आठवणीतली दिवाळी

#आठवणीतली_दिवाळी
#ठिपक्यांची_रांगोळी
       आमच्या लहानपणी रंगीत  रांगोळ्या अंगणात सजल्या की दिवाळी आली असं जाणवायला लागायचं. दिवाळीच्या दिवशी तर  ठिपक्यांच्या मोठं मोठ्या रांगोळ्या काढण्याची चढाओढ रंगायची.   संध्याकाळी त्या रांगोळीला दिव्यांनी सजवतांना तर अधिकच मजा वाटायची. अंगणातील रांगोळी दिव्यांनी उजळुन निघाली की आमचे चेहरेही खुलून यायचे.
     ठिपक्यांच्या रांगोळ्यांमधे तुळशवृंदावन, हंसांची जोडी, कमळ फूलं, पोपट, बदक , चांदण्या , फुलपाखरू , हत्ती असे अनेक आकार सहज काढले जायचे. ठिपक्यांची रांग जितकी सरळ , दोन ठिपक्यां मधले अंतर जितके एक समान तितकी रांगोळी सुबक आणि सुंदर यायची . विशेष म्हणजे मोठी रांगोळी काढली तरी घरची सगळीच लहान थोर मंडळी त्यात रंग भरण्याचे काम करू लागतं असे.  शेजारच्यांशी कितीही चढाओढ असली तरी एकमेकींना रंग भरायला मदत करण्यासाठी मात्र सगळ्याच जणींचा कायमच मदतीचा हात पुढे असायचा.
 आमच्यातल्या अनुभवी मुली रंग संगती ठरवत . आम्हीच्यावर मात्र त्यांनी ठरवून दिलेले रंग ठरवून दिलेल्या आकारात व्यवस्थित भरण्याची जबाबदारी असायची.
        या कामात घरी आलेली पाहुणे मंडळीही हातभार लावत असे.  लहान काका आणि आम्ही अनेक दिवाळी सोबत साजऱ्या केल्या . तेव्हा फोन नसले तरी पत्र व्यवहाराने एकमेकांना आमंत्रण दिले जायचे. महिला मंडळी फराळाचे करण्यात मग्न असायच्या तेव्हा काका आणि आम्ही पोरं  आकाशदिवे, झेंडू फुलांच्या माळा , आणि रांगोळी यांची जबाबदारी अगदी आनंदाने स्वीकारत असू.  या व्यापातून वेळ काढून आम्हा मुलामुलींचे किल्ला बनवण्याचे कामही जोरात सुरु असायचे. किल्ल्याच्या सभोवताली  शेणाने सारवून मस्त आंगण केले जायचे . त्या अंगणात विहीर , शेत असं इतर बरंच काही करत असू पण माझ्यासाठी किल्याच्या अगदी समोरचं छोटसं गुळगुळीत आंगण  फार महत्त्वाचं असायचं कारण किल्याच्या समोर पाच ते पाच ठिपक्यांची छोटीशी रांगोळी काढण्याची जबाबदारी माझ्या एकटीची असे . मला ही जबाबदारी अत्यंत प्रिय होती . तिथे काढायची रांगोळी कोणती असेल? त्यासाठीची रंग संगती कोणती असेल? हे सगळं मी एकटीने ठरवलेलं असायचं. तिन्ही सांजेला पूजेची आणि घराभोवती दिवे ठेवण्याची लगबग सुरु असली तरी  त्या रांगोळीवर  एक पणती नेवून ठेवल्याशिवाय मला चैन पडत नसे. किल्ल्यावर इतर दिवे ठेवण्याचं काम आई करायची. ते करत असताना ती आवर्जून माझ्या रांगोळीच कौतुक करायची. तिने  कौतुक करावं म्हणून तर माझी सगळी धडपड असायची. ताई मात्र चिडून आईला म्हणायची , " माझी रांगोळी तिच्या रांगोळी पेक्षा कितीतरी चांगली आहे. तु उगाच तिची खोटी स्तुती करते". त्यावर आई तिला समजावयाची," अग तुझी रांगोळी अप्रतिम असते. तिच्या आणि तुझ्या रांगोळीची मी कधी तुलना करत नाही. तू तिच्या पेक्षा वयाने मोठी  , तुझ्या तुलनेत तिला रांगोळीचा सराव नाही , विशेष म्हणजे तू काढलेल्या रांगोळीत रंग भरून जे रंग उरतात त्यांचाच वापर तिने करायचा असतो . त्यामानाने तिची रांगोळी छानच असते . तिलाही सगळे रंग आणि मोठं आंगण दिलं तर तीही नक्कीच चांगली रांगोळी काढेल . तसंही ती तुझं बघूनच रांगोळी काढायला शिकते आहे. त्यामुळे तिची रांगोळी चांगली आली तर त्यात तुझाही वाटा आहेच. तुमच्या दोघींमधे स्पर्धा निर्माण होवू नये उलट तिने तुझ्या कडून अजून चांगली रांगोळी काढायला शिकावं म्हणून मी तिचं कौतुक करते ".
        यावर ताईनेही कधी आमच्या रांगोळ्यात तुलना केली नाही. उलट त्या नंतर मला रंग देताना ती ते कसलेही आढेवेढे न घेता देवू लागली.
         बालपणी सारखी समाधानी  दिवाळी पुन्हा अनुभवता येणं कठीण म्हणून काळाच्या ओघात मागे पडलेली ठिपक्यांची रांगोळीच यंदा खास दिवाळीच्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला. २० ते २० ठिपक्यांची ही रांगोळी आहे.
ही रांगोळी काढतांना पूर्वी इतकीच मजा आली . या रांगोळीतही रंग भरतांना घरच्यांनी थोडी मदत केली. लक्ष्मीला कमळ फूलं अत्यंत प्रिय असतात म्हणून मग रांगोळीतही कमळ फुलंच रेखाटली आहेत.
तुम्हालाही रांगोळी आवडल्यास नक्की कळवा. आपली प्रतिक्रिया हिच प्रेरणा असते.
सगळ्या वाचकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ....
आपल्याला ही दीपावली सुख, समृध्दी , समाधान , आरोग्यदायी आणि भरभराटीची जावो हीच इच्छा.....
©️ अंजली मीनानाथ धस्के
(इतर लिखाण आणि रांगोळ्या anjali-rangoli.blogspot.com आशयघन रांगोळी या माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे.)

सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 








पणती

#पणती
©️अंजली मीनानाथ धस्के

         यंदा अनेक कंपन्यांनी बोनस द्यायचं टाळलं होतं. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असल्या तरी दिवाळी सण म्हटलं की थोडा तरी हात सैल सोडावाच लागतो. दिवाळी या सणावर यंदा मंदीचे सावट पसरलेले असले तरी बाजार मात्र नेहमीप्रमाणे गर्दीने फुलून गेला होता. कितीही तंगी असली तरी स्वतःसाठी खरेदी करतांना कोणी हातच राखून खरेदी करत नाही. हेच खरं....
                               निशालाही यंदा खर्च कमी करावा असंच वाटतं होतं. तिच्या लहान मुलाला दिवाळी असली की भारी उत्साह असायचा.त्याच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणत त्याच्यासाठी आवश्यक ती खरेदी करणेही गरजेचे होते. इच्छा नसतांनाही ती नवऱ्याच्या आग्रहाखातर त्या गर्दीचा एक भाग झाली होती. ठरलेल्या दुकानातून ठरलेल्या वस्तू घेवून बाहेर पडल्यावर बाजारात असलेल्या मंदिरातही जावून यावं म्हणून ते तिघेही मंदिरात गेले . पुरुषांची रांग लांब असल्याने नवरा आणि मुलगा मंदिरातून बाहेर यायला वेळ होता. शांततेत दर्शन घेवून निशा मंदिराच्या बाहेर पडली. ती बाहेरच्या पायरीवर बसली. तिला गर्दिचा भाग होण्यापेक्षा गर्दीचे निरीक्षण करायला खूप आवडायचे. बाहेर पडल्यावर मंदिराच्या आवारातच एक गजरेवाला गजरे विकत बसलेला होता. ती त्या गजरेवाल्याच निरीक्षण करण्यात रमली. त्याच्या फुलांचा सुगंध मनाला वेड लावत होता. कितीही काटकसरी बाई असली तरी तिला गजऱ्याचा मोह होतोच. अनेक बायका त्याच्याशी भाव करून करून थकल्या पण तो काही ऐकत नव्हता . बायकाही 'महागाईच वाढली आहे, त्याला आपण तरी काय करणार ' असं म्हणत नेहमी १० रुपयाला मिळणारा गजरा शेवटी निमूटपणे २० रुपयाला घेवून आनंदाने केसात माळत होत्या. निशालाही गजरे खूप आवडायचे . लहान असतांना तर गजरा माळल्याशिवाय तिचा दिवस जात नव्हता . हळूहळू तिचे गजरा माळण्याचे वेड कमी झाले. गजरा घेवून त्याचा सुगंध श्वासात भरून घ्यायला मात्र ती कायम उतावीळ असायची.
       तिची पावलेही गजरे वाल्याकडे वळली. ती गजरेवाल्याकडे जाणारh⁷ तोच तिला एका फुगेवाल्याने अडवले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघता त्याला खात्री होती की एकदाका निशाने गजरा घेतला तर ती काही त्याच्याकडून फुगे घेणार नाही. बायकांची सगळी गर्दी गजरे वाल्याकडे होती . त्यांच्या लेखी फुगेवाल्याला अस्तित्व नव्हते. फुगेवाला मात्र गजरेवाल्याकडे जमलेली गर्दी पाहून विचार करत होता ,' आपलंही आयुष्य या फुलांसारखं एकाच दिवसाचं पण सगळ्यांना हवं हवसं असतं तर किती बरं झालं असतं'.
         निशाची नजर जरी गजऱ्यावर खिळली होती तरी तिने फुगेवाल्याला विचारल," कैसा दिया? " त्यानेही लगेच सांगितलं ," सादावाला बीस रुपये और फॅन्सीवाला पचास रुपये". " पचास रुपये " असं ती जरा आश्चर्याने जोरातच बोलली. नकळत तिचा हात वीस रुपयाच्या फुग्यावर स्थिरावला. तिच्याकडे बघून फुगेवाल्याला वाटलं की, तिने तिचा हात वीस रुपयाच्या फुग्यावर ठेवलाय म्हणजे यातही ती भाव करणार .
       कोणता फुगा घ्यावा? तिचा निर्णय झालाच नाही . ती तशीच विचार करत थांबली. खरं तर ज्याच्यासाठी फुगा घ्यायचा होता तो तिचा लाडोबा मंदिराच्या पायरीवर बूट घालण्यात व्यस्त होता. त्याच्याच पसंतीने फुगा घ्यावा म्हणून ती उगाच फुग्यांवरुन हात फिरवीत वेळ काढत होती.
