गृहिणीही असते स्वयं सिद्धा

#गृहिणीही_असते_स्वयं_सिद्धा

          निशा तशी चुणचुणीत मुलगी. अभ्यासातही तिची प्रगती तशी बरीच होती. सतत आईच्या मागे मागे राहून ती जे काम करत असेल ते शिकण्याचा हिचा खटाटोप सुरू असायचा.
             आई कुठे बाहेर गेली की घर आवरून ठेवायचं. आई आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा. आईने कौतुक केले की हरखून जायचं . यातच ती रमायची.
         घरात  अभ्यासाचं वातावरण होत. वडिलांची कडक शिस्त होती. घर कामाला बाई होती पण ही सतत घर झाडणे, फारशी पुसणे , अंगणात सडा टाकणे, रांगोळी काढणे , भांडे लावणे , ओटा आवरणे , स्वतःचा  गणवेश स्वतः धुणे या कामात रमायची.
       परीक्षा आली की अभ्यासापेक्षा सुट्या लागल्यावर भरतकाम, विणकाम किंवा शिवणकाम शिकण्याचे वेध तिला लागतं. इतर भावंड अभ्यासात मग्न असतांना ही मात्र आई आज काय नवीन पदार्थ बनवणार आहे हे शिकत असायची. आई तिला परोपरीने सांगायची ही सगळी कामं सहा महिन्यांत येतील तुला पण आता अभ्यास महत्त्वाचा . तिच्या या सवयीने ओळखितले लोकही तिला चिडवायचे ," अभ्यासात लक्ष नाही पोरीच . पुढे चालून मुलांना नोकरी करणारीच बायको हवी असणार . नोकरी करणारी बायको मिळाली की घरकामाला काय आणि स्वयंपाकाला काय.... बाई ठेवता येते. हिच्याशी कोण लग्न करेल ?"
    मुलींनी शिकून चांगली नोकरी मिळवली तरच चांगला नवरा मिळतो , लग्न लवकर जुळतं  अशी समाजाची मानसिकता झाली होती.
       मुली मात्र शिक्षण हे केवळ चांगली नोकरी मिळावी म्हणून घेत नव्हत्या तर आपण आत्मनिर्भर व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं  या उद्देशाने शिकत होत्या.

