कोणतंही काम हलक नसतं

#कोणतंही_काम_हलक_नसतं

            आदित्य आणि सोहम दोघे जिवाभावाचे मित्र . शिक्षण सोबत घेतल तसचं स्वतःचे  व्यवसायही सुरू केले. आदित्यने मोटार गाड्यांसाठी लागणारे छोटे छोटे भाग बनवण्याचा कारखाना सुरु केला तर सोहमने कारचे सूशोभिकरण करून देण्यासाठीचा  स्टुडिओ उभारला.
         दोघांच्याही व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले. आदित्यने जसे पैसे येत गेले तसे स्वतःचे राहणीमान ही उंचावले. सोहम मात्र जसा आधी होता तसाच आताही राही. घरात, बाहेर  कुठेही दिसेल ते काम करी . अनेकदा आदित्य त्याला समजावण्याचा प्रयत्न करी ," आता आपला वर्ग वरचा आहे तेव्हा आपल्याला असली छोटी कामे करणं शोभत नाही. समाजात आपला मान वाढवायचा असेल तर आपण स्वतः काम न करता फक्त हुकुम सोडायला हवे."
 सोहमला यातलं काहीच पटत नसे. " कोणतंही काम छोट  नसतं" याच विचारांचा तो होता. कामगारांना हुकुम सोडण्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने कामे करायला त्याला जास्त आवडायचं. त्यांच्या बरोबरीने राबायचं म्हणजे छान छान कपडे घालून कसं मिरवता येईल ? म्हणून पैसा खूप कमावूनही त्याचं राहणीमान अगदी साधं होतं.
          दिवसामागून दिवस जात होते. दोघांचेही व्यवसाय जोरात सुरू होते.   ' पेट्रोल गाड्या पर्यावरणाचं नुकसान करतात म्हणून इथून पुढे फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्या बनवल्या जाव्यात ' अशी घोषणा नव्या सरकारने केली आणि अचानक बाजारात मंदी आली. सगळ्याच व्यवसायांवर या मंदीचा परिणाम झाला होता पण सगळ्यात जास्त फटका मोटार निर्मितीच्या व्यवसायांवर झाला होता. अनेक छोटे कारखाने बंद पडले. कामच मिळत नाही तर कामगारांना पगार तरी कसे देणार ? त्याचाच परिणाम म्हणून आदित्यचा कारखानाही बंद पडला . असं काही होईल याची जराही शंका नसतांना हे झाल्यामुळे आदित्य पुरता कर्ज बाजारी झाला . उत्पन्न भरपूर होते तेव्हा मोठं मोठी कर्ज काढून त्याने बंगला, गाड्या घेतल्या . सगळा पैसा राहणीमान जपण्यात घालवला . आता जेवढी शिल्लक होती त्यात त्याने उभा केलेला हा डोलारा सांभाळणे कठीण होते.  अचानक राहणीमानात बदल केला तर लोक काय म्हणतील? या भीतीने त्याचा खर्च सुरूच होता. कर्ज वाढतच जात होतं. गाड्या विकल्या . बंगला विकला तरी खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नव्हता.
       व्यावसायातून येणारे उत्पन्न कमी झाले तसे सोहमने इतर कामंही करायला सुरुवात केली. त्याच्या कामगारांनाही इतर काम मिळेपर्यंत मदत केली . त्याच्या कामगारांपैकी कोणी चहाची टपरी सुरू केली , कोणी वडापावची गाडी चालवायला घेतली , कोणी किराणा मालाच्या दुकानात काम करू लागले तर कोणी कपड्यांच्या दुकानात काम करायला लागले. सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय होते आहे म्हंटल्यावर सोहमने त्याच्या स्टुडिओतील काही मशिन्स विकल्या आणि डोक्यावर असलेले कर्ज कमी केले. जमा पैशातून महाविद्यालया समोरच एक गाळा भाड्याने घेवून त्यात छोटंसं स्नॅक्स सेंटर सुरू  केलं. इथेही त्याच्या स्टुडिओ मधल्याच काही कामगारांना काम दिलं. तो स्वतः टेबल पुसण्यापासून ते  पदार्थ बनवण्यापर्यंतची  सगळी कामे करू लागला. त्याला तसं काम करतांना बघून त्याच्या हाताखालची माणसंही मन लावून कामं करू लागले . त्याचा हा व्यवसायही जम धरू लागला.  