#परिक्षेचे_भूत
©️ अंजली मीनानाथ धस्के
ही कथा आहे आदित्य आणि त्याच्या आई बाबांची.
त्यांच्या मानगुटीवर बसलेल्या परीक्षेच्या भुताची .
आदित्य जेव्हा आठवीत शिकत होता तेव्हाच
त्याच्या घरात दहावीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला एकाच जागी बसून अभ्यास करतांना कंटाळा येवू नये, एकाच जागी बसण्याची सवय व्हावी म्हणून आठवीत असूनही त्याच्या अभ्यासाचं वेळापत्रक हे दहावीच्या विद्यार्थ्यांना शोभेल असं तयार करण्यात आले होते. खरं तर त्याचे आई वडील आभ्यासाच्या बाबतीत जागरूक असले तरी त्याला सक्ती करणारे नव्हते. मुलांनी मैदानी खेळ खेळावे. शिक्षण हसत बागडत व्हावे या मताची ती दोघे होती परंतू आठवी पासूनच दहावीची तयारी गरजेची असते नाहीतर पुढे मुलांचे भविष्य कठीण होवुन बसते अशी भीती त्यांना आदित्य सातवीत असल्यापासूनच घरी येणाऱ्या पाहुण्यांनी आणि शाळेत भेटणाऱ्या शिक्षक, काही अती जागरूक पालकांनी घातली होती त्यामुळे त्यांची इच्छा आणि गरज नसूनही लोकलाजे करिता त्यांनी आदित्यला खासगी शिकवण्या लावल्या होत्या.
त्याच्या वर्गातल्या प्रत्येक मुलाची अवस्था जवळ पास अशीच होती. अभ्यासाचे वेळापत्रक जरी दहावीतल्या मुलांसारखे असले तरी प्रत्यक्षात तो आठवीत होता . त्यामुळे अनेकदा आईबाबंकडून त्याला वेळापत्रकात बदल करण्याची मुभा मिळत होती म्हणून सुरवातीला आदित्यने या सगळ्याची फारशी दखल घेतली नाही. त्याचे आई वडील जागरूक राहून त्याचा अभ्यास घ्यायचे पण तो कंटाळतो आहे असं जाणवल्यावर त्याला सक्ती करत नव्हते.
जेव्हा तो प्रत्यक्षात दहावीत गेला तेव्हा मात्र असच एखाद्या क्षणी तो अभ्यासाला कंटाळुन मैदानात खेळण्यासाठी गेला असता तिथे ओळखीचे लोक भेटले की ," दहावीत न रे तू? दहावीत तर खूप अभ्यास असतो तुला खेळायला वेळ मिळतो का?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडत. तो हुशार नसला तरी अभ्यासात चांगला होता परंतु पुस्तकी किडा बनणे त्याला पसंद नव्हते. समाजात मात्र तोंडासमोर कायम पुस्तक घेवून बसणाऱ्यालाच हुशार मानलं जात होतं.
हे कमी म्हणून की काय हे ओळखीचे लोक घरी आले किंवा आईवडिलांना इतर कुठे भेटले तर जमेल तसे आणि तितके सल्ले देत होते. "मुलाकडे लक्ष द्या. अमक्याचा अमका / तमक्याच्याची तमकी बघा कसे अभ्यास करतात. त्यांनी बघा कसली भारी अमुक अमुक शिकवणी लावली आहे. त्यांच्या मुलाचे अभ्यासाचे वेळापत्रक बघा कसे आदर्श आहे . तुम्ही आदित्यला वेळीच अभ्यासाला लावलं नाहीतर पुढे खूप कठीण जाईल" असे बोलून कळत नकळत स्पर्धेची भावना त्याच्या आणि त्याच्या पालकांच्या मनात रुजवत होते. याचा परिणाम म्हणून अखेर त्यांच्या मानगुटीवर परिक्षेचे भूत अगदी आरामात विसावले.
आदित्यला सारखं वाटे , "आपल्याला काय करायचे आहे, याचा निर्णय आपण घेण्याचं स्वातंत्र्यच राहिलं नाही . कायम इतरांना काय वाटतं , काय करणं समाज मान्य आहे , इतरांच्या अपेक्षांच्या यादीलाच महत्त्व आहे. रोज एक जण तरी आपल्या पालकांना आपण दहावीत असल्याची आठवण करून देतं. आपण काय करावे म्हणजे फायद्याचे ठरेल याबद्दल सल्ले देवुन जातं. आम्हाला भविष्यात काय करायचे आहे याचा विचार आम्हाला आणि आमच्या पालकांना करू न देता समाजच सगळं ठरवू पाहतो. आमचं अपयश हे समाजाच्या यशाबद्दल च्या निकषांवर ठरवलं जातं. दहावी.... बारावीला अवास्तव महत्त्व देवुन समाज नकळत किती त्रास देतो आम्हा मुलांना .... पर्यायाने त्यांच्या पालकांनाही. प्रत्येकाने डॉक्टर, इंजिनियर आईआईटी केलंच पाहिजे असा आग्रह का? यशस्वी होण्यासाठी आभ्यासक्रमात इतरही अनेक उत्तम पर्याय उपलब्ध असताना केवळ लोकांना दाखवायला म्हणून आपल्या बुद्धीला, मानला न झेपणारे क्षेत्र का निवडायचे?
