मुरलेल्या नात्याचा व्हॅलेंटाईन डे

#मुरलेल्या_नात्याचा_व्हॅलेंटाईन_डे



        काय गंमत आहे ना .....
निसर्गात झाडांची पानगळती सुरू होते आणि मना मनात मात्र प्रेमाचा वसंत फुलतो.
लग्नाआधी 'दिलं तो पागल है' मधल्या माधुरी सारखं रात्री १२ वाजेपर्यंत जागून व्हॅलेंटाईन  मिळेल या आशेने जागण्याचा प्रयत्न केला होता पण नाही जमल तेव्हा स्वतःच सांत्वन करून घेतल की ," आपलेही दिवस येतील ..... जेव्हा चॉकलेट डे, टेडी बिअर डे , रोझ डे , प्रपोज डे .... विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन डे  आपण दणक्यात साजरा करू "
           लग्न ठरलं आणि माझे दिवस आले ......
चॉकलेट , टेडी .... गुलाब सगळं कसं न मागता मिळालं . रोज येणार पार्सल आणि त्यातल्या भेट वस्तू बघून सगळ्यांनी खूप चिडवलं . पहिल्यांदाच सगळे आपल्याला चिडवतं आहे आणि आपल्याला मनात गुदगुल्या होतात आहे ..... अगदी डेरी मिल्कच्या जाहिराती सारख्या " मन में लड्डू फूटा" असं वाटलं.
           लग्न झालं .... डोक्यावर अक्षदा सोबत संसाराच्या जबाबदाऱ्या ही पडल्या. रोजच छोट्या मोठ्या गोष्टीतून प्रेम व्यक्त होवु लागलं . खास एका दिवसासाठी काही राखून ठेवणं  जड जावू लागलं.
त्याने कधी चॉकलेट आणलं तर ," येवढं मोठ चॉकलेट 😲😲😲😲 हे खावून माझं वजन किती वाढेल "अशी ओरड मी करण्याआधीच मुलाने  ते माझ्या हातून हिसकावलेल असे.
टेडी आणला तर ," घरात माणसापेक्षा टेडी च जास्त झालेत. "
गुलाब आणला तर ," दोन दिवसात सुकून जातात रे ..... नंतर बघवत नाही त्यांच्याकडे , फेकण्याची इच्छाही होत नाही "
ग्रीटिंग कार्ड, शो पीस म्हणजे निव्वळ पैशाचा अपव्यय.
अशी तक्रार माझ्याकडून केली जावू लागली.
त्याने आवडीने ड्रेस किंवा साडी आणावी. त्या कापडाचा रंग, पॅटर्न पाहून .... लपवू म्हटलं तरी कपाळावरची आढी लपवता येत नसे.
 
