वॉटर बॉटल

 #वॉटर_बॉटल

©️ अंजली ममीनानाथ धस्के

        उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळेचा पहिला दिवस जवळ येवू लागला तसे शाळेच्या तयारीचे जोरदार वारे आमच्या घरात वाहू लागले होते. वह्या, पुस्तके, खाकी कव्हर पेन पेन्सिल... अशा सामानाची गरजेनुसार पुनर्बांधणी आणि खरेदी असे सत्र सुरु होते.  आमच्यावेळी मोठ्या भावंडांची पुस्तके लहान भावंडांनी वापरायची असा प्रघातच होता. त्यात आम्हा भावंडांमध्ये प्रत्येकी दोन वर्षाचे अंतर असल्याने आमच्या घरीही या पेक्षा वेगळे काही नव्हते.  ताईची पुस्तके भावाला आणि भावाची पुस्तके मला देण्यासाठी जपून ठेवलेली असत. दरवर्षी फक्त त्या पुस्तकांना नवीन कव्हर घालून आम्हाला दिली जात. प्रत्येकाला नव्या वह्या मात्र घेतल्या जात. वर्षभराच्या वह्या स्वस्त मिळाव्या म्हणून एका दमात घेवून त्या आम्हाला लागतील तशा दिल्या जात. जुन्या वह्याची कोरी पाने वेगळी करून त्यापासून कच्चे काम करण्यासाठीच्या वह्या घरीच बनविल्या जात. वह्या पुस्तकांना कव्हर घालून त्यावर नवे कोरे लेबल लावले जायचे. कव्हर लावण्याचे काम वडील पार पाडायचे. त्यांना अगदी घट्ट बसणारे कव्हर घालता यायचे. घरात वडिलांचे अक्षर वळणदार त्यामुळे त्या लेबलवर वडिलांकडून नाव, विषय, वर्ग लिहून घेण्याची आम्हा भावंडांना घाई असायची. जुनेच युनिफॉर्म नव्याने इस्त्री करून तयार ठेवले जात. जुनीच दप्तरे डागडूजी करून स्वच्छ धुवून नवीन केल्याचा भास निर्माण केला जात असे. जुनेच सॉक्स निळ देवून पांढरे केले जात. जुन्याच बुटांना रगडून पॉलिश केली जायची. सगळे काही जुने असले तरी नव्या कोऱ्या वह्यांचा सुगंध,  त्यावर लावलेले  लेबल आणि शाळेत जायचा उत्साह मात्र नवीन असायचा.  

शाळेत पहिल्याच दिवशी सगळे साहित्य नवीन घेवून येणारी मुले फार थोडी असायची. वर्गात गेल्यावर शाळेचा युनिफॉर्म, वह्या, पुस्तके या सगळ्यांपेक्षा दप्तर, डबा, वॉटर बॉटल, पेन असे काही नवीन असेल तर सगळ्या मुलांचे लक्ष वेधले जायचे. असे लक्ष वेधून घेणे सगळ्यांनाच आवडायचे परंतू काहींनाच ते परवण्यासारखे असल्याने त्या बाबतीत कसली स्पर्धाच नसे. मुळात शाळेच्या नळावर हाताची ओंजळ लावून पाणी पिण्याची उत्तम सोय असल्याने मुलांच्या खांद्यावर वॉटर बॉटलचे ओझे लादणे अनेक पालकांना मान्य नव्हते. त्यामुळे वॉटर बॉटलवर वायफळ खर्च करण्याचा प्रश्नच उद्भवत नसे.

