अबोली

   #अबोली
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के

                         पूजेला फुले हवीत म्हणून अश्विनी रोज शेजारच्या वाड्यात जात असे. शेजारी राहणारे आजी आजोबा तिला आपली नातच मानत होते. त्यामुळे  ते तिला हक्काने बोलावून घेत व टोपलीभर फुले देत. आजी दहा दिवसांसाठी माहेरी म्हणजे त्यांच्या भावाकडे गेल्या होत्या. आजोबा एकटेच होते घरी म्हणून मग दोन्ही घरच्या पूजेसाठी फुले वेचायचे आणि फोटोसाठी हार करायचे काम  तिलाच मिळाले होते. ती रोजच्यासारखीच फुले वेचत होती.  अबोलीची थोडी फुले घ्यावीत म्हणून तिने हात पुढे केला तेवढ्यात आजोबा मागून आले व म्हणाले , " अबोलीची फुल तेवढी तोडू नकोस, तुझी रागवेल आपल्यावर ". त्यावर ती आश्चर्याने म्हणाली, " का नको? मी रोजच तर ही फुले घेत असते. आजींना फार आवडतात". त्यावर ते म्हणाले, " तेच तर, तिला फार आवडतात अबोलीची फुले. ती रोज त्याचा छोटा गजरा बनवून माळते केसात. तिची फुले आपण पूजेला घेतली तर तिला गजरा बनवता येत नाही मग ती दिवसभर कुरकुर करत असते." असे बोलून त्यांनी आजीची नक्कल करत " एवढी फुल असतांना ...... काय गरज असते अबोलीची फुले तोडायची कुणास ठाऊक. मला मेलीला एक तर आवड आहे अबोलीचा गजरा माळायची पण हे........ मुद्दाम विसरतात आणि पूजेला घेतात सगळी फुले". त्यांनी हुबेहूब आजीची नक्कल केली होती. 
त्यावर ती दोघही खळाळून हसली. 
         आजोबांना चिडवत अश्विनीही  बोलून गेली ,"आजोबा तुम्ही फारच धाकात आहात हं... आजींच्या. त्या घरी नाहीत तरी तुम्ही फुल तोडत नाही आहात. " असे ती म्हणाली तसे आजोबा मिश्किल पणे म्हणाले " तिच्या डाय केलेल्या केसात सुंदर दिसतो गजरा  पण मी मुद्दाम घेतो चार दोन फुले पूजेला. ती लाडीक चिडते, बडबड करते, घर कसं भरल्यासारखं वाटतं. आता ती घरी नाही तर फुले तोडून आणि ती पूजेला घेवून तरी काय फायदा".
           आजी परत आल्यावर त्यांना झाडावर सुकलेली फुले दिसली तेव्हा अश्विनीने त्यांना," आजोबांनी एकही फुल तोडू दिले नाही" अशी कौतुकास्पद तक्रार केली. त्यावर आजी लटक्या रागाने म्हणाल्या, "बघ कसे मुद्दाम त्रास देतात मला. मी नव्हते घरी तर फोन करुन म्हणतात कसे, "अबोलीचे एकही फुल तोडले नाही हं.... तू चिडतेस म्हणून सगळी फुले जपून ठेवली आहेत. आलीस की खात्री करून घेशील". आजींनीही आजोबांची हुबेहूब नक्कल केली असल्याने अश्विनीला कौतुक वाटले.  आजींचे बोलणे सुरूच होते ,"खरं तर त्यांनाच मी अबोलीची फुले केसात माळलेली आवडतात. ही फुले खूपच नाजूक म्हणून मग मी त्यांचा गजरा विणते.गजरा कसला ... सुटी फुले माळता येत नाही म्हणून दोऱ्यात गुंफून छोटा गुच्छ करते इतकंच.
अबोलीच झाड ते केवढं..... त्याला फुलं येतात ती किती ......
बरं मी केसात फुल मळावी हा आग्रह ही त्यांचाच ..... तरी मुद्दाम पूजेला हीच फुले घेतात "
       त्यावर अश्विनी म्हणाली,"  आजी ... तुम्ही चिडावे म्हणून ते मुद्दाम तसे करतात ".  आजी गालातल्या गालात गोड हसल्या व बोलल्या , " मलाही माहित आहे गं, ते गंमत करतात. पूर्वी सासू , सासरे, नणंद, माझ्या माहेरची माणसे, आमची मुले..... यावरून छोटे मोठे वाद व्हायचे. मग काय  धुसफूस, रागवणं, रूसून बसणं, समजूत काढणं, यात दिवस मजेत जायचे. आता एकही कारण नाही संवाद साधायला. जुन्या आठवणी काढत बसायला आम्हाला आवडत नाही तेव्हा अशी फुटकळ कारण काढून लुटूपुटूचे भांडण करतो. दिवस कसा मजेत जातो. उगाच का आजोबा रोज सकाळी अबोलीला आवर्जून पाणी घालतात. मला लागतील तेवढी फुले बाजूला काढून जास्तीची फुले तेवढी पूजेला घेतात. तरी मी दुर्लक्ष करून त्यांच्यावर चिडते, रागावते. मग त्यांनाही बहाणा मिळतो हसण्याचा आणि हळूच केसात फुले माळून माझा  राग घालवण्याचा.  नाव  ' अबोली ' आहे या फुल झाडाचे पण आमच्या संवादाचे .... सुखाचे कारण आहे बघ ".
          