         पुढे पुढे ती मोठी झाली तसं तिला जाणवू लागलं की, "*घरात  कमावणाऱ्या स्त्रीचे मत निदान गृहीत धरले जाते .... न कमावणाऱ्या स्त्रीला तर फक्त गृहीतच धरले जाते*".
        तिला या सगळ्याची चीड यायची. संसार करण्यासाठी दोघांची मन जुळली पाहिजे. केवळ नोकरी बघून लग्न करणारा मुलगा त्या मुलीवर खरंच प्रेम करेल ? तिच्या पगारावर लक्ष ठेवून असणारा मुलगा तिच्या मनाचा विचार करेल? नोकरी करत घर सांभाळण्याची कसरत करतांना तो तिची बरोबरीने साथ देईल??
बायको नोकरी करणारी असावी अशी मागणी असली तरी तिने घर उत्तम पद्धतीने सांभाळावं अशीच मुलांची अपेक्षा असायची.
घर सांभाळणं बायकोचं आद्य कर्तव्य आहे तर नोकरी करून संसाराला हातभार लावणे ही तिचीच जबाबदारी आहे . असा समज तेव्हा समाजात रूढ होता.
       निशाने शिक्षण पूर्ण केलं .  तिला नोकरीही लगेच लागली. तरी लग्न ठरवतांना अडचणी येत होत्याच.
 लग्ना नंतर नोकरी करणार का? असा प्रश्न हिला विचारला  की ही लगेच उत्तर द्यायची ," घरच्यांनी सहकार्य केलं तरच नोकरी करणार अन्यथा घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत केवळ अशक्य . यापैकी एकच मी चांगल्या पद्धतीने करू शकेन "
असं उत्तर द्यायची. त्यामुळे साहजिकच तिला नकार दिला जायचा .
आपण नोकरी केलीच पाहिजे असा आग्रह धरणारा नवरा तिला नको होता. आपण काय करावं, काय करू नये याचं भान आपल्याला नक्कीच आहे मग ते करण्याचं स्वातंत्र्य ही मिळायला हवं. आपल्याला आपल्या पगारावर नाही तर आपल्यावर प्रेम करणारा जीवनसाथी हवाय.  नवऱ्यावर एकट्यावर संसाराचाआर्थिक भार नको म्हणून आपली  नोकरी नक्कीच महत्त्वाची पण ती करतांना त्यानेही संसारातल्या घरगुती कामांचा व्याप त्याच्या परीने वाटून घ्यायला हवा. हे करतांना कोणाचीही कोणाला सक्ती नकोच पण समजून उमजून संसार करायला हवा . असं तिचं मत होत.
         तिच्या काही मैत्रिणींची लग्न झालीत. गरज नसतांना फरफड होत असूनही आपण  खूप शिकलो म्हणजे नोकरी केलीच पाहिजे नाहीतर सगळं शिक्षण वाया जाईल अशा गैरसमजाला बळी पडून काही जणी नोकरी करत होत्या.  काही जणी सासू घरी त्रास देते म्हणून इच्छा नसतांनाही  नोकरी करत होत्या. काहींना घर कामाचा कंटाळा . या कामांपासून सुटका मिळावी म्हणून नोकरी करत होत्या. काहींना त्यांच्या  खर्चासाठी नवरा पैसे देत नाही म्हणून नोकरी करत होत्या. लग्नानंतर फार कमी मैत्रिणी अशा होत्या की त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती म्हणून त्या नोकरी करत होत्या आणि घर नोकरी यांचा बीनतक्रार मेळ बसवत होत्या. तिला अशा मैत्रिणीनं बद्दल नितांत आदर होता. नोकरी आणि घर अशी तारेवरची कसरत सोपी नसते हे ती जाणून होती.
     कालांतराने तिचही लग्न झालं. मुंबईतला नवरा मिळाल्याने घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत सुरू झाली पण नवरा तिला सर्व तोपरी सहाय्य करत होता.  कोणतंही काम मनापासून करण्याची तिची सवय असल्याने ती  घर  उत्तम प्रकारे सांभाळून नोकरी करत होती. आपल्या क्षेत्रात काहीतरी कामगिरी करून दाखवायची इच्छा असल्याने नोकरीच्या ठिकाणीही तिच्या चांगल्या कामामुळे तिला बढती मिळत होती.
        ती आई होणार आहे अशी जेव्हा तिला चाहूल लागली तेव्हा मात्र तिच्या होणाऱ्या बाळाला तिने प्राधान्य क्रमात अग्रभागी  ठेवलं. बाळाचा जन्म झाला. तिचं विश्व त्याच्या भोवतीच घुटमळू लागलं. कामावर जायला तिचा पाय उचलेना. कामावर गेलं तरी घरची ओढ तिला काम करू देईना . जिथे पगार घेवूनही आपण आपल्यातलं उत्तम देवू शकत नाही तिथे काम करण्याचा आपल्याला अधिकार नाही. या विचाराने तिची चीड चीड होवु लागली. या चिडचीडीमुळे बाळा सोबत घालवायचे आनंदी क्षणही बिघडू लागले तेव्हा तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
      तिच्या सासर आणि माहेरकडच्या कोणालाही तिचा हा निर्णय पटला नव्हता.
 नोकरी न सोडता काही दिवस सुट्टी घेऊन बाळाला पाळणाघराची सवय करावी याच मताचे सगळे होते. बाळ लहान आहे तोपर्यंतच पाळणा घराची सवय होते नंतर फार जड जातं. मग घरातून बाहेर पडणं कठीण होत. असे कळकळीचे सल्लेही तिला अनेकींनी दिले.
इवल्याशा बाळाला पाळणाघरात ठेवायला तिचं मन तयार नव्हतं. बाळाच्या जन्मानंतर खर्च वाढले हे जरी खरं असलं तरी त्याला सध्या आईचीच गरज जास्त आहे. तिने नोकरी केली नाही तर घरात येणारा पैसा कमी होईल, त्यांना त्यांच्या गरजा कमी कराव्या लागतील, नवऱ्याच्या पगारात सगळे खर्च बसवावे लागतील. याची तिला पूर्ण कल्पना होती. त्यासाठी तीची मनापासून तयारीही होती.
तिने नोकरी करावी किंवा करू नये हा सर्वस्वी तिचाच निर्णय असावा या मताचा तिचा नवरा असल्याने  तिची बाळासाठीची तगमग बघून फक्त नवऱ्यानेच तिला नोकरी सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी पाठींबा दिला .
        "तुझी इच्छा झाली तर नोकरी पुन्हा मिळवता येईल पण आपल्या बाळाचं बालपण तुला पुन्हा बघायला मिळणार नाही. आपल्या दोघानाही त्याच्या सोबत घरी राहता आलं असतं तर मजा आली असती पण आपल्यापैकी एकाने कामावर जाणं गरजेचं आहे. बाळाला तुझी गरज जास्त आहे तेव्हा तूही मोकळेपणाने आई होण्याच्या सुंदर अनुभवाचा आनंद घे आणि मीही जबाबदार बाबा होण्याचा प्रयत्न करतो  ". अशी  हसून त्याने तिची समजूत काढली.