मी पहिलीतून  दुसरीत जाणार होते. माझ्या बाल मनाला, 'यंदा आपल्या जवळ काहीतरी नवीन असावे ' असे तीव्रतेने वाटू लागले होते. मागच्याच वर्षी पुढील दोनतीन वर्षे पुरेल इतका मोठा युनिफॉर्म खरेदी करून त्याला माझ्या उंचीनुसार खालच्या बाजूने टिप मारून देण्यात आली होती. त्यामुळे या वर्षी त्यावरची एक टिप उसवून उंची फक्त वाढविली जाणार हे निश्चित होते. तेलाचे डाग पडलेले जुनेच दप्तर जेव्हा आईने स्वच्छ धुण्याचा घाट घातला तेव्हाच नवीन दप्तर मिळण्याची आशाही मावळली होती. कव्हर आणि वह्यांच्या खरेदी साठी जेव्हा बाबांना बाजारात जायचे होते तेव्हा मात्र काहीतरी करून नवीन वस्तूचा जुगाड करायलाच हवा या हेतूने मी आणि माझ्या भावाने " मीही सोबत येणार" चा घोषाच लावला. अखेर वडिलांनी," मी तुम्हाला फक्त सोबत नेणार आहे. तिथे गेल्यावर काहीच मागायचे नाही. मी काहीही.... काहीही घेवून देणार नाही. तिथे जर हट्ट केला तर दणके मात्र देईल " अशी धमकी दिली.  तरी आशावादी विचार डोक्यात आले . ' पुढचे पुढे बघू... सध्या तरी सोबत बाजारात जाण्याची संधी सोडता कामा नये '  म्हणत माझ्या बाल मनाने लगेच  बाबांना होकार दिला. त्यांनीही मग आम्हाला सोबत नेले. वडील ज्या दुकानात वह्या, कव्हर, लेबल अशी खरेदी करत होते. त्याच्या शेजारच्या दुकानात नवी दप्तरे, वॉटर बॉटल, रेनकोट, असे बरेच काही लटकवले होते. माझे सगळे लक्ष काय बघू आणि काय नको या भावनेने विचलित झाले. वडिलांनी माझ्या हापापलेल्या नजरेला नियंत्रीत करण्याचा अपयशी प्रयत्न करत पुन्हा एकदा धमकीची आठवण करून दिली," मी काहीही घेवून देणार नाही. उगाच हे सगळे बघण्यात वेळ वाया घालवू नको." माझ्या भावाला आशा होती की नवीन पेन, कंपास बॉक्स, बाजारात  नुकत्याच आलेल्या लीड पेन्सिल असे काहीतरी तो नक्की मिळवू शकतो. त्याने वडिलांसोबत स्टेशनरी दुकानाकडे मोर्चा वळवला होता. मी मात्र मनातील हाव लपवत निरागसपणे ," काही नाही मागत.... एकदा बघते फक्त," असे बोलून वेळ मारून नेली. वडिलांनीही मग माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत ठरवलेली खरेदी करण्यावर भर दिला.

भावाने ," पप्पा हे बघा ना .... किती छान आहे" असे म्हणत अनेक वस्तूंकडे वडिलांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतू प्रत्येक वस्तूकडे वडिलांनी कटाक्षही न टाकता," छान आहे" असे म्हणत विषय टाळून दिला. 

