#चकुल्या
नुकतंच लग्न झालेली निशा सासरी आली. शिकलेली, नोकरी करणारी सून मिळाली खरी पण आपल्या सारखा ' एक नंबर' स्वयंपाक येतो का? याची खात्री करून घ्यायला म्हणून सासूबाईही तिच्या पाककौशल्याची परीक्षा घ्यायला सज्ज झाल्या. माहेरी तिच्या फसलेल्या प्रयोगालाही दाद मिळायची. ती नव्या जोमाने नवीन प्रयोग करायची. तिला स्वयंपाकाची आवड नसली तरी वेगवेगळे पदार्थ ती आवडीने करायची. त्यामुळे आपण हे आव्हान सहज पेलू शकतो असा विश्वास तिच्यात होता.
पहिल्याच दिवशी जेव्हा जेवणाच्या पदार्थांची यादी हातात मिळाली तेव्हा तिला कळालं की हे वाटतं तितकं सोपं प्रकरण नाही. तिनेही मग गांगरून न जाता एक एक पदार्थ करायला घेतला . वरण भात भाजी पोळी कोशिंबिर ..... असं ताट सजलं. याआधी आईला फक्त मदत व्हावी म्हणून काम करणाऱ्या तिने आयुष्यात पहिल्यांदाच पूर्ण स्वयंपाक केला होता . खूप उत्साहात तिने सगळ्यांना ताट वाढली आणि त्यांच्या प्रतिक्रिया टिपून घेवू लागली. अर्थातच तिचा अंदाज चुकला होता. मनासारख्या प्रतिक्रिया तर आल्याचं नाहीत. त्यात भर म्हणजे सासूबाईंनी आपणच किती चविष्ट जेवण बनवायचो याची सगळ्यांना आठवण करून दिली. दुसऱ्या दिवशी ही असेच घडले. काही दिवसांनी फरक पडेल या आशेवर ती काम करतच होती . आजही तिला सासूबाईंनी पदार्थांची यादी दिली . तिने त्यांना लगेच विनंती केली की, ती सगळा स्वयंपाक करेल. भाजीची सगळी तयारी ही करेल परंतु भाजीला फोडणी मात्र त्यांनी घालावी म्हणजे तिला सगळ्यांना आवडणारी भाजी कशी असते ते शिकता येईल . तिची ही विनंती , " त्यात काय एवढं , कर जसं येतं तसं... मला गॅस जवळ उभ राहिलं की त्रास होतो. इतकी शिकली आणि साधी फोडणी घालता येत नाही तुला? कर रोजच्या सारखं .... " असं सांगून धुडकावण्यात आली. ती हिरमुसली तरी ताटात वरण भात, भाजी , दुधी भोपळ्याचा हलवा, कढी , चपाती , भजे ,तळलेले पापड आणि कोशिंबीर असा बेत वाढला. सासऱ्यांनी दुधी भोपळ्याचा हलवा या आधी कधी खाल्लाच नव्हता त्यामुळे त्यांनी लगेच ," हा काय कचरा केला " अशी भयंकर प्रतिक्रिया दिली. तिने आशेने सासुबाईंकडे बघितले तर त्याही अगदी मख्ख चेहऱ्याने मुलाला म्हणाल्या , " आज काल जेवण घश्याखाली जातच नाही . तसंही वय झाल आता.... आम्हाला खायचं तरी किती असतं? आता खाते दोन घास आणि गप पडून राहते ". आई वडिलांची प्रतिक्रिया बघून नवराही निशाला चटकन बोलून गेला ," आईला विचारून करायला काय होतं तुला ".
आता मात्र तिचा धीर सुटला ..... चेहऱ्यावर कसं बसं टिकवलेल हसू गायब झालं.... डोळे पाण्याने डबडबले. ती उठून धावतच बेडरूम कडे गेली. ओक्साबोक्शी रडायला लागली .
इकडे नवर्याला नको ते बोलून गेल्याची जाणीव झाली. त्याला तिच्या मागे जावून तिची समजूत काढायची होती तर सासूबाईंनी," आधी जेवून घे. मी समजावते तिला " असं म्हणून त्याला तिची समजूत काढण्यापासून रोखले. पोटभर जेवण झाल्यावरच त्या स्वतः तिच्या कडे आल्या. त्यांचा खोटा मायेचा स्पर्श ... खोटी सहनभुती तिला नको होती. त्यात त्या तिला म्हणाल्या , " यात एवढं काय आहे रडण्या सारखं.... उगा भरल्या घरात रडते कशाला ? ". तीही खंबीर पणे उत्तरली, " तुम्हाला शिकवा म्हणूनही तुम्ही तुमची पद्धत शिकवत नाही आणि मी केलेल्या जेवणाने तुमची पोट भरत नाही म्हणून रडते आहे".
