असंगाशी संग .... प्राणाशी गाठ

   #असंगाशी_संग_प्राणाशी_गाठ

            आज काल का कोणास ठाऊक मी बी. एड. करत असतांना चे दिवस आठवतात. तेव्हा अभ्यासक्रमात खूप कार्यक्रम समाविष्ट करण्यात आले होते. त्या पैकी एक म्हणजे ' छात्र सेवा कल' . या उपक्रमा अंतर्गत आम्हा शिक्षक विद्यार्थ्यांनी आठ दिवस संपूर्ण शाळा आणि शाळेचा कारभार जसा चालतो अगदी तसाच तो  चालवायचा असतो. मुख्याध्यापक ....वर्ग शिक्षक ..... विषय शिक्षक व.... चपराशी सगळ्या भूमिका आम्हीच करायच्या असतात. शाळा सुरू होते त्या प्रार्थापासून ते शाळा सुटे पर्यंत सगळी जबाबदारी आमची असायची.  शाळा सुटतांना शाळेतील विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण या विषयाच्या अंतर्गत एक कथा सांगायची....  प्रार्थना घ्यायची आणि मगच सगळे विद्यार्थी घरी जायचे . असा शाळेचा नियम होता.
शक्य तोवर हे काम आमच्या सोबत असणारे आमचे सहकारी ज्यांनी बी एड. ला मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेची निवड केली आहे ते करत.
 एक दिवस   ज्या वर्गाची मी आठ दिवसांसाठीची  वर्ग शिक्षिका होते  . तसेच मी ज्या वर्गावर पाठ घ्यायचे ते विद्यार्थी गोंधळ घालून माझे नाव मोठं मोठ्याने घेवू लागले . मुख्याध्यपकांनी त्यांना विचारल्यावर मुलांनी सांगितलं की आम्हाला ज्या गणित आणि विज्ञान विषय शिकवायला येतात त्या ताईनेच आज कथा सांगावी.
  आमच्या वेळा पत्रकात पुर्ण आठ दिवसांचे नियोजन आधीच झाले होते . त्यानुसार सगळे तयारी करत होते.    मूल्यशिक्षण .... बोध कथा ...... ..... या कसल्याच बाबींची   मी तयारी केली नव्हती की  विचारही  केला नव्हता.   असं अचानक सगळ्या शाळेसमोर बोधकथा सांगायची म्हंटल्यावर माझे हात पाय थरथरायला लागले.  वर्गात ५० मुलांना शिकवण वेगळं आणि सगळ्या  शाळेसमोर.... शिक्षक.... विद्यार्थ्यांसमोर ... असं कुठलीच तयारी न करता बोलण वेगळं.
माझे सहकारी जे ठरल्या प्रमाणे तयारी करून आले होते त्यांचा खोळंबा झाला होता याचाही माझ्या मनावर ताण आला. मी " उद्या नक्की सांगते " असं म्हणून टाळू पहात होते तितके ते काम मीच करावे असा आग्रह होत होता.
मला एकही कथा आठवेना ..... माझ्या हातात माईक .... हात थरथरत आहेत . माझ्या मनावर ताण आला की माझा आवाज कापरा होतो.    कापऱ्या आवाजात माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले ," आज जी कथा मी सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे , ' असंगाशी संग .... प्राणाशी गाठ'. मी सुरुवात केली आहे म्हंटल्यावर वातावरण अधिकच शांत झाले . अगदी इतके शांत की माझ्या धडधडत्या हृदयाचे ठोके माईक मधून सगळ्यांनाच ऐकू जातील की काय अशी भीती मला वाटली.
माझा आवाज भीतीने अधिकच कपरा झाला.
                 तरी मी कथा सांगायला सुरूवात  केली, " एक आटपाट नगर होतं. त्या नगराचा एक राजा होता . त्या राजाची एक सुंदर राणी होती . राजा त्या राणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा. एके दिवशी राणीला नदीवर आंघोळ करण्याची इच्छा झाली. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठीची सगळी तयारी सुरू झाली. नदीवर सैनिक पाठवण्यात आले . सगळी व्यवस्था अगदी चोख करण्यात आली. राणी तिच्या सखींसोबत  पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत असतांना ,सैनिक मात्र   थोडे अंतर ठेवून  राणी आणि राणीच्या सामानाचे संरक्षण करण्यासाठी पहारा देत उभे राहिले.