इकडे माझी नजर  दुकानाबाहेर दहा बारा वॉटर बॉटल एकत्र लटकविल्या होत्या तिथे स्थिर झाली. अनेक पर्याय उपलब्ध असले तरी सगळ्यांच्या किमती ऐकून मीच स्वस्त पर्याय शोधत होते.  एक वॉटर बॉटल माझ्या मनात भरली होती. तिच्या किमतीची चौकशी करतांना तीच सगळ्यात स्वस्त होती असेही समजले. मनाने मी ती बॉटल कधीच खरेदी केली होती. आता फक्त वडिलांना पैसे देण्यासाठी भरीस कसे पाडायचे? हेच ठरवायचे होते. मी काही ठरविणार त्याआधीच वडील ," झाली खरेदी... चला घरी जावूया " असे बोलून ठरविलेल्या तीन चाकी रिक्षाकडे जायला निघाले. माझा धीर सुटला. मी अतिशय केविलवाणा चेहरा करत त्यांना बोलले," पप्पा फक्त एकदा हि वॉटर बॉटल बघा ना" . त्यावर ते मात्र ठामपणे बोलले," मी आधीच सांगितले होत... काहीही घेवून देणार नाही". मीही बोलले," एकदा बघाना फक्त"  माझ्या मागेच उभा असलेला दुकानदारही बोलला," बघायला काय जातं.... बघायचे पैसे थोडीच लागतात साहेब" त्याच्या बोलण्याचा मान ठेवत वडिल इच्छा नसतांनाही ती वॉटर बॉटल बघायला आले आणि ठरल्याप्रमाणे," छान आहे" म्हणत काढता पाय घेतला. मीही जिद्दीला पेटले," असं नाही.... हातात घेवून नीट उघडून बघूया". दुकानदाराने तत्परतेने ती वॉटर बॉटल खाली काढली आणि वडिलांच्या हातात दिली. यामुळे वडिल थोडे वैतागले होते. परंतू सगळ्या भावना नियंत्रीत करत आता दुकानदाराशीच बोलून हे प्रकरण मिटावावे लागणार याची कल्पना येवून त्यांनी ती वॉटर बॉटल हातात घेतली. माझ्यात अर्धी लढाई जिंकल्याची भावना उसळून आली. मी बोलले," किती सुंदर आहे ही बॉटल" त्यावर वडिल बोलले, " वॉटर बॉटल सुंदर नाही टिकावू निवडायची असते. ही फारच नाजूक दिसते आहे" म्हणत त्यांनी ती बॉटल दुकानदाराला परत केली. मी हार मानायला तयार नव्हते," पप्पा.... घेवू या ना एक बॉटल."  काही तरी नवीन मिळवायचेच या उद्देशाने आलेला, तरी आतापर्यंत शांत असलेला माझा भाऊही मग बोलला," पप्पा.... घेवू या ना एक " त्यावर ते," एक बॉटल घेवून घरात काय तुम्हा तिघांची भांडणे सोडवत बसायचे का?" संधीचा फायदा घेत दुकानदार बोलला," मग तीन घ्या ना साहेब.... सगळेच खुश " वडीलही लगेच बोलले ," अहो तिघांसाठी तीन वेगवेगळ्या घेतल्या तरी भांडणे सोडवता सोडवता नाकी नऊ येतील " त्यावर दुकानदार," एकसारख्या तीन घ्या म्हणजे भांडणाचा प्रश्नच नाही " असे बोलत एक सारख्या तीन बॉटल वडिलांच्या हातात द्यायला लागला. भावाला दुसरी वॉटर बॉटल हवी होती. त्याने त्याला हव्या असलेल्या वॉटर बॉटलकडे इशारा करत," मला ती हवी"  असे सांगितले. वडिलांनी या संधीचा फायदा घेत," बघा..... सारख्या नको असतात आणि वेगवेगळ्या घेतल्यावर घरी जावून त्याला/ तिला चांगली घेतली... मला नाही घेतली म्हणत भोकाड पसरतात. चला रे घरी.... आपल्याला एकही वॉटर बॉटल  नकोय" म्हणत ते जायला निघाले. भावाने वडिलांचा हात पकडला. त्याने माघार घेत," चालेल मला हि वॉटर बॉटल" असे सांगितले. वडिलांनी एकदा माझ्याकडे बघितले. खरं तर आपली वॉटर बॉटल हि एकमेव असावी अशी माझी इच्छा होती. हि इच्छा कायम ठेवली तर या जन्मात वडिल काही घेवून देणार  नाही याची भितीही होती. त्याने माघार घेतल्यामुळे मला वॉटर बॉटल मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मीही मग माघार घेत," घेवू ना पप्पा" म्हणत अत्यंत दीनवाणा चेहरा केला. कसा कुणास ठाऊक पण वडिलांना पाझर फुटला. मी निवडलेली बॉटल अत्यंत नाजूक वाटल्याने वडिलांनी दुसऱ्या वॉटर बॉटल बघायला सूरवात केली. भावाने लगेच त्याला जी आवडली होती त्या बॉटलकडे वडिलांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू केला.  माला मात्र आकाशी रंगाचे झाकण आणि बेल्ट असलेली, आतमधे पाणी पिण्याची बारीक नळी असलेली, पारदर्शी लंबगोलाकार, त्यावर विविध रंगात काढलेली छोटी ए, बी, सी डी अशी अक्षरे .... बॅट बॉल आशी चित्रे रेखाटलेली, नाजूक वॉटर बॉटलच हवी होती. 

      सगळ्या वॉटर बॉटल बघितल्यावर म्हणजेच त्यांच्या किमती बघितल्यावर वडिलांना त्यांची स्वतःची पसंती बाजूला ठेवावी लागली. किंमतीचा अंदाज घेत त्यांनी तीन वॉटर बॉटल न घेता आम्हा दोघांसाठी दोनच वॉटर बॉटल घेण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने त्यांनी दुकानदाराशी भाव करायला सुरवात केली. अखेर मला जी वॉटर बॉटल हवी होती ती त्यांना पसंत नसली तरी केवळ त्या दोन वॉटर बॉटलची किंमत बजेट मधे बसत असल्याने त्यांनी खरेदी केली. घरी परतल्या वर ताई भांडण करणार याची खात्री असली तरी आम्हाला नवीन वॉटर बॉटल मिळाली याचा आनंद मोठा होता.

 ताई घरात मोठी असल्याने तिला दर वर्षी नवीन पुस्तके घ्यावी लागत. आम्ही मात्र तिची जुनी पुस्तके वापरत असू. याचाच फायदा घेत . वडीलांनी तिची समजूत काढली असावी. तरी आईने मात्र," कधी तरी तिलाही शाळेत न्यायला देत जा वॉटर बॉटल " असे आम्हा दोघांना समजावून सांगितले होते. उरलेला संपूर्ण दिवस मी त्या वॉटर बॉटल मधूनच पाणी पीत होते. कधी एकदा उद्याचा दिवस उगवतो आणि मी शाळेत हि वॉटर बॉटल घेवून जाते, असे मला झाले होते. दुसऱ्या दिवशी आम्हा तिघा भावंडांच्या नवीन वर्षांच्या शाळेचा पहिला दिवस...

मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे अजून प्राथमिक शाळेत असल्याने सकाळी सोबत जायचो. ताई मात्र माध्यमिक शाळेत असल्याने तीच्या शाळेची वेळ दुपारची होती. अगदी उत्साहात आम्ही तयार झालो होतो. आम्हाला रोजसाठी रिक्षा लावली होती परंतू शाळेचा 'पाहिला दिवस' खास असावा असे वाटून आम्ही वडिलांना शाळेत पोहचविण्याची गळ घातली. वडीलांनीही मान्य केले. यात एक अडचण अशी होती की आमच्या लूनावर आम्ही तिघे जाऊ शकणार नव्हतो. दोघांपैकी एकाला रिक्षाने जावेच लागणार होते. वडिलांनी पोहचवायला यावे हि कल्पना माझी असल्याने मीच त्यांच्यासोबत जावे. असा माझा आग्रह होता. भावालाही  माघार घ्यायची नव्हती. भांडणाची सुरुवात होणार हे बघता वडिलांनी जाहीर केले," मी तयार झाल्यावर जो गाडीच्या मागच्या सीटवर असेल त्याला घेवून जाणार. भांडण कानावर पडले तर तुम्हा दोघांनाही रिक्षाने जावे लागणार. कबूल असेल तर तयारी करतो. " दोघांनीही," कबूल " असे एकसुरात जरी म्हंटले तरी माघार घ्यायची कोणाचीच तयारी नव्हती. अखेर माझ्या भावाने माझ्याशी कसलीही चर्चा न करता युक्ती करून पळतच मागच्या सीटवर जाऊन बसला. तो तिथून उठायलाच तयार होईना. त्याचे दप्तर, वॉटर बॉटलही आणायला तो घरात जायला तयार नव्हता. त्याचे बुटही त्याने घातले नव्हते. एकदा तरी तो उठेल आणि मला संधी मिळेल या आशेवर मी होते. परंतू शाळेची तयारीही गरजेची असल्याने मी जिद्दीला कमी पडले. मी माझी सगळी तयारी नीट केली. मग मात्र आमची झटपट सूरू झाली. मी त्याला," तू तयार नाही झाला तर पप्पा तुला ओरडतील. उठ... उगाच मार खाशील " असे समजावू लागले तर त्याने आधीच ताईला फुस लावल्याने तिने त्याचे दप्तर वॉटर बॉटल, बुट त्याच्या जवळ आणून ठेवले होते. तो काही केल्या माघार घेत नव्हता.

 शाळेला उशीर होतोय असे जाणवता वडिल बोलले," तुझ्या पसंतीची वॉटर बॉटल घेतली ना , आता तू रिक्षाने जा.... वाटले तर पुन्हा कधीतरी तुला एकदा शाळेत सोडायला येइल" माझी निराशा मझ्या चेहऱ्यावर दिसली तसे ते म्हणाले," तुझे दप्तर आणि वॉटर बॉटल मी आणतो. तू जा रिक्षाने. शाळेजवळ भेटून तुला वर्गापर्यंत सोडतो... चालेल का?" तेवढ्यात घरासमोर थांबलेल्या रिक्षातील मित्र मैत्रीणींनी  मला आवाज दिला तसा सगळी निराशा बाजूला सारत मी ,"चालेल" म्हणत आनंदाने रिक्षाकडे धाव घेतली.

खूप उत्साह, गप्पा गोष्टी या भरात आमची रिक्षा शाळेजवळ कधी पोहचली ते कळलेच नाही. मी रिक्षातून टुणकन उडी मारून वडिलांकडे धाव घेतली. ते समोरच्या हुकला लटकवलेली आमची दप्तरे आणि वॉटर बॉटल काढण्यात गुंग होते. त्यांनी एक एक दप्तर काढत आमच्या दोघांच्या हातात दिले. वॉटर बॉटल काढून देण्यासाठी त्यांनी हात पुढे केला आणि काय झाले हे कळायच्या आत दोन्ही वॉटर बॉटल दणकन खाली पडल्या. जीला हातात घेवून मिरवायची प्रचंड इच्छा होती तीने मात्र धुळीत लोळण घेतलेली बघून माझ्या काळजाचा ठोका चुकला. वडीलांनी घाईत दोन्ही बॉटल उचलल्या. त्यांच्यावरची धूळ पुसली तसे त्यांच्या लक्षात आले. एक वॉटर बॉटल खालून गळायला लागली होती. गळणारी वॉटर बॉटल आपली नसावी अशी मी मनोमन प्रार्थना केली. ज्याची भिती वाटते तेच नेमके घडते याची प्रचिती आली. ती वॉटर बॉटल माझीच होती. वॉटर बॉटल जरी एक सारख्या असाल्या तरी आदल्या दिवशी  त्यांच्यातील फरक शोधून काढण्यासाठी आम्ही आमचा बराच वेळ खर्ची घातला होता. दोन्ही बॉटल एकसारख्या दिसत असल्या तरी मी निवडलेल्या बॉटल ची रंग छटा भावाच्या वॉटर बॉटल पेक्षा जरा फिकी होती. भावाने लगेच त्याची वॉटर बॉटल स्वत:च्या ताब्यात घेऊन त्याच्या वर्गाकडे धाव घेतली.