      ती वेळ काढत होती पण इकडे फुगेवाल्याच्या डोळ्यात भीती दाटून आली होती की, ' हेही गिऱ्हाईक काही न घेताच जाणार '. त्याला ती शांतता सहन होत नव्हती म्हणून ती हात ठेवेल त्या फुग्याचा रंग, आकार खूप छान आहे, असं तो सांगू लागला.
         निशाने तेवढ्यातही निरीक्षण केले. त्याचा कळकट अवतार , समोरचं बास्केटमधे पेंगुळेलं छोट लेकरू, तेही तितकच कळकट, सोबतीला मागे कॅरीअरवर त्याच्या अंथरूूणाच गाठोडं.... यावरून त्याच्या परिस्थितीचा अंदाज बांधला. फुगे विकून जे पैसे मिळतील त्यात पोट भरायचं आणि रात्र झाली की जागा मिळेल तिथे झोपायचं. असंच त्याच आयुष्य असावं. याची जाणीव तिला बेचैन करून गेली. 
           आता रात्रीचे आठ वाजले होते. निशा कडे बघत, 'या बाईनेही फुगा घेतला नाही तर?' याची चिंता, वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात छोट्या अक्षयची आणि त्याच्या बाबांची स्वारी आईला शोधत फुगेवाल्यापाशी पोहचली. निशाने अक्षयला लगेच विचारलं, " कुठला फुगा हवाय तुला ?" एरवी काही खरेदी करायचं म्हंटल की नाही म्हणणाऱ्या आईने आज स्वतःहून कोणता फुगा हवाय? असं विचारलं होतं. तिच्या या प्रश्नाने अक्षय खूपच बुचकळ्यात पडला असला तरी चालून आलेली संधी न गमावता त्यानेही लगेच फॅन्सी फुग्यातल्या स्पायडर मॅनकडे बोट दाखवून ," तो हवाय " म्हणून सांगून टाकले . तिनेही लगेच फुगा घेतला. फुगेवाल्याला शंभर रुपयाची नोट दिली आणि पन्नास रुपये परत घेण्यासाठी तिथेच थांबली . त्याने शंभरची नोट हातात तर घेतली मात्र तिला परत देण्यासाठीचे पन्नास रुपयेही त्याच्याकडे नव्हते. त्याचा खिसा रिकामा होता. त्यावरून दिवसभरात एकही फुगा विकला गेला नव्हता याची निशाला कल्पना आली.
        रात्र वाढत चालली तशी सगळ्यांना घरी जायची घाई होती. कोणी चिल्लर देत नव्हते . आता 'ही' शंभरची नोट परत केली तर 'ही' बाई फुगा न घेताच निघून जाणार . चिल्लर नाही म्हणून हाता तोंडाशी आलेली कमाईही जाणार या विचाराने नोट परत देत तो खिन्न हसला. त्याची ही अवस्था बघून निशानेच पुढाकार घेऊन आजूबाजूच्या बायकांना चिल्लर आहे का ? म्हणून चौकशी सुरु केली. खरं तर शेजारीच उभा असलेला नवरा चिल्लर आणायला जवळच्या दुकानाकडे निघाला होता तरी ती मुद्दाम ज्यांच्याकडे लहान मुले आहेत त्याच बायकांना विचारात राहिली. त्या बायकांनी नाही म्हंटल्यावरही ,' बघा असतील तर ..... मिळाले तर बरं होईल. फुगेवाल्याला द्यायचे आहेत.' असं सांगत त्यांना हातातला फुगा दाखवू लागली. तिच्या हातातला फुगा बघून त्या बाईजवळ चिल्लर नसली तरी तिचे मुलं फुग्यासाठी हट्ट सुरू करू लागे. उभ्या उभ्या तिने दोन तीन बायकांच्या मुलांना फुग्यासाठी हट्ट करायला उदुक्त केले. नवरा चिल्लर आणेपर्यंत तिघी चौघींनी आपल्या हट्ट करणाऱ्या मुलांना वीस रुपयाचा फुगा देवून गप्पही केले. तिनेही तिच्या फुग्याचे पन्नास रुपये दिले . ते पैसे खिशात टाकतांना, 'आज रात्रीच्या खाण्याची सोय झाली' याचा आनंद त्याच्या डोळ्यात होता. तो तोंडभरून हसला आणि तिला धन्यवाद देवू लागला. त्याचा आनंद तिला एक वेगळीच ऊर्जा देवून गेला. तिने गजरा न घेताच परतीची वाट धरली. आज फुलांचा सुगंध श्वासात भरून घेता आला नाही तरी एका जीवाचा त्याच्या कष्टाच्या कमाईवरचा विश्वास मात्र तिने टिकून ठेवला होता. ' कितीही महागाई वाढली तरी माणुसकी महाग होता कामा नये ' या विचाराच्या पणतीने तिच्या मनात प्रज्वलित होताच तिचा चेहराही समाधानाच्या तेजाने लख्ख उजळून निघाला.