                सगळे कान देवून ,ऐकत आहे म्हंटल्यावर आवाजातला कंप जरा कमी झाला. मीही कथा सांगण्यात रमले.
              या नदी शेजारीच सुंदर वनराई होती . या वनराईत एक खूप मोठे वडाचे झाड होते. या झाडावर एक कावळा .... एक बगळा आणि इतर अनेक पक्ष्यांची घरटी होती. झाडाच्या सावलीतच मोठे बिळ होते . त्यात एक  विषारी नाग ही रहात होता. कावळ्याने सांगावे आणि इतरांनी करावे असे सगळे आनंदात नांदत होते.  कावळ्याला कायम बागळ्याचा राग येई . त्याचा रंग पांढरा शुभ्र ..... वागणूक सगळ्यांशी प्रेमाची .... कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही . मुख्य म्हणजे बगळा  कावळ्याचे सांगणे फार मनावर घेत नसे . जे त्याला योग्य वाटे तेच तो करत असे . कावळ्याचे ही सगळ्यांशी संबंध होतेच पण त्या सगळ्यांनी आपलंच ऐकावं .... या झाडावर फक्त आपली हुकूमत चालवी अशी लालसा त्याच्या मनात निर्माण झाली. सगळे पक्षी कामासाठी बाहेर पडले की कावळा राहिलेल्या पक्षांसोबत इतर पक्षांची निंदा करत असे . बगळ्याने ही हे सगळ करावं असं त्याचं मत होतं. पण बगळा काही त्याला दाद देईना. कावळ्यात एक दुर्गुण होता . तो म्हणजे कावळा हलक्या कानाचा होता. ''खरं काय खोटं काय ' याचा विचार न करता इतर सांगतील त्यावर विश्वास ठेवणारा होता. कोणी त्याची खोटी स्तुती केली की तो स्तुती करणाऱ्याचे वाटेल ते काम करून देत असे. सगळ्यांनी आपल्या बद्दल चांगलेच बोलावे असा त्याचा आग्रह होता.     साप ..... कावळा आणि बगळा दोघांशी बोलत असे.  आता कावळ्याने या  विषारी  सापाची मदत घेण्याचे ठरवले . सापाला खुश करण्याची एकही संधी तो सोडत नसे.  कावळा आपली सगळी कामे बिनबोभाट करतो आहे म्हंटल्यावर सापही कावळ्याच्या फायदा घेवू लागला.   आता कावळ्याने आपली जास्तीत जास्त कामे करावी म्हणून सापही त्याला मुद्दाम बागळ्याच्या विरोधात अनेक गोष्टी सांगू लागला.  शब्दांचे विष कावळ्याच्या कानात ओतू लागला. या सगळ्याचा परिणाम म्हणून ,  साप आपल्या बाजूने आहे म्हंटल्यावर कावळ्याला अधीकच चेव चढला. इतर पक्ष्यांनाही कावळ्याचा  त्रास होताच . कावळ्याच्या विरोधात बोलायला कोणी तयार होत नसे . कोणालाही कावळ्याचा  काही त्रास झाला तर,' ज्याचं तो बघून घेईल ' असे म्हणून सगळे गप्प बसून रहात. पण त्यांना हे कळत नव्हते की जो त्रास आज दुसऱ्याला आहे तोच त्रास कधी ना कधी आपल्याला होणार आहे. आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून  त्यातले काही पक्षी कावळ्याला जावून मिळाले.  कावळ्यानेही आपल्या सारख्याच वाईट विचारांचे पक्षी जमवायला सुरुवात केली. हे सगळे मिळून    कावळ्याच्या मदतीने इतरांना त्रास देवू लागले. बगळ्याने  खूप समजावलं की सगळे प्रेमाने राहू. झाडावरचे वातावरण पूर्वी सारखेच करू .पण त्यांना आता या वाईट कामांचीच चटक लागली .  बगळ्याच्या विरोधात काहीही सांगितल की कावळा आपली कामं आनंदाने करतो म्हंटल्यावर काही पक्षीही  सापा सारखेच कावळ्याचे कान भरू लागले . बगळा काही केल्या कावळ्याच्या ऐकण्यात येईना आणि कावळ्याच्या विरोधातही काहीच करेना तेव्हा कावळ्याला बगळ्याशी प्रेमानेच बोलावे लागे . त्या दोघांना प्रेमाने बोलतांना बघून सापाला विनाकारणच असे वाटू लागले की हे दोघे मित्र झाले तर आपली कामं कोण करणार. त्याला राहून राहून वाटू लागलं की या दोघात भांडण व्हायलाच हवे. त्याने कावळ्याचे कान भरायचे काम अधिक जोमाने सुरू केले. तो सांगू लागला की," तुमच्या समोर गोड बोलतो पण माघारी तुमच्या विषयी नेहमी खूप वाईट बोलत असतो . इतका वाईट बोलतो की तुम्हाला त्याच्याशी बोलायचं तर बोला मी इथून पुढे तुम्हा दोघांशीही बोलणार नाही".  कावळा डोक्याने आधीच अर्धवट त्यात सापाची साथ सुटली तर इतर पक्ष्यांनाही आपला धाक राहणार नाही असं वाटून कावळ्याने बगळ्याचा काटा काढायचाच असे  ठरवले .
           एके दिवशी राजाचे सैनिक नदीच्या काठावर राणीच्या आंघोळीची तयारी करतानां सापाने पाहिले . त्यांच्या जवळच्या दगडावर  बगळा निवांत बसलेलाही  त्याने पाहिला. त्यालाही नदितल्या पाण्यात आंघोळ करायची होती.