  त्या वेळी वॉटर बॉटल फुटली याचे दुःख आणि अजून तिला वर्गात नेऊन मिरवायचे बाकी होते याचे दुःख.... अशी दोन दुःखे एकाच दमात अनुभवल्यामुळे फारच वाईट वाटले. एकीकडे माझी वॉटर बॉटल गळत होती आणि दुसरीकडे माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते.  या घटनेमुळे वडिलांची चीडचीड झाली होती. ते," मी म्हणत होतोच की असली नाजूक वॉटर बॉटल नको..... नाही... पण माझं कोण ऐकत.... एक सोडून दोन घेतल्या..... सकाळची घाई...  उशीर होतोय मला आणि आता हा गोंधळ...." असे वैतागून बोलत होते. मला खरं तर टाहोच फोडावासा वाटत होता. पण आमच्या वडिलांच्या रागासमोर आपल्या कोणत्याच भावनेला फारसे महत्व नाही हे ही मी जाणून होते. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते त्याचा असा विचका झालेला मला सहन होईना. काहीही झालं तरी वॉटर बॉटल आज आपल्या सोबत असायला हवी हि भावना इतकी तीव्र होती कि मी रडतच वडिलांच्या हातातून वॉटर बॉटल घेतली आणि वर्गाकडे जायला वळले. माझा भावनावेग बघता परिस्थिती हाता बाहेर जावू नये म्हणून वडीलांनी ," आन तिला इकडे.... कपडे ओले होतील.....जा लवकर शाळेत.... घरी जावून मी हिला दुरुस्त करतो.... होईल ती ठीक.... आता जा लवकर शाळेत ... उशीर झालाय" असा समजावणीचा सुर लावला. मी मात्र हट्टी पणाने," असू द्या माझ्या जवळच " असे म्हणण्याच्या बेतात होते. परंतू त्याच वेळी खांद्याला लटकवलेल्या वॉटर बॉटलचे काही थेंब माझ्या युनिफॉर्म वर पडून तो ओला होत होता, याची जाणीव झाल्याने वडीलांनी जवळ जवळ ती वॉटर बॉटल माझ्या खांद्यावरून खेचून घेतली. त्यांच्या डोळ्यात , राग, वैताग, चीड, पैसे वाया गेल्याने दुःख सगळ्याच भावना उफाळून आल्या होत्या.  'आता माझे काही खरे नाही' अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली. या दरम्यान आमच्या बाई शाळेच्या गेट वर माझी वाट बघत थांबल्या होत्या. त्यांनीही आवाज द्यायला सुरवात केल्याने वडिलांचा आणि माझा नाईलाज झाला. बाईंनी माझे डोळे पुसले आणि मला समजावत वर्गात नेले. वडिल मात्र झाल्या प्रकाराने फारच वैतागले होते. 

वर्गात गेल्यावर कोणीही वॉटर बॉटल घेवून आलेले नव्हते. हे पाहून मला स्वत:साठी फारच वाईट वाटले. उद्या वॉटर बॉटल दुरुस्त करून घेवून येवू या आशेने माझ्या निराश मनाला खूपच उभारी दिली. दिवस मजेत गेला. 

घरी आल्यावर मात्र त्या वॉटर बॉटलला बघून पुन्हा एकदा निराशेने मला घेरले. सकाळी ती ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत ती आताही होती. मला वडिलांचा राग आला. 'दुरुस्त करून ठेवतो 'असे बोलून आशा जागृत करून त्यांनी मात्र तिच्यावर काहीच काम केले नव्हते. मी माझ्या बाल मनात येतील ते सगळे उपाय करून बघितले. तिचे गळणे मात्र अखंड सूरू होते. उलट आता ती जास्त वेगाने गळू लागली होती. माझी खटपट बघून आईने समजावले," हिच्या नादात आज पप्पांना कॉलेजला जायला उशीर झाला... आता ते आल्यावर हिचा विषय सुद्धा काढू नकोस. ते चिडतील.... मार खायचा नसेल तर डोळ्या आड कर हिला.... पैसे वाया गेल्याने ते आधीच चीड चीड करत होते." 

