नात्यातला दुरावा झाला दुर


#नात्यातला_दुरावा_झाला_दुर
©️ अंजली मीनानाथ धस्के
सई  ही एक  घर, मुलं आणि नोकरी योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता असलेली महत्त्वाकांक्षी मुलगी.
अर्थातच तिच्या सासरच्या माणसांची तिला खूप मदत मिळत होती म्हणून ती ऑफिसच्या कामातही स्व:तला झोकून देत होती. नवरा तिच्या बरोबरीने घरची जबाबदारी घेत होता. सासू सासरे ही त्यांना झेपेल तशी मदत करत होते.
ऑफिसच्या कामा निमित्त तिला बाहेर गावी किंवा परदेशात जावं लागलं तरी तिच्या वाचून घरचं काही अडत नव्हतं. मुलांचही सासू सगळं आनंदाने करत होती.
सगळं कसं सुरळीत सुरु होत.
सईची चीडचीड होण्यासाठी  रुपलच लग्न कारणीभूत ठरलं.
रुपल तिची मावस नणंद. रुपल सासूची लाडकी. तिच्या  लग्नासाठी १० दिवस मस्त वेळ काढून जाण्याचं त्यांनी ठरवलं होतं. तशी सासू सासऱ्यांची तयारीही सुरू होती. सईला इतके दिवस जमणार नाही म्हणून सई, आदित्य, बंटी आणि बिल्लू वेळेवर पोहचणार असं ठरलं होतं.
नेमकी नको ती अडचण आली. त्याच दरम्यान सईला कंपनीच्या कामा करिता पंधरा दिवस परदेशी जावं लागणार होत. लग्नाला सासऱ्यांनी एकट्यानेच हजेरी लावावी अस तिचं मत होत. जेणे करुन सासू घरी राहिल्या तर घराचे आणि मुलांचे आबाळ होणार नाही.
तिने जेव्हा सासूबाईंना तसे सुचवले तेव्हा त्या तयार झाल्या नाहीत.
बहिणीच्या घरचं शेवटचं लग्न .  रुपलच्या लग्नानिमित्त सगळे नातेवाईक भेटतील .  गप्पा गोष्टींची मस्त मैफिल रंगेल. एकमेकांवर विनोद केले जातील . पोटभरून हसणं होईल. त्या निमित्ताने चार दिवस आनंदात जातील . त्यामुळे लग्नाला गेलच पाहिजे असं सासूबाईंना वाटतं होत.

सासूबाईंच्या बहिणीच्या घरचं हे शेवटचं लग्न आहे म्हंटल्यावर  त्यांनी लग्नाला जाण्याचा हट्ट करणे योग्य ही होते. निदान  सासऱ्यांनी घरी रहावं म्हणजे सासूबाईंना लग्नाला जाता येईल असं सईला वाटू लागले पण सासूबाई त्यालाही तयार नव्हत्या.
शेवटी सईने तिच्या आईला बोलावून घेतलं. तिच्या आईलाही सईकडे करमायचं नाही. नवीन घर त्यामुळे सोपी वाटणारी कामही त्यांच्यासाठी अवघड होवून जायची. नातवंडांचे लाड पुरवता पुरवता नाकी नऊ यायचे. सईचा चौकशीचा फोन आला की त्या सतत कुरकुर करायच्या. आईची ही भुणभुण सईला नकोशी होवुन सासूबाईनी केलेल्या हट्टीपणाची अधिक चीड यायची.
आईनेही कुरकुरतच तिचे अडचणीचे दिवस काढून दिले.
सासूबाईही १० दिवस ठरले होते त्याप्रमाणे १० दिवसात परत आल्या. पुन्हा सगळं सुरळीत सुरु झालं.
सईच्या मानत मात्र अढी राहिली.
वर्षातून दोनदा सहलीला जातात. शक्य तितक्या वेळेस लग्न समारंभांनाही हजेरी लावतात. घरचं सगळं आम्ही दोघं बघतो. ऑफिसला जातानांही मी बरीचशी काम करूनच जाते. या वयात घरकामात गुंतून न घेता त्यांना त्यांच्या आवडीची कामे करता यावी म्हणून जास्तीत जास्त कामे  कामाला येणाऱ्या मावशींना करायला सांगतो.  यांचा  दिवस मस्त आरामात जातो. तरी थोडं समजून घेता येत नाही. असं वाटून सईच मन खट्टू झालं होतं.
तिच्या मनातली अढी सासूबाईंनाही जाणवली पण त्यांनाही वाटलं की," मी कसली तक्रार न करता आनंदाने मुलांचं करते. तीही ऑफिसला जाताना जमतील तेवढी काम करून जातेच पण ती जातेच मुळी सकाळी ८:३० ला. आपण पुढे संपूर्ण दिवस  कामाचा डोंगर उपसत असतो. बंटीला शाळेच्या बसमधे चढवून परत यायचं. नंतर बिल्लुच सगळं आवरायचं. त्याला शाळेत सोडायचं. आमची जेवणं होत नाही की,
बिल्लुच्या मागोमाग बंटीही घरी येतो. दोघांनाही सकाळचं खाणं नको असतं . रोज काहीतरी चमचमीत लागतं . चार वर्षाचा बिल्लु तर खातांना खूप दमावतो. घर भर पळत असतो. दोघांचा अभ्यास घ्यायचा असतो.  सई येईपर्यंत पोरांचा पसारा अवरता आवरता नाकी नऊ येतात. घरी येणारा पै पाहुणा. काम करणाऱ्या मावशींच्या होणाऱ्या सुट्या. हेही बिन तक्रार पार पडतो.