पण त्याला  बघताच   सैनिक  धावत आले आणि त्याला हाकलून लावले . त्याच्या  मनात बगळ्या विषयीचा  राग अधिकच  उफाळून आला. सापाने कावळ्याला  सांगितलं की बगळ्याचा काटा काढण्याची एक नामी युक्ती त्याला सुचली आहे. जेव्हा साप सैनिकांचे लक्ष वेधून घेईल ती संधी साधून कावळ्याने आंघोळीला आलेल्या राणीचा हिऱ्यांचा हार पळवायचा . हार घेण्याआधी सैनिकांचे लक्ष स्वतः कडे वेधून घ्यायचे  आणि उडायला सुरुवात करायची . म्हणजे ते कावळ्याचा  माग काढायला सुरुवात करतील . ही संधी साधून साप पटकन् त्याच्या बिळात लपून जाईल . कावळ्याने तो हार  बगळ्याच्या घरट्यात नेवून ठेवायचा. सैनिक आले की त्यांचे लक्ष घरट्याकडे वेधून घ्यायचे आणि पळून जायचं.  सैनिक  रागाच्या भरात बगळ्याचे घरटे उध्वस्त करतील. घरटे उध्वस्त झाले की आपोआपच बगळाही परत इथे येणार नाही".
कसलाही विचार न करता कावळा लगेच तयार झाला.
ठरल्या प्रमाणे सगळ झालं . हार बगळ्याच्या घरात ठेवला . नेमकं बगळ्याने ते पाहिलं . वेळ फार कमी होता . बगळ्याकडे दोनच पर्याय उपलब्ध होते . एक.....   घरट्याचा विचार सोडून जीव वाचवून पळून जाणं . दुसरा..... आलेल्या परिस्थितीला तोंड देवून  या दोघांना  कायमचा धडा शिकवणे.
पहिला पर्याय खूप सोपा होता. पण बगळ्याला माहित होत की जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी कावळा आणि सापसारखे लोक भेटतीलच किती दिवस त्यांना टाळत ... भीत आपण जगणार . आता आपल्या अस्तित्वासाठी का असेना आपल्याला लढावे लागणार. त्याने चटकन् तो हार आपल्या चोचीत घेतला आणि सापाच्याच  बिळात टाकला . तेवढ्यात सैनिक तिथे आले. बगळा लगेच उडून गेला. सैनिकांनी कावळ्याला हार उचलतांना पाहिलं होत त्यामुळे त्यांनीही बागळ्याला काही केलं नाही.  हार घरट्यात नाही हे पाहून तर आता कावळ्याचे धाबे दणाणले . तो मोठं मोठ्याने काव काव करू लागला . त्याची काव काव ऐकून त्याच्या मदतीला इतर पक्षी ही आले . अचानक ऐवढे पक्षी बघून सैनिकांनी धनुष्य बाण चालवायला सुरुवात केली.  या गोंधळात पक्षी दुसरीकडे उडून गेले पण काही घरटी तुटली . कावळा जखमी झाला त्याला उडता येईना.
इकडे कावळ्याच्या आवाजाने गोंधळून  जावून साप ही बिळाच्या बाहेर पडला . एका सैनिकाचे  लगेच त्याच्या बिळावर लक्ष गेले. तिथेच राणीचा हार पडलेला दिसला . त्याने ओरडून सगळ्यांना सावध केलं आणि काठी घालून सापाला मारून टाकले  .  हार घेवून  सैनिक निघून गेले.
 वातावरण शांत झाल्यावर सगळे पक्षी परतले.
बगळाही  आपल्या घरट्यात परत आला . कावळा जखमी होवून विव्हळत होता . विष ओकणारा साप मरण पावला होता. ज्यांनी ज्यांनी कावळ्याला साथ दिली होती सूदैवाने त्यांची घरटीच  फक्त तुटलेली होती पण  प्राण मात्र थोडक्यात बचावले होते. आता सगळ्याच पक्षांना कळून चुकले की वाईट माणसांची संगत केली की आपलेही  वाईटच होते. तेव्हा सगळ्यांनी एकी केली व कावळ्याला त्या झाडावरून हाकलून लावले.