वडिलांचा राग, चीडचीड मी समजू शकत होते. त्यांना वॉटर बॉटल घ्यायच्याच नव्हत्या. त्यात हि नाजूक वॉटर बॉटल त्यांना पसंत नव्हती. भरीस भर वॉटर बॉटल त्यांच्याकडूनच फुटली होती. वस्तू घेतली तर तिची किंमत वसूल होईपर्यंत तिचा वापर केला जाणं आम्हा मध्यमवर्गीयांना अपेक्षित असतं.  परंतू इथे ती संधीच मला मिळली नव्हती. त्यामुळे ते माझ्यावर रागावू शकत नव्हते. या सगळ्या गोंधळात पैसे वायाही गेल्याची खंत होतीच.  मीही मग सत्य स्वीकारत वॉटर बॉटल चे दुःख मनात दडपून टाकले. 

इतक्यात भावाने घरात वॉटर बॉटल, दप्तर आणून टाकून दिले. तो खेळायला जाण्याची तयारी करु लागला.. आता भावाकडे वॉटर बॉटल होती तिलाच एखाद दिवशी शाळेत नेवून भाव खाता येईल का? असा एक मार्ग अजूनही शिल्लक होता. त्या उद्देशाने मला बरेच परिश्रम घ्यावे लागणार होते. भावाची अनेक कामे बिनबोभाट करावी लागणार होती. त्याची मर्जी संपादन करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार होत्या. मीही हार मानणाऱ्यातली नव्हते. सगळया कष्टासाठी मानसिक तयारी सुरू केली. मोह अनावर होऊन मी त्याच्या बॉटलकडे धाव घेतली. त्यानेही माझे मन ओळखले. मी काही बोलण्या आधी तोच बोलला," तुला हवी आहे का ही बॉटल? ..... घेवून टाक" 

त्याच्या या बोलण्याने मी खूपच आनंदून गेले. मी लगेच वॉटर बॉटलला उचलून छातीशी कवटाळले. तो उपकाराची भावना न दाखवता खेळायला पळून गेला.  मी बॉटल मिळली या आनंदातच तीला न्याहाळू लागले आणि माझ्या लक्षात आले. तिचा बेल्ट तुटला होता. त्याने गाठ मारून बेल्ट हूकात अडकवला होता. माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. आता मात्र वडिलांचा मला ओरडा खावा लागणार, याची खात्री झाली. 

त्याही परिस्थितीत मी माझ्या बॉटलकडे बघितले. तिचा बेल्ट व्यवस्थित होता. अचानक एक कल्पना डोक्यात आली. मी माझ्या बॉटलचा बेल्ट कापून भावाच्या बॉटलला लावला तर? ... परंतू नंतर माझ्या लक्षात आले. या  बॉटलच्या झाकणाला उभी  चीर गेली होती. 

मी  लगेच माझ्या बॉटलचे झाकण काढून त्याच्या बॉटलला लावले. एक प्रश्न मिटला. आता या बॉटलचा बेल्ट काढून तीला जोडायचा होता.  , दुसरीला जोडतांना हुकातून बेल्ट व्यवस्थित काढून मला सुई दोऱ्याने त्याला पुन्हा टाचावे लागणार होते. यासाठी मला आईची मदत लागणार होती. निदान एक बॉटल तरी वापरात येईल या आशेने आईनेही लगेच मदत केली.

माझा आनंद गगनात मावेनासा झाला. उत्साहात मी वॉटर बॉटल भरली आणि खांद्याला अडकवली. पाण्याचे ओझे बॉटलला पेलवत नाही हे लक्षात येवून मी लगेच खालच्या बाजूने बॉटलला आधार दिला. तिच्या छोट्या नळीतून मी बराच वेळ पाणी पीत बसले होते. 

हि बॉटल नव्यासारखी नक्कीच नव्हती परंतू माझे काम भागणार होते. उद्याची स्वप्ने रंगवत मीही मग दुसऱ्या उद्योगांना लागले. खेळून घरी परतल्यावर भावाने दुरुस्त केलेली बॉटल बघितली आणि त्याचे मन बदलले. आमची वादावादी सुरू झाली. परंतू तो ऐकायला तयार नव्हता. मला फारच हतबल वाटू लागले. मीही जीवाच्या आकांताने माझी बाजू मांडू लागले. आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही. आता  बाहेरून आल्यावर त्यातून पाणी पीत तो मला सांगू पहात होता की ती बॉटल त्याचीच आहे.  बराच वेळ तो ती बॉटल जवळ घेवून बसला होता.  आपली फसवणूक झाली असे वाटून मी दुःखी  झाले होते. 