रोज संध्याकाळी स्वयंपाक करायला त्राण रहात नाही. सईलाही आल्यावर मुलांना वेळ देता यावा म्हणून स्वयंपाकाला बाई ठेवली. वर्षातून दोनदा सहलीला जातो. पण बाकी दिवस मंदिरात जायचं झालं तरी पोरांच्या वेळा सांभाळूनच जावं लागतं. कधी सईला सांगावं की आईला चार दिवस बोलावून घे  तर त्याही इथे रहायला तयार नसतात . "या वयात स्वतः च्या घरीच बरं असतो आपण  " असं सांगून यायचं टाळतात. शनिवार रविवार सईला  आणि आदित्यला सुट्टीचे असले तरी त्यांच्या वैयक्तीक कामासाठी राखीव असतात. पार्लरला जाणे , मैत्रिणींना भेटणे, कधी दोघं विरंगुळा म्हणून चित्रपट बघायलाही किंवा लाँग ड्राईव्हलाही जातात. आदित्य आणि ती बाहेर फिरायला गेले तरी बिल्लू लहान म्हणून तो कायम आमच्याकडेच असतो . त्याच्या बाललीला बघतांना आमचे दिवसही मजेत जातात परंतु शरीर आता पूर्वीसारखी साथ देत नाही.
कधी तरी लग्नाला किंवा छोट्या कार्यक्रमांना जातो तेही फक्त हजेरी लावायला. कधी कोणाशी निवांत बोलून होत नाही. रुपलच्या लग्नानिमित्त सगळी भेटली . त्यांच्या संगतीने १० दिवस मजेत गेले. त्या आठवणींच इंधन आता वर्ष भर पुरेल. सई आणि आदित्यच्या ऑफिसमुळे तसेच बंटीच्या शाळेमुळे होणारी सततची धावपळ असते . घड्याळाच्या काट्यावर नाचायला आता जमत नाही. दिवसामागून दिवस निव्वळ रूटीन सांभाळण्यात जातात.
एक ना एक दिवस सईच्या मानतली अढी आपोआप दूर होईल या आशेवर त्यांनीही या विषयावर बोलणे टाळले.
झालंही तसंच ....
कोरोना व्हायरसने सगळीकडे हाहाकार माजविला.

लॉक डाऊन ची बातमी आली.

सगळ्यांनाच घरी राहावं लागलं.

कामवाल्या मावशी कामाला येत नव्हत्या. घरातली कामे सई आणि सासूबाईंनी वाटून घेतली. आदित्य आणि सासरेही जमेल तशी मदत करत होते.

सुरवातीची काही दिवस या सक्तीच्या सुट्टीची  मजा वाटली. मग मात्र आठवड्यातले सगळे दिवस सारखेच झाले. शनिवार रविवार या दिवसांची पुर्वी जितकी उत्सूकता वाटायची ते निवांत दिवसही उदर भरण आणि घरकामात व्यस्त जावू लागले.