©️अंजली मीनानाथ धस्के

( सदर कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधिन आहेत. लेखिकीच्या नावासहितच कथा शेयर केली जावी)

दिवाळी हा सण  दिव्यांचा आहे. एक छोटी पणती जसा तिच्या भोवतीचा अंधःकार दूर करते . तसेच एक चांगला विचार आपल्या  मनातील रितेपणाचा  अंधार दूर करून आपल्या विचारांना सकारात्मक दिशा देण्याचं काम करतो. अशाच एक, एक करत जेव्हा असंख्य चांगल्या विचारांच्या पणत्या
आपल्या मनात प्रज्वलित होतील तेव्हा आपले व्यक्तिमत्त्व तर दिवाळीसारख्या मांगल्याच्या झगमगाटाने उजळून निघेलच पण इतरांच्या आयुष्यातही आपल्याला आशेचा प्रकाश पसरवता येईल. सद्य परिस्थितीत संस्कारांच्या अध:पतनाचा अंधकार हा सकारात्मक विचारांच्या पणत्यांनीच नष्ट करणे शक्य आहे.
सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 
ईतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे 

( सदर कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधिन आहेत. लेखिकीच्या नावासहितच कथा शेयर केली जावी)


कोजागिरी पौर्णिमा २०१९

#कोजागिरी_पौर्णिमा
#चंद्र

 पौर्णिमा म्हणताच सगळ्यात आधी आठवतो तो शीतल , असा पूर्ण चंद्र. त्यातही कोजागिरीचा चंद्र तर अप्रतिम सुंदर दिसतो . या चंद्र प्रकाशाचे महत्त्व जितके तितकेच कवी मनावर याचे राज्य अधिक आहे.  सागरला भरती येते त्याप्रमाणेच पोर्णिमेच्या चंद्राला पाहून माझ्या शब्दांनाही उधाण येतं. कोजागिरीच्या सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा....... 
शरद पौर्णिमेनिमित्त सहजच सुचलेले शब्द..... तुम्हाला आवडल्यास नक्की कळवावे.
#चंद्र
#मिलन
तू पौर्णिमेचा चंद्र होता 
मी रातराणीचा गंध व्हावे
शरदाच्या चांदण्यात न्हावून निघता
कणाकणाने मी बहरत जावे
प्रेमाच्या धुंदीत हरवत जाता
हळूच कवेत मला तू घ्यावे
श्वासात सुगंध भरून घेता
तूही तुला विसरत जावे
तुझ्यात मी मला शोधता
माझ्यात तू झिरपत जावे
काळोखाच्या पार्श्वभूमीवर 
तुझे अन् माझे मिलन व्हावे