            आज  दोघींच्या या संवादाला दोन वर्षे झालीत.
            आजही अश्विनी सकाळी  फुले वेचायला शेजारच्या वाड्यात जाते. आजही आजी न चुकता आबोलीचा गजरा विणतात. लाडीक तक्रारही करतात, " मुद्दाम मला मागे ठेवून गेलात न ... माझी फजिती बघायला. पण मीही खमकी आहे. सगळं एकटीने करते. अगदी तुम्ही अबोलीच्या झाडाला जसे झारीने हळुवार पाणी घायलायचे तसेच घालते हो... मीही.  बघा फुले कशी टवटवीत आहेेत. हारही किती सुंदर झालाय.  तुमच्या तसबिरीला कसा एकदम खुलून दिसतो".
         अश्विनीचे डोळे पाणावतात. " आजी ... तुम्ही चिडावं म्हणून ते मुद्दाम तसे करतात " असं आज मात्र तिला म्हणवत नाही. धूसर नजरेने ती सुईत दोरा ओवण्याचा निरर्थक प्रयत्न करत राहते.

©️ अंजली मीनानाथ धस्के

          ( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

एक व्यथा

 
   #एक_व्यथा         
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के
                       आज कावेरी जरा लवकरच उठली होती. खूप दिवसापासून भंगलेली बाल गणेशाची मूर्ती घरामधे तशीच पडून होती. खरं तर घरात जागा नसतांना केवळ मुलांना आवडली म्हणून केवढ्या हौसेने छोटा भीमचे रुप असलेली  गणेश मूर्ती घरी आणली होती. पण आता मात्र रस्त्यावर गर्दी वाढायच्या आत मूर्तीला कुठेतरी ठेवून यावे,  असे तिच्या मनात होते. कामांची घाईही खूप होती. तिने कामांची यादी केली आणि मूर्ती घेवून घराबाहेर पडली. बरेच अंतर गेल्यावरही तिला मूर्ती ठेवायला मनासारखी जागा मिळेना तेव्हा ती फार वैतागली आणि तेवढ्यात तिचा मोबाईल खणखणला. चडफडतच तिने फोन घेतला. पाहते तर आईचा फोन होता. आईला काही बोलायच्या आत तिकडून आईचे रडणे ऐकू आले. "तू ताबडतोब घरी ये " असा निरोप मिळाला. "बरं येते लगेच" म्हणून तिने फोन ठेवला. यादीतली सगळी कामे तिने रद्द केली. आईकडे जायला गाडी वळवली तेवढ्यात तिला मूर्तीची आठवण झाली . घाईतच ती मूर्ती तिने तिथेच एका कट्ट्यावर ठेवून दिली.
          आई अजूनही रडतच होती . रडायचं कारण विचारल्यावर कळलं की, भावाने आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज काल आई तब्येतीच्या तक्रारीमुळे झोपूनच असे. भावाचे घरही तसे छोटेच. दिवाणखाना तर आईच्या पलंगाने आणि औषधाच्या बाटल्यांनी व्यापलेला. घरात सगळे नोकरी करणारे आईकडे बघणारे कोणी नाही. तिच्यासाठी घरात पूर्णवेळ थांबणारी बाई ठेवणे परावडण्यासारखे  नव्हते. हल्ली आईला एकट्याने ठेवणे ही तिच्या तब्येतीच्या दृष्टीने धोक्याचे झाले होते. 