असे निराश करणारे विचार त्याच्या मनात रुंजी घालू लागले. मनावर अभ्यासाचा ताण जेवढा आला नव्हता त्यापेक्षा कैक पटीने अधिक लोकांच्या वागण्याचा, बोलण्याचा , त्यांच्या अपेक्षांचा ताण त्याला जाणवू लागला. परिक्षेच्या भुताने त्याला पार जेरीस आणले. त्याचं खेळकर व्यक्तिमत्व बदलून तो गंभीर झाला.
त्याची जी परिस्थित झाली होती
तीच त्यांच्या पालकांचीही झाली होती. त्यांना काय वाटतं याला फारस महत्वाचं उरलं नव्हतं. मुलगा दहावीत शिकायला असलेल्या पालकांनी जसे वागणे अपेक्षित असते तसेच त्यांनी वागावे असा समाजाचा आग्रह महत्त्वाचा ठरत होता. आदित्यने शिकावं, मोठं व्हावं ही त्यांचीही इच्छा होतीच परंतू त्यासाठी कोणता मार्ग निवडावा हे सर्वस्वी आदित्यने ठरवावं असं त्यांचं मत होतं परंतु मिळणाऱ्या सल्ल्यांनी ते कळत नकळत स्पर्धेत सहभागी झाले.
त्यांनी आदित्यसाठी कोणत्या शिकवण्या लावाव्या इथपासून आदित्यचा आहार कसा असावा इथपर्यंत सगळं काही इतर पालकांच्या अनुकरणातून केलं जावू लागलं. अनेकदा मनात नसताना केवळ सगळे करतात आपणही केलेच पाहिजे या भावनेतून ते स्वतः ला आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या न परवडणाऱ्या गोष्टी करत होते. ते इतरांचे बघून बघून स्वतःला नालायक पालक समजून घेत होते. परिक्षेच्या भूताने
त्यांच्या मनाचाही कोंडमारा केला होता.
खोडकर, खेळकर असलेला आदित्य अचानक अबोल, गंभीर झाला . त्याला घरच्यांच्या , शिक्षकांच्या आणि समाजाच्या अपेक्षांचे ओझे जाणवू लागले. त्याला सतत आपण
नापास झालो तर... याची भिती वाटू लागली. त्याच्यात झालेला हा बदल आदित्यच्या आईला जाणवल्या शिवाय राहिला नाही.
त्यांनी याबाबत आदित्यच्या वडिलांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.
रोज एक जण तरी आपल्याला आदित्य दहावीत असल्याची आठवण करून देतं. आपण काय करावे म्हणजे फायद्याचे ठरेल याबद्दल सल्ले देवुन जातं. दहावीला बारावीला अवास्तव महत्त्व देवुन आपल्या आणि आदित्यच्या मनात परीक्षेची भिती निर्माण करतं. हे त्यांना प्रकर्षाने जाणवलं. याबद्दल चर्चा झाल्यावर दोघांनीही "समाजाच्या जीवघेण्या स्पर्धेत सहभागी न होता.... समाजाच्या दृष्टीने आदर्श पालक होण्यापेक्षा , मारून मुटकून संस्कारी मुल घडवण्यापेक्षा आपल्या मुलाला समजून घेवुन... योग्य मार्गदर्शन करून त्याचा उत्तम विकास करू . आपल्या व आदित्यच्या मानगुटीवर बसलेले परिक्षेचे भूत हाकलून लावू " असा संकल्प केला.
आदित्यला विनाकारण अभ्यासाचा ताण दिला जावू नये . शिक्षण हे आयुष्यातील आनंद गमावण्याचा मार्ग न होता अधिकाधिक उत्तम ज्ञान मिळवण्याचे साधन बनायला हवे. शिक्षणाने मुलांच्या मुळ जिज्ञासू वृत्तीला आळा न बसता अधिकाधिक पोषण मिळायला हवे. भविष्यातील यशापयशाचे आराखडे हे मुलांच्या परीक्षेतील गुणांवर नसावे.
यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी मुलाला योग्य मार्गदर्शन करावे . स्वत:च्या आवडीनिवडी मुलांवर लादू नये. आपल्या मुलाच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावे समाजाच्या दबावाला बळी पडून इतरांचे अंधानुकरण करू नये.