©️ अंजली मीनानाथ धस्के



रंजना


#रंजना

                      पै पैं जमवून संसार करावा . काहीतरी संकट यावं आणि सगळंच संपून जाव . असंच काहीसं रंजनासोबत होत होतं . शिकलेला नवरा आहे म्हणजे आज ना उद्या चांगली नोकरी लागेल या आशेने तिने संसाराला सुरुवात केली . एका मागोमाग तीन मुलांचे मातृत्व तिने स्विकारले . घरातले सदस्य वाढत गेले तरी नवऱ्याला नोकरी लागायचा पत्ता नाही . त्याने शेवटी मजुरीचा मार्ग पत्करला. तिनेही चार घरची धुणीभांडी करायला सुरुवात केली. जरा सुरळीत सुरू झालं नाही तितक्यात लहान मुलाचा सारखा दवाखाना सुरू झाला. आधीच शिल्लक काही रहात नव्हतं त्यात दवाखान्याचा खर्च , मोठ्या दोन मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाची भर पडली. नवऱ्याने जास्तीचे काम घेतले तर हिनेही अजून काही घरची काम धरली. बघता बघता मोठी मुलगी दहावीत, लहानी आठवीत तर मुलगा पाचवीत पोहचले. खर्च वाढतच चालले . निराश न होता तिने मेहनत वाढवली . रोजचं खायला मिळतं आहे आणि मुलांचे शिक्षण सुरू आहे यातच समाधान होत . पण हे समाधान ही फारस टिकलं नाही . बांधकामावर असतांना नवरा वरच्या मजल्यावरून खाली पडला. कमरेच्या हाडाला जबर मार लागला . त्याने अंथरून धरलं. ऑपरेशनला पर्याय नव्हता.
ऑपरेशनला पैसे आणायचे कुठून? अंगावरचे चार मणी डोरल आधीच मोडून झाले होते . नवऱ्याने अंगावर दुखणं काढलं तरी कामावर जाता येतच नव्हतं. सगळा भार हिच्या एकटीवर येवून पडला. मोठीची दहावी झाली . अभ्यासात हुशार म्हणून तिला डॉक्टर करायचं स्वप्न बघितलं होत . उत्तम गुणांनी उत्तीर्ण होवूनही घरची परिस्थिती बघता तिने कॉमर्स कॉलेजमधे प्रवेश घेतला. नवऱ्याची तब्येत खूपच बिघडली . उठणं बसणं पूर्ण बंद झालं . होणाऱ्या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या तेव्हा "यंदा दिवाळीला बोनस देवू नका पण  नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी लागणारी रक्कम तेवढी जमा करायला मदत करा " असं सांगून तिने कामावर आगावू रक्कम उचलली.  नवऱ्याचं ऑपरेशन करून घेतलं .
ऑपरेशन झाल्यावर सगळं आधी सारखं सुरळीत होईल असं वाटलं होतं पण.... आज डॉक्टर जे बोलले त्याने सगळ्या आशाच संपल्या होत्या . ऑपरेशन झालं तरी वर्षभर कोणतेही काम करायचे नाही फक्त आराम करायचा.  तसेच वर्ष झाल्यावर  पूर्वीसारखे जड काम तर करायचे नाहीच पण बैठे काम ही खूप वेळ बसून करणे टाळायचे . थोडक्यात जीव जगाला होता फक्त.... बाकी पूर्वी सारखे काहीच होणार नव्हते . तिच्या संसाराचे एक चाक कायमचे अधू झाले होते . इथून पुढे संसाराची गाडी तिला एकटीलाच ओढायची होती. तिच्या मनाप्रमाणेच शरीरावरही खूप ताण पडत होता. स्वतःच दुखणं कुरवाळायला तिला वेळच नव्हता . तिने संकटांनी वेढलेले हे जीवन संपवून टाकण्याचा निर्णय घेतला. अंगात ताप , डोळ्यात पाणी घेवून ती नवऱ्याच ऑपरेशन नीट व्हावं म्हणून केलेला नवस फेडण्यासाठी निघाली होती खरी पण डोक्यात विचार वेगळेच सुरू होते. एका क्षणात स्वतः च आयुष्य संपवून घ्यावं . मोकळं व्हावं या कष्टाच्या जगण्यातून . आपल्या माघारी काही का होईना ... आपण सुटाव यातून . हेच विचार घोळत होते. नवरात्रीचे दिवस होते. ती देवीच्या मंदिरात गेली. देवीच्या  पायावर डोकं टेकवलं. आता इथून बाहेर पडल्यावर घाटावर जावून जीवन संपवावं असंच तिच्या मनात होतं.