 भावानेही नाखुशिनेच हा निर्णय घेतला होता. तिच्या मानत  विचारचक्र सुरू झाले. 'आपल्याकडे आईला न्यावे तर आपलेही घर छोटेच आहे. घरात वृद्ध सासू ,सासरे, एक नणंद, दोन मुले, नवरा आणि आपण मिळून सात जण राहतो.  त्यात आपलीही परिस्थितीही बेताची आहे.'
 तिच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले होते . त्यांची उत्तर शोधण्याआधी तिला आईला समजावणे, धीर देणे गरजेचे होते. काय बोलावे तिला काहीच सुचत नव्हते. ती पुर्णपणे बधीर झाली होती. तरी तीने धीर केला व आईला म्हणाली , " डोळे पूस बघू आधी , निर्णय घेतला म्हणून लगेच नाही काही नेणार तुला, निघेल काही तरी मार्ग. तू काळजी करू नकोस. मी बोलते दादाशी. देव आहेच की आपल्या पाठीशी. डोळे पूस बघू आणि काही तरी खावून घे बरं आता ."
         तीने मनातल्या मनात  " देवा तुलाच रे काळजी ....... काही तरी मार्ग काढ यातून. सोडव बाबा या संकटातून" असा धावा केला. तशी तीला मूर्तीची आठवण झाली. एक सल काळजात खोलवर  रुतली. डोळ्यात अश्रू दाटले.  तिच्या मनावर प्रचंड ताण आला. तिचं आता कशातच चित्त नव्हतं. ती घाईतच उठली आणि घराबाहेर पडली. आता तिला तिचे बालगणेश परत हवे होते. तीने जिथे मुर्ती ठेवली होती तिथे ती परत आली. 
                पण ...... आता तिथे मूर्ती कुठेच नव्हती..............
होती ती फक्त अपराधी पणाची भावना आणि डोळ्यात दाटलेले पाणी.............


#भंगलेली_मूर्ती_सांगू_पाहे_काही

भंगलेली मूर्ती सांगू पाहे काही.......
नवी कोरी असता देव्हाऱ्यात मांडली...
हात जोडूनी दोन्ही, पुढती माझ्या मानही झुकली.........
केवळ माझ्या दर्शनाने अनेक संकटेही सुटली........
पण........
रंग जरा उडता किंवा
कोपरा एखादा तुटता
नकोशी का होते? अडगळ का वाटली?......
सोडले जरी कडेला अथवा झाडा खाली...
कोणे एकेकाळी देवत्व होते माझ्यातही........
कोणे एकेकाळी देवत्व होते माझ्यातही........

रस्त्याच्या कडेला असलेल्या याच मूर्तीला बघून मनात अनेक विचार आले आणि त्यातून ही कथा  व कविता तयार झाली.