संध्याकाळी वडील आले. एक वॉटर बॉटल उत्तम स्थितीत बघून त्यांना हायसे वाटले. आईने त्यांना सगळे सविस्तर सांगितले. आम्ही बेल्ट कसा जोडला आहे ते बघण्यासाठी वडीलांनी ती बॉटल उचलली आणि पाण्याचे काही थेंब गळायला लागले. बॉटल कुठून गळते आहे हे काही कळले नाही. तरी बॉटल गळत होती हे बघून वडिलांनी तीला पुन्हा पाण्याने पूर्ण भरले. आता त्या पाण्याच्या ओझ्याने तिच्या एका बाजूने टाचलेला बेल्ट तुटला. तिने हवेतच एक जोरात हिंदोळा खाल्ला. वडिलांनी तीला लगेच हातात धरले,"  बेल्ट फारच नाजूक आहे.... यामुळेच बहुदा सकाळी या  हातातून  खाली पडल्या" अशी टिप्पणी केली. बॉटल गळण्याचा वेग फार नसल्याने कुठून गळते आहे हे लक्षात येत नव्हते. अखेर कंटाळून वडिलांनी ती बॉटल खिडकीत ठेवून दिली. वडिल आम्हाला उद्देशून  रागाने बोलले," आता शेवटचे सांगतो या बॉटलसाठी तुम्ही पुन्हा भांडणे केलीत तर तुम्हा दोघांनाही दणके देईल. आपापल्या कामाला लागा. या बॉटल मधील पाण्याची पातळी कमी झाली तर बॉटल गळते आहे हे निश्चित.  दोन्ही बॉटलचे पैसे वाया गेल्यातच जमा आहेत. आता आणखी भांडणे नकोत. इथून पुढे मला कोणतीही वस्तू घेण्याचा आग्रह करायचा नाही. राहील लक्षात....." माझ्या भावा कडे बघून वडील बोलले," तू रे.... सकाळी तर तुझी बॉटल ठीक होती. तिचा बेल्ट कसा तुटला. " 

तसा भाऊ आपण कसे निर्दोष आहोत हे सांगू लागला," पप्पा मी वर्गात पोहचलो तेव्हा तिचा एकिकडचा बेल्ट तुटून हातात आला. मग मी घाईतच तीला बेंचवर ठेवले. थोड्या वेळात माझ्या मित्राचे दप्तर ओले झाले म्हणून त्याने मला बॉटल उचलायला सांगितली. मग आम्ही दोघांनी  वॉटर बॉटलचे पाणी पिऊन संपविले. बेल्ट गाठ मारून जोडला.  रिकामी बॉटल दप्तरात ठेवून दिली. मला नाही माहित बॉटल गळायला कशी लागली? तिचा बेल्ट कसा तुटला.?" 

त्यावर वडील थोडे खजील होत बोलले," सकाळीच पडली तेव्हा तिलाही मार बसला असणार. तेव्हा आपल्या लक्षात आले नाही. तुझी आणि मित्राची वह्या पुस्तके तर खराब झाली नाहीत ना?" 

त्यावर तो बोलला," नाही.... दोघांची वह्या पुस्तके खराब झाली नाहीत . त्याचे दप्तर मात्र एका ठिकाणी थोडे ओले झाले होते. " 

हा सगळा घटना क्रम अतिशय निराशाजनक असल्याने," असू द्या.... आता या वॉटर बॉटलचा नाद सोडून द्या. भांडणे करु नका. आपापल्या कामाला लागा. " 

असे म्हणत त्यांनी हा विषय बंद केला.

आशा इतकी वाईट असते की अनेकदा वास्तवाचे भान विसरून आपण चमत्काराची अपेक्षा करु लागतो. मलाही अशाच चमत्काराची अपेक्षा होती. 'निदान ही वॉटर बॉटल गळू नये' ही अपेक्षा मनात घर करून होतीच. बऱ्याच वेळाने जेव्हा त्या बॉटल कडे लक्ष गेले तेव्हा पाण्याचा एक ओघळ खिडकीच्या कट्या वरून खाली येवून खाली पाणी साठलेले दिसले आणि सगळ्याच भावना अचानक बोथट झाल्या.

जणू काही कधीच मी माझ्या आवडीची वॉटर बॉटल खरेदी केली नव्हती. माझा जीव कधीच तिच्यात गुंतला नव्हता.आशा आविर्भावात मी माझ्या मैत्रिणीकडे खेळायला निघून गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार होवून शाळेत गेलो. 

त्यानंतर अनेक वर्षे आम्ही असेच शाळेत जात होतोच. त्या दिवसा नंतर मी मात्र शालेय जीवनात वॉटर बॉटल या संकल्पनेला कधीच भुलले नाही. हा एक अतिशय ताप दायक प्रकार आहे हिच धारणा अनेक वर्षे कायम होती.