त्याच्या त्या शब्दांनी तिला खूप धीर मिळाला . नोकरी की बाळ यात बाळाची तिने निवड केली. घरात येणारा पैसा अचानक कमी झाला आणि बाळाच्या आगमनाने खर्च तर वाढले होते. अनेक आव्हाने निर्माण झाली पण दोघांनी एकमेकांच्या साथीने त्यावर मात केली. यामुळे त्यांच्या तिघांचे संबंध अधिक दृढ झाले.
              इतर आप्तगण जेव्हा घर, गाडी , स्थावर मालमत्ता जमवत होते तेव्हा हे दोघं मुलाच्या संगोपनात रमून गेले होते.
अनेक समारंभात तिच्या आप्तपरिवाराकडून आपल्या उंचावलेल्या राहणीमानाचा वापर करून निशाचा नोकरी न करण्याचा निर्णय कसा चुकला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जायचा. वर्ग मित्रही ," तू एवढी शिकली तेव्हा आम्हाला कधी वाटलच नाही की तू अशी घरी काकू बाई होवून बसशील" असं बोलून जायचे. एखाद्या मैत्रिणीने ती जोपासत असलेल्या छंदांच कौतुक केलं तर बाकीच्या म्हणायच्या ," काय फायदा त्या छंदांचा त्याने  फक्त वेळ मजेत जातो  पैसे मिळत नाही . नोकरी केली असती तर चार पैसे फेकले की सगळं आयतं मिळालं असतं " असं बोलून तिचा हिरमोड करत होत्या.  तर काहींना वाटायचं ती घरीच असते ना मग काय नवल तिच्या छंदांच.
समाजात वावरतांना तिच्या घरी असण्याचा , निव्वळ गृहिणी असण्याचाच उहापोह केला जायचा.
      तिचं यश नेहमीच पैशात तोलल जात होत.
तिच्यावर याचा काहीच परिणाम होत नव्हता कारण नोकरी करणाऱ्या/ पैसे कमावणाऱ्या मधेही आपापसात कायम चाढाओढ सुरू असायची. ती स्पर्धा त्यांना कधीच पूर्णपणे आनंदी राहू देत नव्हती . निशाला कोणी स्पर्धेत धरत नव्हतं आणि तीही  कोणाशीच कधी स्पर्धा नव्हती. त्यामुळे बाह्य जगाशी जुळवून घेतांनाही तिचा आनंद हा सर्वस्वी तिचा होता. तिच्या या वृत्तीमुळे तिचा नवराही समाधानी होता.
       कोणी काहीही बोललं तरी तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं तिला स्वातंत्र्य होत. तिने घेतलेले निर्णय हे सर्वस्वी तिचेच होते आणि त्याबद्दल तिच्या मनात कोणताच पश्चाताप नव्हता.
        "नोकरी करून किती दगदग होते , कमावलेल्या पैशाचा उपभोग घ्यायलाही वेळ नाही, मुलांना द्यायलाही वेळ मिळत नाही. सुट्टी घेऊन घरी बसलो तरी काम सुधारत नाही. "  अशा इतर मैत्रिणीसारख्या कौतुक वजा तक्रारी तिच्या जवळ नव्हत्या परंतु अनेक सुखद आणि निवांत क्षण तिने  कुटंबीयांसोबत घालवलेले होते . तिच्या नवऱ्याची तिला पूर्ण साथ होती म्हणून तीही निर्धास्त होती.
          दोघांनाही   रोज आपण आपल्यातलं उत्तम द्यायचं हिच सवय असल्याने दोघेही आपापल्या क्षेत्रात पुढे जात होते.
 सोशल मीडियाचा वापर करून ती आपल्या छंदांना अनेकांपर्यंत पोहचवत होती . ज्यांना तिच्यासारखे छंद जोपासायाचे होते त्यांना मदत आणि मार्गदर्शन करत होती. तिने अनेक गृहिणींना छंद जोपासत आनंदी राहण्यासाठी प्रेरित केले होते. अनेक गृहिणींना तिने त्यांचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला.
 ती  कोणाला  रांगोळी काढायला शिकवायची तर कोणाला भरतकाम , कधी चित्रकलेचे धडे द्यायची तर कधी विशिष्ट पदार्ध सोप्या पद्धतीने करून दाखवायची.  हळू हळू सोशल मीडियावर तीला चांगलीच प्रसिध्दी मिळाली.
गृहिणी म्हणून काम करतांना आपलं बँक बॅलेन्स नक्कीच वाढत नाही पण आहे त्या वेळेचा सदुपयोग करून सतत काही तरी नवीन शिकत राहिलो तर वेळ मात्र आनंदात जातो . आपण आनंदी राहिलो तर घर आनंदी राहतं. हे अनुभवाने ती शिकली होती आणि इतरांनाही शिकवत होती.