गोष्ट सांगून झाल्यावर नेहमी प्रमाणे त्यातून काय शिकलो यावर चर्चा करायची असते म्हणून मग मी नेहमीचाच प्रश्न विचारला, "आता या गोष्टीतून तुम्ही काय बोध घेतला?"
आठवीतल्या एका हुशार मुलीने फार सुंदर उत्तर दिले.
 ," ही कथा नावा प्रमाणेच बोध देते ..... " असंगाशी संग ...... प्राणाशी गाठ "....वाईट माणसांची संगत ही तात्पुरती सुखकारक असली  तरी या संगतीचे  वाईट परिणाम हे दूरगामी असतात. अनेकदा त्यांच्या संगतीने येणारी संकट ही जीवावर बेतणारी असतात ".

मुख्याध्याकांना कथा फार आवडली होती त्यांनी लगेच माझ्या हातून माईक घेत मुलांशी संवाद साधला, " तुम्ही ज्या पद्धतीने शांत बसून ऐकत होता त्यावरून स्पष्ट आहे की तुम्हाला ही कथा आवडली..... तेव्हा तुम्हाला या कथेतील कोणा प्रमाणे वागायला आवडेल ? "
सगळ्यांनी एका सुरात सांगितले ," बगळ्याप्रमाणे".
लगेच पुढचा प्रश्न ," बगळ्याप्रमाणे का? "
मुलांनी हात वर केले .... एकेकाला उत्तर देण्याची संधी दिली . थोड्या फार फरकाने सगळ्यांची उत्तर अशीच होती.....
कारण बगळा हुशार .... चतुर आहे म्हणून
कारण बगळा सद् मार्गी आहे म्हणून