तिच्या या उत्तराने त्या चपापल्या ... सारवासारव करत म्हणाल्या, " आमच्या माणसांना काहीही केलं तरी आवडत नाहीच . मलाही असेच बोलतात. माझ्या सासुबाईनी तर माझी परिक्षा घेण्यासाठी काय काय केले होते. त्या रोज मी केलेल्या स्वयंपाकात तिखट, मीठ असे जास्तीचे काहीतरी मिसळून ठेवायच्या. सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यावी लागायची. तुला तर फार काही बोलले नाही कोणी.... गप आता....त्यात एवढं रडण्यासारखं काही नाही " असे म्हणुन निघूनही गेल्या.
रात्री झोपतांना तो हळूच तिच्या जवळ आला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला," सॉरी ग .... मला वाटलेच नव्हते की तू माझ्या बोलण्याचे येवढे वाईट वाटून घेशील .... खरंच मनापासून सॉरी . इथून पुढे मी नक्की काळजी घेईल ". तिचे डोळे पुन्हा एकदा पाणावले पण या वेळेस मात्र त्याने लगेच तिचे ओघळणारे अश्रू पुसून घेतले. तीही मग हळूच त्याच्या मिठीत शिरली. त्याला जाणवलं की आपण मघाशी जी जखम दिली आहे ती अजून ओली आहे. सांत्वनासाठी त्याला योग्य शब्दांची जुळवाजुळव करणे अवघड वाटल्याने त्याने शांत राहणे पसंद केले. दोघंही कितीतरी वेळ असेच निःशब्द बसून होते. तिलाही त्याच्या स्पर्शातून अपराधीपणाची भावना जाणवत होती. शेवटी तिनेच पुढाकार घेऊन त्याला सांगितलं की, "लहानपणापासून अन्न हे पूर्णब्रह्म असेच ऐकत आले रे मी .... खारट झालेलं जेवणही माझे बाबा बीन तक्रार जेवायचे. आईने खावू नका म्हणून सांगितल तर ते म्हणायचे ... होत एखाद्या वेळी कमी जास्त चालायचंच.... रोज चवीच खातो मग कधी तरी हेही खायला काय हरकत आहे. अशा वातावणात वाढले मी ... इथे मात्र आमची चव नाही ही ... आमच्या सारखं नाही हे ... हेच ऐकाव लागतंय. शिकावं म्हंटल तर आई शिकवतही नाहीत. आमच्या माणसांना हे आवडतं नाही ... आमच्या माणसांना ते आवडत नाही .... असे मात्र ऐकवत राहतात तेव्हा जाणवत की, त्यांनी अजून मला आपली मानलेच नाही आहे. इतरांच ठीक आहे त्यांना कदाचित माझा स्वीकार करायला वेळ लागेल. पण तूही बोलतोस तेव्हा वाटतं की, आपण इथे आलो कशासाठी? फक्त कामवाल्या बाईसारखे राबायला..... मला पाहिल्या दिवसापासून सगळे परफेक्ट जमावे अशी अपेक्षा चुकीची नाही का? सगळ्याबाबतीत आईंनी असहकार पुकारला असून देखील मी सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असते. तुमच्याकडेच्या अनेक पद्धती, पदार्थ मला माहीत नसतांनाही मी चांगलेच केले पाहिजे अशी अपेक्षा ठेवतांना, तुम्हाला माहित नसलेले जे पदार्थ, पद्धती मला उत्तम येतात त्यांना ' कचरा' म्हणणे योग्य आहे का? स्तुती नका करू पण असही नका बोलू की नवीन काही पदार्थ करण्याची .... स्वयंपाक करण्याची माझी इच्छाच मरून जाईल. एकतर उद्यापासून तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या बनवत जा नाहीतर मी बनविते ते आवडत नसेल तर नका खावू पण अन्नाला नावं ठेवू नका. मला तुमच्या आवडी निवडी समजायला आणि त्या परफेक्ट जमायला वेळ लागणार ... तोपर्यंत तूम्ही समजून .. सांभाळून घ्यायला हवं."
तिच्या या बोलण्याने त्यालाही तिच्या दुःखाची तीव्रता जाणवली. लग्नानंतर अचानक होणार्या मानसिक, शारीरिक बदलांना सामोरे जातांना ती एकटी पडणार नाही याची काळजी घ्यायचे राहून गेले होते,याचे त्यालाही वाईट वाटले. तिला समजावण्याच्या सुरात तो म्हणाला, " माझ्यात इथून पुढे नक्कीच सुधारणा होईल. मलाही तुला समजून घ्यायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत तूही सांभाळून घे ... आज रडलीस तशी पुन्हा रडू नकोस आणि हो.... मी समजून घेईन याची वाट न बघता आत्ता जसं मन मोकळं बोलली तसंच बोलत जा ". या घटनेने दोघांना मनानेही खूप जवळ आणलं.
