व्हॅलेंटाईन डे

 #व्हॅलेंटाईन_डे
   ©️ अंजली मीनानाथ धस्के
           ती खूप अवखळ, अल्लड, बालिश...  त्याच्या संगतीने रोझ डे , चॉकलेट डे , व्हॅलेंटाईन डे असे सगळे डे खास पद्धतीने साजरे व्हावे यासाठी आग्रही असणारी.....  'टोटल फिल्मी' तर तो तेवढाच शांत , संयमी, समजूतदार..... ' वास्तवात जगणारा'. ... असे विशिष्ट एका दिवसापुरते प्रेमाचे प्रदर्शन करणे ... भेट वस्तू देणे  त्याला मुळीच आवडत नसे.  तुझं .. माझं असा जिथे भेदच नाही तिथे  प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा दिवसांची वाट का बघायची ?  असं त्याचं ठाम मत   . अशी ही दोघं विवाह बंधनात बांधली गेली .
             ती  मुद्दाम  सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या नजरा चुकवून त्याला डोळा मारी .... त्याला ठसका लागला की लगेच पाण्याचा पेला देत म्हणे , " लक्ष कुठे असतं जेवतांना? "  थोड्या दिवसातच तिच्या या खोड्या त्याच्या अंगवळणी पडल्या  .... तिला असं अव्यक्त प्रेमच जास्त सुखावतं .... आनंदी करतं हे तो ओळखू लागला . "किती  बालिश आहेस तू " असं तो म्हणत असला तरी हाच बालिशपणा त्याला तिच्या अधिक.... अधिक प्रेमात पाडू लागला.  तोही आता एक पाऊल पुढे जावून तिच्या खोड्या काढू लागला . ती स्वयंपाक घरात काम करत असली की तो हमखास तिला मिठी मारत असे आणि मोठ्याने म्हणे , " चहा घ्यावा वाटतो आहे , एक कप चहा देशील का? " त्याने केलेला ओढांचा चंबु बघून ती भीतीने ,  प्रेमाने लाजून जात असे . त्यात भर म्हणजे दिवाणखान्यात बसलेल्या सासूबाई म्हणत , " करतेच आहेस तर मलाही दे अर्धा कप " त्यावर ती घाबरी घुबरी होवून जाई . त्याला स्वतः पासून दूर लोटू पाही.... मग तो तिला अधिकच चिडवत डोळा मारून म्हणे , " तुमच्या सासूबाईंनाही हवा आहे अर्धा कप चहा ... देणार न?? " ती डोळे मोठे करुन त्याला  दटावी... पुरे आता असं विनवी पण मनातून तृप्त होवून जाई.
              कालांतराने त्यांच्या संसार वेलीवर एक सुंदर फुल उगवले . मुलाच्या संगोपनात तिचा बालिशपणा  मागे पडला. तरी तो तिला तिच्या आवडीचे चॉकलेट आणि गुलाबाचे फुल व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने  द्यायला विसरला नव्हता. तिच्यासाठी त्याच्याही नकळत तो  थोडासा फिल्मी झाला होता . तिच्यातली अल्लड पत्नी आता जबाबदार आई झाली होती . ती खऱ्या अर्थाने संसाराला लागली होती . त्याच्यासाठी आता तीही थोडी वास्तवात जगायला शिकली  होती. तिच्यातला हा बदल त्याला कितीही सुखावत असला तरी तिचा पूर्वीचा बालिशपणा ही त्याला हवा होता.
       त्याची बदली दुसऱ्या गावी झाली.  नवीन गावी स्वतःच्या हक्काच्या घरात त्यांचा संसार स्थिरावला. आता त्यांना अडवणारं ... बघणारं घरात तिसरं मोठं माणूस नव्हतं त्यामुळे  अव्यक्त प्रेमची गंमतही ती विसरून गेली .....
        बघता बघता मुलगा ३ वर्षांचा झाला . एक दिवस ती कामात गुंतलेली असतांना अचानक तिला कसली तरी आठवण झाली .
तिने मुलगा खेळण्यात दंग आहे याची खात्री करून घेतली आणि मगच  याच्या जवळ जावून बसली. याने कामातून डोकं वर काढत तिच्याकडे बघितलं तसं तिने अलगद त्याचे डोळे झाकले.... त्याच्या ओठांवर हळूच ओठ टेकले .
त्याला काही कळायच्या आत त्याच्या कानात , " हॅपी व्हॅलेंटाईन डे" असं कुजबुजली. खूप दिवसांनी पूर्वीची ती ... आज त्याला अशी अचानक भेटली . तो आनंदून गेला. त्याला काहीच कळेना. आज तर व्हॅलेंटाईन डे नाही मग हे काय नवीन .... तेवढ्यात मुलाने आवाज दिला , " मम्मी .....इकडे  ये ना.... बघ मी काय काढलंय " . तिने "आले ह बाळा " असं मुलाला  सांगितलं आणि खट्याळपणे त्याला म्हणाली ," तुलाच वाटतं न .... असं  एका विशेष दिवसाची वाट बघणार प्रेम नसावं म्हणून खास तुझ्यासाठी " . ती मुलाकडे जायला निघाली . त्यानेही ही संधी सोडली नाही . पटकन् तिचा हात पकडला... कानात हळूच बोलला ,  " मलाही तर शुभेच्छा देऊ दे"  आणि ...  मुलाला मोठ्याने सांगितलं , " मम्मी मला शुभेच्छा देते आहे .... झालं की येईलच ह बाळा" . ती पूर्वी सारखीच लाजली .  पूर्वी सारख्याच खट्याळ नजरेने  त्याच्याकडे  पाहिले आणि प्रेमाने त्याला दूर लोटून मुलाकडे गेली .तोही मागोमाग गेला.  मुलगा तिला म्हणाला  , " मम्मी..... पप्पाला दिल्या तशा  शु...भे..च्छा मलाही  हव्यात ".
त्यावर दोघेही खळाळून हसली आणि मुलाला प्रेमाने बिलगली. "हॅपी व्हॅलेंटाईन डे... बेटा" म्हणत दोघांनीही त्याच्या गालाचे मुके घेतले.  आज कुठल्याही कारणाशिवाय.... साधनाशिवाय.... खऱ्या अर्थाने त्यांनी  थोडा फिल्मी तर थोडा वास्तविक असा .... व्हॅलेंटाईन डे.. साजरा केला .
हृदयाची हृदयाला साद जाता
होती प्रेमळ मिलने......
श्वास श्वासात गुंतू लागता
एक होती स्पंदने.....
नात्यांची नात्यात वीण गुंफता
जीवन हे सुंदर बने......
प्रेमाने प्रेमाला साथ देता
एक होती सारी मने......
कवितेच्या या ओळी जणू ते प्रत्यक्षात जगत होते.
©️ अंजली मीनानाथ धस्के


No comments:

Post a Comment