पिक्चर परफेक्ट

#पिक्चर_परफेक्ट
            अवंतिका आणि राहुल अगदी समाधानी कुटुंब होते. आठवडाभर अवंतिका दोन मुलींच्या संगोपनात तर राहुल कामात व्यस्त असे. सुट्टीच्या दिवशी मात्र राहुल  अवंतिकाला घरकामात खूप मदत करत असे.  अवंतिका मुद्दामहून राहुल आणि मुलींच्या आवडीचे पदार्थ करत असे. निवांत वेळेत मग गप्पा रंगांत येत. अवंतिका राहुलला आठवड्याभरात काय झाले ते सगळे  सांगायची. तिच्या बडबडीने, मुलींच्या दंग्याने राहुलला घर कसे भरल्या सारखे वाटायचे . मुली अजून लहान होत्या म्हणून ते सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरणे टाळायचे. दोघे मिळून मुलींच्या सहवासात सगळा दिवस मजेत घालवायचे.  संसाराच्या कुरबुरी सगळ्यांना सारख्याच असतात पण  ती दोघं मिळून सामंजस्याने प्रश्न सोडवत.
           मुली  थोड्या मोठ्या झाल्या, तसा अवंतिकाला जरा मोकळा वेळ मिळू लागला. 'सगळेच कामात व्यस्त आपणच तेवढ्या रिकाम्या असतो' असा विचार मनात येऊ लागला. पार्ट टाईम काम करावं तर मना सारखं काम मिळेना. तिची नवीन गोष्टी शिकण्याची आवड लक्षात घेऊन राहुलने तिला इंटरनेट वापरायला शिकवले. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक अकाऊंट काढून दिले. यामुळे जुन्या मैत्रिणी भेटतील. तिचा वेळ मजेत जाईल. तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी बऱ्याच ऑनलाईन संधी उपलब्ध होत्या. त्यासाठीही या सगळ्याचा तिला फायदा होईल, असे राहुलला वाटले होते. पण झाले उलटे, सुरवातीला या सगळ्यांमुळे अवंतिका खुशीत होती. हळूहळू मात्र तिची चिडचिड व्हायला लागली. आपल्या बरोबरीचे सगळेच लोक पुढे गेलेत. त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. येवढ्या व्यस्ततेतही ते सगळे लहान मुलांना घेवून दर सुट्टीला बाहेर पडतात. सुंदर फोटो काढतात. सगळी कशी सुखी कुटुंब आहेत. दुःख, समस्या त्यांच्या वाट्याला जणू नाहीतच. आपण मात्र सदैव घरकामात बुडालेल्या असतो. नोकरीसाठी मनासारखं काम मिळत नाही. काल परवा तर सगळ्या मैत्रिणींचे स्वतःचे सध्याचे फोटो ग्रुपवर टाकायचे ठरले. किती छान फोटो होते सगळ्यांचे ....एकदम " परफेक्ट  " . 'आपल्यकडे स्वतःचा एकही फोटो धड नाही', असे वाटून तिने राहुलशीच भांडण केले.  आताकाही झाले तरी आपण घराबाहेर पडायलाच हवे.  फॅशनचे कपडे घालून मस्त फोटो काढायला हवे. सगळ्यांना फोटोवरून  'आपणही त्यांचासारखा आयुष्यचा आनंद घेत आहोत' असेच वाटले पाहिजे. आता मागे राहून चालणार नाही. राहुलचा वाढदिवस येतोय त्यानिमित्ताने दोन दिवस कुठेतरी बाहेर जायचेच. या विचाराने ती कामाला लागली. कळत नकळत सोशल मीडियावर सुरू असलेल्या स्पर्धेत ती ओढल्या गेली.
            जायचा दिवस उजाडला तशी ती मुली व राहुलच्या मागेच लागली. त्यांनी कुठले कपडे घालायचे हे ही तिनेच ठरवले. जातांना बेकरीवर थांबून एक केक विकत घेतला. राहुलने कुरकुर केली की प्रवासात कशाला हा केक चा घाट तर त्याला " मलाही सगळे कसे ' पिक्चर परफेक्ट' हवे आहे. सगळ्यांना माझा हेवा वाटला पाहिजे " असे सांगून गप्प केले.
       
