सो गया ये जहाँ

#सो_गया_ये_जहाँ

            रिया आणि आकाश एक प्रेमळ ... मनमिळावू जोडपं. कोणाच्याही अध्यात नाही की मध्यात नाही.  त्यांचं छोटंसं  कुटुंब हेच त्यांचं सारं विश्व होतं.  आज मात्र पहिल्यांदाच ते आपल्या दोन वर्षाच्या मुलाला मनात नसतांनाही ' रात्रीचा परतायला उशिर झाला तर  ? असा विचार करून घरी मावशीकडे  ठेवून ऑफिसच्या कार्यक्रमाला गेले.  जसं जसा उशीर होवू लागला तसं तसे दोघांचे लक्ष घड्याळ्याच्या काट्याकडे लागले तर चित्त घरी असलेल्या आपल्या बाळाकडे गेले.  गप्पा गोष्टी.. खाणं पिणं आवरतं घेवून त्यांनी लवकरच सगळ्यांचा निरोप घेतला.
         कार्यक्रमाविषयी ... भेटलेल्या लोकांविषयी .... बोलत दोघांनी घरची वाट धरली. घरी पोहचायला एक तास तरी लागणार होता . बाळाचा विचार मनात येवुन दोघंही अस्वस्थ झाले . वेळ जावा .. ताण कमी व्हावा  म्हणून रियाने रेडिओ वर मस्त ९० च्या दशकातली गाणी लावली. दोघं एकदम आनंदात .... हसत गाणी म्हणत घराकडे निघाली.   शनिवार म्हणून रस्त्यावर वर्दळ होतीच.  पुढच्या चौकातच त्यांची गाडी ट्रॅफिक सिग्नलला थांबली . तेवढ्यात त्यांच्या कानावर धाड धाड धाड धाड असे आवाज आले. त्या पाठोपाठ   आरडाओरडा.. जीवाच्या आकांताने मारलेल्या किंकाळ्या ऐकू आल्या.  सीट खाली  लपाव का ? असा विचार दोघांच्याही मनात आला पण काही समजायच्या  आतच एक गोळी रियाच्या छातीत  तर दुसरी आकाशच्या डोक्यात  घुसली.  गर्दीची वेळ आणि योग्य संधी साधून दोन आतंकवादी बेछूट गोळीबार करत होते. त्यांना कशाचीच पर्वा नव्हती . त्यांच्यात सैतान संचारला होता.  बराच वेळ ... धाड धाड... किंकाळ्या.. काच फुटण्याचे आवाज... हॉर्न... गाड्या एकमेकांवर आदळल्याचे आवाज .... भयाण ...भीषण ... मनाचा थरकाप उडवणारे आवाज येतंच होते.
सैतानी थैमान घालून झाल्यावर त्यांचा मोर्चा पुढच्या चौकात असलेल्या एका हॉटेल कडे वळला.
          थोड्यावेळाने  सगळं कसं शांत ... स्तब्ध... निश्चल झालं होतं. वेळ ही जणू थांबली होती.
       कारच्या सीटखाली लपलेल्या आकाशने हळूच गाडीचा ताबा घेतला . रियालाही जाग आली ..... बाळासाठी घरी जाण्याची घाई दोघांनाही होती. दोघांनी एकमकांकडे अर्थ पूर्ण नजरेने बघितले. रियाचे  लक्ष समोरच्या आरशात रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेल्या स्वत:च्या  आणि आकाशच्या देहाकडे गेले . ती विषण्ण हसली . तेवढ्यात रेडिओ वर गाणं लागलं .... " सो गया ये जहाँ ... सो गया आसमा ... सो गयी है सारी मंज़िलें... ओ सारी मंज़िलें...   सो गया है रस्ता "
                   मला खाडकन् जाग आली .... दरदरून घाम आला होता.  भीतीने  माझं काळीज धडधडायला लागलं होतं . आधी हातातंला पुलवामाच्या दुःखद बातम्यांनी खाचाखच भरलेला पेपर मी बाजूला सारला. मनात झालेली उलथापालथ थांबवण्यासाठी  दिर्घ श्वास घेवून , " हे फक्त एक  वाईट स्वप्न आहे " असं   मनाला समजावंल  खरं पण माझ्यसारखेच शहीद जवानांच्या  आईलाही  समजावता आले असते तर किती बरे झाले असते , हा  विचार मनाला चटका लावून गेला. नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि "शहीद जवानांच्या आत्म्याला शांती मिळो " असे अस्पष्ट शब्द बाहेर पडले.

©️ अंजली मीनानाथ धस्के


No comments:

Post a Comment