आम्ही दोघे माध्यमिक शाळेत असताना आईने मात्र  पुन्हा हौशेने मिल्टनची वॉटर बॉटल घरी आणली होती. त्यात थंड पाणी बराच वेळ थंड रहायचे, झाकण हरवू नये म्हणून झाकणाला बॉटलशी जोडून ठेवणारी बारीक अशी साखळी होती.  मोतिया आणि मरून रंगाची भरपूर पाणी सामावून घेणारी भारदस्त अशी हि बॉटल आमच्या घरात आली तेव्हाही बॉटल एक आणि आम्ही तिघे असा पेच पडला होताच. यावर उपाय म्हणून आईने आठवड्याचे शाळेचे दिवस आमचा तिघांमध्ये वाटून दिले होते. भाऊ त्याच्या पहिल्याच दिवशी वॉटर बॉटल शाळेच्या स्टेडियमवर विसरून आला.  नशिबाने हि वॉटर बॉटल आधी माझ्या बहिणीकडे बघितलेल्यांनी  तीला ती नेऊन दिली.  भावाचा दिवस असतांना तो रिकाम्या हाताने परतला तेव्हा आईला फारच घोर लागला होता. थोड्याच वेळात मात्र बहिणीने  ती वॉटर बॉटल  तिच्या सोबत घरी आणली होती. आईला तिखट मीठ लावून घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यामुळे त्याचा नंबर या यादीतून कायमचा वगळण्यात आला होता. या सगळ्या प्रकारात रोज लागणाऱ्या तहानेला दोन दिवस मिळणारे घरचे थंड पाणी कसे पूरेल? हा प्रश्न मला पडला होताच. त्यात भावाला आईचा मिळालेला ओरडा बघता, शाळेचा नळ आणि हाताची ओंजळ हीच उत्तम सोय आहे हे माझ्या मनात पक्के झाले.

 वॉटर बॉटलही गरज असण्यापेक्षा जबाबदारीच अधिक होती.

नळ, हापसा, पाणपोई असे अनेक प्रकार उपलब्ध असतांना उगाच खांद्याला वॉटर बॉटलचे ओझे नको या विचाराने मी स्वतः आईच्या वॉटर बॉटल दिवसाच्या त्या यादीतून माझे नाव मागे घेतले होते. रिकाम्या वॉटर बॉटलचे ओझे इतके होते की ताईनेही काही दिवसातच त्या यादीत न रहाणे पसंत केले.

आता या वॉटर बॉटलचा वापर परीक्षेला जातांना, सहीलीला, प्रवासाला जातांना होवू लागला. बाकी वेळ हि वॉटर बॉटल घरीच असे. त्यामुळे तिचा लळा असा लागलाच नाही.  

हल्ली मात्र मी माझ्या लेकासाठी वॉटर बॉटल घेतांना त्याची पसंती, बॉटलचा टिकाऊपणा, माझे बजेट या सगळया कसोट्यांवर योग्य असणाऱ्या वॉटर बॉटलचीच निवड करण्याचा  प्रामाणिक प्रयत्न करते. प्रत्यक्षात मात्र लेकाच्या पसंतीच्या अनेक वॉटर बॉटल खरेदी करून त्यांच्या वापरानंतर लक्षात आलेल्या त्रुटींमुळे घरात पडून राहतात. आता शाळेत पिण्याच्या पाण्याचे नळ नाहीत. हापासा सहज डोळ्याने दिसत नाही. त्यावर मोटर बसवून वरच्या टाकीत पाणी चढविले जाते. हाताच्या ओंजळीने पाणी पिणे अगदीच संस्कार बाह्य समजले जाते. अशा परिस्थितीत लेकाचा पुन्हा नवीन वॉटर बॉटलचा शोध सूरू होतो आणि मीही मग त्या शोधाचा एक भाग होवून जाते.

एक मात्र ध्यानात आले आहे की, पिढी बदलत गेल्या तरी कुठलीच वॉटर बॉटल परफेक्ट नसते आणि परफेक्ट असणारी बॉटल ही आपल्या पसंतीची वॉटर बॉटल कधीच होऊ शकत नाही.  तसेच या वॉटर बॉटल खरेदी नंतर पालकांना तरी समाधान मिळते किंवा पाल्याला तरी आनंद अनुभवता येतो. इथे एकाच दगडात दोन पक्षी मारता येत नाहीत. तात्पर्य एकाच खरेदीत दोघांनाही खुश करता येत नाही.

©️ अंजली ममीनानाथ धस्के




No comments:

Post a Comment