छोट्या बिल्लूला जेवू घालतांना सई रडकुंडीला येवू लागली.  सासूबाईंनी आयते जेवण दिले तरी मुलांच्या खेळण्याचा पसारा आवरून आवरून तिला पाठदुखी सुरू झाली. कामवाल्या मावशी जी कामे आधी करायच्या ती कामे सोडली तरी घरातली इतर बारीक बारीक कामे दिवसभर पुरायची. सईला या दिवसांमध्ये पुरते कळून चुकले की धुणे, भांडी, फारशी आणि पोळ्याच्या मावशी आधी जरी कामाला येत होत्या तरी घरात इतर वेळ खावू कामे बरीच असतात. रोज घर नीटनेटके ठेवणे, फर्निचर पुसणे, बिल्लुचे आवरणे, दोरीवरचे कपडे काढून आणणे , त्या कपड्यांच्या नीट घड्या  करणे, भांडे ट्रॉली मधे लावणे, कुंड्याना पाणी देणे , मुख्य म्हणजे जेवणाचा टेबल कायम रिकामा ठेवणे कारण या टेबलावर सगळेच येता जाता वाट्टेल ते सामान आणून टाकतात. सामानाची इतकी गर्दी होते की जेवायला बसण्या आधी  त्याला रिकामा करण्यासाठीच जास्त वेळ वाया जात असे.

सईला सासूबाईंची रोज किती धावपळ होत असेल याची पूर्ण कल्पना आली. याआधी

आपण  ऑफिसच्या   रूटीनला  कंटाळुन शनिवार रविवारचा जास्तीत जास्त  वेळ  "Me time" साठी राखीव ठेवत होतो. बंटीच्या शाळेच्या आभ्यासाची तर आपण कधी काळजी करत नव्हतो . सगळं सासूबाई आवडीने करायच्या.   घराची जबाबदारी, बिल्लूचे सगळे करणे आणि बंटीचा अभ्यास  यातून सासूबाईंना स्वतःसाठी कितीसा वेळ मिळाला असेल ? या वयात त्यांनी त्यांच्या आवडीची कामे करावी . निवांत रहावं अशी आपली इच्छा पण प्रत्यक्षात घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलायला

आपल्या नोकरीतून वेळ कुठे मिळतो .


अनेक दिवस त्या घराबाहेरही पडत नाही पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. बाहेर जायचे म्हंटले की आपल्या सगळ्या वेळा सांभाळूनच बाहेर जातात. सासूबाई रुपलच्या लग्नाला गेल्या ते एका अर्थी बरंच झालं .... आता कोरोनामुळे बाहेर पडणे केवळ अशक्य.

तिच्या मनातली अढी आपोआप दूर झाली.

वर्क फ्रॉम होम असल्याने तिला घरून काम करावं लागतं होते.

तिच्या कामाचे स्वरूप , त्यासाठी खर्ची पडणारा वेळ , श्रम यांची जाणीव सासूबाईंना झाली. त्यांनाही वाटून गेलं रुपलच्या लग्नासाठी दहा दिवस न जाता दोन ते तीन दिवसात परत येता आलं असतं. आपण उगाच हट्टी पणा केला . सईची खूपच धावपळ झाली असेल.

तिच्या कामा बद्दल असलेला आदर अधिक द्विगुणित झाला.

कोरोनाचे संकट आले पण दोघींच्या मनातली अढी दूर होवुन आता दोघींमधे पूर्वीपेक्षाही  अधिक समंजस संवाद घडू लागला.

अर्थातच हे वाटतं तितक्या सोप्या पद्धतीने झाले नाही. आधी थोडी धुसपुस , किंचित आदळ आपट, टोमणे मारत बोलणे .... या सगळ्या पायऱ्या पार पडल्या. तरी हे सगळं घडताना दोघींनी आपला संयम कायम राखला. निर्माण झालेल्या परिस्थितीचा सारासार विचार केला आणि मोठ्या मनाने स्वतःची चूक मान्य केली.

कोविड१९ मुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते तरी त्यांनी त्याच्याकडे आत्मचिंतन करण्याची संधी या दृष्टिकोनातून बघितले याचाच परिणाम म्हणून दोघींचा संवाद अधीक मोकळे पणाने होवू लागला

आपल्या सगळ्यांच्या बाबतीतही

अनेकदा असेच घडते. वाईट वाटणारी परिस्थिती आपल्यात अनेक चांगले बदल घडवून आणत असते. परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. आपण या कठीण काळात परिस्थितीला नावे न ठेवता सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवे छोट्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याकडे योग्य संधी म्हणून बघायला हवे. जसे कोरोनामुळे मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीचा फायदा  सई आणि तिच्या सासूबाईंच्या मनातली अढी दूर होण्यासाठी झाला तसेच आपल्या बाबतीतही घडत असते फक्त आपण या छोट्या छोट्या सकारात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करून नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करायला हवे.

वाईटातून काही ना काही चांगले घडतेच . हा विश्वास कायम बाळगायला हवा. एकमेकांच्या योग्य साथीने कठीण काळही सहज निघुन जाईल.

©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहीत करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे






No comments:

Post a Comment