मनात अनेक प्रश्न उभे राहिले .
जिथे रूप संपलं की देवही बेघर होतो तिथे वृध्द आईवडिलांना वृद्धाश्रमात जाण्यापासून रोखणे ... वृद्धाश्रम ही संकल्पना समुळ नष्ट करणे आपल्याला ..... शक्य होईल ?????????
रूढी परंपरा म्हणून किती दिवस आपण असे कुठलाही विचार न करता नदी प्रदूषण करत राहणार आहोत???? निर्माल्य , लाल चूनडी , देवांचे फोटो .... भंगलेल्या मुर्त्या नदीत सोडणार आहोत???
अनमोल अशा नैसर्गिक स्रोतांची हानी करणे कितपत योग्य आहे????
कारण कुठलेही असो .... जिथे वेळ पडली तर देवाला घरा बाहेरचा रस्ता दाखवला जातो.... तिथे माणसांनी माणुसकी जपली पाहिजे अशी ओरड करणे  योग्य ठरेल का????
निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे ... आता आपली वेळ आहे या नैसर्गिक स्रोतांची जपणूक करण्याची तरी "आपण केवळ अनेक वर्षे असेच करत आलो आहोत' ही सबब सांगून चांगले बदल स्विकारणे का टाळतो आहे???
अनेक जणांनी असे बदल स्विकारले तरी अजूनही सर्वानुमते असे प्रयत्न कमी का पडत आहेत????
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची ... शोधलेली उत्तरे सगळ्यांनी अवलंबायची गरज आहे .
तुम्हाला काय वाटते ????

©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबत अगदी साधी सोपी सुंदर रांगोळी ही आहे .

मी काढलेली बाल गणेशाची रांगोळी

रस्त्याच्या कडेला असलेल्या याच मूर्तीला बघून मनात अनेक विचार आले आणि त्यातून ही कथा व कविता तयार झाली.


पाऊस

पाऊस
दिवाळीत ही पावसाला रिमझिम बरसू दे
रांगोळीतले रंग माझे एकमेकात मिसळू दे
तहानलेल्या जमिनीला तृप्त होवू दे
आसमंतात साऱ्या तिचा गंध भरू दे
रिकाम्या या गर्भात तिच्या पाझर फुटू दे
दुष्काळाचे संकट नको आनंद पसरू दे
एक दिवा कष्टकऱ्या च्या घरात ही पेटू दे
घरा घरात फक्त आनंद नांदु दे
फक्त आनंद नांदु दे......
दिवाळीत ही पावसाला रिमझिम बरसु दे......
रांगोळीतले रंग माझे एकमेकात मिसळू दे......

(C) ‌‌सौ. अंजली धस्के






दिवाळी २०१८ ( लक्ष्मी पूजन)

    #AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के

 दिवाळी सण ..... दिव्यांचा
           खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बाजारात विकत मिळतात पण मंदिरात प्रज्वलित असलेला लांबन दिवा मनाला प्रसन्न करतो.
लक्ष्मी देवीला सर्व फुलांमध्ये कमळ अत्यंत प्रिय .... म्हणून तेजोमय कमळ . प्रत्येक घरातली लेक... सून .... ह्या त्या घरची लक्ष्मीच ........ असतात ..... म्हणून कुठलेही दागदागिने न घालता .... ऐश्वर्याची कुठलिही खूण न बाळगता केवळ अापल्या दिव्यत्वाचे तेज ल्यालेली ही देवी ...... समस्त स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करते. साधीच तरीही मोहक .... अशी लक्ष्मी ...तिला  आवडणारे कमळ ..... आणि तिच्या देवत्वाची जाणीव अधोरेखित करणारे लांबन दिवे.
सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा....
©️अंजली  मीनानाथ धस्के





नरक चतुर्दशी (२०१८)

नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा......


धनतेरस/ धन्वंतरी पूजन ( २०१८)

आज धनतेरस ...... आज धन ...सापत्ती  पूजन केले जाते त्या सोबतच चांगल्या आरोग्यासाठी धन्वंतरी देवतेचे पूजन ही केले जाते.
सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि धन धान्य समृद्धीची दिवाळी जावो हीच सदिच्छा........

मोराचे डिझाइन (दिवाळी २०१८)


मोराचे डिझाइन आणि दिवाळीचा पहिला दिवा
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.........