याबाबत दोघांचेही एकच मत झाले. आदित्यवर असलेला अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते ते सगळं करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम आदित्यला विनाकारण सल्ले देवून हैराण करणाऱ्या प्रत्येकाला स्पष्टपणे समज द्यायची. ते करत असलेल्या सक्तीला बळी न पडता आदित्यच्या बाजूने ठामपणे उभे रहायचे. आपण घेतलेल्या निर्णयाबाबत आदित्यशी मोकळेपणाने संवाद साधायचा. आदित्यची मते जाणून घेवून त्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन मिळवून द्यायचे. त्याला परीक्षेची भिती न वाटता तो खुल्या मनाने परिक्षेला सामोरा जायला हवा. त्याने परिक्षेकडे एक संधी म्हणून बघायला हवे. या मतापर्यंत दोघेही येवुन पोहचले.
आधीच खूप वेळ अनुकरण करण्यात वाया गेला होता अधिक वेळ न घालवता त्यांनी आदित्यशी बोलण्यासाठी त्याच्या खोलीत प्रवेश केला.
तो चिंताक्रांत चेहऱ्याने अभ्यास करत असतांनाच आई बाबांनी
त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्यानें वळून मागे बघताच त्यांनी सांगुन टाकलं ," आदी ..... तुला जे हवं तेच कार्यक्षेत्र निवड आमचा पुर्ण पाठिंबा आहे . परिक्षेत गुण किती मिळतील याला महत्त्व नाही . तू काय शिकलास याला महत्त्व आहे. उत्तम कार्यक्षेत्र निवडून भरपूर पैसा कमावणे येवढेच आयुष्याचे ध्येय नाही. आधी उत्तम नागरिक, उत्तम व्यक्तिमत्व असलेला माणूस म्हणून जगायला शिक. जे शिकशील ते मनापासून शिक. जे करशील ते मन लावून कर."
त्याने उठून आई बाबांना मीठीच मारली व म्हणाला "असे आई बाबा असतील तर जीवनात मी १०० टक्के यशस्वी होईलच".
त्यानंतर कधीही त्याच्या आईवडिलांनी इतर जागरूक पालकांचे अंधानुकरण केले नाही की समाजाचा दबाव ही आदित्यच्या मनावर लादला नाही.
आज या घटनेला बरीच वर्षे झाली. आदित्य दहावी, बारावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. कॉमर्समधे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. स्वतःची सुटका टॅक्स कन्सल्टन्सी फर्म सुरु केली. मेडिकल, इंजिनियरिंग, आयआयटी हे क्षेत्र न निवडता त्याच्या खेळकर स्वभावाला झेपेल असे क्षेत्र निवडले.
समाज ज्यांना यशस्वी मानतो अशा मुलांमधे त्याची गणना होत नसली तरी तो आत्मनिर्भर आहे. त्याच्या आवडीच्या
क्षेत्रात काम करत असल्याने आनंदी आहे. स्पर्धेच्या धावपळीतून मुक्त होवुन समाधानी आयुष्य जगत आहे . अनेक मोठ्या कंपन्या मधे त्याला " तणाव मुक्त जीवन पद्धती" या विषयावर समुपदेशन करण्यासाठी बोलावण्यात येतं . आपल्या सामुपदेशनात तो नेहमी त्याच्या आनंदी आयुष्याचे श्रेय आई बाबांना देतो.
त्याच्या उत्साही तणाव मुक्त चेहऱ्याकडे बघून आई बाबांनाही त्यांनी आदित्य दहावीत असतांना केलेल्या संकल्पाचे समाधान वाटते.
अनेक पालक कळत नकळत आदित्यच्य आईबाबां सारखे समाजाच्या स्पर्धेला बळी पडतात. इतर पालकांचे अंधानुकरण करत आपल्या मुलाच्या आवडी निवडी, बौध्दिक क्षमतेचा विचार न करता धोपट मार्ग अवलंबतात. अनेकदा या प्रक्रियेमधे मुलं नैराश्यात जाते. मुलाला अपेक्षित यश मिळाले नाही तर पालकही निराश होऊन जातात.
प्रत्येक मूल वेगळे असते त्याची बौध्दिक क्षमता वेगळी असते. त्यांच्यावर सक्ती न करता त्यांच्या आवडीनुसार कार्यक्षेत्र निवडण्यास प्रेरित केले तर ते स्वतःहून यशाचा मार्ग शोधतात.
परिक्षेत मिळणारे गुण हे केवळ तो विषय मुलांना कितपत समजला आहे हे जाणून घेण्याचे साधन आहे. त्यांना अवास्तव महत्त्व देवू नये.आदित्यच्या आई बाबांनी परीक्षेच्या भुताला जसे हाकलून लावले तसेच प्रत्येक पालकाने करायला हवे. मुलांच्या मनातील परीक्षेची भिती घालवून त्यांना खुल्या मनाने परिक्षेला सामोरे जाण्याची सवय लावायला हवी.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहीत करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
No comments:
Post a Comment