मुलांची उत्सुकता आणि गूगल

#मुलांची_उत्सुकता_आणि_गूगल

        निशा कुंड्यांची मशागत करत होती . तेवढ्यात दारावरची घंटा वाजली . तिने दरवाजा उघडला तसा घाईघाईने साहिल आत आला . पाणी पिऊन परत खेळायला जायचा त्याचा बेत होता . त्याची घाई, खेळून घामजलेला चेहरा बघून निशा  म्हणाली , " अरे हळू जरा एवढी घाई कसली करतोस . कोणी जात नाही निघून . सुट्टी आहे आज तर सगळे थांबतीलच ". त्यावर सहिल म्हणाला , " सगळे थांबलेच आहेत ग .... मोबाईल वर सर्च बफर होतंय तेवढ्या वेळात मी घरी आलो " .
        निशाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नक्की कसला शोध घेतला जातोय मोबाईल वर ? खेळणाऱ्या सर्व मुलांचे वय जेमतेम दहा ते बारा  असेल. यांना मोबाईल दिला कोणी ? असे प्रश्न तिच्या मनात आले  तसे तिने लगेच विचारलं "काय शोधता रे मोबाईल वर ?" त्याने अगदी सहज सांगितलं, " अग कंडोम म्हणजे काय ? याचा शोध घेत आहेत सगळी मिळून ". तो पायात चप्पल सरकवून जायला निघाला तसा काळजीने  तिने त्याचा हात पकडला. "अरे चॉकलेट घेवून जा सगळ्यांना " असं बोलून त्याला थांबवलं . खरं तर तिला वेळ हवा होता . त्याला  काय आणि कसं समजावून सांगावं  याचा विचार करतच तिने चॉकलेट्स हातात घेतली.  वेळ गमावून चालणार नव्हतं. जे काही करायचं ते अगदी सहज, त्याला कुठलीही शंका न येता करणं गरजेचं होतं.
                  त्याच्या हातात चॉकलेट देत ती त्याला म्हणाली, " त्यात मोबाईल वर काय शोधायचं ... मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं की तुला " . त्यावर तो  आश्चर्याने म्हणाला , " तुला माहित आहे त्याचा अर्थ ? काय असतं ग ते ? " त्यावर ती म्हणाली, " माहित आहे ना पण त्यासाठी तुला आधी  घरात यावं लागेल. जरा शांत बसाव लागेल. इतक्या घाईत कसं सांगू ? " त्यावर तो लगेच सोफ्यावर येवुन बसला . त्याच्या या कृतीचा अर्थ म्हणजे त्याला त्या शब्दाविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे . आधी काहीतरी नक्कीच कळलं आहे . आपल्याकडून त्याची खात्री फक्त करून घेतली जाणार . असा तिने अंदाज बांधला.
      " सांग आता ... बसलो मी शांत " असं तो बोलला तशी ती भानावर आली आणि म्हणाली , " आधी मला सांग हा शब्द कसा माहित झाला तुम्हाला ? " त्यावर तो लगेच उत्तरला ," अग आम्ही मागच्या पटांगणात खेळत होतो तर समीरला ' ते ' सापडलं त्याने ' ते ' काडीला अडकवलं आणि आमच्या कडे घेवून आला. तशी सगळी पोरं शी sss घाण असं करत पळू लागली.  आतिश म्हणाला की ते ," कंडोम आहे " फेक तिकडे . तर महेश म्हणाला हो हे कंडोमच आहे . आमच्या घरी याच पॅक बघितलं आहे मी . तसा आरव म्हणाला , ' काही काय .... ते गर्ल्सच्या बॉडी पार्ट शी संबंधित काहीतरी खूप घाण असतं  . कोणी बघितलं तर ओरडतील आपल्याला. 'नक्की काय असतं यात चर्चा सुरू झाली आणि मग गूगल वर सर्च करुन शोधायचं ठरल आमचं. सुदर्शन म्हणतो की गूगल वर सर्च केलं की कळतं सगळं ."
