आठवणीतली दिवाळी

#आठवणीतली_दिवाळी
#ठिपक्यांची_रांगोळी
       आमच्या लहानपणी रंगीत  रांगोळ्या अंगणात सजल्या की दिवाळी आली असं जाणवायला लागायचं. दिवाळीच्या दिवशी तर  ठिपक्यांच्या मोठं मोठ्या रांगोळ्या काढण्याची चढाओढ रंगायची.   संध्याकाळी त्या रांगोळीला दिव्यांनी सजवतांना तर अधिकच मजा वाटायची. अंगणातील रांगोळी दिव्यांनी उजळुन निघाली की आमचे चेहरेही खुलून यायचे.
     ठिपक्यांच्या रांगोळ्यांमधे तुळशवृंदावन, हंसांची जोडी, कमळ फूलं, पोपट, बदक , चांदण्या , फुलपाखरू , हत्ती असे अनेक आकार सहज काढले जायचे. ठिपक्यांची रांग जितकी सरळ , दोन ठिपक्यां मधले अंतर जितके एक समान तितकी रांगोळी सुबक आणि सुंदर यायची . विशेष म्हणजे मोठी रांगोळी काढली तरी घरची सगळीच लहान थोर मंडळी त्यात रंग भरण्याचे काम करू लागतं असे.  शेजारच्यांशी कितीही चढाओढ असली तरी एकमेकींना रंग भरायला मदत करण्यासाठी मात्र सगळ्याच जणींचा कायमच मदतीचा हात पुढे असायचा.
 आमच्यातल्या अनुभवी मुली रंग संगती ठरवत . आम्हीच्यावर मात्र त्यांनी ठरवून दिलेले रंग ठरवून दिलेल्या आकारात व्यवस्थित भरण्याची जबाबदारी असायची.
        या कामात घरी आलेली पाहुणे मंडळीही हातभार लावत असे.  लहान काका आणि आम्ही अनेक दिवाळी सोबत साजऱ्या केल्या . तेव्हा फोन नसले तरी पत्र व्यवहाराने एकमेकांना आमंत्रण दिले जायचे. महिला मंडळी फराळाचे करण्यात मग्न असायच्या तेव्हा काका आणि आम्ही पोरं  आकाशदिवे, झेंडू फुलांच्या माळा , आणि रांगोळी यांची जबाबदारी अगदी आनंदाने स्वीकारत असू.  या व्यापातून वेळ काढून आम्हा मुलामुलींचे किल्ला बनवण्याचे कामही जोरात सुरु असायचे. किल्ल्याच्या सभोवताली  शेणाने सारवून मस्त आंगण केले जायचे . त्या अंगणात विहीर , शेत असं इतर बरंच काही करत असू पण माझ्यासाठी किल्याच्या अगदी समोरचं छोटसं गुळगुळीत आंगण  फार महत्त्वाचं असायचं कारण किल्याच्या समोर पाच ते पाच ठिपक्यांची छोटीशी रांगोळी काढण्याची जबाबदारी माझ्या एकटीची असे . मला ही जबाबदारी अत्यंत प्रिय होती . तिथे काढायची रांगोळी कोणती असेल? त्यासाठीची रंग संगती कोणती असेल? हे सगळं मी एकटीने ठरवलेलं असायचं. तिन्ही सांजेला पूजेची आणि घराभोवती दिवे ठेवण्याची लगबग सुरु असली तरी  त्या रांगोळीवर  एक पणती नेवून ठेवल्याशिवाय मला चैन पडत नसे. किल्ल्यावर इतर दिवे ठेवण्याचं काम आई करायची. ते करत असताना ती आवर्जून माझ्या रांगोळीच कौतुक करायची. तिने  कौतुक करावं म्हणून तर माझी सगळी धडपड असायची. ताई मात्र चिडून आईला म्हणायची , " माझी रांगोळी तिच्या रांगोळी पेक्षा कितीतरी चांगली आहे. तु उगाच तिची खोटी स्तुती करते". त्यावर आई तिला समजावयाची," अग तुझी रांगोळी अप्रतिम असते. तिच्या आणि तुझ्या रांगोळीची मी कधी तुलना करत नाही. तू तिच्या पेक्षा वयाने मोठी  , तुझ्या तुलनेत तिला रांगोळीचा सराव नाही , विशेष म्हणजे तू काढलेल्या रांगोळीत रंग भरून जे रंग उरतात त्यांचाच वापर तिने करायचा असतो . त्यामानाने तिची रांगोळी छानच असते . तिलाही सगळे रंग आणि मोठं आंगण दिलं तर तीही नक्कीच चांगली रांगोळी काढेल . तसंही ती तुझं बघूनच रांगोळी काढायला शिकते आहे. त्यामुळे तिची रांगोळी चांगली आली तर त्यात तुझाही वाटा आहेच. तुमच्या दोघींमधे स्पर्धा निर्माण होवू नये उलट तिने तुझ्या कडून अजून चांगली रांगोळी काढायला शिकावं म्हणून मी तिचं कौतुक करते ".
        यावर ताईनेही कधी आमच्या रांगोळ्यात तुलना केली नाही. उलट त्या नंतर मला रंग देताना ती ते कसलेही आढेवेढे न घेता देवू लागली.
         बालपणी सारखी समाधानी  दिवाळी पुन्हा अनुभवता येणं कठीण म्हणून काळाच्या ओघात मागे पडलेली ठिपक्यांची रांगोळीच यंदा खास दिवाळीच्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला. २० ते २० ठिपक्यांची ही रांगोळी आहे.
ही रांगोळी काढतांना पूर्वी इतकीच मजा आली . या रांगोळीतही रंग भरतांना घरच्यांनी थोडी मदत केली. लक्ष्मीला कमळ फूलं अत्यंत प्रिय असतात म्हणून मग रांगोळीतही कमळ फुलंच रेखाटली आहेत.
तुम्हालाही रांगोळी आवडल्यास नक्की कळवा. आपली प्रतिक्रिया हिच प्रेरणा असते.
सगळ्या वाचकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ....
आपल्याला ही दीपावली सुख, समृध्दी , समाधान , आरोग्यदायी आणि भरभराटीची जावो हीच इच्छा.....
©️ अंजली मीनानाथ धस्के
(इतर लिखाण आणि रांगोळ्या anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे.)

सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 








No comments:

Post a Comment