी आणि प्राध्यापक आमचे निरिक्षण करण्यासाठी सगळ्यात शेवटच्या बाकावर बसायचे . प्राध्यापक आपण कसे शिकवतो हे बघण्यासाठी उपस्थित राहणार आहेत याचचं आम्हाला दडपण यायचं. पण सरावाने ते मागे बसले आहेत याचा विसर पडून मी माझा पाठ पूर्ण करू लागले . एके दिवशी मी माझा पाठ पूर्ण करून वर्गा बाहेर पडत असतांनाच त्या वर्गाचे वर्ग शिक्षक तिथे आले. आमचे प्राध्यापक मला माझ्या पाठविषयी काही सांगतील  म्हणून मी ही वर्गाबाहेर थांबले . आमचे प्राध्यापक आणि सहकारी मित्र बाहेर आले . माझ्या एका सहकारी मित्राने  केलेल्या निरीक्षणावर प्राध्यापकांची स्वाक्षरी घ्यावी म्हणून निरिक्षण वही त्यांच्या समोर धरली . त्यांनी सही करण्यासाठी पेन घेतला आणि  स्वाक्षरी करणार तेवढ्यात ते थांबले . त्यात नोंद होती की, " शैक्षणिक साहित्याचा वापर वाढवावा ". आमच्या प्राध्यापकांनी वरती नाव वाचलं तिथे माझे नाव लिहिले होते. त्यांनी लगेच त्या पानावर फुली मारली. सहकारी मित्र एकदम घाबरून गेले. काय चुकलं असं विचारू लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं, " त्यांच्या वाजनापेक्षा जास्त त्या शैक्षणिक साहित्य वापरतात. आत्ताही बघ केवढे सामान त्यांच्या हातात आहे. उगाच लिहायचं म्हणून काहीही नोंदी लिहिण्यात काही अर्थ नाही".
आम्ही ज्या वर्गा बाहेर थांबलो होतो त्या वर्गात गोंधळ सुरू झाला. ज्यांचा तास होता ते शिक्षक गैर हजर होते आणि आता शाळेच्या कामानिमित्त बाहेर जावे लागणार असल्या कारणाने वर्ग शिक्षकांना ही वर्गात थांबणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी आमच्या प्राध्यापकांना विनंती केली की ते परत येई पर्यंत आम्हा शिक्षक  विद्यार्थ्यांनी त्यांचा  वर्ग शांत  करावा.
आमचे प्राध्यापक आम्हाला म्हणाले , "आता आपले लगेच तास नाहीतच मग शिक्षकांच्या खोलीत बसण्यापेक्षा या वर्गात जावून बसू तेवढीच त्यांना मदत होईल आणि पाठ टाचण नसतांनाही वर्ग कसा हाताळायचा याचा अनुभव तुम्हाला मिळेल ".
खरं तर मी आणि माझे दोन सहकारी आम्ही तिघही गणित आणि विज्ञान पद्धती स्वीकारलेले बी एड चे विद्यार्थी . तास ज्या शिक्षकांचा होता ते इतिहास आणि मूल्यशिक्षण हे दोन विषय शिकवायचे.
माझे पुढचे टाचण तयार होते पण मुल ऐकेना. त्यांना मी शिकवावे असे वाटत तर होते पण पुन्हा गणित सोडवण्याची त्यांची अजिबात तयारी नव्हती. माझ्या सहकाऱ्यांनी तयारी नाही सांगून हात झटकले. तेव्हा आमचे प्राध्यापक मला म्हणाले, " बोध कथा सांगून मूल्यशिक्षणाचा तास घेता येईल . तुम्ही प्रयत्न करा. नोकरी लागल्यावर असे  अनेक  प्रसंग येतात ".
मला कथा वाचायला आवडतात पण सांगायची वेळ येते तेव्हा एकही कथा आठवत नाही. वर्गात गोंधळ वाढत चालला तसे मी माझ्या प्राध्यापकांकडे  फार आशेने बघितले . मला वाटलं ते मला वर्गातली मुलं शांत करण्यासाठी मदत करतील . पण त्यांनी," मी इथे नाही असच समजा" असं घोषीत केले . माझ्या सहकाऱ्यांनी लगेच पुढाकार घेऊन मुलांना शांत करण्याचे काम सुरू केले . सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. बाजूच्या वर्गातले शिक्षकही आता आमच्या वर्गात आले . शेवटी मी धीर करून डस्टर माझ्या समोरच्या टेबलावर आपटले . सगळे एकदम शांत झाले. मी लगेच वर्गाचा ताबा घेत म्हणाले , " आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे . तुम्ही सगळे शांत राहिलात तरच मला हे शक्य आहे".
सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला की कथेचं नाव काय ?
मला काही केल्या कथेचं नाव आठवत नव्हते. मग मी एक युक्ती केली . मी सांगून टाकलं की, "या कथेची एक गंमत आहे . आधी मी तुम्हाला कथा सांगणार . त्यातून तुम्हाला काय बोध झाला हे विचारणार . तुम्हाला जो बोध होईल त्याप्रमाणे तुम्हीच मला कथेसाठी एक छानस नाव सुचवायचे. ज्याचं नाव सगळ्यात छान तेच नाव या कथेला देण्यात येईल.
आता तर काय वर्ग अधिकच शांत झाला. मीही कथेला सुरुवात केली," फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे . एका  गावात खूप तेजस्वी असा एक साधू असतो.  त्याचे प्रवचन ऐकायला दुरून दुरून लोक येत असतात. त्याच गावात एक श्रीमंत व्यापारी रहात असतो . त्याच्या मनात येतं की या साधूला एकदा तरी आपल्या घरी जेवायला बोलवावे. त्यांच्या सारख्या महान साधूने आपल्या घरी जेवायला आल्यावर  गावात आपला मान अधिक वाढेल असे वाटून तो साधूला रोज घरी येण्यासाठी विनवत असतो. अनेक दिवस टाळून झाले तरी व्यापारी पिच्छा सोडत नाही म्हंटल्यावर साधूने त्याच्या घरी जेवायला जायचे ठरवले. व्यापाऱ्याला खूप आनंद झाला त्याने जय्यद तयारी केली. साधूचे स्वागत दणक्यात करण्यात आले. त्याची ही तयारी बघून साधूला व्यापाऱ्याविषयी प्रेम वाटू लागले. व्यापारी जेवतांना साधूला आग्रह करून करून वाढू लागला. साधूनेही सगळ्याच पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. तांदळाची खीर तर साधूला इतकी आवडली की त्याने ती वारंवार खाल्ली.
          जेवण झाल्यावर साधू व्यापाऱ्याशी गप्पा मारत बसला.  व्यापारी लगेच साधूच्या पायाशी बसून त्याचे पाय चेपू लागला. साधूला आश्रमात परतायचे होते. पण भरपेट जेवण आणि सुरू असलेली सेवा याने त्याला झोप यायला लागली.  व्यापाऱ्याने आज माझ्याकडेच मुक्काम करा असा आग्रह धरला. साधूला त्याची ही विनंतीही टाळता आली नाही. साधूला एका खास खोलीत नेण्यात आलं.  झोपेमुळे साधूने त्या खोलीचे फारसे निरिक्षण केले नाही. साधू लगेच झोपी गेला. पहाटे जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने सभोवती नजर टाकली तर ती एक फारच सुंदर खोली होती. पलंग तर मऊ मऊ गादीचा होता. शेजारीच पाण्यासाठी चांदीचा तांब्या पेला ठेवलेला. खिडक्या .... पडदे.... सामान..... सगळंच खूप सुंदर . पण का कुणास ठाऊक साधूला चांदीचा पेला फारच आवडला . हा पेला आपण झोळीत टाकून घेवून गेलं तर कोणाला काय कळणार असा विचार त्याच्या मनात सुरू झाला. शेवटी न राहवून त्याने पेला झोळीत टाकला. व्यापाऱ्याचा निरोप घेऊन तो आश्रमात परतला.
        इकडे व्यापाऱ्याच्या घरात साधूच्या खोलीतला चांदीचा पेला गायब झाला म्हणून एकच गहजब उडाला. व्यापाऱ्याने सगळ्या नोकरांना बोलावून चौकशी सुरू केली. सगळ्यांना विचारूनही कोणी कबुल होईना तेव्हा व्यापाऱ्याने सगळ्यांनाच चाबकाचे फटके मारण्याचा निर्णय घेतला.
इकडे साधू रोजच्या सारखं साधनेला बसला . त्याचे चित्त मात्र एक सारखे झोलीतल्या चांदीच्या पेल्याकडेच लागले.
आता तर तो फार बेचैन झाला. त्याला कळेना की आपण हा पेला का उचलून आणला? आपल्या तर तो काहीच कामाचा नाही. आपल्या गरजाही फार कमी आहेत . मग ह्या पेल्याचा आपल्याला येवढा मोह का झाला?  चोरी करणे वाईट असे आपण आपल्या प्रवचनात सांगतो पण मग आज आपणच का चोरी केली? खूप खूप विचार केल्यावर त्याच्या मनात एक शंका आली आणि त्या शंकेच निरसन फक्त व्यापारीच करू शकतो असा विचार त्याच्या मनात आला . केलेली चूक वेळीच सूधारायला हवी असे वाटून त्याने ताबडतोब पेला घेतला आणि व्यापाऱ्याचे घर गाठले.