मंदिरात दर्शन घेवून बाहेर पडल्यावर तापाने थरथरणाऱ्या शरीराला जरा थंडावा मिळवा म्हणून   ती तिथल्याच डेरेदार झाडाखाली असलेल्या रांजणाच पाणी पीत विसावली. तिथे तिला एक भीक मागत असलेलं  जोडपं दिसलं. बायको पंगू झाली म्हणून हताश नवरा तिच्या पंगू पणाचे भांडवल करून भीक मागत होता.  आपसूकच तीच लक्ष त्यांचं निरीक्षण करण्यात गुंतलं. येणारे जाणारे त्यांच्या पुढे ठेवलेल्या भांड्यात नाणी टाकत होते. ज्यांनी नाणी टाकली नाही त्यांच्या मागे हा माणूस जात होता आणि बायकोच्या दुखण्याचे रडगाणे गात होता . समोरच्याने कितीही शिव्या हासडल्या, हाकलून लावलं तरी तो मागे हटत नव्हता. उलट त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःचे घाणीने भरलेले हात त्यांना लावत होता. पैसे मिळेपर्यंत पिच्छा पुरवत होता. त्याच्या त्या मळकट आवतारापासून सुटका करून घेण्यासाठी लोक नाईलाजाने का होईना पैसे देत होते.
रंजना होती तोपर्यंतच त्याने १०० एक रुपये कमावले.  ते  पाहून शरीराने पंगू असलेल्या त्याच्या बायकोपेक्षा मनाने पंगू असलेल्या त्या नवऱ्याची तिला कीव आली. त्याच वेळी
शरीराने धडधाकट असूनही पैसे मिळवण्यासाठी बायकोच्या अधू असण्याचा तो वापर करत होता याची तिला चीडही आली.
देवीचा उत्सव सुरू असतांना तिच्याच दारात एका स्त्रीच्या अधूपणाचे भांडवल करून भीक मागितली जात होती. स्त्री शक्तीचा उत्सव असून एक स्त्री शरीरानेच नाही तर विचारानेही पंगू होवून भीक मागत होती.
 पैसा तर हवाच असतो पण त्यासाठी स्वाभिमान सोडून देणं तिला मान्य नव्हतं. परिस्थितीशी लढण्याची ताकद हातात असतांना ... ते हात असे लोकांपुढे पसरणे तिला मान्य नव्हते.  सृष्टीतल्या शक्तीने अनेकदा वेगवेगळी रूपे घेवून दुष्टांचा संहार केला.  तसेच आपल्यालाही आपल्या स्त्री शक्तीचा विसर पडता कामा नये.   
              त्या भीक मागणाऱ्या जोडप्याला बघून तिने मनातले सगळे वाईट विचार झटकून टाकले. आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तरी   आपल्या कुटुंबाने कोणा पुढेही भीक मागता कामा नये . मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठीचे लागणारे सगळे शिक्षण , संस्कार द्यायचे.
 आपण आपल्या संकटांचा सामना करायचा. ताठ मानेने  यापरिस्थितीतून बाहेर पडायचे. जोपर्यंत हाताला काम मिळतं आहे तोपर्यंत काम करूनच घर चालवायचं. कष्टाचे जीवन जगावे लागले तरी चालेल पण लाचारीचे जीवन आपण  आपल्या कुटुंबालाही कधीच जगू द्यायचे नाही. असा निश्चय करूनच ती तिथून उठली.
          तिच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारली .  तिने सगळ्यात आधी दवाखान्यात जाऊन स्वतःसाठी औषधं घेतली. घरी गेली. काही दिवसात बरं वाटलं तेव्हा तिने जास्तीची कामे धरली. तिची काम करण्याची इच्छा आणि घर पुन्हा उभं करण्यासाठीची चाललेली धडपड कामावर अनेकांच्या लक्षात आली. त्यांनी मदत देवू केली तेव्हा ती ठाम पणे बोलली ," काम असेल तर सांगा पण दया म्हणून काही नको" .
तिच्या या बोलण्याने प्रभावित होऊन एका ताईंनी तिच्या मोठ्या मुलीसाठी  झेपेल आणि  जमेल असं कोचिंग क्लासमधे आलेल्या पालकांना माहिती देण्याचं काम दिलं. एका ताईंनी तिच्या नवऱ्याला पेपर बॅग बनवण्याचं प्रशिक्षण  दिलं. त्याला जमतील तेवढ्याच पेपर बॅग त्याने बनवायच्या. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आणि त्यातून मिळणारा मोबदलाही त्याला घरपोच मिळण्याची सोय केली.
तिचं मुलं लहान होती पण तिच्याकडे पाहून तीही परिस्थितीशी लढायला शिकली. सगळ्यांनी कामालाच देव मानून त्याची अखंड आराधना केली.
 हळू हळू दिवस बदलले. मोठी मुलगी  एका कंपनीत अकाउटांट म्हणून काम करू लागली तर लहानीने डी एड चा अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मुलगा ही शिक्षण घेता घेता मिळेल ते काम करायला लागला होता.
आज परिस्थिती बदलली तरी रंजनाचा तिच्या कामावर असलेला विश्वास कायम आहे . आजही  तिला कोणी भीक मागितली तर ती न देता काम करायची तयारी असणाऱ्यांना ती काम मिळवून देते.