त्यावर ते म्हणाले , ....." ही कथा मलाही खूप आवडली... कारण यात  सद् मार्गी बगळा तर आहेच पण ही कथा आपल्या समाज व्यवस्थेचं प्रतीक ही आहे   .  बगळा होण वाटतं तेवढं सोपं नाही. ..... जेव्हा तुम्ही समाजात राहता तेव्हा  अनेक  प्रसंग असे येतात की लोकं छोट्या स्वार्थासाठीही तुमचा गैर फायदा घेऊ शकतात.  आपण हलक्या कानाचं असता कामा नये. दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः च्या अनुभवावर निर्णय घेतला जाणे गरजेचे असते. तुमच्या आजूबाजूला अनेक  माणसं सापासारखी  असतात. जे स्वार्थापोटी शब्दाचं विष आपल्या कानात ओकत असतात. अशा सापांना वेळीच ठेचलं पाहिजे अन्यथा आपल्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग ओढवू शकतात. ही कथा आपल्या समाज व्यवस्थेचं उदाहरण आहे .... झाडावर चांगले वाईट दोन्ही प्रकारचे पक्षी आहेत पण वाईट कामं करणाऱ्यांची एकी लवकर झाली ..... चांगल्या विचारांच्या पक्ष्यांना संघटित व्हायला वेळ लागला. जर चांगल्या विचारांचे पक्षी वेळीच संघटित झाले असते तर कावळ्याला समज देणे .... गरज पडल्यास हाकलून देणे त्यांना अवघड नव्हते . त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढवला नसता पण जोवर स्वतः ला त्रास होत नाही तोपर्यंत , " आपल्याला काय करायचं दुसऱ्याचं  ....  त्यांचं ते बघून घेतील . अशीच भूमिका सगळ्यांची असते. आज जे दुसऱ्या सोबत घडले ते उद्या आपल्या सोबत हि घडू शकते याचा विसर आपल्याला पडलेला असतो.
संकट कितीही मोठे असले तरी आपण आपल्या सद् सद् विवेक बुध्दीच्या जोरावर तिचा सामना नक्कीच करू शकतो.
 जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी थोड्या फार फरकाने अशीच चांगली वाईट माणसे आपल्या आजूबाजूला असतात. तेव्हा पाठ दाखवून पळून जाणे सोपे असते . खरी हिंमत खंबीरपणे लढण्यात असते.
बघ्याची भूमिका घेणं सोपं असतं पण गरज असते ती योग्य वेळी  आपली मते स्पष्टपणे  मांडण्याची  आणि त्यावर ठाम राहण्याची . तेव्हाच समाजातील वाईट वृतींना आळा बसून सौख्याचे वातावरण प्रस्थापित होईल."
आम्ही सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला.
आज इतकी वर्ष झाली या प्रसंगाला पण ही बोध कथा आणि त्यावर मुख्याध्यापकांनी केलेले स्पष्टीकरण .... दोन्ही अगदी लक्षात राहिले .आजही जेव्हा एखाद्या वाईट व्यक्तीच्या सानिध्यात आल्याने एखाद्या वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागते .  तेव्हा मी ही कथा आणि मुख्याध्यापकांचे त्यावरचे स्पष्टीकरण आठवते . तेव्हा जे तितकसं समजलं नव्हतं ते आता मात्र नीट कळलं आहे.
आजही  ........ तेव्हा शिकलेले  मूल्यशिक्षण कामी पडते.
 आयुष्यात मी जे काही चांगले  काम केले  किंवा  करते आहे त्याचे सगळे श्रेय हे , " मला लाभलेल्या उत्तम व्यक्तींच्या सहवासालाच जाते ..... त्यांच्यातल्या चांगलेपणाने  मला नेहमीच वाईटा विरूद्ध खंबीरपणे उभे राहण्याची हिंमत दिली .
हा प्रसंग आठवण्याच दुसरं मजेशीर कारण म्हणजे , माझ्या या कथा कथनाने शाळेचे मुख्याध्यापक इतके प्रभावित झाले होते की त्यांनी आमच्या घरी येवुन माझ्या वडिलांकडे त्यांच्या मित्राच्या मुलासाठी मला मागणी घातली होती .  मुलाने आणि त्याच्या वडिलांनी माझ्याच नकळत मला याच छात्र सेवा काल मधे शाळेत वावरतांना बघितले होते .
मला पुढचे शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची होती त्यानंतरच मी लग्नाचा विचार करणार होते त्यामुळे माझ्या वडिलांना  त्यांना नाईलाजाने नकार कळवावा लागला होता.
मनात कुठलाही आकास न ठेवता . नकार मिळूनही माझ्या वडिलांना त्यांनी माझ्याच वेगळेपणा बद्दल सांगितले. माझ्या निमित्ताने का होईना त्यांची एकमेकांशी ओळख झाली .. याचं समाधान व्यक्त केलं.  तसचं  लग्नाच्या गाठी स्वर्गात  बांधल्या जातात ..... असं स्वतः ला आणि माझ्या वडिलांना समजावलं होत.
  खरं तर आई बाबांचे सगळ्यात खोडकर अपत्य म्हणजे मी .... तरी झाल्या प्रकरणाने त्यांना माझा अभिमान वाटला हे मात्र नक्की .
असो......
 इथून पुढच्या वाटचालीतही  अशीच चांगली माणसं भेटत जातील आणि अनेक सकारात्मक विचारांनी ... अनुभवांनी मला समृध्द करतील  याची मला खात्री आहे.
समाजाचे प्रतीक असलेले या कथेतील वडाचे झाड रांगोळीत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( टिपः यात कुठलीही आत्मप्रौढी नसून .. ज्या प्रसंगांनी आत्मविश्वास वाढवला ... आपल्यातल्या चांगल्या गुणांची  ओळख करून दिली .... ... त्याबद्दल केवळ कृतज्ञ तेचे भाव आहेत .)


No comments:

Post a Comment