          मुलांचे हे ज्ञान ऐकून  नीशाच्या पायाखालची जमीन सरकली.  तिने सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला आणि सगळया गोष्टींची नीट सांगड घालून सोपे करुन सांगता यावे यासाठी थोडा वेळ घेत तीने प्रश्न विचारला, "  तू हा शोध सोडून  कसा काय घरी आलास?  "  असं विचारलं तर तो म्हणाला , " अग किती वेळ झाला ते बफर च होतंय ? स्पेलिंग चुकलं की अजुन काय ? त्यांचे वाद सुरू आहे.  मला आला कंटाळा , तहानही लागली होती म्हणून मग आलो घरी " .
     त्यावर ती लगेच म्हणाली , " बरं झालं घरी आलास. गूगल वर असलेली सगळीच माहिती शंभर टक्के खरी नसते. " तसं तो आठवून म्हणाला , " हो ना ... बाबा ही हेच म्हणतो. गूगल वर सगळंच हंड्रेड परसेंट परफेक्ट नसतं काही. परवाच काका कडे जातांना  गूगल मॅप लावला होता , त्यावर टर्न लेफ्ट दाखवत होतं पण लेफ्टला तर रस्ताच नव्हता. शेवटी आम्ही लोकांना विचारत विचारत गेलो . जावू दे ...  आता तू सांग ना लवकर  ' ते ' नक्की काय असतं? " .
         अखेर तिने शब्दांची जुळवाजुळव केली आणि म्हणाली , " काही नाही रे , मेडिकल  सायन्स ने लावलेला  तो एक चांगला शोध  आहे " . त्याने लगेच विचारलं, " मग सगळे शी sss घाण का करत होते? "  तिने समजावून सांगायला सुरुवात केली , " अरे अर्धवट माहिती असली की असेच वागतात लोक . त्याला  शी sss  घाण म्हणतात कारण त्यांना तसचं सांगितल्या गेलेलं असतं . मुळात त्यात घाण असं काही नाही आणि ते फक्त मुलींच्या  बॉडी पार्टशी संबंधित नाही तर  मुलांच्या  शरीराशी ही संबंधित आहे .  एक असा शोध जो दोघांनाही अनेक घातक आजारांपासून वाचवतो .  असे काही आजार आहेत ज्यांचा इलाज करणे अती कठीण कधी कधी तर त्या आजाराने जीव ही गमवावा लागतो. मग असे आजार होवूच नये म्हणून काळजी घेतलेली कधीही चांगली . तेव्हा आपल्याला हे साधन  त्या आजारापासून  दूर राहण्यासाठी उपयोगी पडते. हे साधन  वापरून झाल्यावर इतरांनी त्याला हाताळले तर त्यापासून इतरांना संसर्ग होवू शकतो . म्हणून त्याची विल्हेवाट काळजीपूर्वक करावी लागते. पण चुकून तुम्हाला ते असे कुठे सापडले तर त्यापासून आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून त्याला हात मात्र लावायचा नाही. बस एवढंच .... बाकी त्यात घाण शी sss असं काही नाही ".
             साहिलने लगेच शंका बोलून दाखवली  " आरव  का म्हणाला की घरचे ओरडतील  आणि सचिन ही म्हणाला की ,  'आपण गूगल वर काय  शोधतो हे घरी  सांगायचं नाही. नाहीतर घरचे मारतील आपल्याला ' पण  तू तर माझ्यावर चिडली नाहीस . उलट त्याचा अर्थ सांगायला तयार झालीस. असं का ? "
          आता तिने त्यालाच पुन्हा प्रश्न विचारला " मला सांग , कार कशी चालवायची? हे  तुला गूगल वर शोधून  माहिती झालं आणि आम्हाला न सांगता तू ती चालवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल?" तो म्हणाला , " मला कार नीट चालवता येणार नाही ". तिने पुन्हा विचारले , " का  चालवता येणार नाही? गूगलवर तर सगळी माहिती  आहे न ".
तो म्हणाला , " गूगलवर माहिती आहे . तरी मी अजुन तितका मोठा झालो नाही ना... माझे पाय ब्रेक आणि  अॅक्सिलेटर पर्यंत नीट पोहचत नाही . ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर माझी उंची कमी पडते . मला समोरचा रस्ता ही नीट दिसत नाही. अशी कार चालवायला गेलो तर माझा अॅक्सिडेंट होईल ना. "
     याच प्रतिक्रियेचा फायदा घेत  ती लगेच त्याची समजूत काढ ण्यासाठी म्हणाली, " अगदी बरोबर .... कोणतीही गोष्ट  करण्याआधी ते करण्यासाठीचं   योग्य  वय लागतं . घरच्यांना न सांगता वेळेआधी काही करायला गेलात  तर तुमचंच जास्त नुकसान होणार आहे. म्हणुन काही पालकांना वाटतं की योग्य वेळेआधी आपल्या मुलाला असे काहीच  माहिती होवू नये . कारण ती माहिती मिळाली तर मुलं उत्सुकतेने काहीही प्रयोग करून स्वतःला इजा करुन घेवू शकतात. लहान वयात  चुकीची  माहिती  मिळाली किंवा  योग्य वया आधीच नको ती माहिती मिळाली   तर त्याचे वाईट परिणाम मुलांना आयुष्यभर भोगावे लागतात.   मग यावर सोपा उपाय म्हणून काही पालक आपल्या मुलांनी त्यांच्या वयाला योग्य नसतील अशा गोष्टींबद्दल  विचारलं की लगेच चिडतात ,रागावतात. त्यात त्यांचा आपल्या मुलाचे संरक्षण करणे हाच हेतू असतो. माझा ही अगदी तोच हेतू आहे . तुला चुकीची आणि अर्धवट माहिती  तुझ्या मित्रांनी दिली  . त्या माहितीचा  तुझ्यावर वाईट  परिणाम होवू नये .  तुला तुझ्या वयाला योग्य अशा भाषेत सगळं समजावून सांगावं '  असं मी ठरवलं म्हणून तुझ्या या प्रश्नांवर  मी चिडले नाही . या पुढेही तुला काहीही विचारायचं असेल तर तू मलाच येवुन विचार .उगाच गूगलवर शोधण्याचा प्रयत्न करू नको. आम्ही तुझी जी काळजी घेवू ती काळजी गूगल घेणार आहे का? " या तिच्या प्रश्नावर त्याने लगेच तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकून लाडात येऊन समजूतदार पणाचा आव आणत , निखळ हसत तिलाच समजावलं
, " अग गूगल काळजी घेत नाही ... फक्त माहिती देतं. काळजी घ्यायला तू आहेस न.... आय लव्ह यू मम्मा.  चल मी जावून त्यांना  चॉकलेट देवून येतो आणि सांगतो ही की ते काही शी ss घाण नसतं म्हणून ".  तीही त्याला हसत म्हणाली , "लवकर ये रे ... जास्त उशीर करू नको  " पण  मनातल्या काळजीने अनेक प्रश्न निर्माण केले .
         आता अजुन काय माहिती घेवून येणार आहे हा ? या   विचारानेच तिला धस्स झालं.   इंटरनेटच्या विळख्यात  तरुण पिढी तर सापडलीच आहे पण आता या लहानग्यांना त्यापासून कसं दूर ठेवता येईल ? साधन वाईट नसतंच ... पण त्याचा योग्य वापर  कळण्याइतपत ही मुलं मोठी झालेली नसतांना त्यांच्या हाती स्मार्ट फोन देणं कितपत योग्य आहे? फोन दिला नाही तरी टीव्ही वर जाहिरातींचा मारा होतोच आहे . या चिमुकल्यांपासून काय काय आणि कसं कसं लपवणार ?  गूगल फक्त माहिती देतं .... पण आपल्या मुलांच्या बाल मनाची काळजी कोण घेणार ? असे अनेक प्रश्नांची ती उत्तरं शोधत होती आणि तिला जाणवलं की कुंडीतल्या झाडांना कीड लागू नये म्हणून फवारणी करावी लागते. अगदी   तशीच मुलांच्या मनात वाईट विचार येवू नये म्हणून वेळोवेळी चांगल्या विचारांची पेरणी ही करावी लागते. जशी  झाडांची वाढ योग्य प्रमाणात व्हावी म्हणून वेळोवेळी माती उकरून मोकळी लागते, खत घालावं लागतं. अगदी तसचं मुलांशी वेळोवेळी मोकळा संवाद साधत , सकारात्मक दृष्टिकोनातून  त्याच्या साठी ज्ञानाची भंडारे खुली केली पाहिजेत. कधी कधी आपण झाडांच्या नको तितक्या वाढलेल्या फांद्या छाटून त्याला योग्य आकार देतो . तसेच मुलांच्या बुध्दीला वाईट वळण लागू नये म्हणून थोडा धाक, थोडी शिस्त जोपासत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा लागतो.  झाडांना  योग्य प्रमाणात उन आणि पाणी उपलब्ध करावं लागतं. अगदी तसचं आपल्या मुलांच्या बाबतीत ही सभोवतालच्या वातावरणातील बदल स्विकारतांना त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊनच ते स्विकारले पाहिजे . त्यांना योग्य ती साधन सुविधा उपलब्ध करून देतांना त्यावर आपले नियंत्रण  तर  हवेच पण त्याचा गैर वापर होवू नये याबाबत आपण सतर्क ही राहायला हवे आणि  हे सगळं पालक म्हणून  आपल्यालाच करावं लागणार आहे. तेव्हाच ते एक योग्य व्यक्ती म्हणून घडतील.
               अशा विचारात ती गढून गेलेली असतांनाच साहिल परत आला आणि त्याने आनंदात तिला सांगितलं  , " अग त्याचं नेट पॅक संपल होतं . म्हणून त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. बरं झालं तू मला सगळं सांगितलं होतं. मी त्यांना सांगितलं तर मलाच सगळी चिडवायला लागली .  तू सांगितलं आहे म्हंटल्यावर सगळी गप्पच बसली   " .
          हे ऐकुन  तिचा जीव भांड्यात पडला आणि  पुन्हा नव्या जोमाने ती बाग कामाला लागली.
     
©️ अंजली मीनानाथ धस्के
लिखाण आवडल्यास नक्की लाईक... कमेंट .. नावासहित शेयर आणि फॉलो करून प्रोत्साहित करायला विसरू नका.

  टिपः   मी काही पट्टीची लेखिका नाही . ज्या प्रसंगांनी मला काही तरी शिकवलं ... किंवा आठवीत राहिले ... ते लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून प्रसंग चांगले अथवा वाईट जसे घडले तसे स्वीकारून  ... इतरांचे त्या बद्दलचे अनुभव ऐकून .... माझ्या लिखाणातून तसेच ते व्यक्त करण्याचा व त्यातून काही तरी शिकण्याचाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कधी कधी या प्रसंगाना कल्पकतेची जोड दिली जाते तेव्हा काही चुका झाल्या तर माफी असावी . 
इतर लिखाण माझ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. anjali-rangoli.blogspot.com


4 comments:

  1. Khupach chan lihalay ga...kharach sadhana kahi vait nastat. Apan kasa vapar karto tya war aahe sagla. Aani evdha parents ne kasa sangava he tyanahi kalayala wel lagto. Pan tuze lekh hya karita upyogi padtat

    ReplyDelete