©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहीत करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे



दसरा २०१९


#दसरा२०१९
#दुर्गुणांचे_दहन
#पाटीपुजा
दसरा हा सण आपण चांगल्याचा वाईटावर विजय या अर्थाने साजरा करतो. इतरांचे दुर्गुण आपल्याला चटकन् दिसतात पण आपल्यातल्या दुर्गुणांकडे कळत नकळत आपलेच दुर्लक्ष होते. कोणीही परिपूर्ण नसतं. परिपूर्णतेचा ध्यासच आपल्यातील चांगल्या गुणांची वृध्दी करण्यास कायम प्रेरित करतो.
आधी आपल्यातल्या दुर्गुणांचा नाश केला पाहिजे तेव्हा आपण एक उत्तम माणूस म्हणून आपले अस्तित्व टिकवू ठेवू शकतो.
" जग बदलावे असे वाटत असेल तर त्या बदलाची सुरुवात आपल्या पासूनच करायला हवी ".  हा बदल तेव्हाच घडून येईल जेव्हा  शिक्षणातील  मूल्यांचा वापर आपण आपल्या आयुष्यात करू . शिक्षणाने  आपण केवळ शिक्षित होत नाही तर सुसंस्कृत होण्यास मदत मिळते.  म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी पाटी पूजनाला खूप महत्त्व आहे.
                 दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिक्षणाची कास धरत स्वतःतल्या रावणाचे दहन करण्याचा संदेश देणारी  ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल.
तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा...
©️ अंजली मीनानाथ धस्के