          मुलींना मस्त खेळायचे होत पण जोपर्यंत चांगले फोटो येत नाही तोपर्यंत तिने मुलींना खेळू दिले नाही की केक खावू दिला नाही. 'एरवी जरा मोकळा वेळ मिळाला की आपल्या हातात हात घालून निवांत क्षितिजाकडे बघणारी अवंतिका आज मात्र आपल्या हातात हात घालून सेल्फी घेण्यात मग्न आहे' असा विचार राहुलच्या मनात आला. तेवढ्यात छोटी स्वरा पाय अडकून खाली पडली. सगळ्या कपड्यांना माती लागली. अवंतिकाने पळत जावून तिला उचलले. तिचे कपडे झडकले , " आता हिचे कपडे बदलल्याशिवाय  फोटो काही काढता येणार नाही " असे ती राहुलला बोलली  तसे स्वराने तिच्याकडे रागाने पहिले , " तू ना .... फेसबुक बघते तेव्हापासून खूप बदलली आहे. तुला सारखे फोटो काढायचे असतात. मला नाही बोलायचे तुझ्याशी " असे म्हणून ती राहुलकडे पळत गेली.
       अवंतिकाला तर तिचे काय चुकले हे कळलेच नाही  पण डोळ्यात पाणी मात्र आले. राहुलने स्वराला समजावून खेळायला पाठवल्यानंतर अवंतिकाजवळ जावून बसला. तिचा हात प्रेमाने हातात घेतला. त्याच्या या प्रेमळ स्पर्शाने भवनांचा बांध फुटला ती त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली. तिचे रडणे थांबल्यावर तिने राहुलला विचारले , " काय चुकलं रे माझं ? स्वरा अशी का बोलली ?"
        त्यावर राहुलने तिला समजावले , ' काहीच चुकल नाही तुझं .... ह्या आधी ....आपण जसे आहोत तसेच परफेक्ट आहोत. इतरांशी तुलना करू नये. स्वतःला कमी लेखू नये. असेच शिकवले आहेस तू त्यांना .....आता मात्र.... दुसऱ्यांना काय परफेक्ट वाटतं ? काय आवडेल? कशाचा हेवा करावा ? किंवा इतरांना हेवा करायला भाग कसे पीडावे? हे समजायला त्यांना वेळ  लागणार आहे. त्या अजुन लहान आहेत"
      त्याच्या या वाक्याने आणि आश्वस्त स्पर्शाने आपले नेमके काय चुकले आहे  हे अवंतिकाला कळले. कुठल्याही साधनाच्या किंवा त्यातून निर्माण होणार्‍या आभासी जगाच्या अती आहारी जाणे घातक ठरते आहे. इतरांशी तुलना करून आपण आपलाच आनंद गमावून बसतो आहे. याची तिला प्रकर्षाने  जाणीव झाली.
           आज या घटनेला वर्ष झालं..... पूर्वी सारखे तिचे आयुष्य अगदी साधं आणि समाधानी आहे.  नवरा व दोन मुली हेच तीचे जग आहे.  फावल्या वेळेत ती ऑनलाईन मराठी विषयाची शिकवणी घेते. ती आजही  फेसबुक वर अ‍ॅक्टिव्ह असते. तिला जे आवडले , पटले असे लेख, फोटो ,माहिती इत्यादी ती शेअर करते. इतरांचे आवर्जून कौतुक करते. कुणाचा हेवा करत नाही की कोणाला आपला हेवा वाटावा असे मुद्दाम काही करायला जात नाही. सोशल मीडियावर  कळत नकळत जी लाईक, कमेंटची  स्पर्धा सुरू असते त्यापासून ती आता दोन हात दूर रहायला शिकली आहे. ती आयुष्यातील सगळे बदल सकारात्मकतेने स्विकारायला लागली आहे. या सोबतच आवडीने छंद जोपासणाऱ्या अनेक ग्रुपची ती अ‍ॅक्टिव्ह मेंबरही आहे. 'जे जसे आहे तसेच स्वीकारून पुढे जाता आले तरच सुखी राहता येते. अन्यथा सुखी आहोत हे दाखविण्याच्या नादात आत्मिक सुख मात्र कायमचे हरवून बसते.' या विचारानेच  तिच्या मनातील  गुंतागुंत नाहीशी झाली. तिच्यासाठी सगळेच अगदी सोपे झाले.
        सगळ्यात महत्वाचे म्हणजे , मुली गळ्यात पडून , " मम्मा यू आर दी बेस्ट " म्हणतात तेव्हा मुली आणि राहुलच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान ती नजरेने टिपते आणि मनाच्या अल्बम मधे #पिक्चर_परफेक्ट " म्हणून पोस्ट ही करते.

©️ अंजली मीनानाथ धस्के

टिप: कुठलेही साधन चांगले किंवा वाईट नसते . आपण त्याचा वापर कसा करतो?? .. त्याच्या आहारी किती जातो ?? यावर सगळे अवलंबून असते.
मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवणीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट जसे घडले तसे स्वीकारून  ... इतरांचे त्या बद्दलचे अनुभव ऐकून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कधी कधी या प्रसंगाना कल्पकतेची जोड दिली जाते तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com
(या रांगोळीत चंद्र पाहतना पाठमोर्‍याी मुलीचे केस म्हणून मक्याचे केस वापरले आहेत )

No comments:

Post a Comment