स्टुडिओ पूर्ण बंद पडला होता तरी त्याचं आणि त्याच्या कामगारांच मस्त सुरू होतं. आता तर तो रहाणीमानावर पूर्वीपेक्षाही कमी खर्च करू लगला. "कर्ज काढून रेशमी वस्त्र मिरवण्यापेक्षा कष्टाच्या कमाईचे फाटके कापड घालावे " याच मताचा तो होता आणि यात त्याच्या घरच्यांचीही त्याला साथ मिळाली.
          आदित्यला आणि त्याच्या घरच्यांना सगळ्या महागड्या वस्तू वापरण्याची सवय लागल्यामुळे आता त्याला पैशाची चणचण भासू लागली. पूर्वी ज्या कामांना कमी लेखलं ती काम करावी लागू नये म्हणून तो मित्रांना पैसे उधार मागूनच घर खर्च सांभाळू लागला. आधी हुकुम सोडण्याची सवय लावून घेतल्याने आता पैसा कमावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची त्याची मानसिकता नव्हती. दिवसेंदिवस तो अधिकच कर्ज बाजारी होवु लागला . सगळे मित्र त्याला टाळू लागले.
एक दिवस बाजारात फिरत असतांना  काहीतरी खावून घ्यावं म्हणून तो तिथल्याच स्नॅक्स सेंटर मधे गेला . तिथे सोहम टेबलं पुसत होता. त्याला पाहून आदित्यला आश्चर्य वाटलं. याची परिस्थिती फारच वाईट झाली असं वाटून त्याने  सोहमला आवाज दिला.  सोहमने आधी त्याची ऑर्डर घेतली आणि मग त्याच्या जवळ येवून बसला.  दोघांच्या खूप गप्पा रंगल्या . सोहमने स्टुडिओ विकून टाकल्याच सांगितलं . आदित्य मात्र अजूनही  दिखावा करण्यातच  मग्न होता. व्यवसाय बंद झाला तरी आपल्याला फार काही फरक पडला नाही . असंच तो भासवत राहिला. ' केलं तर आपल्याला शोभेल असंच काम करायचं' याच मतावर  तो अजूनही ठाम होता.  टेबल पुसण्याच  इतकं हलकं काम सोहमने  का करावं? यावर तो सोहमवरही चिडला. सोहमनेही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की ," कोणतंच काम हलक नसतं. कोणत्याही मोठ्या कामात यश मिळवायचं असेल तर त्यासाठी लागणारी सगळी छोटी छोटी कामं यायलाच हवी. तसेही उधारीवर जगण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाची कमाई कधीही चांगली .  पैसा काय .... येत आणि जात असतो.  माणूस पैशाने नाही तर कर्तुत्वाने मोठा होतो " .  सोहमने इतकं समजावलं पण आदित्य काही समजून घ्यायला तयार झाला नाही.
         जातांना  जेव्हा आदित्य त्याच्या खाण्याचे बिल द्यायला गेला तेव्हा  गल्ल्यावरच्या माणसाने सांगितलं की ," आमच्या मालकाचे तुम्ही मित्र ..... तुमच्या कडून पैसे कसे घेणार? ". त्याचे हे वाक्य ऐकून आदित्यला धक्काच बसला. त्याने सोहमकडे वळून बघितलं तर तो त्यांच्याच  टेबलावरच्या खरकट्या ताटल्या उचलून घेत टेबल स्वच्छ करत होता.
" कोणतंही काम हलक नसतं " या शिकवणीनेच सोहमला या मंदीच्या काळातही यश दिलं होतं तर  खोटा अहंकार मिरवणाऱ्या आदित्यच्या डोळ्यात अंजन घातलं होतं.


तात्पर्य :
१: कोणतंही काम हलक नसतं.
२: माणूस पैशाने नाही तर कर्तुत्वाने मोठा होतो.

©️ अंजली मीनानाथ धस्के



No comments:

Post a Comment