        तिथे व्यापाऱ्याने सगळ्या नोकरांना एका रांगेत उभे केले होते . त्यातल्या एका नोकराला चाबकाचे फटके मारायला सुरुवात केली होती. तो नोकर कळवळून सांगत होता की," मी चोरी नाही केली ".
हे दृश्य पाहून साधू दुःखी झाला. त्याने पुढे होवून चाबूक अडवला आणि चांदीचा पेला झोळीतून काढून व्यापाऱ्याच्या हातात दिला. "यांना मारू नकोस चोरी मी केली होती" अशी कबुलीही दिली.
     व्यापाऱ्याला वाटले साधू महान आहे . नोकरांना वाचवण्यासाठी स्वतःवर चोरीचा आळ घेतोय. त्याने साधूला विचारले , "  मागितला असता तर यापेक्षा मोठा आणि छान पेला मी तुम्हाला दिला असता . हे तुम्हाला माहिती आहे .तुम्ही चोरी का कराल? तुम्ही या नोकरांना वाचवण्यासाठी असे खोटे का बोलताय? "
     साधू ने सांगितले ," मी खोटे बोलत नाही. मलाही हाच प्रश्न पडला आहे की मी चोरी का केली ? याचे उत्तर शोधण्यासाठीच मी इथे आलो आहे. मला सांगा काल मी जी खीर आवडीने खात होतो तिचे सामान तु कसे मिळवले आहेस?
      यावर व्यापारी एकदम गडबडून गेला . साधूने पुन्हा विचारले ," खिरीसाठीचे तांदूळ आणि साखर तु कसे मिळवले आहेस?"
त्यावर व्यापाऱ्याने घाबरातच सांगितले की , " राजाकडून जे धान्य ... सामान लोकांना वाटण्यासाठी माझ्या दुकानात पाठवण्यात येतं त्यातले  तांदूळ आणि साखरचे पोते मी सैनिकांच्या चोरून माझ्या घरी घेवुन येतो . त्यातल्याच तांदळाची आणि साखरेची खीर मी तुम्हाला खावू घातली .  मला माफ करा पण माझ्या या चोरीचा तुम्ही नेलेल्या पेल्याशी काय संबंध?"
    त्यावर साधू उत्तरला ," कंद मुळे खाणारा मी ... सत्याच्या मार्गाने जाणारा मी ..... स्वतः चे पोट भरण्यासाठी कष्ट करणारा मी ......  खीर छान लागली म्हणून भरपेट खाल्ली. चोरीच्या सामनापासून बनवलेल्या खीरीने मलाही चोरी करायला उदुक्त केले. मी चोरी केली पण मी रोज असे चोरीचे  अन्न  खात नाही म्हणून चोरी कबुल करण्याची बुध्दी झाली . तुम्ही रोज रोज चोरीचेच   अन्न   खाता त्यामुळे तुम्हाला रोज रोज चोरीची बुध्दी होते आणि त्यामुळेच चोरी करणे वाईट आहे हे ही तुम्ही विसरून गेलात. आता एकच कर की , इथून पुढे कधीही मला तुझ्या  घरी जेवायला बोलावू नकोस ".
त्यांचे हे बोलणे जवळ उभा असलेला एक नोकर ऐकत होता. त्याने लगेच साधूचे पाय पकडले आणि मोठमोठ्याने रडू लागला. कारण विचारल्यावर त्याने सांगितले की , ' व्यापाऱ्याच्या या चोरीच्या सामानातले थोडे सामान तोही त्याच्या मुलासाठी  चोरून नेत होता .  अजून त्याचा मुलगा लहान आहे पण जाईल तिथे चोरी करतो . त्याचे भविष्यही या चोरीच्या अन्नामुळे धोक्यात आले . त्याला सुधारण्यासाठी आता काही उपाय असेल तर तो सांगावा'.
त्याचे रडणे बघून साधूने सांगितले ," रडू नकोस ... अजून वेळ गेली नाही . चोरीचं सामान गरजूंना देवून टाक . घरातल्या सगळ्या गरजा फक्त स्वतःच्या कष्टाच्या कमाईने पूर्ण करायला सुरुवात कर. गरजा भागात नसतील तर कष्ट वाढव पण पुन्हा चोरी करू नकोस . हळू हळू तुला कष्ट करतांना   बघून तुझा मुलगाही चोरी करणे सोडून देईल".
त्या दिवशी नोकराला आणि व्यापाराला आपली चूक कळली. त्यांनी त्या दिवसानंतर कधीच कोणत्याही प्रकारची चोरी केली नाही.