त्या दिवसानंतर त्याने तर तिला तिच्या स्वयंपकावरून कधी बोल लावला नाहीच पण वडिलांनाही काय सांगितलं कुणास ठाऊक त्यानंतर सासरेबुवांनीही कधी काही तक्रार केली नाही . उलट तिची शिकण्याची इच्छा बघून दोघेही तिला त्यांना माहीत असलेल्या पद्धती सांगू लागले. तिला थोडं बळ मिळालं. अचानक एके दिवशी सासूबाईंनी आज रात्रीच्या जेवणाला ' चकुल्या ' कर अशी फर्माईश केली. तिला हे नाव आणि पदार्थ एकदमच नवीन होते. तिने त्यांना सांगितलं की," मला चकुल्या येत नाही पण तुम्ही पद्धत सांगितली तर मी बनवून ठेवेन". त्यावर त्या " फोङणीच्या वरणात कच्च्या चपाट्या छोटे तुकडे करून टाकायच्या" अशी अगदीच मोघम पद्धत सांगून बाहेर निघून गेल्या. तिने कणीक मळली ... डाळ तांदूळाचा कूकर लावला. तेवढ्यात सासरे बाहेरून आले आणि तिला विचारलं," आज काय बेत संध्याकाळचा?" तिने ''चकुल्या '' सांगितल्यावर त्यांची कळी खुलली. ते म्हणाले, "ओल खोबर घातलं तर 'एक नंबर' लागतात चकुल्या". ओल खोबर याबद्दल तर सासूबाईंनी काहीच सांगितल नाही हा विचार मनात येऊन तिने त्यांच्याकडे असं काही बघितलं की त्यांना जाणवलं की, हिला चकुल्या येत नाहीत. त्यांनी लगेच , " ओला नारळ नसेल न घरात ..... थांब मी घेवून येतो ... आमच्या हिलाही बोलावून आणतो ती तुला चकुल्या शिकवेल . तू काळजी करू नकोस काही" असं सांगून काढता पाय घेतला. इकडे निशाला आनंद झाला की, आज काही झालं तरी आपल्याला सासूबाईंच्या हाताच्या 'एक नंबर' चकुल्या शिकायला आणि खायला मिळणार.
थोड्याच वेळात सासरे एकटेच ओला नारळ घेवून परत आले आणि म्हणाले," तिने तुला कसं करायचं हे सांगितलं आहे ना तसच कर .. फार काही अवघड नसतं". आता मात्र तिला सासूबाईंनी सांगितलेली पद्धत करून बघावी असं वाटेना. हा प्रयोग नक्की फसणार असं वाटून तिने सासऱ्यांना माहीत असलेली पद्धत विचारली तसे ते स्वतः स्वयंपाक खोलीत उभे राहून तिला मदत करू लागले. त्यांनी सांगावं आणि हिने करावं यातून चकुल्या तयार होवू लागल्या. तेवढ्यात तोही घरी आला. खमंग सुवासाने त्याची भूकही खवळली. हात पाय धुवून आल्यावर तोही मग ताट वाढण्याच्या तयारीत तिला मदत करू लागला.
सगळे जेवायला बसले. आज तीही त्यांच्या सोबतच जेवायला बसली. सगळे निमूट जेवत होते. तिचे लक्ष त्याच्याकडे गेले त्याने इशाऱ्यानेच ' चांगल्या झाल्यात ' असं सांगितलं.
कोणीच काही बोलत नाही म्हंटल्यावर सासूबाईं सासऱ्यांना उद्देशून म्हणाल्या , " आपल्यासारख्या झाल्या नाहीतच .... नुसतं खोबरं लागतंय ... होय ना ". त्यावर आपण काय बोलावं? सासूला राग आला तर? असा विचार करून मग तेही म्हणाले , " हो तर... तुझ्या हातच्या चकुल्या एक नंबरच होतात पण मलाही नीट माहीत नाही तू कशा करते ..... मी जे सांगितलं ते तिने केलं .... पुढच्या वेळेस तूच करून दाखव तिला म्हणजे काही प्रश्नच येणार नाही ". आता बोलण्यात काही अर्थ नाही हे उमगुन मग सासूबाईंनीही विषय वाढवला नाही.