          तरीही मी पेपरमधे WhatsApp वर आलेल्या पोस्ट वाचून त्याला म्हणतेच, " लग्नाआधी कसा होतास तू मी नको नको म्हणत असतांनाही प्रेम व्यक्त करण्याची एक संधी सोडत नव्हता. आता मात्र तुझं प्रेमाचं नाही माझ्यावर ..... म्हणून सारखं बोलून दाखवतो ," रोजचं व्हेलेंटाईन डे मानणाऱ्यासाठी असं एका दिवसाचं प्रेम नसतं कधी ....
 प्रत्यक्षात मात्र नुसता छळतोस मला "
            हे ऐकल्यावर तोही बोलायला मागे राहत नाही....
काय?????  मी छळतो तुला...
तुझा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत जावा  म्हणून घर भर मुद्दाम माझं सामान पसरवून जातो. ते आवरताना तुला माझी आठवण रहावी हाच उद्देश . तू आवरल्यावर माझी एक वस्तू मला कधी वेळेवर मिळत नाही तरी मी कसलीच तक्रार करत नाही. ती सापडावी म्हणून प्रयत्न करतांना तुझ्यासाठी  पुन्हा घरभर वस्तू पसरवतो.
बाहेर गावी असलो की तिथे जावूनही जेवतांना न चुकता तुला फोन करतो.... तिथल्या चांगल्या चुंगल्या पदार्थाचं  वर्णन करतो जेणे करुन तू प्रेरणा घेवून नेहमी काही तरी नवीन करत रहावं हाच उद्देश.
तू सांगितलेली अनेक छोटी मोठी कामं विसरतो जेणे करुन माझ्यावर अवलंबून न राहता तू तुझं नियोजन अधिक चांगलं करावं.
तू कामात असताना मी पेपर वाचायला घेतो .... जेणे करुन तुझ्या कामात माझी लुडबुड नको म्हणून
येवढं च काय पण अनेकदा तुझा तोंडाचा पट्टा अखंड सुरू असतो तेव्हा ही एका शब्दाने  वाद न घालता मी मुकाट पेपर वाचत असतो.
तुझ्या 'सुख दुःखात' साथ देण्याच वचन दिलं आहे त्याप्रमाणे तुझ्या 'दुःखात सुख' मानून घेतोय ना.
  तरी मीच छळतो तुला .......😲😲😲
( कितीही राग आला तरी मीच माघार घेतो त्यांचं तर बोलायची ही सोय नाही .... असं पुटपुटत तो माझी समजूत काढायला सुरुवात करतो)

    राणी चिडू नकोस . चिडली की तू खूप गोड दिसते मग तोंड गोड करणारा ' चॉकलेट डे ' साजरा करावा 😉 वाटतो..... अजून तर सात जन्म सोबत काढायची आहेत. माझं हे चीडकं चॉकलेट ही मला सात जन्म पुरवायच आहे . सगळं आताच चिडून घेशील तर पुढच्या जन्मी काय करशील?

अशी तो माझी समजूत काढण्यात यशस्वी होतो ..... प्रेमाचा पुरावा म्हणून काही भेट वस्तू मिळेल या आशेने मी सुरू केलेला लाडिक वाद ..... तो मला कसा छळतो हे स्वतः कबूल करूनही तोच किती सोशिक आहे हे मला नव्याने पडवून देवून मिटवतोही.

माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून दर वर्षी मात्र तो न चुकता चॉकलेट्स आणि गुलाबाची फुलं आणतोच.
मी ही मग सगळे रुसवे फुगवे विसरुन माझ्या गुबगुबीत टेडी बिअरला मिठी मारते.
      आज तर " चॉकलेट्स आणि गुलाब आणलेस तर याद राख.... " अशी धमकीच दिली आहे. बघू माझी ही धमकी तो गांभीर्याने घेवून गिफ्टच्या बाबतीत काही नवीन प्रयोग करतो की हिच्या कडेही दुर्लक्ष करून नेहमीचा धोपट मार्ग अवलंबतो.    ©️ अंजली मीनानाथ धस्के
व्हॅलेंटाईन डे

तू मिठी मारता
धडधडते काळीज....
तुझ्या संगतीत
फक्त आनंदी क्षणांची बेरीज...

शरीराची भूक नाही
 प्रेमाची कबुली आहे...
 हे फक्त ' चुंबन ' नाही
  आनंदी आयुष्याची सुरवात आहे...

  दिखावू प्रेम नको 
 आंतर मनाची साद दे... 
एका दिवसाचा खेळ नको
 रोजचं असावा व्हेलेंटाईन डे...


©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः कृपया कोणी कमेंट मधे " मिळालं का काही विशेष गिफ्ट " अशी चौकशी करू नये. उगाच समजुतीने मिटणारा वाद तुमच्या अशा प्रश्नाने विकोपाला जावू शकतो 😝😝😝😝 वाद विकोपाला गेल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल व आवडीचे गिफ्ट तुम्हाला शिक्षा म्हणून तुमच्याकडूनच घेण्यात येईल.😉😂😂😂




No comments:

Post a Comment