     तिच्या छंदांनी तिला नवी ओळख मिळवून दिली.  तिच्या छंद जोपासण्याच्या याच  सवयीची नोंद ' स्वयं सिद्धा' या सुप्रसिद्ध  कार्यक्रमाने घेतली. त्यांच्या  'आनंदी आयुष्यासाठी छंद जोपासलेच पाहिजे ' या भागाकरिता त्यांनी तिची मुलाखत घेवून तिचा सत्कार करण्याचं ठरवलं . तिच्यासारख्या इतर काही गृहिणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या . त्यांच्याही मुलाखती होत्या. प्रत्येकीला ," तू काय घरीच असते" या समाजाच्या मानसिकतेला सामोरं जावं लागलं होतं.  त्यांना भेटून आणि बोलून तिला बरच मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याकडून  तिला तिच्या कामा प्रती अधिक प्रेरणा मिळाली. एक नवीन आत्मविश्वास मिळाला.
  तिला नोकरी सोडून आज १२ वर्षे पूर्ण झाली होती आणि योगायोगाने आजच  टी व्ही वर तिची मुलाखत झळकली . त्यातलं तीच प्रसन्न हास्य बघून आणि आत्मविश्वास पूर्ण बोलणं ऐकून अनेकांना  प्रेरणा मिळाली . अनेकांना तिचा हेवा वाटला.
      सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.  नोकरी सोडून घरी बसली म्हणून बोल लावणाऱ्या मित्रमंडळीलाही आज तिचा अभिमान वाटत होता.
आज तिचे यश पैशात तोलाता येत नव्हते. तिने पैसा कमावला नव्हता पण कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांच्या आनंदाने तिच्या आठवणी मात्र कायमच्या श्रीमंत झाल्या होत्या. पैसा हे तुमच्या यशाचं आणि आनंदाचं मापदंड ठरू शकत नाही हे तिने सिद्ध केलं होत.

©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः
 कथा आवडल्यास नक्की कळवा. शेयर करताना नावासहितच करावी हिच विनंती. इतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहे. ब्लॉग ची लिंक anjali-rangoli.blogdpot.com ही आहे.







            

No comments:

Post a Comment