गोष्ट संपली तरी वर्गात शांतता होती . काय बोध घेतला हे विचारलं तर ," चोरी करणे वाईट " या मतावर सगळेच आले होते.
मग मी कथेचे स्पष्टीकरण दिले ते असे ....
" यापुढे जावून ही कथा अनेक बोध देते ते म्हणजे ,
  वाईट मार्गाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्ही आलात तर तुमच्याही नकळत तुम्ही वाईट गोष्टीच्या आहारी जाता.
 तुमची सद् सद् विवेक बुध्दी जागृत असेल तरच तुम्ही चांगले काय.... वाईट काय यातला भेद ओळखू शकता.
चूक सुधारण्यासाठीची संधी ही एक मात्र अशी संधी आहे जी कधीच निघून जात नाही.
चूक लक्षात आल्यावर ती झाकून न ठेवता मोठ्या मनाने स्विकारायला तर हवीच पण भविष्यात ती टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

कष्टाची कमाई ..... कष्टाची सवयच तुम्हाला वाईट गोष्टींपासून दूर ठेवते.
मुख्य म्हणजे लोभाचे अनेक क्षण आयुष्यात येतील पण त्यावेळी  मोहाच्या आहारी न जाता सद् मार्गाची निवड करता यायला हवी.
खरं तर ही कथा खूप विचार करायला लावणारी आहे. तसेच
मूल्यशिक्षण हा विषयच  असा आहे की तो फक्त शिकायचा नसतो तर प्रत्यक्ष आपल्या वागण्यात तो अवलंबायचा देखील असतो. प्रत्यक्ष आयुष्यात इतर विषय कच्चे राहिले तर त्याने तुमच्या आयुष्यावर फारसा गंभीर परिणाम होत नाही  पण मूल्यशिक्षण जर घेतलेच नाही तर माणूस म्हणून तुम्ही १०० टक्के अपयशी ठरता. ही गोष्ट मात्र फक्त तुमच्याच आयुष्यावर नाही तर समाजावर ही वाईट परिणाम करू शकते.
कथा एक पण त्यातून बोध घेतले तर अनेक आहेत. कथेला काय नाव द्यायचं या पेक्षा कथेतून काय बोध घेतला हे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही या कथेला देवू शकता .  तसंही शेक्सपियर सांगून गेलेत ," नावात काय आहे".

असं बोलून मी माझी कथा संपवली.
वर्गातली मुल तर आनंदी झालीच पण आमच्या प्राध्यापकांनी .... सहकारी मित्रांनी आणि शेजारच्या वर्गातले शिक्षक जे आता वर्ग येवढं शांत कसा झाला हे बघायला आले होते त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझे कौतुक केले.

मूल्यशिक्षण हे आजही खूप गरजेचे आहे. कळत नकळत घेतलेले मूल्यशिक्षण आयुष्यात  माणूस म्हणून जगतांना खूप उपयोगी पडते. आजकाल  बोधकथा वाचायच्या म्हणून वाचल्या जातात . त्यातून घेतलेला बोध प्रत्यक्ष आयुष्यात अवलंबला जात नाही. किंबहुना तशी शिकवणच  दिली जात नाही. मग नंतर आपणच चर्चा करतो की आजकाल सगळ्यांच्या भावना बोथट होत चालल्या आहेत. नैतिक मूल्यांचा ह्रास होत चालला आहे. पण आपणच पुढाकार घेऊन ही मूल्ये जपायला हवी आणि वारसा म्हणून पुढच्या पिढीला द्यायला हवी. याचा विचार करणारी माणसं आज फारच थोडी आहेत . आता गरज आहे ती आपण   सर्वांनीच मूल्यशिक्षणाची पुन्हा नव्याने उजळणी करण्याची.
आपण सर्वांनी प्रयत्न केले तरच ..... आपल्याला हवा असलेला सामाजिक बदल हा हळू हळू का होईना घडणार हे नक्की .
माझ्या आयुष्यात मी शिकलेले मूल्यशिक्षण वर्गात शिकवण्याचा केलेला पहिला प्रयत्न.... ," ज्या प्रसंगाने अनेक चांगल्या गोष्टींची  सुरुवात केली. ज्या प्रसंगाने माझ्यातला आत्मविश्वास वाढवला.    " तो प्रसंग येथे सांगत आहे .
कथा आवडल्यास ..... नक्की कळवा ..... अजूनही खूप छान छान बोध कथा आहेत ..... तोपर्यंत ," खूप वाचा ..... जे आवडेल ते स्वीकारा ....नाहीतर सोडून द्या".



गुढी पाडवा (२०१९)

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतन वर्षाभिनंदन !!
आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !