व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग ३)

        

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग ३)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ३:

©️Anjali Minanath Dhaske 

        प्रसादला कामानिमित्त दहा दिवस बाहेर गावी जायचे होते परंतू वनिताला प्रतीकसोबत एकटीला रहाणे जमेल का? याची चिंता त्याला सतावत होती. वनिताने त्याला कंपनी कोणत्या कामासाठी व कुठे पाठवत आहे ? नक्की किती दिवसांसाठी पाठवत आहे? असे प्रश्न विचारले तेव्हा त्याने उत्तर द्यायचे सोडून वनिता सारखी संशय घेते म्हणत भांडण उकरून काढले. तो घरात नीट बोलेना झाला.  नेमका तेव्हाच वनिताचा लहान भाऊ संदीप नोकरीच्या मुलाखतीसाठी वनिताकडे रहायला आला. तो रहायला आल्यावर प्रसादने त्याचे हसून स्वागत केले व त्यालाच दहा बारा दिवस राहण्याचा आग्रह केला. संदीप रहायला तयार झाल्यावर वनिताशी एक शब्दही न बोलता प्रसाद बॅग घेवून घराबाहेर पडला. वनिताचे फोनही तो घेत नव्हता. संदीपला मात्र रोज फोन करून ख्यालीखुशाली विचारत होता.  वनितापेक्षा संदीप वयाने लहान म्हणुन त्याच्याजवळ  मन मोकळे करता येत नव्हते. प्रसाद भांडण करून घराबाहेर पडला होता हे तिला उघडपणे भावाला सांगता येत नव्हते. प्रसादचे विचित्र वागणे सहन करणेही अवघड जात होते. तिची नुसती घुसमट होवू लागली. या उलट भाऊजींना आपल्या बहिणीची किती काळजी आहे याचे कौतुक तिच्या भावाला वाटत होते. तसे तो घरी आईवडिलांना फोन करून कळवत देखील होता. 

        अखेर प्रसाद दहा बारा दिवसांनी परत आला. तो आल्यावर वनिताला बरे वाटले. त्याने येतांना प्रतीकसाठी बरीच खेळणी आणली होती. भावासोबत पाठविण्यासाठी म्हणून भरपूर मिठाई आणली होती. त्याचे असे वागणे पाहून आपलेच काहीतरी चुकते आहे का? असे वाटून प्रसादचा राग घालवण्यासाठी तीने स्वतःहून त्याची माफी मागितली. त्यानेही तिला मोठ्या मनाने माफ केले. दुसर्‍या दिवशी संदीप गावी निघून गेला. प्रसादही प्रतीकला घेवून बागेत फिरायला गेला. वनिताने घर आवरायला घेतले तसे तिला  प्रसादने खेळणी व मिठाई आणलेल्या कपाडी पिशव्या दिसल्या. प्रत्येक पिशवीवर मोठ्या अक्षरात दुकानाचे नाव होते व त्याखाली बारीक अक्षरात पत्ता होता. पत्ता वाचल्यावर वनिताला लक्षात आले की मिठाई व खेळणी दोन्ही गोष्टी  याच शहरातील दुकानातून विकत आणल्या आहेत. मग काल प्रसादने ती मिठाई खास बाहेर गावाहून आणलेली  आहे असे संदीपला का सांगितले होते? संशयाने तिला पुन्हा एकदा घेरले.  

         खरं तर तिला तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरे हवी होती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रसाद देणार नाही याची तिला खात्री होती. या प्रश्नांची उत्तरे तिची तिलाच शोधायची होती. कटकट ,भांडण करण्यापेक्षा सध्या तरी प्रतीकच्या वाट्याला येणारे बाबांचे प्रेमाचे क्षण तिला अधिक महत्त्वाचे वाटले. यावेळी तीने परिस्थितीला संयमाने सामोरे जाण्याचे ठरविले. 

      दिवसा मागून दिवस जात होते. प्रसाद कधी कामावर जात होता तर कधी फोन आल्यावरच घराबाहेर पडत होता. कधी दिवस दिवस प्रतीकसोबत खेळण्यात घालवत होता. कधी अचानक कामाचे निमित्त सांगून दोन तीन दिवस बाहेर गावी निघून जात होता. वनिताशी जुजबी बोलत होता. स्वतःहून तिच्याशी शारीरिक जवळीक टाळत होता. सुरवातीला ती स्वतःहून जवळ गेली तरी तो केवळ तिला संशय येवू नये म्हणून संबंध ठेवत होता. नंतर नंतर तर त्याने तशी वेळच येवू नये म्हणून रात्री उशिरा घरी येण्यास किंवा संध्याकाळी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. आईवडिलांना  खर्च करायला पैसे मात्र तो वेळच्या वेळी पाठवत होता. यावेळी वनिताने संयम बाळगायचा ठरविले असल्याने तिने कोणत्याच शंका उपस्थित केल्या नाही. आला दिवस समाधानात घालवायचा असेच ठरविले. 

         वर वर सगळे कसे सुरळीत सुरू होते. प्रसाद बाहेर गेला की तीही प्रतीकला बाबा गाडीतून खालच्या बागेत फिरवत असे. हळू हळू तिच्या ईतर बायकांशी ओळखी होवू लागल्या. प्रसाद घरी नसतांना शेजारी राहणार्‍या बायका तिच्या मदतीला येवू लागल्या. असेच बोलता बोलता शेजारच्या काकू बोलून गेल्या की, ' ती बाळंतपणाला माहेरी गेली होती तेव्हा तिच्या घरात रोज नवीन नवीन तरुण मुले,माणसं रहायला येत होती. कचऱ्याच्या टोपलीत रोज दारूच्या बाटल्यांचा ढीग असे. तेव्हा काही सदस्यांनी तिच्या नवर्‍या विरोधात सोसायटी कार्यालयात तक्रार केली होती. इथे कुटुंबाला राहण्याची परवानगी आहे. केवळ तरुणांना घर भाड्याने देता येत नाही. बर झाले की वनिता लवकर आली नाहीतर तिच्या नवर्‍याला हे घर सोडावे लागले असते'  ही सगळी माहिती तिच्यासाठी नवीन होती. आपल्या शिक्षणासाठी पैसे व परवानगी देत नाही . दारू प्यायला पैसे कुठून येतात? तिचा नुसता त्रागा झाला. प्रसादने तीला काहीही कल्पना न देता घरात परक्या लोकांना ठेवून घेतले याची तिला चीड आली. तिला आठवले की,  ती जेव्हा बाळाला घेवून आली होती तेव्हा घराची अवस्था फार खराब होती. प्रसादला विचारल्यावर त्याने अधून मधून मित्र पार्टी करायला यायचे त्यात घर खराब झाले. कामाला येणार्‍या मावशीच्या मदतीने घर स्वच्छ करून घे म्हणत विषय बंद केला होता. तिने हजारदा सुचविले होते की ती येण्याआधीच कामाला येणार्‍या मावशी कडून घर आवरून ठेवावे परंतू त्याने तिच्या माघारी काम करणार्‍या मावशीला कधीच घरात येवू दिले नव्हते. तेव्हा तिला ते योग्यही वाटले होते. परंतू काकूंनी दिलेल्या माहितीने ती गांगरून गेली. तिने चेहर्‍यावर दाखविले नसले तरी वनिताच्या मनात पुन्हा शंका जोर धरू लागल्या.

क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

वनिताच्या  माघारी घरात नेमकी काय घडले होते? प्रसाद तिच्याशी वारंवार खोटे का बोलत होता?  बायको असूनही तो वनिताशी  शारीरिक जवळीक का साधत नव्हता?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.

भाग १  link 

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ५ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html

भाग ६ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_9.html

भाग ७ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html

भाग ८ link:

भाग ९ link:

भाग १० link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_13.html

भाग ११  link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_87.html

भाग १२ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_46.html

भाग १३ link: समाप्त (The end)

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html









व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी ( भाग ४)

 कथा मालिका :  व.नि.ता ( भाग ४)

विषय: कौटुंबिक कथा

भाग ४:

©️Anjali Minanath Dhaske 


               वनिता आई वडिलांकडे प्रसाद बद्दलं तक्रार सांगायला गेली की ते काहीही ऐकून न घेता प्रसादचे गुणगान गायला सुरुवात करायचे. सासरी पैसे वेळच्या वेळी पोहोचत असल्याने त्यांना काहीही सांगून फारसा ऊपयोग नव्हता.   या वेळीही तिने प्रसादशी  कोणतीही चर्चा, भांडण न करता स्वतःच्या  सगळ्या शंकांचे  शांतपणे ठोस पुरावे  मिळवून निरसन करण्याचे ठरविले. तिने घरातले वातावरण बिघडू  न देता दिनक्रम सुरू ठेवला. प्रतीकचा पहिला वाढदिवस गावी धुमधडाक्यात साजरा केला. 

  वनिता आता फार प्रश्न विचारत नाही, शंका घेत नाही, भांडण करत नाही म्हंटल्यावर प्रसाद निर्धास्त झाला. असेच दिवसामागून दिवस जात राहिले. एक दिवस शेजारच्या काकूंनी वनिताला सांगितले की , ' आदल्या दिवशी त्या रात्री सहकुटुंब जेवायला हॉटेलात गेल्या होत्या तेव्हा तिथे प्रसाद त्यांना काही माणसांसोबत बराच उशिरापर्यंत बसलेला दिसला होता.' हे ऐकल्यावर प्रसादची बाजू सावरायला तीने हसून, " मित्रांना भेटायला गेले होते " म्हणत विषय टाळला. 

        अजूनही  प्रसाद नक्की काय काम करतो याची वनिताला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे तो त्याच्या कार्यालयातील मित्रांसोबत होता की ईतर कोणा सोबत याची तिला मनातून खात्री देता येत नव्हती. 

            परंतू  आता  फक्त संयम बाळगून काही होणार नाही. याची तिला जाणीव झाली  तीने अधिक सावध रहायला सुरुवात केली.  नवर्‍याला फोन आला व तो गॅलरीत जावून हळू आवाजात बोलायला लागला की तीही दाराच्या पडद्यामागे लपून त्याचे बोलणे ऐकू लागली.  कोणाला तरी माणसे हवी आहेत, रेट परवडत नाही, किती वाजता भेटायचे? कोणीतरी मुलं पाठवत आहे, काम नक्की होईल, अशा आशयाची वाक्ये कानावर पडत होती. त्यातून तिला फार अर्थ बोध होत नव्हता. परंतू तिने डोळे आणि कान  कायम उघडे ठेवून वावरायला सुरवात केली. 

        या सगळ्या प्रयत्नात तिला प्रसादच्या मोबाईलचा पासवर्ड मिळाला . प्रसाद एक मिनिटही फोन स्वतःच्या नजरेआड करत नसे. रात्री घरी आल्यावर झोपतांनाही तो मोबाईल बंद करून मोबाईलला उशी खाली ठेवून झोपत असे. कधी कधी तो वनिताची परीक्षा बघण्यासाठी म्हणून स्वतःचा मोबाईल तिच्या हाताशी येईल असा ठेवत असे तेव्हा वनिताही आवर्जून त्याच्या मोबाईलकडे दुर्लक्ष करत होती. कोणताही संशय न येता त्याचा मोबाईल हातात मिळविण्यासाठी विनिता योग्य संधीची वाट बाघत होती. ती संधी तिला लवकरच मिळाली.

           प्रसाद तापाने फनफनला असतांना वनिता त्याचा दवाखाना, खाणे पिणे यांची काळजी घेत होती. प्रसाद औषधांच्या गुंगीत असल्याने अचानक बराच वेळासाठी त्याचा फोन वनिताच्या हाती लागला.  तिने फोन उघडून फोटो गॅलरी, मेसेज,मेल बॉक्स चेक करत असतांना तिला काही माहिती मिळाली . 

   मेल बॉक्स मधल्या मेल वरुन प्रतीकच्या जन्माआधीच प्रसादची नोकरी गेलेली होती. त्याला नोकरी साठी ब्लॅक लिस्ट केल्याने त्याला ईतर कुठेही नोकरी मिळणार नव्हती. याची माहिती तिला मिळाली. प्रतीक सोबत खेळण्यात तो दिवस दिवस घरीच असे याची तिला आठवण झाली. तीने कामाबद्दल चौकशी सुरू केली होती तेव्हा त्याने पुन्हा कामावर जायला सुरवात केली होती.  तेव्हा तो कामावर जायचे फक्त नाटक करत होता. याची जाणीव झाल्यावर तिला मोठा धक्का बसला. 

फोटो गॅलरीमध्ये अनेक पुरुषांचे फोटो होते.  मेसेज मध्ये ही वेगवेगळ्या पुरुषांनी वेगवेगळ्या वेळी प्रसादला भेटायला बोलाविले होते. यावरून फार काही कळत नव्हते. 

            नोकरी जाऊनही घर खर्च भागविण्यासाठी सध्या प्रसाद नेमके काय काम करतो? नोकरी गेली आहे हे स्पष्टपणे न सांगता रोज कामावर जाण्याचे नाटक का करतो? याचा उलगडा काही केल्या होत नव्हता. कंटाळून तीने घर कामात लक्ष गुंतवण्याचा प्रयत्न सुरू केला. 

     तेवढ्यात प्रासदचा मोबाईल वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर ' ऑफिस ' हे नाव झळकले . वनिताची उत्सुकता चाळवली.  प्रसाद औषधाच्या  गुंगीत शांत झोपला होता म्हणून तिने भीतभीतच फोन सुरू केला.  फोनवरचे बोलणे ऐकून तिच्या अंगावर सरसरून काटा आला. तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिने एका झटक्यात मोबाईलला आपल्या पासून दूर फेकले.


क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

   प्रसादला ब्लॅक लिस्ट का केले? नोकरी नसतांना त्याने रोज कामावर जाण्याचे नाटक का केले? नोकरी नसतांना आता ' ऑफिस '  मधून फोन  कसा आला ? फोन घेतल्यावर वनिताची अवस्था इतकी बिकट का झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.

भाग १  link 

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html




भाग १३ link: समाप्त (The end)

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html





व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी (भाग १)

  

कथा मालिका :  व.नि.ता ( भाग १)

विषय: कौटुंबिक कथा

भाग १:

©️Anjali Minanath Dhaske 

                 वनिताने गावाकडच्या महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केले होते.  शहरात चांगल्या नोकरीवर असलेल्या रूबाबदार प्रसादचे स्थळ सांगून आल्यावर तिच्या घरात आनंदी आनंद झाला . वनिता आणि प्रसाद यांचे लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडले होते. लग्नात वनिता वीसची तर प्रसाद पंचवीस वर्षे वयाचा होता. वनिताला दोन बहिणी आणि एक भाऊ होता. वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्न करून देण्याकडे त्यांचा कल जास्त होता. 

        लग्नानंतर काही महिने वनिता प्रसादच्या कुटुंबासोबत गावच्या घरीच राहिली. खर म्हणजे तिला नवर्‍यासोबत शहरात राहण्याची व पुढचे शिक्षण पूर्ण करण्याची ईच्छा होती. प्रसाद दर आठवड्याला गावी येणे जाणे करत होताच. राजा राणीचा संसार असावा हे स्वप्नं तिला खुणावत होते. वनिता शहरात जाण्यासाठी प्रसादच्या मागे लागली होती.  वनिताच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रसादने आई वडिलांचे कारण देत तिला शहरात नेण्याचे टाळले होते.  वनिताच्या माहेरच्यांनी ही एक दोन वेळा सासरकडच्यांना सुचविले की, नवीन जोडप्याने शहरात संसार मांडून एकत्र राहावे. नवीन नवरीला शहराची हवा लागली तर ती सासू सासर्‍यांचे कधीच काही करत नाही अशी भीती सासरच्या मंडळींना वाटत असल्याने त्यांनीही तिला शहरात पाठविण्याचे फार मनावर घेतले नाही. 

     लग्न होऊनही मुलाचे शहरात खाण्याचे आबाळ होतात ही गोष्ट लक्षात आल्यावर  सासरच्यांनी वनिताला शहरात जायला परवानगी दिली. प्रसाद मात्र आता महागाईचे कारण पुढे करत तिला नेणे टाळत राहिला.  यातच वर्ष निघून गेले.  घरात आता पाळणा हलायला हवा असे वाटून प्रसादच्या आई वडिलांनी वनिताला शहरात नेण्याचा आग्रहच सुरू केला तेव्हा मात्र प्रसादचा नाईलाज झाला. 

            अखेर शहरातील  दोन खोल्यांमधे वनिता प्रसादने संसार थाटला. वनिता आवडीने रोज प्रसादला डबा बनवून देई. प्रसादही संध्याकाळी तिच्या ओढीने घरी परतत होता. दिवस आनंदात जात होते.  सुटीच्या दिवशीही प्रसादला काम असे.  वनिता घरात एकटी कंटाळून जाई.  तिने प्रसादला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची तिची ईच्छा अनेकदा सांगून पहिली. सध्याच्या पगारात फक्त घर खर्च भागविणे शक्य असल्याने शिक्षणासाठी अधिक खर्च करणे शक्य नाही म्हणत त्याने तो विषयही मोडीत काढला. माहेरच्यांकडून कसलीही मदत होणार नाही याची तिला खात्री असल्याने तिनेही शिक्षणाचा विषय डोक्यातून तात्पुरता काढून टाकला. बाहेर फिरायला जावू म्हणुन एकदा तिने पिच्छा पुरविला तेव्हा त्याने सिनेमाची दोन तिकिटे काढून आणली.  तिला सिनेमाला घेवून गेला.  

           सिनेमा सुरू झाला आणि प्रसादचा फोन वाजला. ऑफिसचे काम आहे म्हणून तो बाहेर पडला.  वनिताने त्याला खूप फोन केले होते पण त्याचा फोन लागत नव्हता. ती शहरात अजून रुळली नव्हती. त्याची वाट पहावी की घरी जावे या गोंधळात सिनेमा संपण्याची वेळ झाली.  तेवढ्यात धापा टाकत  प्रसाद तिच्याजवळ येवून बसला.  तिची चिडचिड झाली होती परंतू स्थळाचे भान ठेवता तिने गप्प राहणे पसंत केले.  घरी गेल्यावर मात्र त्यांचे कडाक्याचे भांडण झालेच. नोकरी टिकवायची असेल तर सुट्टीच्या दिवशी पण काम करावे लागते याच मतावर प्रसाद ठाम होता.  दोन दिवसांच्या अबोल्यानंतर तिनेच अखेर माघार घेतली. प्रसादने मात्र  त्या दिवसानंतर  सुट्टीच्या दिवशी तिच्यासोबत बाहेर जाणे सोडून दिले . 

        प्रसादने लवकरच दोन खोल्यातून तीन खोल्यांमधे संसार हलविला.  नवर्‍याची नोकरीत प्रगती होत आहे म्हणुन वनिता ही समाधानी होती. प्रसादला आवडत नसल्याने घराबाहेर ती फारशी पडत नव्हती.  त्यामुळे शेजारी राहणार्‍या कुटुंबाशी तिच्या ओळखीही खूप नव्हत्या. सामान आणण्याकरता बाहेर पडतांना एक दोघींशी दृष्टी भेट फक्त होत राही .

   प्रसाद त्याच्या कामामधे अधिकाधिक व्यग्र होत गेला तसे तिला घर खायला उठले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावे, सासू सासर्‍यांना आपल्याकडे  रहायला बोलावून घ्यावे असे तिला फार वाटत असे. परंतू शहरी भागातील जीवन  त्यांना मानवणार नाही ही सबब देवून प्रसाद त्यांना बोलाविणे टाळत  वनितालाच दर महिन्या दोन महिन्यांनी आठ दहा दिवस गावी पाठवत असे.  वनिताच्या माहेरी शेती असल्याने तिचे आईवडील ही शहरातल्या तिच्या घरी कधी येत नसत. अशातच तिला दिवस गेले. 

क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

वनिताने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले का? नवीन लग्न झालेले असूनही प्रसाद कामाला इतके महत्व का देत आहे? वनिताच्या कोणत्याही मागणीला तो का टाळत आहे?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

भाग २ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_8.html

भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html

भाग ५ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_68.html


भाग ६ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_9.html


भाग ७ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_71.html

भाग ८ link:



भाग १३ link: समाप्त (The end)

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html




व.नि.ता वरदायिनी निर्मोही तारिणी (भाग २)

 कथा मालिका :  व. नि. ता. (भाग २)

विषय: कौटुंबिक कथा

भाग २ :

©️Anjali Minanath Dhaske 

           प्रसादने बाळंतपणासाठी  वनिताला गावी पाठविण्याचा निर्णय घेतला.  सासरी, माहेरी डोहाळे पुरवल्या जात असल्याने तीही आनंदी होती. खरं तर होणार्‍या बाळाला बाबांचा जास्तीत जास्त वेळ सहवास मिळावा अशी तिची ईच्छा होती.  परंतु बाळाच्या आगमनाची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करता यावी म्हणून प्रसादने ओव्हर टाइम करायला सुरवात केली होती त्यामुळे तिने मनातली ईच्छा बाजूला ठेवून गावी जाण्याचा निर्णय घेतला. प्रसाद दर महिन्याला तिच्या खर्चासाठी म्हणुन काही रक्कम  पाठवत होताच. तोही महिन्यातून दोन वेळा न चुकता गावी तिला भेटायला येत होता. अशातच तिच्या लहान बहिणीचे लग्न ठरले. तेव्हा वडिलांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट असल्याने लगेच लग्न करून द्यायला वडील तयार नव्हते. मुलाकडची मंडळी जास्त दिवस थांबायला तयार नव्हती. ठरलेले लग्न  मोडण्याची भाषा मुलाकडची मंडळी करू लागली होती.  तेव्हा चांगले स्थळ हातातून जावू नये म्हणून प्रसादने स्वतःहून मध्यस्ती केली.  तिच्या वडिलांना बिनव्याजी पाच लाख रुपये देवून बहिणीचे लग्न धुमधडाक्यात करण्याचे सुचविले. आपल्या शिक्षणासाठी पैसे नाहीत असे म्हणणार्‍या प्रसादने तिच्या वडिलांना एक हाती पाच लाख रुपये कसे दिलेत असा साधा प्रश्न  वनिताच्या निरागस मनाला पडला नाही. बहिणीचे लग्न झाले याच आनंदात ती दंग होती. त्याच्या या कृतीने तिला आणि तिच्या घरच्यांना फार समाधान झाले. तिच्या लहान बहिणीचे लग्न पार पडून तीही संसाराला लागली. यानंतर वनिताच्या माहेरी प्रसादचे विशेष कौतुक  होवू लागले. वनिताचा सुखी संसार बघून आई वडील निश्चिंत होते. 

             बघता बघता घरात लहान पाहुण्याचे आगमनही झाले. गोंडस नातू मिळाल्याने सासरीही सगळे आनंदात होते. बाळाचे  ' प्रतीक ' असे नामकरण केले. 

प्रतीक तीन महिन्याचा झाला तरी प्रसाद तिला नेण्याचे नाव काढेना. नातवंडाची बाललीला अनुभवण्यासाठी सासरचे ही तिला स्वतःहून प्रसादकडे शहरात पाठवेना. प्रसादला आपली ओढ राहिली नाही या भीतीने अखेर  तिनेच हिंमत करून सासू जवळ विषय काढला.  प्रसादचे खाण्यापिण्याचे फार हाल होतात ही सबब पुन्हा एकदा सांगून तिने सासूचे मन वळविले. प्रसाद आल्यावर सासूने वनिताला घेवून जाण्याचा विषय काढला. परंतु तो टाळाटाळ करतोय हे लक्षात आल्यावर, ' पोरगं हातचं जातंय की काय ' या शंकेने सासूने हट्टाने वनिताची रवानगी प्रसादसोबत केली.

            आता प्रतीकशी खेळण्यात प्रसादचा जास्तीत जास्त वेळ घरात जावू लागला. फक्त कामासाठी बोलावणे आले तरच तो घराबाहेर पडू लागला.  सुरुवातीला प्रतीकचा सांभाळ व घर काम करतांना वनिता गोंधळून जात होती.  प्रसाद घरी असल्याने तिला बरीच मदत करत होता. सुरुवातीला त्याच्या घरी असण्याने ती सुखावली होती. नेहमी फोन आला की तो लगेच कामासाठी बाहेर पडत असे. कुठे जातोय? कधी येणार? असे प्रश्न तीने विचारले की तो तुटक उत्तरे देत असे. पूर्वी रोज सकाळीच कामावर जाणारा प्रसाद आता मात्र दिवस दिवस घरात कसा काय बसून  असतो ? फोन आल्यावर तास दोन तास तो बाहेर जातो. ईतका कमी वेळ काम करूनही चांगला पगार देणारी कोणती नोकरी तो करतो? असे अनेक प्रश्न तिला चिंतित करत होते. 

           तिने त्याला अनेकदा विचारले की, तो नेमके काय काम करतो? हल्ली तो घरीच जास्त वेळ कसा घालवतो? ऑफिसचे फोन असे वेळी अवेळी, रात्री बेरात्री का येतात? त्याने कधीही प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दिली नाहीत. बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली की  माणसे दुसर्‍या बाईकडे आकर्षित होतात, अशी शंका उगाच तिच्या मनात जोर धरू लागली. तीने त्याचा फोन तपासण्याचा प्रयत्न केला पण प्रसाद आंघोळीलाही जातांना फोन सोबत घेवून जात होता. प्रसाद वनिताकडे दुर्लक्ष करत होता. घरात  असतांना पुर्वीसारखा तिच्याशी प्रेमाने बोलत नव्हता. वनिताची चिडचिड वाढली . त्यांच्यात सारख्या कुरबुरी सुरू झाल्या. 

       वर वर बघता प्रसादचे वागणे सामान्य होते. प्रतीकचे तर तो खूप लाड पुरवत होता.  प्रतीकला दवाखान्यात नेतांना फोन आला तरी तो जाण्याची कधीच घाई करीत नव्हता.  प्रतीकला घरी आणून सोडल्यावरच तो कामावर जात होता.  प्रतीकच्या वेळा सांभाळतांना ती दमून जाते म्हणुन तो कधीही स्वयंपाक, घरकाम केलेच पाहिजे या बाबत आग्रही नव्हता.  तरीही त्या दोघांच्या नात्यात खोलवर कुठेतरी काहीतरी उसवत जात होते. केवळ शंका घेवून भांडण काढणे तिच्या स्वभावात नव्हते परंतु गप्प बसून सहन करणेही तिला शक्य नव्हते.  माहेरी किंवा सासरी कोणालाही याबाबत सांगणे तिला जमणार नव्हते.  जवळची अशी कोणी मैत्रीणही नव्हती जिच्याशी बोलून मन हलके करता येईल. 

         अशातच प्रसादने पूर्वीसारखे रोज कामावर जायला सुरवात केली.  तिनेही मन घट्ट करून शंका बाजूला सारल्या आणि प्रतीकसोबतच स्वतःवर लक्ष द्यायला सुरवात केली. व्यायाम करून तिने शरीर पुन्हा सुडौल बनवायला सुरवात केली.

क्रमशः 

©️Anjali Minanath Dhaske 

पुणे 

प्रसाद नक्की कोणती नोकरी करत होता? दोघांच्या नात्यात नक्की काय उसवत चालले होते? प्रसाद दुसर्‍या स्त्रीच्या नादी लागला होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.

भाग १  link 

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_2.html


भाग ३ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_43.html

भाग ४ link:

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_93.html






भाग १३ link: समाप्त (The end)

https://anjali-rangoli.blogspot.com/2022/08/blog-post_15.html



रक्षाबंधन 2022

 #रक्षाबंधन 2022

अगदी सोपी सुंदर रांगोळी. तुम्हीही काढून बघा. 

https://youtu.be/CBIkjha7xyw

©️Anjali Minanath Dhaske (Elgire )




श्रावण सोमवार (२) २०२२

 #श्रावण_सोमवार२०२२ (2)

#शिवामूठ #तीळ #रांगोळी 

ठिपक्यांची ही रांगोळी काढायला खूप सोपी असून अत्यंत आकर्षक दिसते. संपूर्ण व्हिडिओ दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. 

https://youtu.be/2zYxktG935w

©️Anjali Minanath Dhaske 





नागपंचमीला काढायच्या रांगोळ्या २०२२

 #नागपंचमी

 #रांगोळी२०२२

खास तुमच्यासाठी घेवून येत आहे पारंपरिक रांगोळ्या . रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

https://youtu.be/4Cx3Ilr2pI0

©️Anjali Minanath Dhaske