तिनेही लगेच सासऱ्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि म्हणाली , "आई तुमच्यासारख्या तर जमणारच नाहीत मला कधी ... मी फार कच्ची आहे स्वयंपाकात. पुढच्या वेळेस तुम्हीच करा ह .... म्हणजे 'एक नंबर' चव काय असते मलाही शिकता आणि चाखता येईल ". आता हे स्वयंपाकाचं काम परत आपल्याच गळ्यात पडतंय की काय या भीतीने त्या पटकन् बोलून गेल्या ," आमच्या माणसांचं काय घेते मनावर .... ते कशाला पण 'एक नंबर' म्हणतात . बऱ्या आहेत या चकुल्याही .... तसेही आता खायचे कितीअसते आम्हाला".
खरे तर तिच्या आजे सासूबाई चकुल्यात ओले खोबरे घालायच्या, सासुबाई मात्र मुद्दाम ओले खोबरे घालणे टाळायच्या, हे तिला थोड्या वेळा पूर्वीच सासरेबुवांनी सांगितले होते. निशाला मुळात नंबरसाठीची जीवघेणी स्पर्धा कधीच, कोणत्याही क्षेत्रात आवडतं नव्हती ..... पण सासूबाईंना मात्र तेव्हाही आणि आताही त्यांचा ' एक नंबर ' टिकून ठेवायचा होता. आतापर्यंत त्यांच्या या स्वभावाची ती बळी ठरत होती. चकुल्याच्या निमित्ताने तिनेच स्वत:ला समजावलं की ,' एक नंबर ' चे दावेदार आपण कधीच नव्हतो. मग ही मर मर कशाला? मुळात आपल्याला स्पर्धाच आवडत नसतांनाही 'एक नंबर' मिळवण्यासाठीची नकळत चाललेली आपली ही धडपड कशासाठी? आपल्याला हवं असलेलं कौतुक मिळवण्याची ही ओढ कसली? हवं असलेलं कौतुक मिळत नाही म्हंटल्यावर ..... ते मिळायलाच हवं हा अट्टहास का? आपला आनंद हिरावून घेवून जर कौतुक मिळणार असेल तर ते हवंय कशाला? आपल्यालाही आणि समोरच्यालाही 'जे जसं आहे तसं स्वीकारण्याची' गरज आहे. योग्य वेळी योग्य शब्दात समोरच्यालाही आपल्या मर्यादांची जाणीव करून द्यायला हवी आहे. ' मला सध्या तरी एवढंच जमतं ' हे खुल्या मनाने कबुल करून, इतरांच्या आणि स्वतःच्याही अपेक्षा वाढवत जावू नये. स्वतःच्या अपेक्षांची पूर्ती स्वतः करून घेण्याची तयारी ठेवावी. इतरांना याची समजही देता यायला हवी. याच विचार मंथनातून तिच्या पुरता तरी हा ' एक नंबर ' तिने आयुष्यातून कायमचा हद्द पार केला .
निशाने पहिला घास तोंडात टाकला आणि का कोणास ठाऊक तिला या चकुल्याची चव खूप आवडली. तिच्या माहेरी केला जाणारा वरणफळ हा पदार्थ तिला माहिती होता. त्याचेच हे चमचमीत मसालेदार तिखट रूप आज पहिल्यांदाच ती चाखत होती. आज पहिल्यांदाच स्वतःच्या हक्काच्या घरात पोट भर जेवत होती. त्या दिवशी तिला एवढं मात्र कळलं होत की, 'एक नंबर 'अशी कोणतीच स्वयंपाकाची पद्धत नाही.... की... चवही नाही आणि असलीच तरी ती आपल्याला चाखायला कधीच मिळणार नाही. तेव्हा आपण प्रेमाने करू आणि आनंदाने खावू तोच पदार्थ आणि त्याचीच चव 'एक नंबर' असेल. 'एक नंबर' अशा फसव्या संकल्पनेच्या मागे लागून जीवनातला लाख मोलाचा आनंद गमावून चालणार नाही. कारण कोणतंही काम करतांना जर आपल्याला स्वतःला ते काम करण्यात आनंद मिळत नसेल तर मिळणारा नंबर हा फक्त नंबरच राहतो.
आजही ती जे बनवते ते तिच्या आवडीने आणि आनंदाने. तिच्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा तिच्या पाककलेचं कौतुक करतो. सासरचे बरेच पदार्थ ती नंतर शिकली पण 'चकुल्या' विषयी तिच्या मनात असलेलं प्रेम आजही अगदी तसचं आहे. आजही नवरा कधी कधी चकुल्या खातांना कौतुकाने " एक नंबर झाल्या चकुल्या" असं म्हणतो . तेव्हा सासऱ्यांनी शिकवलेल्या या चकुल्या आपल्याला बरंच काही शिकवून गेल्या. तेव्हाच आपल्यातील सुरवंटाचे फुलपाखरू बनण्याचा हा सुंदर प्रवास सुरू झाला होता. याची आठवण होवून तीही मग गालातल्या गालात हसते.
©️ अंजली मीनानाथ धस्के
No comments:
Post a Comment